राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार राजकारणात जितके जुने आहेत, तितकेच ते क्रिकेटच्या खेळातही मुरलेले आहेत. क्रिकेटच्या व्यवस्थापन व प्रशासनात मुरलेल्या पवारांनी त्याही खेळातले अनेक डावपेच राजकारणात सहजगत्या वापरलेले आहेत. त्यामुळेच राजकारणातून पवार संपले असे म्हटले जात असताना, हा बिलंदर माणूस अशी काही खेळी करतो, की त्याच्या प्रतिस्पर्ध्यांनीही तोंडात बोट घालावे. आताही महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुका खुप रंगल्या आणि त्याचे निकाल लागल्यावर दोन्ही कॉग्रेस पक्षांचा धुव्वा उडाल्याचे सांगितले जात होते. पण अकस्मात पवार नांदेडला जाऊन पोहोचले आणि त्यांनी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेतली. त्या भेटीपुर्वी तसा कुठे जागावाजा झाला नाही आणि अचानक पवारांनी दोन्ही कॉग्रेसची सत्तेसाठी आघाडी होत असल्याची थेट घोषणाच करून टाकली. त्यानंतर एकदम महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी मिळताना दिसू लागली. निकालानंतर दोनतीन दिवस सगळीकडे भाजपा आता स्वयंभू व स्वबळावर मोठा झालेला पक्ष, अशी भाषा चालली होती. ती अकस्मात थांबली आणि चार दिवसात भाजपाच्या महान यशाचे डंके बाजूला पडून, थेट मुख्यमंत्र्यांनाच माघारीची घोषणा केली. शिवसेनेला शरण जात असल्याची जाहिरात त्यांना करावी लागली. शुक्रवारपर्यंत मुंबईत भाजपा महापौर पदाच्या शर्यतीत होता आणि शनिवारी अचानक रागरंग बदलून गेला. कुठल्याही पदाची अपेक्षा न बाळगता भाजपाने शिवसेनेला बिनशर्त पाठींबा देत माघार घेतली. त्याला कारण काय असावे? सत्तेतून बाहेर पडण्याची सेनेची धमकी निर्णायक ठरली, की भाजपाला पुन्हा युतीची महत्ता लक्षात आली? ह्यामागची खरी खेळी कोणाची आहे? एकदिवसीय क्रिकेटमध्ये पॉवर प्ले नावाची एक खेळी असते. तशी काही पवार प्ले खेळी याला कारणीभूत झाली आहे काय?
मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यात पॉवर प्ले नावाची एक खेळी असते. यात पाच षटके मध्यरेषेच्या आत नऊ क्षेत्ररक्षक ठेवून खेळावे लागते. अवघे दोनच खेळाडू परिघावर जाऊ शकतात. नऊ खेळाडू फ़लंदाजाला घेरून उभे ठाकतात. पण त्यात गोलंदाजाची कसोटी असते. त्याने षटकार मारला जाऊ नये अशीच गोलंदाजी करावी लागते. कारण मधल्या रेषेच्या बाहेर फ़ार क्षेत्ररक्षक नसतात. त्या डावपेचाला पॉवर प्ले म्हणतात. ती निवड क्षेत्ररक्षण करणार्या कर्णधाराची असते. त्याने तसा निर्णय घ्यायचा असतो. राजकारणात दोन वर्षे रडगाणे झाल्यावर आता शरद पवार आपला खास पॉवर प्ले घेऊन आलेत काय? कॉग्रेसशी संबंध तोडून त्यांनी भाजपाला दिलेले अभय संपुष्टात आल्याची घोषणाच त्यांनी नांदेड येथून केली असावी काय? कारण त्यानंतरच सत्तेची फ़लंदाजी करणार्या शिवसेना व भाजपा यांच्या खेळात अचानक परिवर्तन घडून येऊ लागले आहे. कालपर्यंत मिळेल त्या चेंडूवर षटकार चौकार मारणारे मुख्यमंत्री वा भाजपाचे नेते प्रवक्ते अकस्मात आता बॅकफ़ुटवर जाऊन सावध फ़लंदाजी करू लागले आहेत. विक्रमी धावसंख्या उभारण्याच्या तयारीत असलेल्या कर्णधाराने अकस्मात डावच सोडल्याची घोषणा करावी, तसे मुख्यमंत्री फ़डणवीसांनी थेट लढाईची शस्त्रे खाली ठेवून शिवसेनेला पाठींबाच जाहिर करून टाकला. शिवसेनेच्या धमक्यांना भाजपा इतका कधीपासून घाबरू लागला? सरकार नोटिसवर आहे अशी भाषा सेनेने निवडणूक काळात वापरली. तेव्हा तर भाजपाचे नेते प्रवक्ते टवाळीच करत होते आणि विविध पक्षाचे आमदार संपर्कात असल्याचे हवाले देत होते. मग आता अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या मुहूर्तावर मुख्यमंत्र्यांच्या धीर कशाला सुटला आहे? त्यामागे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची कुटील रणनिती असण्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. भाजपाची हवा सेनेने नव्हेतर पवार प्लेमधून निघालेली आहे.
विधानसभेच्या वेळी राष्ट्रवादी वा पवारांच्याच भरवशावर भाजपाने सेनेशी असलेली जुनी युती मोडून टाकली होती. स्वबळावर बहूमत मिळवण्याच्या भाजपाच्या हिंमतीचे जामिनदार शरद पवार होते. म्हणून तर युती मोडताच तासाभरात पवारांनीही आघाडी मोडून भाजपाला विजयाचा मार्ग मोकळा केलेला होता. त्यात त्रुटी राहू नये म्हणून आपले निष्ठावानही भाजपाकडे उमेदवारीसाठी पाठवून दिले होते. युती मोडल्याने दोन्ही कॉग्रेस मिळून सहज बहूमत मिळवू शकले असते आणि चौथ्यांदा त्यांना सत्ता नक्कीच मिळाली असती. पण ती सत्ता म्हणजे अजितदादांचे वर्चस्व ठरले असते. त्यासाठी आघाडी मोडून भाजपाचे सरकार आणले आणि त्यात आमदार कमी पडताना दिसताच निकाल संपण्यापुर्वीच पवारांनी बिनशर्त पाठींबा जाहिर केला. पुढे एकट्याच्या बळावर भाजपाला सरकार बनवण्यास भाग पाडले आणि आवाजी मतदानातून सरकारला अभयही दिले. मात्र त्यामुळे भाजपाला व मुख्यमंत्र्यांना खुप शिव्या खाव्या लागल्या. तसे फ़डणवीसांनी सोशल माध्यमातून विनाविलंब कबूलही करून टाकले. त्यामुळेच मग शिवसेनेला सोबत घेण्याची वेळ भाजपावर आली. पण तो देखावा होता. लोकमत खराब होऊ नये म्हणून राष्ट्रवादीचा उघड पाठीबा भाजपाने घेतला नव्हता. पण शिवसेनेला नित्यनेमाने डिवचत चाललेले सरकार पवारांच्याच पाठबळावर चालू होते. म्हणूनच सेनेने बाहेर पडण्याची धमकी दिली, तरी भाजपा नेते प्रवक्ते टवाळी करीत होते. ह्या सर्व शिरजोरीला पवारांच्या नांदेड भेटीने ब्रेक लागला आहे. कारण पवारांचा कार्यभाग आता उरकलेला आहे. अजितदादा सत्तेतून गेले आहेत आणि पुणे पिंपरी-चिंचवड अशा दोन्ही पालिकाही त्यांच्या हातून काढून घेण्याचा डाव यशस्वी झाला आहे. मग आता भाजपाचा उपयोग काय राहिला? त्यापेक्षा पुन्हा नव्याने निवडणुका झाल्या आणि दोन्ही कॉग्रेस सत्तेत आल्या. तर अधिक उत्तम ना?
त्यामुळेच शिवसेनेची सत्तेतून बाहेर पडण्याची धमकी वजनदार झाली आहे. ती शिवसेनेची ताकद नव्हेतर पवारांचे अभय संपुष्टात आल्याने शिवसेनेचा पाठीबा निर्णायक महत्वाचा झाला आहे. खरेच अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या तोंडावर सेनेने धमकी खरी केली, तर फ़डणवीस यांच्या पाठीशी दाखवायला बहूमताचा आकडा खात्रीचा राहिलेला नाही. नादेंडहून पवारांनी तोच संदेश दिला आहे. आपण जिल्हा परिषदेत सत्तेसाठी कॉग्रेस सोबत जात असून, मध्यावधी निवडणूकांना एकत्रित सामोरे जाण्याची तयारीच त्यातून आपण आरंभलेली आहे, इतकाच त्याचा अर्थ लागू शकतो. सहाजिकच कालपर्यंत सत्तेतून बाहेर पडण्याची सेनेची धमकी हास्यास्पद होती, तिला पवारांच्या खास खेळीने भलतेच वजन आले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद आणि मुंबईचे महापौरपद समान वजनाचे झाले आहे. त्यातले जे पद भाजपाकडे आहे, ते सेनेला गमावण्याची भिती नाही. पण महापौरपदही जाणार असेल, तर फ़डणवीसांचे मुख्यमंत्रीपद घालवण्याची खेळी शिवसेना बिनधास्त खेळू शकते. कारण मुंबईच हाती नसेल तर सेनेला गमावण्यासारखे आणखी काहीच उरत नाही. त्यामुळेच भाजपाचे होईल इतके नुकसान करीत जाण्याची खेळीच सेनेला सुखाची ठरू शकते. नांदेडनंतर भाजपाचा आवाज थंडावला, त्याचे तेच कारण आहे. शिवसेनेलाही पवार प्लेची खबर लागलेलीच असणार. म्हणूनच नुसता महापौरच नाही, तर पुढला मुख्यमंत्रीही सेनाच ठरविल, असली भाषा सुरू झाली होती. आता बहूमताअभावी भाजपा गोत्यात आला असेल, तर त्याची अधिकाधिक अडवणूक शिवसेना करीत जाईल. कालपर्यंत शरद पवारांनी भाजपाला खेळवले, आता काही दिवस ते शिवसेनेलाही खेळवू शकतील. जेव्हा सेना टोकाला जाऊन भाजपाचे सरकार गोत्यात आणायचा पवित्रा घेईल, तेव्हा मध्यावधी महाराष्ट्राला परवडणार नाही म्हणत सरकारला पवार पाठींबाही देऊ शकतील. दोन्ही मित्रांनी पवारांवर विसंबून मोठ्या कुस्त्या खेळण्याचा घातक पवित्रा घेतला असेल, तर त्यांना कठपुतळीसारखे वागवणार्या पवारांनाही कोणी दोष देण्याचे कारण नाही.
(५/३/२०१७)
परफेक्ट
ReplyDeletePlease Do not give very important to him.
ReplyDelete...महाराष्ट्रात पवारांच राजकारण ओळखणारे फार कमी आहेत... त्यातील एक आपण आहात भाऊ... जबरदस्त समीक्षा...
ReplyDelete