Saturday, March 18, 2017

मोदी आणि योगी

modi yogi के लिए चित्र परिणाम

उत्तरप्रदेशचे नवे मुख्यमंत्री म्हणून गेल्या आठवडाभर अने्क नवे स्पर्धेत होती. खरे म्हणजे अशी कुठलीही नावे स्पर्धेत नव्हती. कारण कुठलीही स्पर्धाच नव्हती. पण आपण सर्वात आधी बातमी देतो, अशी एक स्पर्धा मागल्या दोन दशकात सर्व वाहिन्यांवर चालू असल्याने प्रत्येकाला आपणच नेमका मुख्यमंत्री आधी सांगितला, अशा श्रेयाची भुक लागलेली असते. त्यासाठी मग भेटेल त्या वा सापडेल त्या भाजपाच्या वरीष्ठ नेत्याला पकडून त्याचे अंदाज घेतले गेले. विविध नावे स्पर्धेत आणली गेली. त्यापैकी सर्वात पुढे राजनाथ सिंग यांचे नाव होते. यापुर्वी ते उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि आज केंद्रातील ज्येष्ठ मंत्री आहेत. त्यामुळेच त्यांचेही नाव स्पर्धेत आणले गेले होते. पण त्याविषयी विचारले असता त्यांनी ‘काय फ़ालतुगिरी आहे’ म्हणत ती शक्यता झटकून टाकली होती. दुसरे होते रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा! त्यांचेही नाव असेच स्पर्धेत आणलेले होते. पुर्वाश्रमीचे संघ प्रचारक असल्याने त्यांनाच मोदी सत्तेवर बसवणार, याची छातीठोक खात्री अनेकजण देत होते. शनिवारी नव्या नेत्याची निवड व्हायची असताना, सकाळपासून सिन्हा यांच्या नावाची चर्चा रंगली होती. तेव्हा ते आपल्या गावी गेलेले होते. सहाजिकच सिन्हा आपल्या कुलदैवताच्या दर्शनाला गेल्याचे सांगून, त्यांच्या नावावर माध्यमातील श्रेष्ठींनी शिक्कामोर्तब करून टाकलेले होते. पण खरा स्पर्धक वा चेहरा कोणाच्याही लक्षात आला नव्हता. मग तो चेहरा समोर आला, तेव्हा सर्वांचीच बोबडी वळली. ज्याला मागली कित्येक वर्षे हिंदूत्वाचा आग्यावेताळ म्हणून माध्यमांनी सतत सादर केलेले होते, असे गोरखपूरच्या नाथपंथीय मठाचे महंत योगी आदित्यनाथ यांचे नाव निश्चीत झाले. सहाजिकच आता नाव ठरलेच आहे, तर त्याच्या कारभाराचेही भाकित करायला मंडळी मोकळी झाली. माध्यमांवर विश्वास ठेवायचा, तर आतापासूनच उत्तरप्रदेशात कडव्या हिंदूत्वाचे राज्य सुरू झालेले आहे.

स्वता:ला राजकीय पंडित म्हणवणारे मुठभर लोक एक अजेंडा बनवतात आणि एकूणच माध्यमे त्याला ब्रह्मवाक्य मानून कशी तोंडघशी पडतात. हे मागल्या पंधरा वर्षात सातय्याने बघावे लागते आहे. २०१२ सालात गुजरातमध्ये दंगली माजली आणि त्याला नवखा मुख्यमंत्री नरेंद्र मोदी जबाबदार असल्याचा गवगवा सुरू झाला. यासाठी गुजरातला संघाच्या हिंदूत्वाची प्रयोगशाळा ठरवण्यात आले. पण योगायोग असा, की त्यानंतर गुजरातमध्ये पुन्हा कधी दंगल माजली नाही आणि गुजरातच देशाच्या आधुनिक विकासाची मात्र प्रयोगशाळा ठरून गेली. कारण ज्याला हिंदूत्वाचा उग्र विद्रुप चेहरा म्हणून माध्यमांनी दहाबारा वर्षे पेश केला, तोच प्रत्यक्षात भारताच्या विकास चेहरा बनत गेला, जसजसा त्याचा अनुभव सामान्य भारतीयाला येत गेला, तसतशी अशा प्रचारकी बातम्यांची विश्वासार्हता संपत गेली आणि २०१४ मध्ये त्याच हिंदूत्वाच्या विद्रुप चेहर्‍याला जनतेने देशाचा पंतप्रधान बनवले होते. पंधरा वर्षे मागे जाऊन तेव्हाच्या बातम्या चाळल्या वा संपादकीय लेख वाचले; तर लक्षात येईल, की शनिवारी निवड झाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांच्याविषयी जे काही बोलले जात होते, त्यात नवे काहीच नव्हते. २००२ सालानंतर काही वर्षे असेच नरेंद्र मोदींचे वर्णन राष्ट्रीय माध्यमातून चालले होते आणि त्यांची भिती देशभरच्या मुस्लिमांना घातली जात होती. त्याच्याच परिणामी मग उत्तरप्रदेशात भारतीय जनता पक्षाला अवकळा येत गेली. केंद्रातील वाजपेयी सरकारला त्याची किंमत मोजावी लागली आणि मोदींच्या विद्रुप चेहर्‍याचे राजकीय भांडवल करून कॉग्रेसप्रणित पुरोगामी आघाडी देशात सत्तेवर आलेली होती. त्यावेळचे राजकीय विश्लेषण वा मोदींचे वर्णन वाचले, तर आज योगींविषयी नवे काहीही बोलले जात नसल्याचे लक्षात येऊ शकेल. ही पंधरा वर्षे जुनी भाषा व जुनेच आरोप आहेत.

मजेची गोष्ट अशी, की ज्याच्यावर मागल्या पंधरा वर्षात हिंदूत्वाचा विद्रुप चेहरा म्हणून एकाहून एक भयंकर आरोप केले, त्यानेच आज देश पादाक्रांत केला आहे. कालपरवा झालेल्या मतदानात उत्तरप्रदेशात अपुर्व यश मिळवले आहे. त्याने आजही एकाही मुस्लिमाला उमेदवारी न देता इतके मोठे यश मिळवलेले आहे आणि त्याला मुस्लिमांनीही मते दिल्याचा हवाला तेच पुरोगामी देत आहेत. आणखी मोठी गंमत म्हणजे मुस्लिमाला उमेदवारी दिली नाही, म्हणून जे कालपर्यंत मोदींना शिव्याशाप देत होते, तेच आता मोदींनी विकासावर मते मिळवल्याचे हवाले देत योगींना शिव्याशाप देत आहेत. मोदींनी जातपात धर्मपंथ याच्यापलिकडे जाऊन मते मिळवली, असे आज सांगत आहेत. किंबहूना म्हणूनच मोदींनी आदित्यनाथ यांच्यासारख्या कडव्या हिंदूत्ववादी महंताला मुख्यमंत्री बनवायला नको होते, असेही सांगत आहेत. यातला विनोद त्यांच्याही लक्षात कसा येत नाही? मोदी आज अकस्मात पुरोगामी वा उदारमतवादी कसे झाले? ज्यांच्यावर बारापंधरा वर्षे हिंदूत्वाचा आरोप केला तो चुकला? की खोटा होता? अशी यापैकी एकानेही कबुली दिलेली नाही. आपण खोटे होतो वा मुर्ख होतो, असे आधी त्यांनी कबुल करावे आणि मगच मोदींकडून अन्य काही अपेक्षा करावी. तसे नसेल तर याच शहाण्यांच्या आरोपानुसार मोदी हिंदूत्ववादी आहेत आणि त्यांनी त्याला अनुसरूनच कडव्या हिंदूत्ववाद्याला मुख्यमंत्रीपदी बसवले आहे. त्यात गैर काय? उलट आज त्याच शहाण्यांनी छाती फ़ुगवून आपला आरोप खरा ठरल्याचा आनंद व्यक्त करायला हवा. विकास वगैरे खोट्या गोष्टी आहेत आणि मोदींना देश भगवा करायचा आहे. त्यासाठीच त्यांनी योगी सत्तेत आणुन बसवला, असे म्हणायला हवे. पण घडते आहे भलतेच काही. हेच लोक मोदींनी कोणा भगव्या हिंदूत्ववाद्याला मुख्यमंत्री केल्याने चकीत झाल्याचे हेच लोक सांगत आहेत. किती केविलवाणी स्थिती आहे ना?

खरे सांगायचे तर तेव्हाही मोदी हिंदूत्ववादी नव्हते आणि आजही हिंदूत्ववादी नाहीत. ते जिहादी मुस्लिमांचे लांगुलचालन करत नाहीत. मोदी आपल्या हिंदूत्वाचे किंवा हिंदू असण्याची लाज बाळगत नाहीत. त्यांना आपण हिंदू आहोत याचा अभिमान आहे. किंबहूना आपण हिंदू आहोत, म्हणूनच कोणाशी भेदभाव करणार नाही, असाच मोदींचा दावा राहिलेला आहे. पुरोगामी वा सेक्युलर भेदभाव करतात आणि हिंदूंना पक्षपाताने वागवतात, असा मोदींचा आक्षेप आहे. म्हणूनच हिंदू नेता मुख्यमंत्रीपदी बसला, म्हणून कोणावर अन्याय करणार नाही, याची मोदींना पुर्ण खात्री आहे. योगी आदित्यनाथ हा कडवा हिंदू म्हणजे अभिमानी हिंदू आहे. तो हिंदूवरचा अन्याय सहन करणार नाही, की हिंदूंच्या बाबतीतला पक्षपात सहन करणार नाही, ह्याची मोदींना पुरेपुर खात्री आहे. पण हिंदूंना न्याय वा पक्षपात विरहीत वागणूक म्हणजेच मुस्लिमांवर अन्याय, अशी एक पुरोगामी विचारसरणी आहे. त्यातून सेक्युलॅरीझम विकृत व विद्रुप होत गेला आहे. मोदी वा योगी त्यापासून अलिप्त आहेत. म्हणूनच मोदींना योगिविषयी खात्री आहे. पण पुरोगामी व त्यांच्या टोळीतली माध्यमे अजून हे सत्य बघू शकलेली नाही. उत्तरप्रदेशच्या मतदाराने ते सत्य जाणले आहे आणि म्हणून तर मागल्या लोकसभेत मोदींना इतके मोठे बहूमत दिलेले होते. यावेळी उत्तरप्रदेशच्या मुस्लिमालाही त्या सत्याची अनुभूती झालेली आहे. म्हणूनच त्याने सुद्धा भाजपाला भरभरून मेत दिलेली आहेत. दुर्दैवाने ते सत्य बघण्याची सुक्ष्मदृष्टी पुरोगाम्यांना मिळू शकलेली नाही. त्याचे बळी पंधरा वर्षापुर्वी मोदींच्या नावाने शंख करीत होते. आज त्याच पंथाचे लोक योगी आदित्यनाथना नावे ठेवत आहेत. पण त्यातून ते दहापंधरा वर्षानंतरचा देशाचा पंतप्रधान तर घडवण्याचे काम करीत नसतील ना? ज्यांनी देशाला मोदी दिला, तेच आता योगी हा नवा नेता घडवू लागले आहेत काय?

6 comments:

 1. मस्तच भाऊ,भाजपा किंवा आर एस एस ची रचना पाहता ते काळानुरुप बदलत चांगले म्हणजे नाव घेण्यासारखे नेते तयार करत आलेत,मी स्वतः शिवसेनेचा असलो तरी यांचे काम जवळुन बघतोय अस वाटत होत की अटलबिहारी वाजपेयी प्रमोद महाजन नंतर भाजपा संपला पण चमत्कार घडवत भाजपाची उसळी जबरदस्त आहे १५ वर्षा पुर्वीचे एका यादव नामक वकिलांचे शब्द आठवले हा पक्ष म्हातारा कधीच होणार नाही सतत तरुणनेते तयार होत राहणार त्यावेळी महाजन,मुंढे,स्वराज,जेटली ही नाव अनुभवली आता देवेन्द्र,त्रिवेंद्र,योगेंद्र माझ्या माहिती प्रमाणे यातील एकही ५० वर्षांपेक्षा जास्त नाही विशेष म्हणजे abp maza चे राजीव खांडेकर यांनी उप्र निकाला दिवशी बोलताना सांगितल की भाजपा अनेक मोदी उभे करु शकतो हे एक आश्चर्य आहे

  ReplyDelete
 2. योगींचे "मोदीकरण".
  "Modification" (मोदीफिकेशन)?
  झकास. चालू दे.

  ReplyDelete
 3. Atishay Uttam ani parakhad lekh.

  ReplyDelete
 4. Bhau Shivsenechya mate "'यूपी चालवणं हे मठ चालवण्याइतकं सोपं नाही'", Jara shivsenechya bhavitawya vishayi liha. 792 mate padoon suddha Raut saheb mhantat ki Goa sarkar padel.

  ReplyDelete