भारतातील काळापैसा असो किंवा शिकागोतील अल कापोनचे गुन्हेगारी साम्राज्य असो, त्यांची खरी शक्ती गुन्हे व पैशापेक्षाही कायद्याच्या लुळेपणात दडलेली होती. कायदा जिथे पांगळा आहे, त्याचाच लाभ उठवून गुन्हेगार आपल्या भोवती सुरक्षा कवच निर्माण करीत असतात. जिथे कायदा प्रशासन त्यांना धक्का लावू शकत नसते. म्हणूनच मग त्यांना भेदायचे असेल, तर कायद्याच्या निकामी ठरलेल्या पारंपारिक शस्त्राचा वापरच करायचा नाही, अशी इलियट नेसची रणनिती होती. ज्या मार्गाने कापोनसारखे गुन्हेगार कारवाया करतात, त्याच मार्गाने त्यांच्यावर चढाई करण्याचा त्याचा मनसुबा होता. पण त्यासाठी पोलिसी खाक्याने वा कायद्याच्या जंजाळात फ़सणारे कोणीही त्यात उपयुक्त नव्हते. उलट अपवादात्मक स्थितीला सामोरे जाताना अपवादात्मक मार्ग चोखाळू शकणार्या, पण प्रामाणिकपणाने हेतू तडीस लावणार्यांची नेसला गरज होती. विविध खात्यातील व कुशलता अंगी असलेल्या लोकांना शोधून काढण्यात त्याला काही कालापव्यय करावा लागला. पण त्याची टिम तयार झाली आणि ती कापोनलाही भारी पडू शकली. मात्र प्रत्यक्ष कारवाईला हात घालण्यापुर्वी त्याने एटर्नी जनरलकडून एक आश्वासन मिळवले होते. कोणीही राजकारणी वा अधिकार्याने त्याच्या कारवायांबद्दल रान उठवले, तरी हस्तक्षेप चालणार नाही. त्याला जाब विचारण्याचे सर्वाधिकार एटर्नी जनरल यांनाच असले पाहिजेत. तितके आश्वासन मिळाले आणि इलियट नेसची टिम कामाला लागली. त्याने गुन्हेगारी लाभदायक वा फ़ायदेशीर धंदा असल्याच्या समजूतीलाच सुरूंग लावण्याचा चंग बांधला होता. त्यासाठी कापोन वा अन्य कुणा गुंडाला शिक्षा देण्यासाठी कोर्टात खेचण्याची वा अटक वगैरे करण्याची त्याला गरजही वाटली नाही. शह गुन्हेगारीला द्यायचा होता. कारवाईही शह देण्याचीच सुरू झाली. त्याचे रहस्य काय होते?
गुन्हेगारीत झटपट व सहज प्रचंड पैसा मिळतो आणि तेच गुन्हेगारीत पडणार्याचे मोठे आकर्षण असते. शिवाय त्या पैशात सरकारी व प्रशासकीय लोकांनाही भागिदारी मिळाली तर त्यांचेही हात ढिले पडू लागतात. थोडक्यात सर्व रोगाचे मूळ सहज मिळणार्या पैशात होते. त्यामुळे तोच झरा आटला, तर गुन्हेगारीची घुसमट सुरू झाली असती. तोच मार्ग इलियट नेसने चोखाळला होता. उदाहरणार्थ कापोनची सर्व कमाई चोरटी बेकायदा दारू, जुगाराचे अड्डे, विविध लॉटरीचे प्रकार यातून येत होती. त्यापैकी एकाही धंद्याला कुठलीही कायदेशीर मान्यता नव्हती, की प्रशासनासाठी असा कुठलाही धंदाच अस्तित्वात नव्हता. सहाजिकच त्या धंद्यात काही दंगल, हाणामारी किंवा घोटाळा होत असेल, तर त्याच्याविरोधात कायदेशीर दाद मागण्याची कुठलीही सोय नव्हती. अमेरिकेत तेव्हा दारूबंदी होती. त्यामुळे दारूची निर्मिती वा विक्री वितरण यालाच बंदी होती. सहाजिकच असे काही कोणी करीत असेल आणि त्याचे अन्य कोणी नुकसान मोडतोड केली, तर कोर्टात दाद मागता येत नव्हती. पोलिस ठाण्यात तक्रारही नोंदवता येत नव्हती. मग लष्करी रणगाडे वा चिलखती गाड्या घेऊन इलियट नेसची टिम अशा अनेक दारू उत्पादन कारखान्यांचा, वितरणाच्या बार व दुकानांचा विध्वंस करीत सुटला. सहाजिकच कपोनच्या साम्राज्याचे कोट्यवधीने नुकसान होऊ लागले. पण मोडतोड करणारी टोळी कोणी प्रतिस्पर्धी गुन्हेगारांची नाही, तर खुद्द पोलिस खात्याचीच असल्याने त्यांच्याशी गुन्हेगाराप्रमाणे दोन हात करणे कापोनच्या टोळीला शक्य नव्हते. म्हणजेच त्याला तोंड दाबून बुक्क्याचा मार खायची वेळ आलेली होती. शिवाय नेसची टिम थेट एटर्नी जनरलच्या अधिकाराखाली काम करीत असल्याने, स्थानिक प्रशासकीय अधिकारी किंवा राजकारणी कुठलाही हस्तक्षेप करून नेसची उचलबांगडी करू शकत नव्हते.
प्रथमच कापोनला नवे आव्हान उभे ठाकले होते आणि त्याला विकत घेऊन गप्प करणे त्याच्या हातातली गोष्ट उरलेली नव्हती. बाकी सर्व शासकीय राजकीय यंत्रणा त्याची गुलाम होती. म्हणूनच पर्यायाने त्याच्या इच्छेनुसार सर्वकाही चालत होते. पण एटर्नी जनरल व त्याच्या हाताखाली कार्यरत असलेली नेसची टिम कापोनच्या हातात खेळणारे बाहुले नव्हती. मजेची गोष्ट म्हणजे असे दारूचे कारखाने वा बार दुकाने उध्वस्त करताना, तिथल्या कोणालाही अटक करून खटले भरण्याचा फ़ंदात नेसची टिम पडलेली नव्हती. धाडी घालताना तिथला कोणी पळून जात असेल, तर त्याला अडवण्याचे वा अटक करण्याचे कष्ट या टिमने घेतले नाहीत. त्या बेकायदा गोष्टी करणार्यांना मस्त पळून जाऊ देण्यात आले. त्यामुळे खटले भरणे वा ते सिद्ध करण्यासाठी पुरावे गोळा करणे; असल्या कटकटी राहिल्या नव्हत्या. सगळी शक्ती कापोनच्या सुरक्षित साम्राज्याची हानी व विध्वंस करण्यासाठी लावली जात होती. पण तिथे मिळाणारे अनेक पुरावे, कागदपत्रे जमा केली जात होती. त्यांची सवडीनुसार छाननी चालू होती. त्यात कुठे कापोनला थेट गुंतवता येईल, त्याचा अभ्यास चालू होता. मात्र दुसरीकडे सर्वच उद्योग बेकायदा असल्याने, त्या विध्वंसाच्या विरोधात कुठल्या कोर्टात दाद मागणेही कापोनला अशक्य होते. कारण त्याचा कुठलाही धंदा कायदेशीर वा कागदोपत्री अस्तित्वातच नव्हता. मग कुठल्या नुकसानासाठी इलियट नेसच्या टिमला गुंड ठरवुन गळा काढता आला असता? शिवाय अशा कुठल्याही कारवाईची दफ़्तरी नोंद वा न्यायालयिन भानगड करण्याचे नेस टिमनेही कष्ट घेतलेले नव्हते. थोडक्यात नेसची ‘अनटचेबल्स’ टिम शिकागोभर बेकायदा धुमाकुळच घालत होती. पण तसे काही घडत असल्याचा पुरावा कोणी देऊ शकत नव्हता. कारण तसे काही करणे म्हणजे असे बेकायदा धंदे राजरोस चालू असल्याची कबुली देण्यासारखे होते.
एकूणच तेरीभी चुप मेरीभी चुप, अशी प्रशासन राजकारणी व कापोनची गोची झालेली होती. आपल्याकडे पण काळापैसा आहे म्हणून बाता मारल्या जातात. पण आहे कुठे व कोणाकडे त्याचा पुरावा कोणी देत नाही. मग जो पैसाच नाही, तो चोरीला गेला वा लुटल्याचा दावा करी कसा करायचा? दोन्हीकडून कोंडी ना? शिकागोच्या गुन्हेगारी साम्राज्याचे भागिदार असलेल्या शेकड्यांनी लोकांची नेसच्या मुठभर प्रामाणिक सहकार्यांनी अशी तारांबळ उडवून टाकली. आपल्याकडेही नोटाबंदी झाल्यावर सामान्य माणूस रांगेत उभा आहे. पण ज्यांच्यापाशी पोत्यानी वा खोके भरून नोटा दडवून ठेवलेल्या आहेत, त्यांची बोंब मारायचीही सोय झालेली नाही. तेव्हा कापोनच्या गुन्हेगारी टोळीचे काय झाले असेल, त्याचा आज आपल्याला अनुभव येऊ शकतो. घरबसल्या रातोरात त्यांचे कोट्यवधी रुपये मातीमोल झालेत वा कचरा झाले आहेत. पण एक चकार शब्द बोलण्याची त्यांना हिंमत करणेही शक्य झालेले नाही. कारण कागदोपत्री त्यांच्यापाशी असे पैसेच नव्हते ना? मग बुडालो वा लुटला गेलो, म्हणून बोंब तरी कशी ठोकायची? कुठल्या कोर्टात वा पोलिस ठाण्याकडे जाऊन दाद मागायची? शिकागोमध्ये करोडोची अशी मालमत्ता दुकाने व कारखान्यांच्या रुपाने उध्वस्त झाली होती आणि आपल्याकडे एका निर्णयाने इलियट नेसच्या टिमसारखी कामगिरी पार पाडलेली आहे. कापोन दाद मागू शकत नव्हता आणि इथे काळापैसावाले स्वत:च त्या नोटा गटारात, उकिरड्यात फ़ेकून नामानिराळे रहायची कसरत करीत आहेत. कारण पैसा बोलता है. लेकीन जबतक पैसा है तबतक. ज्याक्षणी तो पैसा म्हणजे निरर्थक कागदाचा तुकडा होऊन जातो, तेव्हा त्याची बोलती बंद होत असते. नेसने काळ्याधंद्याची गळचेपी करून पैशाची बोलती बंद केली होती आणि मोदीनी काळ्या पैशाच्या नोटाच मातीमोल करून त्याची बोलती बंद केली आहे. कापोनचे साम्राज्य त्यातून जसे उध्वस्त झाले, तसे भारतातील काळ्यापैशाचे व भ्रष्टाचाराचे मुजोर साम्राज्य कसे संपू शकेल? (अपुर्ण)
No comments:
Post a Comment