Monday, March 6, 2017

महाराष्ट्राचा मोदी काय करील?

मुंबईतल्या यशामुळे भाजपाला आपले बहूमत गाठता आलेले नसले, तरी त्या पक्षाला आता राज्यव्यापी खंबीर नेता मिळाला आहे. तो नेता शिवसेनेच्या अपयशातून मिळाला आहे. हा नेता आता आत्मविश्वासाने भरलेला आहे. कारण त्याला पक्षातून कोणाचे आव्हान शिल्लक उरलेले नाही आणि राज्यातील अन्य पक्षाचे कुठलेही आव्हान पेलण्याची क्षमता त्याने सिद्ध केलेली आहे. त्यामुळे राज्याची राजकीय समिकरणे किती बदलली आहेत. त्याचेही भान महापौर मिळवण्यात गुंतून पडलेल्या शिवसेना नेत्यांना आलेले नाही. फ़ार कशाला मुंबईत भाजपाला बहूमत मिळालेले नाही, म्हणून सुखावत हाती आलेल्या पत्त्याचे डाव खेळू बघणार्‍या राष्ट्रवादी किंवा कॉग्रेस नेत्यांनाही फ़डणवीस किती सुस्थितीत पोहोचलेत, त्याकडे बघायला सवड झालेली नाही. तसे नसते तर कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शिवसेनेला पाठींब्यासाठी सत्तेतून बाहेर पडायची अट घातली नसती. पवारांनी जिल्हा परिषदातील अध्यक्ष व ग्रामीण सत्तेची गणिते मांडली नसती. ताज्या निकालांमध्ये फ़डणवीस यांनी मुंबईत शिवसेनेला रोखताना ग्रामिण भागात मिळवलेले यश मर्यादित आहे. पण राज्यव्यापी प्रभावशाली नेता अशी त्यांची जी प्रतिमा जनमानसात उभे राहिली, त्याचा व्याप अजून कोणाच्या लक्षात आलेला नाही. काही ठिकाणी महाराष्ट्राचे मोदी अशीही त्यांची भलामण झालेली आहे. पण मोदी म्हणजे काय, त्याचे कोणी विश्लेषण केलेले नाही. मोदी कशा प्रतिकुल स्थितीतून गुजरातचे निर्विवाद नेता झाले, तो इतिहास बघितला तर आज फ़डणवीस कुठल्या पातळीवर पोहोचले आहेत, त्याचा अंदाज येऊ शकतो. मोदींनी त्यावेळी कुठले धाडस केले व कोणता राजकीय जुगार खेळला होता, त्याचे आज कुणालाही स्मरण झालेले नाही. अन्यथा महाराष्ट्राचा मोदी म्हणजे नेमके काय, त्याचे विवरण येऊ शकले असते.

२००१ सालात कुठलाही अनुभव गाठीशी नसलेला तरूण भाजपाने गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी बसवला होता आणि त्याला प्रशासनाचीही जाण नव्हती. अशा परिस्थितीत तिथे दंगलीचा आगडोंब उसळला, तेव्हा त्याला आवर घालताना मोदी तोकडे पडले होते. पण त्यातला अननुभव विचारात घेण्यापेक्षा माध्यमांनी व विरोधी पक्षांनी मोदी यांच्या संघ स्वयंसेवक असण्याला प्राधान्य देऊन, त्यांच्यावरच दंगली पेटवल्याचा आरोप केला. मग त्या दंगली थोपवण्यापेक्षा त्याच आगीत तेल ओतण्याचा वा दंगल माजवणार्‍यांना पाठीशी घालण्याचा आरोप केला. खरे तर मोदींनी असे काहीही केलेले नव्हते. उलट गोळीबारात मोठ्या संख्येने हिंदूही मारले गेलेले होते. पण माध्यमांनी काहूर माजवल्याने पंतप्रधान वाजपेयीही विचलीत झालेले होते आणि मोदींची उचलबांगडी निश्चीत झाली होती. केंद्रातील एनडीए सरकार कोंडीत सापडले होते. पण इतके आरोप झाल्याने गुजरातच्या दंगलपिडीत हिंदूसमोर मोदी हाच कडवा नेता असल्याचे चित्र मात्र तयार झाले. त्याचे श्रेय अर्थातच माध्यमांना व मोदींवर बेताल आरोप करणार्‍या विरोधी पक्षांना द्यायला हवे. अशा स्थितीत मोदी हा राज्यातील सर्वाधिक लोकप्रिय नेता बनला होता. गोव्याच्या पक्ष अधिवेशनात त्याच मोदींनी स्वत:च राजिनाम्याचा प्रस्ताव पुढे केला. तो मान्य करणेही श्रेष्ठींना शक्य झाले नाही. म्हणून मोदींना अभय मिळाले आणि माघारी गुजरातला पोहोचताच त्यांनी थेट विधानसभा बरखास्त करून जनमताचा कौल घेण्याचा धोका पत्करला. आपल्या विरोधात लोकमत असेल तर जनतेनेच कौल द्यावा, अशी त्यांची भूमिका मोठे यश मिळवून गेली आणि दोनतृतियांश बहूमताने मोदी पुन्हा मुख्यमंत्री झालेले होते. संकटातून सुखरूप बाहेर पडल्यावर आपल्या प्रतिमेचा धुर्तपणे कसा वापर करावा, याचा तो अप्रतिम दाखला होता. हा इतिहास बघता फ़डणवीस काय करू शकतील?

आज राज्यातील कॉग्रेस व राष्ट्रवादी हे दोन्ही प्रमुख विरोधी पक्ष पुरते नामोहरम झालेले आहेत. त्यांच्यात लढण्याची इच्छाच उरलेली नाही. खुमखुमी असलेल्या शिवसेनेला मुंबईतच मुख्यमंत्र्यांनी ‘पाणी पाजलेले आहे’. अशा स्थितीत राज्यव्यापी लोकप्रियतेतून त्यांनी पक्षाला इतके मोठे यश मिळवून दिल्याचा सार्वत्रिक गवगवा झालेला आहे. वास्तविक तितके हे यश मोठे वा निर्विवाद नाही. कारण अर्ध्याअधिक जिल्हा परिषदांमध्ये दोन्ही कॉग्रेस एकत्र येऊन सत्ता मिळवू शकतात. त्यांच्यात तसा सौदाही झालेला आहे. म्हणजेच तिथे भाजपा गारद झालेला आहे. अन्य तालुका पंचायतीमध्येही कमीअधिक प्रमाणात भाजपाचे यश शंकास्पद आहे. पण एकूणच जनमानसातील मुख्यमंत्र्यांची प्रतिमा उजळलेली आहे. मोदींना वा अन्य राष्ट्रीय नेत्यांना प्रचारापासून दूर ठेवून त्यांनी मिळवलेले यश नेत्रदीपक असे आहे. त्यामुळेच राज्याचे खंबीरपणे नेतृत्व करू शकणारा, ही प्रतिमा त्यांना राजकारणात अधिक प्रभावी बनवणारी आहे. त्यांच्या तुलनेत मुख्यमंत्रीपदाचा अन्य कुठलाही वा कुठल्याही पक्षाचा चेहरा आज लोकांसमोर नाही. हीच त्यांची जमेची बाजू झाली आहे. म्हणूनच उद्या जर विधानसभेच्या मध्यावधी निवडणूका झाल्या, तर भाजपाला बहूमतापर्यंत घेऊन जाण्याची क्षमता आज या मुख्यमंत्र्यामध्ये आलेली आहे. त्याची जाणिव असेल तर हा नेता वा त्याचे श्रेष्ठी कोणते धाडसी जुगार खेळू शकतील? त्याचा विचार अन्य कुठल्या पक्षाच्या नेत्यांनी केलेला दिसत नाही. शिवसेनेने सरकारमधून बाहेर पडावे असे पवार किंवा चव्हाण म्हणत आहेत. पण तसे होऊन मध्यावधी निवडणुका आल्या, तर यापैकी कोण समर्थपणे फ़डणवीसांच्या नेतृत्वाखालच्या भाजपाला सामोरा जाण्याइतका सज्ज आहे? तो जुगार अन्य कोणी खेळण्याच्या तयारीत नाही, इतके आज तोच जुगार खेळण्याच्या स्थितीत देवेंद्र फ़डणवीस व भाजपा नक्कीच आहेत.

शिवसेनेसह अन्य दोन्ही कॉग्रेसने भाजपाला सरकार पाडण्याच्या धमक्या देणे सोपे आहे. पण तसे झाल्यास मध्यावधी निवडणूका आल्यास काय करायचे, त्याची तयारी त्यापैकी एकाचीही नाही. म्हणूनच मध्यावधी वा सरकार पडण्याला घाबरण्याची फ़डणविसांना गरज राहिलेली नाही. किंबहूना तशी शक्यता दिसली, तरी हा माणूस मोठा जुगार खेळण्याच्या स्थितीत आता आला आहे. अन्य पक्ष फ़ोडण्यातून ताकद मिळवत आपणही फ़ोडाफ़ोडीचे राजकारण खेळू शकतो, असे त्यांनी कामातूनच सिद्ध केले आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना फ़ोडून आणले, त्यांना पुन्हा निवडूनही आणु शकतो, अशी समजूत करण्यात त्यांना यश आलेले आहे. त्यामुळेच अकस्मात उद्या जर विधानसभा बरखास्त झाली, तर विरोधी पक्षातल्या अनेक आमदारांना ते नको आहे. कारण पुन्हा निवडून येण्याची हमी नाही. त्यापेक्षा असे अनेक आमदार पक्षांतराला उत्सुक असतील वा पक्षांतर करून भाजपात जाण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळेच असे दिग्गज अन्य पक्षांकडून हिरावून घेण्याची कुवत या विजयाने फ़डणवीसांना दिलेली आहे. परिणामी सरकार पडण्याचे भय त्यांना उरलेले नाही. मग ती धमकी शिवसेनेने द्यावी किंवा अन्य कुठल्या पक्षांनी द्यावी. या कुठल्याही पक्षाला आज आपलेच आमदार आपल्या सोबत ठाम रहातील, याचीही हमी देता येणार नाही. म्हणून त्यांच्या धमक्यांना घाबरण्याचे कारण राहिलेले नाही. पण त्याच्याही पुढे जाऊन खुद्द भाजपा वा फ़डणवीसांनीच विधानसभा बरखास्त करीत जनतेचा नव्याने कौल मागायचा पवित्रा घेतला तर? तशा परिस्थितीचा राष्ट्रवादी, कॉग्रेस वा शिवसेनेने विचार तरी केला आहे काय? जर हा तरूण नेता महाराष्ट्राचा मोदी असेल, तर मग तोही मोदींनी तशा स्थितीत खेळलेला राजकीय जुगार बिनधास्त खेळू शकतो. तशी वेळ आल्यास त्याला त्या जुगारात पराभूत करण्याची क्षमता व कुवत आज कुठल्या पक्षात आहे?

(२८/२/२०१७)

No comments:

Post a Comment