उत्तरप्रदेशात कॉग्रेसची उरलीसुरली अब्रु मातीत मिळवल्यावर राहुल गांधी यांनी गोवा आणि मणिपूर या छोट्या राज्यातही कार्यकर्त्यांनी मिळवलेल्या यशाची पुर्ण धुळधाण करून दाखवली आहे. पहिली गोष्ट म्हणजे पक्षाचे सर्व निर्णय हा युवा कॉग्रेस नेता घेणार, असे म्हटले जाते. मात्र जेव्हा निर्णय घेण्याची वेळ येते, तेव्हाच हा नेता कुठल्या कुठे गायब झालेला असतो. आताही गोव्यात भाजपाला हरवून कॉग्रेसने सर्वात मोठा पक्ष होण्यापर्यंत मजल मारली होती. मात्र चार जागांसाठी कॉग्रेसचे बहूमत हुकलेले होते. अशावेळी धावपळ करून अन्य पक्ष वा अपक्षांना सोबत घेण्याची चतुराई दाखवणे अगत्याचे होते. त्यासाठी लवचिकता अंगी असावी लागते. तशीच तत्परताही सिद्ध असावी लागते. भाजपाने बहूमत व सत्ता गमावलेलीच होती. पण सत्ता कॉग्रेसकडे जाऊ नये, म्हणून खुद्द संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर व वाहतुकमंत्री नितीन गडकरी गोव्यात धावले. त्यांनी तिथे बसून निकालाचा अभ्यास केला व तात्काळ लहानसहान पक्षांना आपल्या सोबत घेण्याची धावपळ आरंभली. उलट कॉग्रेसचे प्रभारी व राहुलचे विश्वासू दिग्विजयसिंग आपलाच पक्ष मोठा असल्याने आडून बसले होते. अशावेळी सत्ता बळकावण्यासाठी तातडीने कुणाहीशी सौदेबाजी केली जाते व त्यात आजवर कॉग्रेस पुढे असायची. पण इथे गोव्यात साधा विधीमंडळ कॉग्रेसचा नेता निवडला गेला नाही, की अन्य पक्षांशी संपर्क साधला गेला नाही. त्यातल्या काही पक्षांनी कॉग्रेसशी संपर्कही साधला होता, तर त्यांनी पाया पडायला यावे; अशी अपेक्षा करत दिग्गीराजा बसले. तोपर्यंत त्याही लोकांना भाजपाने समजावून आपल्या सोबत घेण्यापर्यंत मजल मारली. काही गोवन आमदार दिल्लीला गेले, तर राहुल त्यांना भेटलेही नाहीत. ही कॉग्रेसची समस्या आहे. त्या पक्षाचे निर्णय घेणारा नेत्याला तो महाराजा असून इतरांनी त्याच्या पायाशी शरण यावे, असेच कायम वाटत असते.
उत्तरप्रदेशची निवडणूक सुरू व्हायला दोनचार दिवस असताना, समाजवादी पक्षाशी कॉग्रेसची आघाडी होणार असल्याची बातमी आलेली होती. तशी लखनौला राहुलसह अखिलेश पत्रकार परिषदेत घोषणा व्हायची होती. पण राहुल तिथे पोहोचलेच नाहीत आणि अखिलेशने पत्रकार परिषद रद्द करून समाजवादी पक्षाच्या ३०० उमेदवारांची यादीच जाहिर करून टाकली. तिथे समाजवादी पक्ष सत्तेत होता आणि मोठाही होता. पण हे समजण्याइतकी समजूत कॉग्रेसच्या उपाध्यक्षाकडे नाही. म्हणूनच अखिलेश आपल्या दारात येऊन उभा रहाण्याची मुजोर अपेक्षा राहुलनी बाळगली. त्यात दोन दिवस गेले आणि मग दिल्लीतून सोनिया व प्रियंका यांनी अखिलेशची समजूत काढत पुन्हा जागावाटपाला चालना दिली. पण दरम्यान दोन दिवस वाया गेले. ऐन निवडणूक रंगात आली असताना दोन दिवस किती मोलाचे असतात, त्याचेही भान ज्याला नाही, तो आज या शतायुषी पक्षाचे भवितव्य ठरवतो आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी व प्रत्येक बाबतीत थप्पड खाण्यापलिकडे कॉग्रेसच्या नशिबी काहीही आलेले नाही. सतत बिहारच्या महागठबंधन विजयाचा दाखला दिला जातो. पण तिथे राहुलला बाजूला ठेवून सोनियांनी जागावाटपात भाग घेतला होता आणि नितीश लालूंच्या कुठल्याही सभेत राहुल सहभागी झालेला नव्हता. म्हणूनच बिहारच्या यशाचा राहुलशी काडीमात्र संबंध नाही. उलट जिथे म्हणून राहुलने पुढाकार घेतला वा निर्णय घेतलेले आहेत, तिथे कॉग्रेसच्या वाट्याला अपयशच आलेले आहे. काही बाबतीत तर कॉग्रेसला अपमानास्पद पराभवाला सामोरे जावे लागलेले आहे. मात्र इतके असूनही कॉग्रेस पक्षाला हाच तरूण नेता यशाच्या शिखरावर घेऊन जाईल, अशी आशा आहे आणि तीच या सर्वात जुन्या पक्षाची समस्या बनलेली आहे. जी समस्या आहे, त्याच्यातच आपले समाधान सामावलेले असल्याचा भ्रम, त्या पक्षाला रसातळाला घेऊन चालला आहे.
मागल्या चार महिन्यात राहुलनी ज्या मार्गाने संसदेत वा सार्वजनिक जीवनात कॉग्रेसला नेलेले आहे, त्यातून त्या पक्षाची पदोपदी नाचक्की झालेली आहे. सर्जिकल स्ट्राईकनंतर पंतप्रधानांचे अभिनंदन करणार्या याच माणसाने, चार दिवसात त्याच विषयावर मोदी सरकारवर खोटेनाटे आरोप सुरू केलेले होते. त्यानंतर नोटाबंदीचा विषय घेऊन इतक्या टोकाचा विरोध केला, की त्याचीच फ़ळे आज उत्तरप्रदेशात कॉग्रेसला भोगावी लागलेली आहेत. भाषणाने लोकांना प्रभावित करावे किंवा कामकाजातून मतदाराला जिंकावे; अशी कुठलीही कला वा गुणवत्ता राहुलपाशी नाही. आडातच नाही तर पोहर्यात कुठून यायचे? त्याच उक्तीनुसार राहुल पक्षाला कुठलेही यश मिळवून देऊ शकलेले नाहीत. मात्र त्यांच्या प्रत्येक अपयशात व नाकर्तेपणात नसलेली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी कॉग्रेसचे नेते अहोरात्र धडपडत असतात. त्यासाठीच आपली सर्व बुद्धी पणाला लावत असतात. गोव्यातील नाकर्तेपणाने उदभवलेली स्थिती, त्याचा उत्तम नमूना आहे. तिथे बहूमत हुकले असताना हवी तितकी तत्परता वा चतुराई राहुल वा त्यांचे विश्वासू दिग्विजय सिंग दाखवू शकलेले नव्हते. त्यामुळेच तशी घाई करणार्या भाजपाला राज्यपालांनी संधी दिली. पण याच मुर्खपणाला शहाणपणा ठरवण्याच्या कामी कॉग्रेस नेत्यांना जुंपले गेले. मग सर्वोच्च न्यायालयाकडून सणसणित चपराक खाण्याची नामुष्की कॉग्रेसच्या नशिबी आली. कायदेशीर व घटनात्मक विषयावर गोव्यातील भाजपा सरकार स्थापनेला आक्षेप घेत कॉग्रेसने कोर्टात धाव घेतली होती. पण त्या याचिकेत वा राज्यपालाकडे कुठल्याही बहूमताचा दावा कॉग्रेस करू शकलेली नव्हती. कोर्टानेही तेच विचारत वकीलाची खरडपट्टी काढली. मग हा तमाशा कॉग्रेसने कशासाठी केला? एक म्हणजे गेलेली अब्रु झाकण्यासाठी व दुसरे कारण राहुलच्या नाकर्तेपणाला लपवण्यासाठी. असे म्हणता येईल.
गोवा प्रकरणी कॉग्रेसने कोर्टात धाव घेण्याचे तिसरे व महत्वाचे कारण वेगळेच आहे. कॉग्रेसच्या अंतर्गत आता राहुल विरोधातील आवाज उठू लागले आहेत व गोव्यात राहुलच्या नाकर्तेपणाने निराश झालेले कॉग्रेसी आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याने काहीतरी करून त्यांना रोखण्याची गरज होती. म्हणूनच कोर्टात आपला दावा हास्यास्पद ठरणार असूनही कॉग्रेस तिथे गेली, ती फ़ुटायच्या मनस्थितीत असलेल्या आमदारांना आशा दाखवण्यासाठी! एक गोष्ट निश्चीत आहे. आता राहुल गांधींच्या एकुणच खुळेपणाला दिल्लीबाहेर कोणी विचारीनासा झाला आहे. दिल्लीतले भोवताली जमणारे मुठभर ज्येष्ठ नेते वगळता, विविध राज्यातील कॉग्रेस नेते व कार्यकर्ते राहुल विरोधात खुलेआम बोलू लागले आहेत आणि पक्षाला रामराम ठोकण्याचा वेग वाढतो आहे. राहुल हे पक्षाला भेडसावणार्या समस्येचे उत्तर नसून, राहुल हीच आज कॉग्रेस पक्षाला भेडसावणारी समस्या बनलेली आहे, याची जाणिव वाढत चालली आहे. लौकरच निवडणुका होऊ घातलेल्या विविध राज्यातले कॉग्रेसनेते भाजपात सहभागी होत आहेत. कर्नाटकात बंगारप्पा व एस एम कृष्णा असे दोन माजी मुख्यमंत्री त्या प्रतिक्षेत आहेत. हेमंतो बिस्वाल, रीटा बहूगुणा वा जयंती नटराजन यांनी यापुर्वीच राहुलवर ठपका ठेवून कॉग्रेसला काडीमोड दिलेला आहे. उत्तरप्रदेशचा दारूण पराभव आणि त्यानंतर गोवा मणिपुरच्या बाबतीतला हलगर्जीपणा बघता, येत्या काही काळात कॉग्रेस सोडण्याच्या कार्यक्रमाला गती येणार आहे. मग राज्यसभेत बसलेले मुठभर ज्येष्ठ नेते वा तथाकथित श्रेष्ठी यांना अंगणात बसवून राहुलनी अंगणवाडी सुरू केली, तर कोणाला नवल वाटण्याचे कारण नाही. कारण उत्तरप्रदेशच्या पराभवापेक्षाही गोवा मणिपुरच्या यशाला मातीमोल करून टाकण्यातून राहुलनी आपल्या खर्या विनाशक विध्वंसक आत्मघातकी गुणवत्तेही चुणूक दाखवली आहे.
भाऊ,याला पाकिस्तान मध्ये पाठवायला हवे दहशत- वाद संपेल
ReplyDelete