Monday, March 6, 2017

मनसेचे भवितव्य काय?

ताज्या महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणूकात महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुठल्या कुठे दूर फ़ेकली गेली आहे. तसे बघितले तर अडीच तीन वर्षापुर्वी लोकसभा निवडणूकांचा जो झंजावात आला, त्यातच मनसेचा पालापाचोळा व्हायला सुरूवात झालेली होती. त्यात पराभवाची चव चाखावी लागली, तेव्हाच राज ठाकरे यांच्या मागे असलेले अनेक सहकारी त्यांना सोडून जाऊ लागले होते. राम कदम हा आमदार विधानसभेचे वेध लागताच जिंकू शकणार्‍या भाजपात दाखल झाला होता, तर आणखी कोणी शिवसेनेत निघून गेला होता. पण राज ठाकरे यांनी जिद्दीने विधानसभेची लढाई लढवली होती. राष्ट्रीय झंजावातामध्ये स्थानिक पक्षाचा नेहमीच धुव्वा उडालेला आहे. आज आपल्याला शिवसेना हा प्रादेशिक पक्ष मोठा प्रभावी वाटतो. पण आरंभीच्या काळात आपली राजकीय विश्वासार्हता प्रस्थापित करताना, बाळासाहेब ठाकरे यांनाही अनेक पराभव पचवावे लागलेले आहेत. १९७१ सालात अशीच इंदिरालाट उसळली, त्यात अनेक जुनेपुराणे पक्ष वाहून गेले. त्यात शिवसेनेच्याही नाकातोंडात पाणी गेलेले होते. मुंबईच्या आपल्या बालेकिल्ल्यात शिवसेनेला नामुष्की म्हणावा, तसा पराभव चाखावा लागला होता. ३० पैकी १९ नगरसेवक असलेल्या उत्तर मध्य मुंबईत मनोहर जोशी लोकसभा निवडणूकीत एक लाख मतांनी पराभूत झाले. बाकी सांगायला नको. पण त्याही नंतर १९७२ च्या विधानसभा निवडणुकीतही इंदिरालाट कायम होती आणि नवलकर वगळता सेनेला एकही अधिक आमदार निवडून आणता आला नाही. मात्र त्यामुळे शिवसेना संपली नाही, की बाळासाहेब नाऊमेद झाले नाहीत. त्यांचे काही सहकारी त्यांना सोडून गेले. पण शिवसेना टिकून राहिली. कारण कुठल्याही पराभवाने नाऊमेद होऊन जाण्याइतके साहेब लेचेपेचे नव्हते. तसेच कुरकुरत बसण्याइतके उथळही नव्हते. प्रसंगाला ओळखून निर्णय घेण्याची त्यांची कुवतच सेनेचे खरे बळ होते.

त्यानंतर १९७७ सालात जनतालाट आली आणि त्यात आधीच्या इंदिरालाटेवर स्वार झालेला कॉग्रेस पक्ष वाहून गेला, तर शिवसेनेची काय कथा? पण तोही पराभव पचवून शिवसेनाप्रमुख ठाम उभे राहिले होते. पुढल्या काहीकाळ तर अनेकजण त्यांना सोडून गेले आणि प्रसंगी निवडणूकाही लढायचे सोडून, त्यांनी आपल्या नेतृत्वाची कसोटी दिलेली होती. इंदिरालाट, जनतालाट, पुन्हा इंदिरालाट व इंदिरा हत्येनंतरची राजीवलाट, असे अनेक चढउतार पचवणार्‍या शिवसेनेला खरा दणका बसला तो गिरणी संपानंतरच्या सामंत प्रभावाने. त्यात गिरणगावातील सेनेला बालेकिल्लाच सामंतांनी बळकावला होता. पण त्यातूनही टिकून राहिलेल्या शिवसेना व बाळासाहेबांनी थेट स्वबळावर महापालिकेची सत्ता मिळवली आणि नंतर राज्यव्यापी पक्ष होत शिवसेनेला राज्यातील एक प्रमुख पक्ष म्हणून प्रस्थापित केले होते. त्यात बाळासाहेबांच्या पराभव पचवण्याच्या क्षमतेची जितकी कसोटी लागली, तितकीच वेळप्रसंगी माघार घेण्याच्या लवचिकतेही परिक्षा होऊन गेली होती. अशा कुठल्याही पराभवानंतर त्यांनी आपल्या पाठीराख्यांची हिंमत खच्ची होऊ दिली नाही, की सत्तेसाठी शिवसैनिकांना मान खाली घालण्याची पाळी आणली नव्हती. आपले स्वतंत्र स्थान राखूनच त्यांनी तडजोडी केल्या आणि प्रसंगी सत्तेलाही लाथ मारण्याचे धाडस दाखवले होते. जे निष्ठावान कायम टिकून राहिले, त्यातून त्यांनी नेतृत्वाची नवी पिढी उभी केलेली होती. लढण्याची व झुंजण्याची क्षमता व इच्छा असलेले सहकारी हे बाळासाहेबांचे खरे बळ राहिलेले होते. म्हणून ते अपयश पचवू शकले, तितकेच यशही पचवू शकले होते. कशाचेही त्यांना अजिर्ण झाले नाही वा गर्वही झाला नाही. व्यक्तीगत रागलोभाचाही त्यांच्या निर्णयावर कधी प्रभाव पडला नाही. तेच खर्‍या राजकीय नेत्याचे बळ असते आणि राज ठाकरे यांनी त्याची साक्ष काही प्रसंगी दिलेली आहे.

सहा वर्षापुर्वीच्या कल्याण-डोंबिवली महापालिकेत त्यांनी युतीला बिनशर्त पाठींबा देऊन मनाचा मोठेपणा दाखवला होता आणि नंतर ठाणे महापालिकेत शिवसेनेचे तिथले आमदार घरी आल्यावर त्यांनी मनसेचा बिनशर्त पाठींबा ठाण्यातही युतीला देऊन टाकला होता. तसे बघितले तर अशा कितीही कमी जागा असल्या तरी अडचणीच्या प्रसंगी पक्ष वा नेता नेहमी सौदीबाजी करीत असतो. उपरोक्त दोन्ही प्रसंगी राज ठाकरेही बारीकसारीक सौदा करून काही अधिकारपदे पक्षाला मिळवू शकले असते. पण तसे घडले नव्हते. ही नेतृत्वाची खरी कसोटी असते. नंतर नाशिक महापालिकेत सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आल्यावर त्यांना सत्तास्थापनेसाठी काही नगरसेवकांची गरज होती. तितकी संख्या शिवसेनेकडे होती. तसा पाठींबा सेनेने ठाण्याच्या बदल्यात द्यायला काहीही हरकत नव्हती. पण तो दिला गेला नाही आणि ठाण्यामध्ये मग मनसेनेही सेनेला निर्विवाद पाठीबा देण्यात टाळाटाळ केली. स्थायी समिती व अन्य बाबतीत शिवसेनेचीच तारांबळ उडालेली होती. मात्र नाशिकात राजनी भाजपाशी हातमिळवणी करून सत्तेची सुत्रे हाती घेतली. शिवसेनेचाच एक घटक असल्यासारख्या या नव्या पक्षाला आपल्या मदतीला घेऊन वा त्याच्या मदतीला जाऊन, सेना नेतृत्वाला राजकीय समजुतदारपणा दाखवता आला असता. पुढल्या भाजपा विरोधातल्या लढाईत तोच उपयुक्तही ठरला असता. पण सेनेचे नवे नेतृत्व तितका समजूतदारपणा कधीच दाखवू शकले नाही. व्यक्तीगत वाद वा भांडण आणि राजकारणाची गल्लत करण्यातच आजच्या सेनेचे नुकसान होत गेले आहे. आपणच अडचणीत असतानाही व्यक्तीगत हेवेदावे बाजूला ठेवण्याची सदबुद्धी दाखवली गेली नाही. ती याहीवेळी राज ठाकरे यांनी दाखवली. पण त्याचे योग्य मूल्यमापन सेनानेतृत्व करू शकले नाही. ही बाब सेनेसाठी जितकी घातक असणार आहे, तितकी मनसेला लाभदायक ठरू शकणार आहे.

ज्यांनी मागल्या अर्धशतकातील शिवसेनेची वाटचाल जवळून बघितली आहे, त्यांना एक गोष्ट मान्य करावी लागेल, की बाळासाहेबांच्या कारकिर्दीत पराभवही शिवसैनिक आनंदाने स्विकारू शकला होता. शिवसैनिकाला अन्य पक्षात सामावून जाणे अशक्य असते. कारण त्याची झुंजण्याची क्षमता होय. झुंजण्याची खुमखुमी ज्याच्यात नाही, तो शिवसैनिक असूच शकत नाही. म्हणूनच शिवसैनिकाला अन्य पक्षात सामावून जाणे शक्य होत नाही. त्याला झुंजणारा लढणारा नेता भावतो. स्वाभिमानासाठी सत्ता वा लाभावर लाथ मारणारा नेता, शिवसैनिकाला हवा असतो. आजही त्याला बाळासाहेब भावतात, कारण त्यांनीच त्याला झुंजायला शिकवले आहे. त्यातलाच एक गट बाजूला होऊन मनसेत दाखल झाला होता. आपल्या कारकिर्दीत प्रत्येक पिढीतला झुंजणारा तरूण बाळासाहेबांच्या भोवती एकवटत गेला. आज त्याचे प्रतिबिंब नव्या शिवसेनेत पडत नसेल, तर नव्या पिढीतल्या तरूणाला पर्याय शोधावा लागणार आहे. लागतो आहे. म्हणून तर मनसेमध्ये अजून धुगधुग दिसते आहे. भाजपाच्या आव्हानाला सेना समर्थपणे सामोरे जाऊ शकली नाही, म्हणून तो पक्ष मुंबईत बाजी मारू शकला. त्यामुळे विचलीत झालेला मराठमोळा तरूण यापुढेही सत्तेसाठीच्या तडजोडी बघून वेगळा विचार करू शकेल. त्याच्यासाठी शिवसेनेच्याच मुशीतला आणखी एक पर्याय आहे. मनसे हा तो पर्याय असू शकतो. म्हणूनच मध्यंतरीच्या कालखंडात मुसंडी मारलेल्या वा आज मागे पडलेल्या मनसेचे खरे आव्हान आता शिवसेनेला पेलावे लागेल. अर्थात आमदार व नगरसेवक यांची संख्या घटल्यानंतरही राज ठाकरे आपल्या खर्‍या पाठीराख्यांवर विसंबून किती खमकेपणाने पुढल्या राजकारणासाठी उभे रहातात, यावर त्यांचे भवितव्य अवलंबून असेल. तीन निवडणूकातले पराभव पचवून राज कितीसे ठामपणे टिकण्याची लढाई लढतात, यातूनच त्याचे उत्तर मिळू शकेल.

(१/३/२०१७)

3 comments:

  1. एक उत्तम विरोधी पक्ष म्हणून काम करणे... सध्यातरी हेच हातात आहे... आणि शिवसेना द्वेष कमी केल्यास फायदा होईल त्यांना...

    ReplyDelete
    Replies
    1. Raaj sahebaani shivsenecha dvesh bish kadhich kelela nahi.... Tyache 2 ullekh bhaunchya lekhatch aahet....

      Delete
  2. Raaj sahebaani shivsenecha dvesh bish kadhich kelela nahi.... Tyache 2 ullekh bhaunchya lekhatch aahet....

    ReplyDelete