Thursday, November 10, 2016

मराठा मूक मोर्चा आणि ट्रंप

मराठा मोर्चा के लिए चित्र परिणाम

८ नोव्हेंबरला अमेरिकेत मतदान झाले आणि ९ नोव्हेंबरला अमेरिकेचा नवा अध्यक्ष निश्चीत झाला. येत्या वर्षी २० जानेवारी २०१७ रोजी डोनाल्ड ट्रंप अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून कारभार सुरू करतील. हे सत्तांतर सुरळीत पार पडावे, म्हणून गुरूवारी मावळते अध्यक्ष बराक ओबामा यांनी ट्रंप यांना अध्यक्षीय निवासात आमंत्रित केले. हीच जुनी प्रथा आहे. पण पराभूत डेमॉक्रेट पक्षाच्या पाठीराख्यांना मात्र आलेला निकाल मान्य नाही आणि त्यासाठी जिथे त्या पक्षाचा प्रभाव आहे, तिथे त्यांनी निदर्शनांचा तमाशा आरंभला आहे. अर्थात असा धक्का बसलेले लोक केवळ त्या पराभूत पक्षातच नाहीत. अमेरिकेतील व जगातील बहुतांश राजकीय अभ्यासक, विश्लेषक आणि पत्रकारांनाही या निकालाने हादरा दिला आहे. अमेरिकन मतदाराने ट्रंप यांना निवडावेच कशाला, ह्या यक्षप्रश्नाचे उत्तर शोधण्यात सगळे गर्क आहेत. जितका शोध चालू आहे तितके त्यांचे कोडे अधिकच गुंतागुंतीचेच होत चालले आहे. अर्थात यात नवे काहीच नाही, कदाचित दहा आठवड्यांनी ट्रंप सत्तासुत्रे हाती घेतील, तेव्हाही अशा लोकांना या कोड्याचे उत्तर सापडणार नाही. अडीच वर्षे म्हणजे नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानकीची अर्धी मुदत संपून गेली, तरी भारतातल्या अनेक अभ्यासकांना मोदी कशामुळे इतकी मते मिळवून निवडून आले; त्याचा शोध कुठे लागला आहे? गफ़लत समजून घेण्यात नसून त्यांच्या विचारशैलीत आहे. समोर दिसते ते आधी समजून घ्यावे आणि मग त्याचे विश्लेषण करावे, ही गोष्ट आजकालचे अभ्यासक विसरून गेल्याचा तो परिणाम आहे. म्हणूनच त्यांना मोदींना लोक कशाला निवडून देतात वा ट्रंपच्या हातात सत्तासुत्रे कशाला सोपवतात, त्याचा थांग लागत नाही. फ़ार कशाला? दोनतीन महिने महाराष्ट्रात निघत असलेल्या मराठा मूक मोर्चाचे रहस्य किती जाणकारांना नेमके उलगडता आलेले आहे? कोणी त्याची नेमकी मिमांसा करू शकला आहे काय?

मराठा समाज हा राज्यातला बहुसंख्य किंवा मोठा समाजघटक आहे. तोच जमिनदार व सघन वर्ग आहे. त्याच्यापुढे बाकीचे सगळे समाजघटक दुर्बळ आणि अगतिक आहेत. हे एक गृहीत आहे. सत्तेत कायम मराठे होते. पुर्वापार मराठेच गावचे पाटिल, सरपंच म्हणून मुजोर आहेत. मराठ्यांना कशात काही कमी नाही, हे कायमचे गृहीत आहे. मधल्या सत्तर वर्षात लोकशाहीत काय बदलले आणि मराठा समाजावर त्याचे काय बरेवाईट परिणाम झालेत; त्याची दखल घ्यावी असे कुणा अभ्यासकाला कधीच वाटले नाही. सहाजिकच सत्तर, पन्नास वा वीसतीस वर्षापुर्वीच्या समजुतीच्या आधारावरच, आजच्या मराठ्यांची गणना किंवा मुल्यमापन होत राहिले आहे. तुलनेने ओबीसी किंवा दलित हा गरीब, दुबळा वा पिडीत असतो; असेही गृहीत आहे. या दोन गृहीतामध्ये गुरफ़टून आजच्या मराठा मानसिकतेचे विश्लेषण करायला गेल्यास मूक मोर्चा समजू शकत नाही, की त्याची मिमांसा करता येणार नाही. गेल्या दोनतीन दशकात जे काही पुरोगामी निर्णय महाराष्ट्रात झाले वा धोरणे राबवली गेली, ती प्रत्यक्षात आणणारे नेतेही मराठा होते. तेच मराठा घटकाचे प्रतिनिधीत्व करतात, हे गृहीत आहे. त्यापैकी कुणा नेत्याने कधी मराठा समाजाचे मन आजमावून बघितले नाही, की त्याच्या वेदना यातना वा समस्यांची दखल घेतली नाही. नेत्यांनी त्या गोष्टी बघितल्या नाहीत आणि कायम अभ्यासक वा विश्लेषकाच्या मिमांसेवर आधारीत निर्णय घेतले गेले. मराठा पुरोगामी म्हणून तोच फ़ुले शाहू आंबेडकरांचा वारसा चालवणारा, हेही तसेच एक गृहीत! अशा कोंडीत प्रत्यक्ष खेड्यापाड्यात पसरलेल्या मराठ्याची खरी स्थिती काय आहे, ते दुर्लक्षित राहिले. त्याच मूक बहुसंख्येने एक दिवस उठून आपल्यावर लादलेले पुरोगामीत्वाचे ओझे झुगारण्याचा पवित्रा घेतला, त्याकडे जगाने मूक क्रांती मोर्चा म्हणून बघितले. तो तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करण्याची क्षमता संपल्याचा हुंकार होता.

नेहमीच्या पद्धतीने मग यामागे कोणाचे कारस्थान आहे? कुठल्या राजकीय शक्ती वा नेत्याची प्रेरणा अशा मोर्चामागे आहे, त्याचा कसून तपास सुरू झाला. पण दोन महिने उलटून गेल्यावरही कुणाला ठामपणे या मूकमोर्चाचा बोलविता धनी शोधून काढता आलेला नाही. कारण जे नसेलच ते शोधून सापडणार कसे? या मूकमोर्चामागे एका मोठ्या बहुसंख्य समाजघटकाची वेदना यातना आक्रोश आहे. तीच त्याची प्रेरणा आहे. जे दुखते आहे, त्यासाठी कोणी आवाज उठवत नाही. याची खात्री झाल्यावर हा मूक समाज आत्मप्रेरीत होऊन रस्त्यावर आला आहे. त्याने कुणा नेत्याला साकडे घातले नाही. त्याने कुणा नेत्याला शरण जाण्याचे पाऊल उचलले नाही. इंग्रजीत ज्याला ‘सायलेन्ट मेजॉरिटी’ म्हणतात, तशी मराठा मूकमोर्चा ही आजवरच्या गृहीताविरोधात उमटलेली प्रतिक्रीया आहे. पण ती समजून घ्यायचे असेल तर आधी जुने कालबाह्य मापदंड फ़ेकून द्यावे लागतील. मराठा म्हणजे सुखवस्तु, मुजोर ही धारणा सोडून प्रतिकुल शेतीमुळे डबघाईला आलेला व आत्महत्येपर्यंत जाऊन पोहोचलेला मराठा बघावा लागेल. सुखवस्तु मराठा नेते म्हणजेच मराठा, या गृहीतातून बाहेर पडावे लागेल. तरच समोर लाखोच्या संख्येने रस्त्यावर आलेल्या मराठ्याची मिमांसा करता येऊ शकते. पण अभ्यासक जाणकारच आपल्या समजुती व गृहीतातून बाहेर पडायचीच भिती बाळगणारे असले, तर त्या मूक मोर्चाचे नेमके निदान कसे होऊ शकेल? आज मराठा असण्याची लाज वाटावी आणि आपल्या अभिमानाचीच शरम वाटावी, अशी सक्तीच मराठा समाजावर लादली गेल्याने आलेली ही संतप्त प्रतिक्रीया आहे. मराठा असण्यातला अभिमान दाखवायला हा स्वाभिमानी मराठा लाखोच्या संख्येने घराबाहेर पडला आहे. जी कहाणी इथल्या मूक मोर्चाची आहे, तशीच्या तशीच काहीशी स्थिती अमेरिकेतल्या मतदाराची आहे. ट्रंप त्यावर स्वार झालेला विजेता आहे.
सव्वादोनशे वर्षापुर्वी इंग्रजी सत्तेचे जोखड झुगारून १३ वसाहतींनी आपल्याला स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित केले. तेव्हाची अमेरिका आणि आजची अमेरिका यातला फ़रक ओळखायला हवा. एका ठराविक अभिमान व धारणेवर आधारीत समाज जगत असतो, एकत्र येत असतो. त्यातून त्याच्यात राष्ट्रभावना जोपासली जाते. त्याच पायावर ते राष्ट्र उभे रहाते. त्या परिघाबाहेर असलेल्यांना त्यात स्थान नसते. अशा एकजीव समाज वा राष्ट्रभावनेला राष्ट्र म्हणतात. त्याच्या भौगिलिक सीमा असतात आणि अभिमानाची ठराविक प्रतिके असतात. त्याच प्रतिकांच्या माध्यमातून त्या लोकसंख्येला एकजीव राखता येत असते आणि राष्ट्र म्हणुन जगता येत असते. प्रगती करता येत असते किंवा आव्हानांना र्तोड देता येत असते. तीच प्रतिके खच्ची केली, तर त्या राष्ट्राचा विनाश आपोआप होऊन जात असतो. गेल्या दोनतीन दशकात जगभर अशा कुठल्याही समाजघटकाची वा राष्ट्रवादाची प्रतिके खच्ची करण्याला प्रगतशील मानले जाऊ लागले. किंबहूना त्यासाठी पद्धतशीरपणे खच्चीकरण सुरू झाले. मूक बहुसंख्या त्याकडे गंमतीने बघत होती, म्हणून ते चालून गेले आणि सहनही झाले. पण आता ते असह्य होऊ लागले आहे. तथाकथित पुरोगामी असण्यासाठी आपला अभिमान सोडण्याची सक्ती अतिरेकी झाली आहे. अमेरिका गोर्‍यांचा देश मानला जायचा. आजकाल तिथे गोरा असणे हाच गुन्हा ठरवल्यासारखा कारभार सुरू झालेला आहे. भारतात हिंदू असणे गुन्हा मानला जातो आहे. महाराष्ट्रात मराठा असण्याला गुन्हा ठरवण्याची सक्ती होऊ लागली आहे. मुंबईत मराठीचा अभिमान गुन्हा ठरवला जातो आहे. या सगळ्यातली समानता लक्षात आली, तर सगळीकडे सारख्याच प्रतिक्रीया कशामुळे उमटत आहेत, त्याचा उलगडा होऊ शकेल. त्यासाठी आधी समजुतीची झापडे फ़ेकून द्यावी लागतील. नवी समयोचित मापके शोधून नव्या स्थितीचा अभ्यास करावा लागेल. मगच मराठा मूकमोर्चा किंवा ट्रंपच्या विजयाचे रहस्य उलगडू शकेल.

5 comments:

 1. एकुण काय ??? पुरोगामी नकोत तसेच मुल धर्मी व बहुसंख्यकांना कमी लेखुन चालणार नाही हे जनतेने दाखवुन दिले

  ReplyDelete
 2. ट्रंप का निवडून आले त्याबाबत जेष्ठ पत्रकार गोविंद तळवळकर लिहित आहेत
  http://maharashtratimes.indiatimes.com/edit/article/wonder-of-the-world/articleshow/55359556.cms

  ReplyDelete
 3. Dear Bhau
  Do you think without any political support such big rallies can be arranged? From where the money comes to run all this orchestra? What you said is fine but can any common man like you me or anybody else in country can arrange such big event as it needs lots of money. I hope you are well aware of this fact.

  In 2012 kejriwal has started collecting flash mobs & later on he got exposed like who was funding him & what was the intentions behind that Orchestra?

  So I request you to write from this angle to because we just cant ignore this vital aspect of funding behind it.

  Thanks
  Abhijeet

  ReplyDelete
 4. जागतिक बातमी - दगडापेक्षा वीट मऊ अशा म्हणीचा अभाव असल्याने त्यांनी वीट बाजूला सारली आणि दगड जवळ केला .

  ReplyDelete
 5. Bhau, "purogami Maharashtra" barobar sagalya samasyana Brahman jababdar ahet ha gairsamaj suddha karanibhoot ahe. Kharatar itar konahi peksha marathyana Brahman javalache ahet....(bhootkalatil vaibhav ani satta tar vartamankalat kathin divas)....sankhyabal nasalyane brahmanani hatpay marale ani shikshan nokari chya maga lagale....shahari madhyamvargiy marathe aaj tech karatahet ani mhanun pragati pathavar ahet...

  ReplyDelete