Saturday, March 25, 2017

शिवसेनेचे भवितव्य काय?

shivsena bjp के लिए चित्र परिणाम

प्रचलीत राजकारणाला उत्तरप्रदेशच्या निकालांनी मोठा धक्का दिलेला आहे. याचा अर्थ शोधण्यात व आपल्या आजवरच्या भूमिकेला कशामुळे हादरे बसले ते शोधण्यात, सध्या देशातले तमाम मोदी विरोधक गर्क आहेत. ते अजूनही चाचपडत आहेत. अशावेळी महाराष्ट्रात प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेला काही शिकण्याची गरज आहे. कारण यात जे पक्ष राजकारणातून उखडले जात आहेत, त्यांच्या पंक्तीत जाऊन बसायचे, की आपली स्वतंत्र भूमिका ठेवून प्रचलीत राजकारणात आपले अस्तित्व राखऊन ठेवायचे; हे सेनेला ठरवावे लागणार आहे. मुंबईत भाजपाने मारलेली मुसंडी व महाराष्ट्राच्या स्थानिक संस्थांमध्ये त्या पक्षाला मिळालेले यश, ही कॉग्रेसपेक्षाही शिवसेनेसाठी चिंतनाची बाब आहे. कारण राष्ट्रवादी व कॉग्रेस आता अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहेत. खरेतर या दोन्ही पक्षांनी मागल्या दोन दशकात पुर्वीच्या शेकाप, समाजवादी व साम्यवादी पक्षांच्या धोरणाचा अंगिकार करून, आपल्याच अस्तित्वाला सुरूंग लावून घेतला होता. शिवसेनेला मिळणारा प्रतिसाद ओळखून त्याच पक्षांनी आपल्या भूमिका निश्चीत केल्या असत्या आणि हिंदूत्व किंवा भाजपा-सेनेच्या विरोधात काहूर माजवण्याचा मोह टाळला असता, तर त्यांचा इतका र्‍हास झालाच नसता. पण माध्यमात बसलेल्या सेक्युलर शहाण्यांच्या आहारी जात राष्ट्रवादी व कॉग्रेस यांनी आपल्या भूमिकांचा मार्ग बदलत नेला. आज त्याचेच परिणाम दोन्ही पक्षांना भोगावे लागलेले आहेत. हळुहळू शिवसेना त्याच मार्गाने जाताना दिसत आहे. नोटाबंदीपासून सेनेने क्रमाक्रमाने सेक्युलर पक्षांची कास धरलेली दिसली. ममता बानर्जी व केजरिवाल यांच्या पंक्तीला जाऊन बसताना, शिवसेना आपल्या वेगळ्या भूमिकेला विसरून गेली. त्याचा फ़टका तिला फ़ेब्रुवारीतल्या मतदानातही बसला आहे. पण काय चुकले ते शोधण्यापेक्षा, चुकांचेच अनुकरण हट्टाने चालू आहे.

सतत मोदीविरोधी बोलले वा मुखपत्राने लिहीले, मग अन्य वर्तमानपत्रात त्याला ठळक प्रसिद्धी मिळते. मग तीच सेनेची भूमिका म्हणून भाजपाला डिवचण्यासाठी त्याच्या बातम्या होतात. परिणामी केंद्र व राज्यातील सरकारशी असलेले सेनेचे संबंध अधिकच बिघडत चालले आहेत. विरोध करताना राज्यातील विषय वेगळे असतात व केंद्रातील विषय वेगळे असतात. याचे भान शिवसेनाप्रमुखांनी नेमके पाळलेले दिसून यायचे. पण आजच्या सेनेला त्यातले तारतम्य राहिलेले नाही. उदाहरणार्थ मठाचे व्यवस्थापन व राज्याचे प्रशासन यात फ़रक असतो, अशी शेलकी भाषा शिवसेनेच्या भूमिकेत आलेली आहे. त्याची लगेच बातमी झळकली. बाळासाहेबांच्या कारकिर्दीत त्यांनी काय म्हटले वा मतप्रदर्शन केले, ते वाचण्यासाठी लोकांना सेनेचे मुखपत्र घ्यावे लागत होते. क्वचितच कधी त्यातल्या अग्रलेखाची बातमी अन्य वर्तमानपत्रात छापली जायची. आजकाल सेनेचे मुखपत्र हे अन्य वर्तमानपत्रांच्या बातमीचा विषय झाला आहे. यातच गंमत लक्षात येऊ शकेल. या मुखपत्राचा खप किती आहे आणि सेनेचे पाठीराखे किती आहेत, त्याचे गणित मांडले तरी मुखपत्राचा हेतू पराभूत झाल्याचे सहज लक्षात येऊ शकते. योगी आदित्यनाथ यांच्यावर टिकेची झोड हिंदूत्वाची झुल पांघरलेली शिवसेना कशाला करते? केवळ योगी भाजपाचे मुख्यमंत्री आहेत म्हणून त्यांच्यावर झोड उठवली जात आहे, की त्यांची निवड नरेंद्र मोदींनी केली म्हणून त्यांना झोडपणे, हा सेनेसाठी नियम झाला आहे? अशा वक्तव्यातून अकारण हिंदूत्ववादी आपल्यापासून दुरावतील, याचेही भान सेनेला उरलेले नाही काय? एकूणच सध्या शिवसेना कुठे भरकटत चालली आहे, त्याचा अंदाज येत नाही. पण तिच्यावर आता बाळसाहेबांच्या भूमिकांचा प्रभाव राहिलेला नाही, हे मान्य करायची पाळी आली आहे. मायावती व मुलायमचा धुव्वा कशामुळे उडाला तेही सेनेच्या लक्षात आले नसेल, तर तिचे भवितव्य अवघड आहे.

गेल्या तीन वर्षात मुलायम मायावतींसह राहुल गांधी यांनी सतत मोदींवर तोफ़ा डागलेल्या आहेत. कुठलाही निर्णय असो किंवा वक्तव्य असो. मोदींची खिल्ली उडवणे, हा जणू तथाकथित पुरोगामी पक्षांसाठी नियम होऊन बसला आहे. त्याचेच अनुकरण करीत मुलायम मायावतींनी आपले राजकारण लोकसभेनंतरही चालू ठेवले. सेनेने विधानसभेत युती तुटल्यानंतर भाजपाशी वैर घेतले तर समजू शकते. पण त्याच शत्रुत्वाचा अविष्कार कुठल्याही नंतरच्या निवडणूकीत व्हायला पाहिजे. तिथे सतत सेनेला मागे टाकून भाजपा पुढे सरकताना दिसतो आहे. सहाजिकच सेनेने शिवीगाळ केल्याने भाजपाचे काहीही बिघडलेले नाही. कारण त्या पक्षाचे कुठलेही राजकीय नुकसान सेना करू शकलेली नाही. कारण राज्यातील संबंध व केंद्रातील राजकारण यातले तारतम्य सेनेला अजिबात राखता आलेले नाही. तिथेच तिची राजकीय घसरण सुरू झालेली आहे. मुंबई महापालिकेत भाजपा आपल्या बरोबरीला पोहोचला, त्याचे वैषम्य सेनेला अजिबात वाटलेले नाही. इतक्या टोकाचा विरोध असेल तर सरकारमधून बाहेर पडण्याची हिंमत लागते. तीही दाखवणे सेनेला शक्य झालेले नाही. त्यामुळेच सत्तेसाठी अगतिक असलेली सेना, आपल्या कुरकुरण्याने जनमानसातील आपले स्थान गमावत चालली आहे. हे ऐकायला आज आवडणार नाही. पण जेव्हा पुढल्या मतदानाचे निकाल येतील, तेव्हा त्याची जाणिव होईल. शिवसेना हळुहळू कॉग्रेसच्याच दिशेने चालली आहे. आज कॉग्रेसची दुर्दशा कोणी केली, त्याचे उत्तर राज्यसभेत बसलेले आहे. ज्यांना लोकांमध्ये जाऊन निवडून यावे लागत नाही, अशा लोकांच्या हाती आजची कॉग्रेस फ़सलेली आहे. हायकमांड म्हणतात, ते सर्व राज्यसभेत आहेत आणि शिवसेनेचे श्रेष्ठी बहुतांश विधान परिषदेत बसलेले आहेत. त्यामुळे त्यापैकी कोणालाच लोक काय म्हणतील, त्याची फ़िकीर नाही. मग पुढे काय वाढून ठेवलेले असेल?

मोदी चुकीचे आहेत व वाईटच आहेत, असे सेनेला वाटण्यात काही गैर नाही. ज्याला आपण विरोधक म्हणतो, त्याच्या विरोधत कंबर कसून उभे रहाता आले पाहिजे. त्याला सार्वजनिक जीवनातून पराभूत करता आले पाहिजे. आपली सर्व शक्ती त्यासाठी पणाला लावली पाहिजे. नुसती तोंडाची वाफ़ दवडून विरोधकांचा पराभव शक्य नसतो. तसे असते तर कम्युनिस्ट, समाजवादी वा शेकाप इत्यादी पक्षांना शिवसेना पराभूत करू शकली नसती. सेनेच्या स्थापनेपासून सेनेच्या विरोधात याच राजकीय पक्षांनी सातत्याने टिकेची झोड उठवली होती. पण त्यांना सेनेला पराभूत करता आले नाही. उलट तेच संपून गेले. शिवसेना त्यांच्या विरोधात ठाम उभी राहिली आणि आपल्या बळावर तिने राजकारणात आपले स्थान निर्माण केले. पण आजची शिवसेना फ़क्त आपल्या विरोधकांना तोंडाची वाफ़ दवडून आव्हान देताना दिसते. आपण कुठल्या कात्रजच्या घाटात फ़सलो, त्याला पालिका मतदानात पत्ता लागलेला नाही. असे लोक शाहिस्ते खानाची बोटे छाटल्याची भाषा करतात, त्याची दया येते. आदित्यनाथ यांची खिल्ली उडवून महाराष्ट्रात सेना कशी मजबूत होणार, याचे उत्तर कोणाकडे आहे काय? नसेल तर दिवसेदिवस सेना हास्यास्पद कशाला होते आहे, त्याचा जरा शोध घ्यावा. शेकाप, समाजवादी वा कम्युनिस्टांनी शोध घेतला नाही, त्यांचे आज नामोनिशाण शिल्लक राहिलेले नाही. कारण काळ कोणासाठी थांबत नाही. संयुक्त महाराष्ट्र समितीतल्या पक्षांना मराठी माणुस ही आपली मक्तेदारी वाटलेली होती. त्यांना मराठी माणसाने दाद दिली नाही व आपली हक्काची शिवसेना जोपासली. त्याच सेनेच्या नेतृत्वाला ही मराठी धारणा ओळखता आली नाही, तर शिवसेनेला भविष्य नसेल. कारण मराठी अस्मिता ही कोणाची मक्तेदारी नाही. पाठीराख्यांना जिंकून देणारा नेता आवडतो व हवा असतो. त्याचा विसर पडलेल्या नेतृत्वाला भवितव्य नसते.

5 comments:

  1. फक्त "भारत विरोध" या एककलमी कार्यक्रमाचे पाकीस्तानचे जे झाले तेच सेनेचे झाले तर आश्चर्य वाटू नये

    ReplyDelete
  2. भाऊ, कोणताही पक्ष अस्तंगत होत नाही, काँग्रेस ncp अस्तंगत होत आहे असे तुम्ही म्हणता पण तसे अजिबात वाटत नाही. सर्व विचारधारेचे लोक समाजात असतात आणि ते आपल्या पक्ष्याला जिवंत ठेवतात. भाजपचा up मध्ये विजय झाला हे खरे आहे पण मागील 2 विधानसभांच्या निकालावरून तेथील नागरिक एका पक्ष्याला निवडून देत आहेत, तेच यावेळी केले, बाकी राज्यात कुठे प्रभाव पडला त्यांचा. मुद्दा इतकाच कि कोणीही संपणार नाही, परत जिवंत होतील कदाचित सत्तेतेही येतील, इंडिया श्यायनिंगचा फुगा कसा फुटला होता ते आठवा, फेसबुक आणि व्हाट्स अँप वरचा विकास जनतेला जास्त दिवस भुळवू शकत नाही,

    ReplyDelete
  3. भाऊ,सेनेला सध्या भाजपा सोबत जमवुन घेत पुढे जाणेच सोईस्कर असेल २ खांग्रेस बरोबर गेले तर संपले हे लक्षात घेणे गरजेचे आहे मारामारी करताना लाज वाटायला हवी होती जणु जन्म विमानात झाल्या प्रमाणे वागतायत किंवा अफवा पसरवुन काय फायदा??

    ReplyDelete
  4. कशाला उगीच.... ते आहेत दीड शाहणे....

    ReplyDelete