Friday, November 25, 2016

विरोधाची जोपासना

indira janta party के लिए चित्र परिणाम

काही लोक बाकीच्या सर्व विषयातले जाणकार असतात आणि ठराविक विषयात अजिबात अनभिज्ञ असतात. माझ्या पत्रकारी जीवनात जे काही जीवलग मित्र जमलेले होते, त्यांचा एक गोतावळा होता. या गोतावळ्यातले कुटुंबियही जीवाभावाचे होऊन गेलेले होते. मध्येच कधीतरी आम्ही मुंबईबाहेर दोनतीन दिवस विश्रांतीसाठी जाऊन अड्डा टाकायचो. तिथे दिवसभर बेताल गप्पा चालायच्या. अगदी जगातल्या कुठल्याही विषयावर उलटसुलट हमरातुमरी व्हायची. त्यात सगळे सहभागी व्हायचे. पण जेव्हा राजकीय वादविवाद व्हायचे, तेव्हा त्यात एक अपवाद असायचा, तो वसंत सोपारकरच्या पत्नीचा! निशा सोपारकर कधीच राजकीय वादात भाग घ्यायची नाही. त्याबद्दल तिचे फ़ारसे काही मत नसायचे. पण इतिहास, पुराण, सामाजिक समस्या, साहित्य-कला अशा अन्य कुठल्याही विषयात निशा आवेशात बोलायची. एकदाच तिने अपवाद केला होता. १९७८ सालची गोष्ट आहे. लोणावळ्याला आमचा अड्डा पडला होता आणि जनता पार्टी सत्तेत आलेली होती. इंदिराजी लोकसभेत पराभूत होऊन सत्ताभ्रष्ट झालेल्या होत्या. त्यामुळे इंदिराजी व कॉग्रेसचे भवितव्य काय असेल, यावर आमचा राजकीय वाद रंगलेला होता. इतक्यात कधी नव्हे ती निशा मध्येच बोलली. ‘आता जनता पार्टीचे मोरारजी सरकार पडणार’. कोणाचे तिच्याकडे लक्ष नव्हते. पण मी सर्वांना गप्प केले आणि निशा प्रथमच राजकीय मत देतेय, याविषयी सर्वांना जागे केले. सगळेच तिच्याकडे थक्क होऊन बघू लागले. थेट जनता सरकार पडण्याचा निष्कर्ष हिने कुठून काढला? म्हणून सगळेच चकित झालेले होते. कारण निशाची राजकीय समज यथातथा, असाच आम्हा सर्वांचे गृहीत होते. त्याबद्दल तिची अजिबात तक्रार नव्हती. पण खरेच काही महिन्यात जनता सरकार कोसळले होते. मग आमच्यापेक्षा निशाला त्याचा अंदाज आधी कशामुळे आला होता?

बाकीचे आम्ही बहुतांश पत्रकार होतो आणि स्वत:ला राजकारणाचे जाणकार समजत होतो. सहाजिकच आमची एक विचार करण्याची शैली तयार झालेली होती. त्यामध्ये अनेक आडाखे असतात. त्यामुळे जनता पक्षाकडे भक्कम बहूमत असताना त्यांचे सरकार पडण्याची कुठलीही शक्यता आम्हाला दिसत नव्हती. शिवाय दुसरीही एक बाजू होती. इंदिराजींचे वर्चस्व कॉग्रेस पक्षातही कमी झालेले होते. त्याच स्वत: लोकसभेला पराभूत झाल्या होत्या आणि अन्य समकालीन कॉग्रेसनेते इंदिराजींना फ़ार दाद देत नव्हते. त्यात पुन्हा इंदिराजींनी पक्षात दुफ़ळी माजवून वेगळी चुल मांडलेली होती. अशा दोन्ही तुकड्यातल्या कॉग्रेसपाशी संख्याबळही कमी होती. अगदी जनता पार्टीतला एखादा गट बाजूला झाला, तरी इंदिराजी पर्यायी सत्ता बनवू शकणार नव्हत्या. थोडक्यात कुठल्याही प्रचलीत निकषावर जनता सरकार पडण्याची शक्यता आम्हा पत्रकारांच्या बुद्धीला पटत नव्हती. किंबहूना निशाचा दावाच हास्यास्पद होता आणि सहाजिकच त्या चर्चेत अधिक काही बोलत नसली, तरी निशाची टिंगलच होत राहिली. मुद्दाम खोदून तिला बोलते करण्याचा प्रयास झाला, तेव्हा तिचा तर्क अधिकच मुर्खासारखा वाटला होता. तिला जनता सरकार कशामुळे पडेल विचारले तेव्हा तिने दिलेला खुलासा आणखीनच गमतीशीर होता. तमाम जनतावाले इंदिरा गांधींचे पक्के विरोधक आहेत. त्यामुळे जे काही इंदिराजी म्हणतील वा करतील. त्याचा हे जनतावाले कडाडून विरोध करणार ना? म्हणूनच ते आपलेच सरकार पाडतील, असा तिचा दावा होता. कारण इंदिराजी दोनच दिवस आधी म्हणाल्या होत्या, ‘जनता सरकार पाच वर्षाची मुदत पुर्ण करील.’ आता इंदिराजींना खोटे पाडण्यासाठी हे जनतावाले मुद्दाम आपलेच सरकार पाडतील आणि इंदिराजींचे शब्द खोटे करून दाखवतील, असे निशाचे चमत्कारीक मत होते.

किती चमत्कारीक तर्क होता निशाचा? आम्हाला अजिबात पटला नाही. कारण आमच्या सुबुद्ध राजकीय अभ्यासात बसणारा तो तर्क नव्हता. जनता पक्षवाले वा अन्य इंदिरा विरोधक केवळ इंदिराजींना खोटे पाडण्यासाठी आपलेच सरकार पाडतील? हे कसे पटेल? पण पुढल्या काही महिन्यात अशा घटना घडत गेल्या, की क्रमाक्रमाने जनता पक्षातील नेत्यांनी व गटबाजीनेच आपले सरकार जमिनदोस्त केले. इंदिराजींना काहीच करावे लागले नाही. त्यांनी ते सरकार पाच वर्षे चालण्याची हमी दिलेली होती. पण जणू त्यांनाच खोटे पाडण्यासाठी अवघ्या अडीच वर्षात जनता नेत्यांनी बेबंदशाही माजवून आपलेच सरकार पाडले. यातला तार्किक अतिरेक सोडला, तरी निशा सोपारकरचे ते तर्कशास्त्र मी अनेकदा पुन्हा आठवून समजून घेण्याचा प्रयत्न करतो. इंदिराजींनी त्यावेळी तसे बोलण्याची काय गरज होती? जनता पक्षातले अंतर्विरोध त्यांनाही दिसत होते. आतली भांडणे व तात्विक वादविवाद चव्हाट्यावरच आलेले होते. मग इंदिराजी पाच वर्षे सरकार चालण्याची भाषा कशाला बोलत होत्या? तर जनता पक्षीयांना एका गोष्टीची हमी त्या देत होत्या. जो काही जनता पक्ष आहे आणि त्याचे जे संसदेतील संख्याबळ आहे, त्याला पुरून उरण्याची आपल्यापाशी कुवत नाही, असेच इंदिराजी त्यांना समजावत होत्या. आपल्या विरोधासाठी हे लोक एकवटलेले आहेत आणि आपला धोका नाही याची खात्री पटली, तर ते नक्की एकत्र नांदणार नाहीत, असेच इंदिराजींचे गणित असावे. म्हणूनच त्यांनी जाहिर विधानातून आपली असहायता व्यक्त केली आणि जनता पक्षातली सुंदोपसुंदी वाढत गेली. सतत भांडत बसणार्‍यांना बाहेरचा शत्रू उरला नाही, मग त्यांची आपसात जुंपते. तशीच काहीशी जनता पक्षाची कहाणी झालेली होती. पण ते आपसात लढून पडले, तर लाभ इंदिराजींचा नक्कीच झाला असता. अर्थात झालेही तसेच!

जेव्हा एका व्यक्ती वा प्रतिकाच्या विरोधात लोक एकत्र येतात आणि त्यांना जोडून ठेवणारा धागा तीच एक गोष्ट असते,. तेव्हा त्यांना बांधणारा तोच धागा काढून घेतला, तर त्यांना विस्कळीत व्हायला वेळ लागत नाही. इंदिरा विरोधाने जनता पक्ष वा त्याचे राजकारण एकत्र चालले होते. जोवर इंदिरा हे आव्हान असल्याची भिती कायम समोर असणार होती, तोवर त्यांना एकत्र रहाणेच भाग होते. इंदिराजींनी त्यातली असमर्थता दाखवली आणि जनता पक्षाला एकत्र बांधून ठेवणार धागा सुटला. आज त्याची आठवण पुन्हा इतक्या वर्षांनी येतेय, कारण आजचे विस्कळीत विरोधक आपापल्या कुठल्या ठाम भूमिकेने काम करताना दिसत नाहीत. त्यांच्यापाशी काही कार्यक्रम नाही वा तत्वज्ञान नाही. मोदीविरोध हा त्यांना एकत्र आणणारा एकमेव धागा आहे. त्यातला मोदी बाजूला काढला, तर अशा विरोधकांना एकत्र आणणे किंवा राखणे अशक्य आहे. किंबहूना तेच नरेंद्र मोदींना नेमके उमजलेले आहे. तीन वर्षापुर्वी त्यांनी पद्धतशीरपणे अशा तमाम विरोधकांना विस्कळित ठेवले आणि आपल्याच विरोधात उभे रहायला भाग पाडले. सहाजिकच ज्यांना मोदी नको ,त्यांनी अन्य कुणा विखुरलेल्या पक्षाकडे जावे. पण ज्यांना त्यापैकी कुठलाही एक पक्ष नको असेल, त्यांनी मोदी हा पर्याय निवडावा; अशीच स्थिती मोदींनी धुर्तपणे निर्माण केलेली होती. त्यानंतर सत्ता हाती आल्यावर मोदींनी जाणिवपुर्वक विरोधकांना केवळ मोदीविरोध याच भूमिकेसाठी एकत्र यावे, अन्यथा आपापसात लढावे; अशा स्थितीत ठेवलेले आहे. मोदीविरोधाच्या पलिकडे विरोधकात अन्य कुठला कार्यक्रम, तत्व किंवा विषयावर एकमत होऊ नये, याविषयी मोदी काटेकोर आहेत. त्यामुळेच गेल्या अडीच वर्षात मोदींनी तमाम विरोधकांना आपल्या विरोधात एकजुट होण्याची संधी उपलब्ध करून दिलेली दिसेल. मोदीला खोटा व चुकीचा ठरवण्याच्या या खेळात विरोधकांना ठराविक अंतराने कोण नवे मुद्दे पुरवतो आहे? विरोधाची जोपासना करून राजकीय यश मिळवण्याची ही शैली, इंदिराजींचीच नाही काय?

1 comment: