Thursday, November 17, 2016

नोटाबंदीचा ‘समाजवादी’ परिणाम

mulayam family feud के लिए चित्र परिणाम


गेले काही आठवडे देशभरच्या माध्यमांना उत्तरप्रदेशात सत्तेवर असलेल्या समाजवादी पक्षाचे काय होणार, याची चिंता भेडसावत होती. कारण समाजवादी पक्षाचा जनक असलेल्या मुलायम सिंग यादव यांच्या कुटुंबात कलह निर्माण झालेला होता. पुत्र मुख्यमंत्रीपदी आणि बाकीचे घराणेच पक्षाच्या नेतृत्वात असल्याने कुटुंब कलहाला राजकीय कलहाचे स्वरूप आलेले होते. त्यात मंत्री असलेला चुलता मुख्यमंत्री पुतण्याला दाद देत नाही, म्हणून धुसफ़ुस चालू होती. वाद विकोपास गेल्यावर पित्याने पुत्राला दणका देत भावाला प्रदेशाध्यक्ष नेमले आणि पुत्राने काटशह देत चुलत्याचीच मंत्रिमंडळातून हाकालपट्टी केली होती. त्यामुळे दिवसेदिवस हा वाद चिघळत गेला आणि एका प्रसंगी मुलानेही पित्याला खुले आव्हान दिल्यासारखे त्याचे आदेश जुमानण्यास नकार दिला. पंतप्रधान नरेंद मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घोषित करण्यापर्यंत हेच एक वादळ राष्ट्रीय माध्यमात धुमसत होते आणि उत्तरप्रदेशच्या राजकारणाचे काय होणार त्याची भाकिते रंगवली जात होती. मात्र नोटाबंदी जाहिर झाली आणि सर्वांचेच लक्ष समाजवादी कुटुंब कलहावरून उडाले. परिस्थिती इतकी टोकाला गेलेली होती, की मुलायमनी आपलाच भाऊ असलेल्या रामगोपाल यादव याची पक्षातून हाकालपट्टी केलेली होती. रामगोपाल हे राज्यसभेतील पक्षाचे नेते होते. पण भांडण विकोपास गेल्याने त्याचीही पर्वा झाली नाही. मात्र बुधवारी संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आणि चमत्कार घडला. रामगोपाल यादव यांनी पक्षाच्या वतीने नेता म्हणून राज्यसभेत भूमिका मांडली आणि कोणाच्याही ते लक्षात येण्यापुर्वीच त्यांना पुन्हा पक्षात घेऊन सरचिटणिस नेमण्यात आल्याची घोषणा झाली. याचा अर्थ सध्या तरी समाजवादी कुटुंबातील वादंग मिटलेले आहे. पण कोणी त्यांच्यात समझोता केला, त्याचा खुलासा होऊ शकलेला नाही. मोदीच तर त्यामागचे सुत्रधार नसतील ना?

समाजवादी पक्ष आणि मोदींचा संबंध काय? मोदी कशाला त्या पक्षाच्या वा मुलायमच्या घरगुती भांडणात मध्यस्थी करतील? तर त्याचे उत्तर मोदींनी व्यक्तीगत कुठेही मध्यस्थी केलेली नाही असे आहे. मध्यस्थी मोदींच्या कृतीने केलेली असू शकते. मोदींनी नोटाबंदीतून परिस्थितीच अशी निर्माण केली, की समाजवादी कुटुंबाला एकत्र येऊन राजकीय आव्हानाला सामोरे जाण्यास भाग पडावे. एक गोष्ट स्पष्ट आहे आणि जगजाहिर आहे. भारतातल्या निवडणूका काळ्यापैशाच्या बळावरच लढवल्या जात असतात. काळापैसा म्हणजेच बेहिशोबी पैसा. हा पैसा नोटांच्या स्वरूपात लपवून ठेवलेला असतो आणि कुठलीही पावती घेतल्याशिवाय त्याची देवाणघेवाण होत असते. असाच पैसा विविध नेत्यांनी जमवून ठेवलेला असतो. निवडणूकीत कुठल्याही पक्षाला असा पैसा ओतूनच लढावे लागत असते. त्याच पैशाच्या बळावर संघटना चालतात आणि त्याच बळावर नेता पक्षातल्या सहकार्‍यांना मुठीत ठेवत असतो. तसे नसते तर प्रशांत भूषण व योगेंद्र यादव यांची केजरीवाल हाकालपट्टी करू शकले नसते. ही त्या नवजात पक्षाची स्थिती असेल, तर समाजवादी पक्षाची वेगळी स्थिती कशाला असेल? समाजवादी पक्षाकडे येणार्‍या अशा बेहिशोबी पैशाच्या नाड्या मुलायमच्या हाती केंद्रीत असतील, तर पक्षाचे निर्णय तेच घेऊ शकतात. मायावतींची कहाणीही वेगळी नाही. पण नरेंद्र मोदी यांच्या एका निर्णयाने अशा नोटांच्या तमाम साठेबाजांची तारांबळ उडवून दिली. रातोरात त्या अब्जावधी रुपयांची किंमत मातीमोल करून टाकली. मग मुलायमच्या हाती असलेल्या पैशाला बाजारात काय मूल्य राहिले? आगामी विधानसभा निवडणूका कुठल्या बळावर लढवायच्या? मुलायम मायावती यांची स्थिती सारखीच होऊन गेली. पण तितकी वाईट स्थिती मुलायमपुत्र अखिलेशची नाही. कारण त्याच्या हाती सत्ता आहे. तो मुख्यमंत्री आहे.

सत्तेत असताना तुम्ही कुठल्याही मार्गाने पैसा उभा करू शकता. आज भाजपा सत्तेत असल्याने त्यांना यानंतरही मोठ्या रकमेने पैसे उभारणे शक्य आहे. कारण सत्ता हाती असल्याने विविध मार्गाने पैसे काढता येऊ शकतात. पण कॉग्रेसला पुर्वी जमवून ठेवलेल्या नोटांवरच विसंबून रहायला हवे ना? पण त्या जमवलेल्या नोटांची माती झाली असेल, तर आदळआपट करण्याखेरीज दुसरा मार्ग शिल्लक उरत नाही. मायावतींप्रमाणेच समाजवादी गोटातील मुलायम, शिवपाल यादव अशांची स्थिती म्हणूनच असहाय झाली. पण त्यांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या अखिलेशची स्थिती तितकी दुर्बळ नाही. पित्याच्या विरोधत गेलेला हा मुलायमपुत्र आजही मुख्यमंत्री आहे आणि पुढल्या चार महिन्यात तो आपल्या उमेदवारांसाठी हवी तितकी मोठी बेहिशोबी रक्कम उभी करू शकतो. सहाजिकच समाजवादी गोटात आज पैसे उभारू शकणार्‍यालाच महत्व असणार ना? मग पित्याचा मान वगैरे गोष्टी दुय्यम होऊन जातात. त्या पक्षात पैसे गोळा करण्याची कुवतच निर्णायक महत्वाची ठरणार ना? त्यासाठी पुत्राला बाजूला करून सत्ता हाती घेणे, मुलायमना आज शक्य नाही. कदाचित त्यातून राष्ट्रपती राजवट लागून असलेली सत्ताही गमवावी लागेल. त्यापेक्षा पैसे उभारू शकणार्‍या पुत्राशी तडजोड करायला पर्याय उरतो काय? तशीच तडजोड आता पितापुत्रांमध्ये झालेली असावी. म्हणूनच पित्याने पुत्राची सोबत करणार्‍या चुलत्याला रामगोपाल यादवना पुन्हा मुळपदावर आणून बसवले आहे आणि समाजवादी पक्षातला वाद संपवण्य़ात आला आहे. कारण आज नोटाबंदीमुळे हाती असलेल्या नोटा निरूपयोगी झाल्या असून, नव्या नोटा जमवू शकणारा मुख्यमंत्रीपुत्र मुलायमसाठी चलनी नाणे झालेला आहे. त्याला झिडकारून मुलायमना आगामी निवडणूकीला सामोरे जाता येणार नाही. कारण मोदींमुळे आता अखिलेश हेच मुलायमचे चलनी नाणे झालेले आहे.

नोटाबंदीने अनेक चमत्कार घडवले आहेत, त्यापैकी हा एक चमत्कार आहे. हमरातुमरीवर आलेल्या समाजवादी पक्षातला वाद क्षणार्धात निकालात निघाला आहे. कारण आगामी निवडणूकीत लागणारा बेहिशोबी पैसा निकामी झाला आहे. हेच मायावतींचे झाले आहे आणि इतरांचेही झाले आहे. कालपरवा पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येऊन गेले. वास्तविक भाजपाच्या स्थानिक नेत्यांसाठी ही पर्वणी होती. यापुर्वी मोदी पुण्यात आले म्हणजे जागोजागी त्यांच्यासह आपले चेहरे झळकवणारे फ़्लेक्स बोर्ड नाक्यावरील जागा व्यापून टाकत होते. पण यावेळी पुण्याच्या कुठल्याही नाक्यावर अशा पंतप्रधानांचे स्वागत करणार्‍या फ़लकांची गर्दी दिसली नाही. मोदींचेच स्वागत कशाला? गावगन्ना भाऊ, दादा, साहेबांच्या कुठल्याही निमीत्ताने झळकणार्‍या फ़्लेक्स फ़लकांची संख्या गेल्या दहाबारा दिवसात नुसती घटलेली नाही. अनेक शहरात वा गाव तालुक्यात फ़्लेक्स झळकणेच थांबले आहे. कोर्टाने इशारे देऊनही असे फ़लक थांबत नव्हते. त्यांना अकस्मात अदृष्य़ होण्याचे नोटाबंदीखेरीज दुसरे काही कारण असू शकते काय? अशा फ़लक प्रसिद्धीसाठी हिशोबातला अधिकृत पैसा कधीच वापरला जात नाही. अनेक समारंभ व मेळावे निदर्शनांसाठी लोटणारी गर्दीही आटोपली आहे. खाऊनपिवून मोर्चा मेळाव्यांना जमणार्‍या गर्दीला, नोटाबंदीचे भय कशाला भेडसावू लागलेले आहे? वाढदिवसाच्या निमीत्ताने विविध वर्तमानपत्रात प्रसिद्ध होणार्‍या पुढार्‍यांच्या पुरवण्याही अकस्मात थांबल्या आहेत. नोटाबंदीचे हे ‘दुष्परिणाम’ कुठल्याच वाहिनीने दाखवलेले नाहीत किंवा कुठल्याही वर्तमानपत्रात ठळकपणे आले नाहीत. सामान्य लोकांना रांगेत ताटकळावे लागते हे सांगितले जात आहे. पण नित्यनेमाने जे प्रसिद्धी मिळवत होते, त्यावर अकस्मात गदा कशामुळे आली, त्याचा उहापोह कुठेच होऊ नये, ही बाब चमत्कारीक नाही काय? त्यावर कोणी बोलत नाही की मुलायमच्या घरात कलह मिटल्याची चर्चा होत नाही.

3 comments:

  1. खर शिकले ते पप्पू तेच ४००० घेऊन भारतात सगळ्याच लाईन मध्ये उभारतायत पण दुर्भाग्य असे त्यांना कुणीच नोटा बदलुन देत नाही

    ReplyDelete