Sunday, November 20, 2016

उंटाच्या पाठीवरची काडी

marine le pen के लिए चित्र परिणाम

‘उंटाच्या पाठीवरची काडी’ अशी एक इंग्रजीमधली उक्ती आहे. त्याचा अर्थ उंटाच्या पाठीवर काडी ठेवली आणि उंट खाली बसला. म्हणजे त्याला साधी काडीही उचलायला झेपले नाही, असा होत नाही. त्याच्या पाठीवर आधीच इतके ओझे चढवलेले होते, की त्याला तेही उचलणे अवघड होते. तरी तो कसाबसा उभा राहिला व चालण्याच्या प्रयत्नात होता. पण त्याची अवस्था नजरेआड करून जेव्हा त्याच्यावर आणखी ओझे लादले जाते; तेव्हा त्याला उभेही रहाणे अशक्य करून टाकले जाते. अलिकडे सर्वच सार्वजनिक क्षेत्रात तसा अतिरेक होताना दिसतो आहे. त्यामुळे विविध क्षेत्रातले जाणकार व त्यांची भाकिते फ़सत चालली आहेत. त्यांच्या योजना बारगळताना दिसत आहेत. अमेरिकेत डोनाल्ड ट्रंप जिंकणे वा ब्रिटनमध्ये बेक्झीट यशस्वी होऊन युरोपियन महासंघातून बाहेर पडण्याचा अवस्थेला येणे, हा त्यातलाच प्रकार आहे. कुठल्याही गोष्टीला सीमा असते आणि तिचा मर्यादाभंग झाला, मग सगळे उलटू लागते. उदारमतवाद किंवा डावे तत्वज्ञान यांचाही असाच अतिरेक झाला असून, त्याचेच परिणाम सध्या पाश्चात्य देशात दिसत आहेत. पण त्याचा अर्थ समजून सावरण्यापेक्षा अधिकच अतिरेकाच्या भूमिका घेतल्या जात आहेत. गेल्या काही वर्षात युरोपमध्ये विविध परकीय लोकांना आणून वसवताना स्थानिकांच्या काही अपेक्षा भावनांची पायमल्ली करण्यात उदारमतवादी मंडळींनी धन्यता मानली. पण त्याकडे सोशिकपणे बघितले गेल्यावर त्याचा अतिरेक होत गेला आणि आता सगळेच उलटू लागले आहे. या अतिरेकावर नाराजी व्यक्त करण्यालाही गुन्हा मानले गेले आणि वंशवाद ठरवले गेले. त्याचा दुष्परिणाम म्हणून उदारमतवाद उध्वस्त होण्याची पाळी येत चालली आहे. अमेरिकेत ट्रंप यांचा विजय त्याची सुरूवात असून, युरोपात त्याची आगामी दोनचार वर्षात पुनरावृत्ती होताना दिसणार आहे. फ़्रान्सने त्यातले पहिले पाउल उचलले आहे.

गेल्या दोन दशकात युरोपात ठरवून बहुसंस्कृतीवाद या नावाखाली आफ़्रिकन वा प्रामुख्याने मुस्लिमांची आवक करण्यात आली. अशा नवागतांनी मुळच्या व्यवस्थेमध्ये सामावून जाण्यापेक्षा आपले वेगळे अस्तित्व जपले. आता तर आपले वेगळे अस्तित्व हा अधिकार असून त्यासाठी युरोपातील मूळनिवासींनी होईल ते निमूट सहन करण्याचा अट्टाहास सुरू झाला. युरोपियन संस्कृतीने जगाला मुक्त मानवी स्वातंत्र्याची प्रेरणा दिली. आज तिथेच शरीयत हवी म्हणून आग्रह धरला जात आहे आणि त्याला विरोध म्हणजे वंशवाद ठरवण्याला युक्तीवाद बुद्धीवाद मानले गेले. त्याला लोक कंटाळले आहेत. गेल्या वर्षापासून तिथे सिरीया वा इराकमधील युद्धाचा परिणाम म्हणून निर्वासितांचा लोंढा सुरू झाला आणि कसल्याही तपासणीशिवाय कोणीही युरोपियन देशात घुसखोरी करू लागला. माणुसकी म्हणून त्यांना सामवून घेण्याची सक्ती विविध लहानमोठ्या देशावर होऊ लागली. अशा बाबतीत आधीपासून सावधानतेचे इशारे देणार्‍यांना वर्णवादी वर्चस्ववादी म्हणून नामोहरम करण्याची स्पर्धाच चालू झाली होती. त्यातून विचलीत होणारे काही लोक संघटित होऊ लागले आणि त्यांना कुठल्याही प्रस्थापित पक्षात व राजकारणात स्थान नसल्याने, त्यांनी नवनवे पक्ष व संघटना स्थापन केल्या. मागल्या दहा वर्षात अशा नव्या पक्षांना मोठा प्रतिसाद मिळाला नव्हता. पण त्यांच्या नेत्यांना म्होरक्यांना कायदा व खटल्याच्या कोंडीत पकडून संपवण्याला उदारमतवाद मानले गेले. गेल्या वर्षभर आलेल्या निर्वासितांच्या झुंडींनी त्याच वंशवादी मानल्या जाणार्‍यां नेत्यांच्या शब्दांची व इशार्‍यांची खात्री लोकांना अनुभवातून येत गेली. आता त्यांना राजकीय प्रतिसाद मिळू लागला आहे. ह्यातले अनेक नेते व राजकीय संघटना कुठल्याही प्रचलीत राजकारणातून आलेल्या नाहीत. परिस्थितीने त्यांना राजकारणात आणले आहे.

ट्रंप यांचा विजय होताच मरीन ली पेन ह्या महिला नेत्याने फ़्रान्समध्ये थेट अध्यक्षीय निवडणूक लढवण्याची घोषणा केलेली आहे. आजवरच्या स्थितीत त्यांनी तशी कधी हिंमतही केली नसती. कारण फ़्रान्स हा सेक्युलर देश असून तिथे कुठला धर्म पाळणारा अशी कोणाची ओळखही कागदोपत्री होऊ दिली जात नाही. पण त्यच फ़्रान्समध्ये मुस्लिमांच्या अतिरेकी वागण्यावर सतत उदारमतवादी पांघरूण घातले गेल्याने प्रतिक्रीया म्हणून मुळच्या ख्रिश्चन लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्याचा अर्थ हे मुळचे फ़्रान्सनिवासी धर्मांध झालेत, असा अजिबात होत नाही. त्यापैकी कोणालाही धर्माची फ़िकीर नाही. पण मुळ ख्रिश्चन धर्माचा पगडा नको म्हणजे लादलेल्या इस्लामची गुलामी करायची काय, असा यक्षप्रश्न त्यांच्या समोर उदारमतवादाने उभा केला. त्याला नकार देताना एकत्र येण्यासाठी अशा मूळनिवासींना ख्रिश्चन वा गोरे हाच धागा जोडणारा होता. पण असे लोक एकत्र येऊ लागले आणि आपले खरे दुखणे बोलू लागले, तर त्यांच्यावर गोर्‍या वंशवादाचा आरोप झाला. ती वस्तुस्थिती नसल्याने त्यांच्यापासून अलिप्त असणारे, पण उदारमतवादी अतिरेकाचा अनुभव घेणारे इतर लोकही अलिप्तता सोडून त्यांच्या नव्या चळवळी व पक्षाकडे आकर्षित होऊ लागले. किंबहूना ज्यांना इस्लामी अतिरेक वा जिहादची हिंसा मान्य नसेल, त्यांनी अशा गोर्‍या ख्रिश्चन पक्षांकडे जावे, अशी सेक्युलर मंडळींनी त्यांच्यावर सक्तीच केली होती. त्यांचे बळ गेल्या वर्षभरात वाढतच होते आणि आता ट्रंपच्या विजयाने त्यांना प्रोत्साहन मिळाले आहे. अशावेळी त्यांना धार्मिक वा वर्णाच्या प्रभावाखालून बाहेर काढण्याचा सोपा मार्ग म्हणजे, त्यांची वेदना तक्रारी समजून घेणे इतकाच आहे. त्याऐवजी त्यांची वर्णवादी अशी हेटाळणी होत राहिली आणि अधिकाधिक गोर्‍यांना अशा नव्या पक्षांकडे जाण्याखेरीज पर्याय राहिलेला नाही.

उदारमतवादी अतिरेकाचे उदाहरण म्हणजे बाहू पसरून लक्षावधी निर्वासित आशियन व आफ़्रिकनांचे युरोपमध्ये स्वागत होते. आधीच तिथे असलेल्या सोयी सुविधांवर  अशा निर्वासितांमुळे भार वाढत गेला आणि भणंग व निर्धन निर्वासितांना पोसण्याचा बोजा युरोपियन देशांच्या अर्थव्यवस्थेला पेलवेनासा झाला. पण तो कमी करण्याचा विषय बाजूला राहिला. उलट असा बोजा उचलण्यात तक्रार करणे म्हणजेच गुन्हा ठरवण्याचे प्रयास झाले. त्यालाच उंटाच्या पाठीवरची काडी म्हणता येईल. कारण गेल्या एकाच वर्षात युरोपची सगळी घडी निर्वासितांच्या लोंढ्याने पुरती विस्कटून टाकली आहे. त्याच दरम्यान अनेक देशात इस्लामी जिहाद व घातपाताने हिंसाचाराचे थैमान घातले. तरी त्यातला धर्मवेडेपणा नाकारून इस्लामी दहशतवादाला पाठीशी घालण्यात उदारमतवादी राजकीय नेते व पक्ष आघाडीवर राहिले. सहाजिकच युरोपवर आलेले संकट, निर्वासित वा त्या झुंडीतल्या जिहादींचे नसून उदारमतवादी नेते व पक्षच खरे संकट असल्याची भावना वाढीस लागली आहे. त्यामुळे नुसते उदारमतवादी पक्षच नव्हेत, तर कधीतरी अशा उदारमतवादाशी हातमिळावणी केलेले उजवे पक्षही आता जनतेला विश्वासार्ह वाटेनासे झाले आहेत. त्यांच्याऐवजी संपुर्ण दुसर्‍या टोकाची वर्णवादी वा मुस्लिमविरोधी भाषा बोलणार्‍यांना लोक प्रतिसाद देऊ लागले आहेत. म्हणूनच अशा अतिरेकी ख्रिश्चन वा गोर्‍या वर्णवादाची भाषा बोलणार्‍यांचे बळ वाढू लागले आहे. युरोप हळुहळू मुस्लिम व बिगर मुस्लिम वा गोरे व गौरेतर; अशा विभाजनात भरकटू लागला आहे. त्याला असे अतिरेकी उजवे कारण असण्यापेक्षाही तिथे मोकाट झालेला उदारमतवादी अतिरेक कारणीभूत आहे. त्यामुळे आता समझोता वा सहनशीलता गुंडाळून युरोप वर्णवादी मानसिकतेकडे झुकू लागला आहे, आगामी एकदोन वर्षात होणार्‍या निवडणूकांमध्ये त्याचे प्रतिबिंब पडेल. कारण उंट अतिरेकाच्या काडीमुळे खाली बसला आहे.

7 comments:

  1. Bhau
    Congratulations for ur viewer across 30.44 lakhs. Go ahed.

    ReplyDelete
  2. मा.सावरकर म्हणत होते धरमांतर हेच राष्ट्रअंतर.हेच आता खरं ठरत आहे आणि तेही भारताबरोबरच परदेशाबाबतही.

    ReplyDelete
  3. छानच भाऊ सुंदर

    ReplyDelete
  4. नुकतीच एक बातमी वाचली , बोस्टनमधे एका शिख युवकाची मुस्लिम समजुन काही युवक खिल्ली उडवत होते , ईतर कुणा बघ्यानीसुद्धा त्यांना हटकले नाहि. माझ्या मते मुस्लमानी हीवेळ स्वतः ओढुन घेतली आहे. मुस्लीम शांततेचा धर्म आहे हे जगाला सांगण्यापेक्षा अतिरेक्याना पटवून द्यावे . मुस्लीम धर्मावर थोडा ओरखडा जरी पडला तरी जगातील मुस्लीम एक होतात तसेच त्यांनी अतिरेकी हीॕंसेविरुध्द जगभर आवाज बुलंद करावा तरच गेलीली पत पुन्हा येईल.

    ReplyDelete
  5. सुरेख लेख. पण जे पेरले तेच उगवले.

    ReplyDelete
  6. http://www.cnn.com/2016/11/25/opinions/new-pc-should-include-white-people-mcwhorter/index.html

    ReplyDelete