Thursday, November 24, 2016

भोंदू सहिष्णूतेची सत्वपरिक्षा

hilary trump के लिए चित्र परिणाम

रात्री उशिरा अमेरिकन मतदानाची मोजणी पुर्ण झाली आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रंप विजयी झाले. डेमॉक्रेट पक्षाच्या हिलरी क्लिंटन पराभूत झाल्या. त्यांचे पाठीराखे मोठ्या संख्येने एका भव्य संकुलात विजयोत्सव साजरा करण्यासाठी आधीपासूनच जमा झालेले होते. पण मतमोजणीचा कौल समोर येऊ लागला आणि शेवटच्या टप्प्यात ट्रंप यांचा विजय स्पष्ट झाला. तेव्हा हिलरी गोटात नैराश्याचे वातावरण पसरले. नेहमीची पद्धत अशी, की पराभूत उमेदवार आपल्या समर्थकांपुढे येऊन पराभव मान्य करतो. मात्र तितके सौजन्य हिलरी दाखवू शकल्या नाहीत. पराभव स्पष्ट झाल्यावर त्यांनी समर्थकांपुढे येण्याचे टाळले आणि त्यांचा प्रतिनिधी तिथे येऊन समर्थकांचे सांत्वन करून निघून गेला. ‘बाकी उद्या बघू’ असा त्याचा सूर होता. काही वेळाने ट्रंप आपल्या समर्थकांपुढे आले आणि त्यांनी तमाम अमेरिकन मतदारांचे आभार मानले. यापुढे आपण सर्व अमेरिकनांचे प्रतिनिधी असल्याचे त्यांनी सांगितले. प्रचाराची धुमाळी संपली, आता नव्याने देशाच्या उभारणीला लागुया, असे आवाहन त्यांनी केले. दुसर्‍या दिवशी सकाळी हिलरी यांनीही आपल्या समर्थकांना सामोरे जाऊन, नव्या अध्यक्षांशी सहकार्य करूया. त्यांना काम करण्याची संधी देऊया, असे आवाहन केले. पण त्याच रात्री विविध शहरामध्ये डेमॉक्रेट समर्थकांनी ‘ट्रंप आमचा अध्यक्ष नाही’ अशा घोषणा देत दंगामस्ती सुरू केली. प्रामुख्याने जिथे हिलरी यांना जास्त मते मिळाली, त्या राज्यात अशा घोषणा व निदर्शनांचा गोंधळ सुरू झाला. ज्यांनी गेल्या वर्षभरात ट्रंप असहिष्णू असल्याचा सातत्याने डंका पिटला होता, त्यांनीच मतदानाचे निकाल सभ्यपणे स्विकारण्यास नकार देऊन धुमाकुळ आरंभला. जाळपोळ व दगडफ़ेक करण्यापर्यंत मजल मारली होती. किती चमत्कारीक गोष्ट आहे ना? सहिष्णूतेचे पुरस्कर्तेच कायदेशीर मतमोजणीचा निकाल झुगारायला सरसावले आहेत.

निवडणूक प्रचार मोहिम चालू असताना, एकूणच निवडणूक व्यवस्था व त्यातल्या यंत्रणा भ्रष्ट आणि पक्षपाती असल्याचा आरोप ट्रंप करीत होते. प्रमुख उमेदवार समोरासमोर आणून ज्या तीन चर्चा झाल्या, त्यापैकी शेवटच्या चर्चेत मतदानाने झालेला पराभव मान्य कराल काय, असा प्रश्न ट्रंप यांना विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी निकाल लागल्यानंतर बघू; अशी प्रतिक्रीया दिलेली होती. तेवढेच वाक्य उचलून बहुतांश वाहिन्या व माध्यमांनी ट्रंप राजकीय व्यवस्था व यंत्रणांचेही पावित्र्य झुगारतात, अशी टिकेची झोड उठवली होती. त्यांना फ़ॅसिस्ट व हुकूमशाही प्रवृत्तीचे म्हणून बदनाम केले होते. थोडक्यात निकाल लागेल, तो हिलरी व त्यांचेच समर्थक सहिष्णूतेने मान्य करणारे सभ्यलोक असल्याचा दावा, सर्वच माध्यमांनी व जाणत्यांनी केला होता. पण निकाल लागल्यावर तो सभ्यपणाचा मुखवटा पुरता फ़ाटला आहे. कारण निकाल विरोधात गेल्यावर इतिहासात प्रथमच डेमॉक्रेट पक्षाचे पाठीराखे व समर्थक निकाल नाकारत रस्त्यावर उतरले आहेत. निकाल नाकारून हे लोक राजकीय नियम व व्यवस्थेलाच झुगारण्याची भाषा बोलत आहेत. थोडक्यात विजय आमचाच झाला पाहिजे आणि आम्हाला विजयी करणार नसेल, ती व्यवस्थाच आम्हाला मान्य नाही, असा पवित्रा या तथाकथित सहिष्णू सभ्य जमावाने घेतला आहे. निवडून आलेल्या अध्यक्षाला ‘तो आमचा राष्ट्राध्यक्ष नाही’ असे संबोधून, हे लोक कुठली सभ्यता व सहिष्ण्ता दाखवत आहेत? शब्दांचे अर्थ किती बदलून गेलेत ना? असहिष्णूता आजकाल सहिष्णूता बनली आहे. असभ्यता आजकाल सभ्यता म्हणून मिरवते आहे. जितके म्हणून तुम्ही सभ्य वा सहिष्णू होत जाता, तितका बेशरमपणा तुम्हाला करता आला पाहिजे. यापेक्षा वेगळा अर्थ त्यातून काढता येतो काय? तोतयेगिरी किती शिगेला जाऊन पोहोचली आहे, त्याच हा जागतिक नमूना आहे.

कुठल्याही क्रांतीनंतर आधीचा हुकूमशहा बरा होता म्हणायची पाळी सामान्य लोकांवर येत असते आणि तेच सध्या अमेरिकनांना अनुभवावे लागते आहे. कमीअधिक प्रमाणात जगावर अमेरिकन माध्यमाचा व बुद्धीवादाचा प्रभाव असल्याने, त्याचीच पुनरावृत्ती जगातही होत असते. नरेंद्र मोदी नेहमीच्याच पद्धतीने देशाचा पंतप्रधानपदी जाऊन बसले, तर त्यांनाही अशाच अग्निदिव्यातून जावे लागले आहे. त्यांच्यापाशी संसदेतले बहूमत आहे, पण त्यांना कुठलेही काम करू द्यायचे नाही, यासाठी नियम व कायदे शोधून अडथळे आणले जात असतात. मोदींच्या भाजपाला ३१ टक्के मते मिळाली. म्हणूनच ६९ टक्के मते त्यांच्या विरोधात आहेत, असा सिद्धांत मांडणारा बुद्धीवाद कुठल्या भारतीय पंतप्रधानाला ५० टक्क्याहून अधिक मतदारांचा पाठींबा मिळाला होता, त्याविषयी कधी बोलत नाही. सोनिया गांधींच्या कॉग्रेसला २०-२५ टक्के मते होती आणि भाजपा तेव्हा पराभूत होऊनही १९ टक्के मते होती. तेव्हा कोणी मतांच्या टक्केवारीचा बुद्धीवाद केला नाही. याला बुद्धीवाद नव्हेतर युक्तीवाद म्हणतात. आज त्याचेच प्रत्यंतर अमेरिकन सहिष्णूतेत बघायला मिळत आहे. पण आपल्याला लोकांनी कशाला नाकारले किंवा सत्तेपासून दूर केले, त्याचे आत्मपरिक्षण करण्याची अशा बुद्धीमान पुरोगामी वा सहिष्णू लोकांना कधी गरज वाटत नाही. आपल्याला जगातले सत्य गवसले आहे, अशी बुवाबाजी करणारे वा सामान्य लोकांना नादी लावून त्यांची दिशाभूल करणारे भामटे आणि तथाकथित पुरोगाम्यांमध्ये आता तसूभर फ़रक राहिलेला नाही. त्याचेच हे दुष्परिणाम आहेत. साधूत्वाचे मुखवटे लावून पुरोगामी फ़िरत असले तरी व्यवहारात ते भोंदूगिरी करत असतात. ती जेव्हा लोकांच्या लक्षात येते तेव्हा अंगावरची वस्त्रे वा वेशभूषा कुणावर प्रभाव पाडू शकत नसते. जगभर अशा पुरोगामी, उदारमतवादी लोकांना म्हणूनच झिडकारले जात आहे.

ट्रंप हा चांगला माणूस नसेल किंवा तद्दन असभ्य असेल. पण निदान सभ्यतेचा मुखवटा लावून दिशाभूल करणारा भोंदू नक्कीच नाही. त्याची पापे चव्हाट्यावर आली आहेत. पण त्याच्यापेक्षा बिल क्लिंटन किती भिन्न होता? राष्ट्राध्यक्ष निवासातच त्याने तरूण मुलींचे लैंगिक शोषण व व्याभिचार केल्याचे लोक विसरलेले नाहीत. त्या पतीला लाथा घालण्याची हिंमत नसलेली हिलरी, जेव्हा ट्रंपच्या बाष्कळ बडबडीला भयंकर गुन्हा ठरवित आक्रोश करू लागते, तेव्हा विचारांनी हिशोबी मत बनवणार्‍या शहाण्यांना पुरोगाम्यांना तिचा कळवळा येत असेल. पण आपल्याच डोळ्यावर आणि तर्कबुद्धीवर विश्वास ठेवणार्‍या सामान्य माणसाला त्या दोघांमध्ये लपवाछपवी न करणारा ट्रंप बरा वाटू लागतो. सहिष्णूतेचे नाटक रंगवून पराभूत झाल्यावर असहिष्णूतेचा नंगानाच करणार्‍यांना, सामान्य माणूस त्यांची जागा दाखवायला सिद्ध होत असतो. जगात नेहमी टिचभर अल्पसंख्य बोलघेवडे खुप गोंगाट करतात आणि अफ़ाट बहुसंख्य निमूट ऐकत असतात. पण तो गोंगाट असह्य झाला, मग तोच मूक बहुसंख्य कृती करू लागतो आणि वाचाळ बोलघेवड्यांच्या मुस्कटातही मारायला पुढे येऊ लागतो. सध्या जगभर तेच वारे वहात आहेत. त्याचा संकेत व दिशा ज्यांना लौकर कळेल, ते वेळी़च शहाणे होतील. नाही त्यांना उचलून बाहेर फ़ेकून देण्यापर्यंत मूक बहुसंख्येला कृती करायची पाळी येईल. हिलरीचा पराभव व्यक्तीगत नाही. तो एका तोतयेगिरीचा पराभव आहे. सध्या त्याला नुसते सभ्य मार्गाने नाकारले जाते आहे. तेवढ्याने भागले नाही, तर मूक बहुसंख्य जनता एक सुरात बोलू लागेल आणि एकत्रित तिचा आवाज इतका भयंकर असेल, की त्या नुसत्या ध्वनीलहरी पुरोगामी तोतयेगिरीला विनाश घडवून आणतील. पित्याचा मुखवटा लावून लैंगिक शोषण करणार्‍यापेक्षा खरा बलात्कारी गुंड परवडला; असा त्यातला इशारा आहे. समजून घेतला तर!

1 comment:

  1. खरय भाऊसाहेब लोकसत्ता ने सुध्दा पुरोगामी ढोंगाला झोडपणारा लेख परवा लिहीला होता. लोकसत्ता अस लिहु शकते , अमेरिकेत ट्रंप निवडून येऊ शकतात याचा अर्थच हा आहे कि आता पुरोगाम्याचे दिवस भरत आले. मोदि सत्तेत आल्यावर भारत सोडून जातो म्हणणारे सेन ,कर्नाड आणखी भारतात कसे ?

    ReplyDelete