Wednesday, November 23, 2016

सबसे बडा रुपैया की कायदा? अनटचेबल्स (३)

dawood blackmoney के लिए चित्र परिणाम

माणूस समाजात वावरतो त्याला सर्व कायदे लागू होत असतात. त्यामुळेच अकस्मात त्याच्याकडून कायदा नियम मोडले गेल्यास, त्याला गुन्हा मानले जात असते. पण काही लोक असे असतात, ते सातत्याने कायदे नियम पायदळीच तुडवत असतात. किंबहूना कायदा राबवताना त्यांचे गुन्हे सिद्ध करण्याची कायद्याला फ़ारच कटकट करावी लागत असते. अनेक सोपस्कार पार पाडावे लागत असतात. तेच तेच करताना कायदा यंत्रणेतील कर्मचार्‍यांनाही त्याचा कंटाळा येऊ लागतो. त्यामुळेच त्याच त्याच गुन्हेगाराला पकडून पुन्हा जामिनावर सुटताना बघून वा पुन्हा तसाच काही गुन्हा करताना बघून; कायद्याच्या अंमलदाराचाही कायद्याच्या धाकावरचा विश्वास डळमळीत व्हायला लागतो. दुसरीकडे कायद्याला घाबरून जगणार्‍या लक्षावधी लोकांच्या मनात अशा सातत्याने कायदा पायदळी तुडवणार्‍याच्या हिंमतीने भय निर्माण होते. त्याचा गुन्हेगार म्हणून दबदबा समाजात निर्माण होतो. हा दबदबा जितका मोठा, तितकी त्याची दादागिरी अधिक होत जाते. एका बाजूला अशा गुन्हेगाराचा वचक समाजात निर्माण होतो आणि दुसरीकडे त्याला शिक्षा देण्यासाठी सज्ज असलेल्या यंत्रणेला आपला अधिकार पोकळ वाटू लागतो. सहाजिकच कायदा व्यवस्था निकामी होत जाते. अशा निकामी व्यवस्थेचा जितका धाक सामान्य माणसाला असतो, त्यापेक्षा अधिक धाक कायदा मोडणार्‍याविषयी जनमानसात तयार होतो. त्याला कायदा काही करू शकत नाही, हा धाक कायद्यापेक्षाही मोठा असतो. अशा रितीने दाऊद, छोटा राजन वा छोटा शकील उदयास येत असतात. म्हणूनच आयकर वा शासकीय यंत्रणेला उल्लू बनवणारे भलेभले श्रीमंत लोक दाऊद वा राजन यांच्या नावानेच व़चकतात ना? हे कायद्याचे लंगडेपण लक्षात घेतले, तर कायदा निष्ठूर कशाला असायला हवा, ते लक्षात येऊ शकेल.

कापोन वा दाऊद यांच्यासारखे टोळीबाज गुन्हेगार याचा पुरेपुर लाभ उठवत असतात आणि सरकारी यंत्रणा निकामी करून दोन्हीकडून आपले वर्चस्व समाजात प्रस्थापित करतात. सामान्य माणूस वा समाज कुणाचा कायदा मानतो? ज्याची शिक्षा देण्याची निष्ठूरता अधिक, त्याचाच शब्द वा आदेश हा कायदा असतो. पोलिस कोणाला शिक्षा देऊ शकत नाहीत. त्याला फ़ार तर कुणाला पकडता येते आणि जे काही पुरावे असतील, ते न्यायालयात सादर केल्यावर पोलिसाचे काम संपते. पण त्या गुन्हेगार टोळीची गोष्ट वेगळी असते. कोणालाही इशारा देऊन तो पाळला गेला नाही, तर थेट मृत्यूदंड देण्यापर्यंत आपला शब्द असे गुंड खरा करून दाखवू शकतात. म्हणून भलेभले दांडगे लोकही गुन्हेगारांचा शब्द प्रमाण मानतात, पण कितीही मोठ्या शासकीय अधिकार्‍याला धुप घालत नाहीत. इथून कराचीत बसलेल्या दाऊदला खंडणीची रक्कम परकीय चलनात पोहोचती केली जाते. पण रुपयात भरता येणारा कर मात्र हिकमती करून बुडवला जातो. कारण कायद्याचा पळवाटा शोधून सरकारी यंत्रणा वा अधिकार्‍याला नामोहरम करणे सोपे असते. कापोन त्यातूनच निर्माण झाला होता आणि पैशाच्या बळावर लाच देऊन त्याने सरकारी कायदेशीर यंत्रणाही पुरती निकामी करून टाकल्याने त्याचे साम्राज्य उभे राहिले होते. पण त्याच्या पैशाचे बळ संपले तर सरकारी यंत्रणेकडून त्याला मिळणारे अभय संपणार होते. त्याच्या काळ्या धंद्यातून मिळणारा अफ़ाट पैसा आटला असता, तर लाचखोरीला लगाम लागून कापोनच्या खिशातली सरकारी यंत्रणा मुक्त होणे शक्य होते. बेकायदा धंदे नुकसानीत गेले तर कापोनच्या हाती येणारा पैसा आटणार होता आणि आपोआप भ्रष्ट सरकारी यंत्रणा क्रमाक्रमाने कामाला लागणार होती. म्हणूनच अटका व खटले भरण्याच्या मागे धावण्यापेक्षा, इलियट नेसने कापोनचे उद्योगाचे साम्राज्य उध्वस्त करून तोट्यात नेण्याचे डावपेच खेळले होते.

जसजसे धंद्यातले नुकसान वाढत गेले, तसतशी कापोनची सरकारी व राजकीय वर्गावरची पकड ढिली पडत गेली. लाचखोरीला सवकलेले अधिकारी व राजकारणी कापोनला दाद देईनात. जिथे शक्य होईल तिथे लाचेअभावी अन्य यंत्रणाही कापोनची कोंडी करू लागल्या. इतके झाल्यावर इलियट नेसच्या टिमने हाती आलेले पुरावे तपासून त्यात कापोनला गुंतवण्याचा मर्ग शोधून काढला. कापोनला खुन दरोड्यात पकडणे अवघड होते. पण त्याच्या विविध धंद्यासाठी आवश्यक असलेल्या मालमत्ता व साधने त्याने प्रचंड रक्कम ओतून खरेदी केलेल्या होत्या. त्यासाठी त्याने पैसे कुठून आणले, त्याच्याशी आयकर विभागाला कर्तव्य नव्हते. ती रक्कम कमावली म्हणूनच खर्चली होती. त्याविषयीही तक्रार असायचे कारण नव्हते. सवाल इतकी वर्षे ही कमाई केल्यावर कापोनने खरेदीविक्री करताना त्या उत्पन्नावरचा आयकर भरलेला नव्हता. तोच मुद्दा घेऊन नेसच्या पथकातल्या एका हिशोब तपासनीसाने कापोनवर करबुडवेगिरी केल्याचा खटला तयार केला आणि त्याच आरोपाखाली या माफ़िया बॉसला ताबडतोब अटक केली. एकदा त्याला अटक झाली आणि शिकागोसह अमेरिकेत धमाल उडाली. कापोनला अटक ही मोठी बातमी होती आणि त्या खटल्यात त्याला जामिन मिळू नये म्हणून नेसच्या पथकाने आटापिटा केला. अखेरीस शेकड्यांनी मुडदे पाडलेला व हजारांनी लहानमोठे गुन्हे केलेला क्रुरकर्मा अल कपोन, किरकोळ मानाव्या अशा करबुडव्या प्रकरणासाठी काही वर्षे तुरूंगात फ़ेकला गेला. त्याच्याअभावी त्याचे गुन्हेगारी साम्राज्य चालवायला तितका खमक्या कोणी शिल्लक नव्हता. शिवाय त्यालाच कायदा तुरूंगात टाकू शकतो, या अनुभवाने त्याची दहशत संपुष्टात येत गेली. त्याच्या अनुपस्थितीत त्याच्याच साथीदारांमध्ये बेबनाव निर्माण झाला आणि ते गुन्हेगारी साम्राज्य लयास गेले. सहज येणारा पैसा आटला आणि इतके अभेद्य गुन्हेगारी साम्राज्य उध्वस्त होऊन गेले.

जे काम शिकागो व अमेरिकेतील हजारो अधिकारी व शेकडो पोलिस यंत्रणांना शक्य झाले नव्हते, किंवा डझनावारी कठोर कायद्यांनी शक्य झाले नव्हते; तेच आव्हान जुन्याच कायद्याच्या कक्षेत राहुन व वीस बावीस प्रामाणिक अधिकार्‍यांच्या ‘अनटचेबल्स’ नामक पथकाने कसे करून दाखवले असेल? त्यांचे ध्येय ठरलेले होते आणि त्यांनी अपवादात्मक मार्ग स्विकारलेला होता. त्यांना कारवाईचा देखावा उभा करायचा नव्हता किंवा, श्रेय मिळवायचे नव्हते. त्यांना अल कापोनचे गुन्हेगारी साम्राज्य नेस्तनाबुत करायचे होते आणि त्यासाठी आवश्यक असलेली कुठलीही कृती करण्याची सज्जता त्यांनी राखलेली होती. प्रसंगी कापोनचेच लबाडीचे तत्व व प्रणाली वापरून त्याला संपवायचा होता. कापोनचे वा कुठलेही गुन्हेगारी साम्राज्य, निष्ठूर कारवाईच्या धाकावर उभे असते आणि त्यासाठी भरपूर बेकायदा पैसा मिळवता येईल, असा धंदा गुन्हेगारीचा असतो. त्यातला सहज मिळणारा पैसा हीच खरी चालना वा प्रेरणा असते. त्यालाच वेसण घातली गेली, मग गुन्हेगारीला पायबंद घातला जातो आणि आपोआप कायद्याला वचकून रहाणारी संख्या वाढत जाते. गुन्हेगारी साम्राज्य संपत जाते तसे भ्रष्टाचाराचेही वर्चस्व घटत जाते. त्यातल्या प्रत्येक घटकावर हल्ले करत बसण्यापेक्षा इलियट नेसने पैशाचा मार्ग रोखला आणि वर्मावर घाव घातला. पैसा आटल्यावर बाकीच्या तमाम गोष्टी घुसमटून मरत गेल्या. भारतातल्या बहुतांश बेकायदा धंदे व गुन्हेगारीला भ्रष्टाचार व काळापैसाच जबाबदार आहे आणि त्याचा जीव कुठल्याही क्षणी उपलब्ध असलेल्या लपवलेल्या काळ्यापैशाच्या नोटांच्या पिंजर्‍यातला पक्षी आहे. पंतप्रधानांनी ८ नोव्हेंबरला पाचशे हजाराच्या नोटा अकस्मात रद्द करून त्याच पिंजर्‍यातील पक्षाची मान पिरगाळली आहे. त्यामुळे तो पक्षी तडफ़डून मरताना राजकारणासह सर्वक्षेत्रातले भ्रष्टाचारी राक्षस घुसमटल्यासारखे जुन्याच नोटा हव्यात म्हणून शिव्याशाप देताना दिसले, तर नवल नाही.

5 comments:

  1. भाऊ, The INDIAN Untouchables series जबरदस्त लेख

    ReplyDelete
  2. छानच भाऊ सुंदर

    ReplyDelete
  3. अप्रतिम भाऊ

    ReplyDelete
  4. फारच सुंदर, अचूक नेमबाजी

    ReplyDelete