Friday, November 25, 2016

नोटाबंदीचा डाव आणि पेच

welcome rahul posters के लिए चित्र परिणाम

शेवटी विरोधकांनी संसद चालू दिलेली नाही. आपण संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोंडी करू शकलो, यावर विरोधक खुश असतील, यात शंका घेण्याचे कारण नाही. त्यांना प्रत्येक दिवशी वाहिन्यांवर आणि माध्यमात हवी तितकी प्रसिद्धी मिळते आहे आणि मोदी विरोधातले त्यांचे शब्द नित्यनेमाने अधिकाधिक प्रसारीत होत आहेत. अशा खळबळजनक बातम्या मिळत असल्याने वाहिन्यांवरचे पत्रकार खुश आहेत. परिणामी अधिक प्रसिद्धीने विरोधी पक्षही खुश आहे. पण देशातील गरीब जनता वा सामान्य नागरिकांच्या त्रासासाठी जो काही धुडगुस चालू आहे; त्याविषयी सामान्य माणसाची काय प्रतिक्रीया आहे? मोदींनी आपल्या परीने सोशल मीडियातून चाचणी घेऊन लोकांचा चांगला पाठींबा असल्याचा दावा केला आहे आणि सहाजिकच त्यांना खोटे पाडणारे दावे विरोधकांनी केलेले आहेत. अशा बाबतीत मग सी व्होटर नावाच्या संस्थेने केलेली चाचणीही मोदींच्याच आकड्यांशी जुळणारी आहे. पण तिच्यावरही विश्वास ठेवण्याचे काही कारण नाही. सामान्य माणूस जो नोटाबंदीने हैराण झाला, तोच यातील खरी मोजपट्टी आहे. लोक असे हैराण होतात, तेव्हा शांत बसत नाहीत. ते आपोआप आपल्या बाजूने आवाज उठवणार्‍याच्या पाठीशी जमा होऊ लागतात. त्यांचा आवाज माध्यमातून व वाहिन्यांवर उठला असता, तर रस्त्यावर इतकी शांतता दिसू शकली नसती. त्रस्त जनतेचे पडसाद नेहमी रस्त्यावर उमटतात. साध्या बाजारात, दुकानात किंवा किरकोळ पैशाची देवाणघेवाण चालते, तिथे तंटेबखेडे उभे राहिले असते. हाणामारीचे प्रसंग उभे राहिले असते. नोटाबंदीमुळे ज्या भयंकर घटना घडल्याचे दावे केले जात आहेत, तशा घटना अधूनमधून सामान्य स्थितीतही होत असतात. पण त्या केवळ नोटाबंदीमुळेच घडल्याचे दावे, जनतेला कसे पटावे? मात्र अशा स्थितीतून मोदी काय सिद्ध करू बघत आहेत, हा प्रश्न शिल्लक उरतो.

लोकपाल आंदोलनाच्या निमीत्ताने शेकड्यांनी लोक रस्त्यावर आलेले होते. निर्भया प्रकरणाने देशभर संतापाची लाट उसळलेली होती. तेही चित्रण याच वाहिन्यांनी प्रसारीत केलेले होते. त्या दोन्ही घटना तशा देशभरच्या सामान्य माणसाला विचलीत करणार्‍या असल्या तरी थेट त्याच्या आयुष्याला येऊन भिडणार्‍या नव्हत्या. तरीही शेकड्यांनी लोक आमंत्रणाशिवाय रस्त्यावर आलेले होते. मग त्याच्या तुलनेत आजचा नोटाबंदीचा निर्णय जवळपास अर्ध्याहून अधिक लोकसंख्येला थेट नित्य जीवनाला येऊन भिडणारा आहे. अशा निर्णयाने आपल्या सुरळीत जीवनाला छेद देणारा पंतप्रधान वा त्याचे सरकार, कुणा अन्य काळेपैसेवाला किंवा श्रीमंताला धक्का देत नसेल, तर लोक चवताळून रस्त्यावर आल्याशिवाय रहातील काय? लोकांना आपल्या आसपास कुणाकडे किती काळा पाढरा पैसा आहे आणि कोणाला पैशाचा किती माज चढला आहे, हे पक्के ठाऊक असते. त्यासाठी त्या माणसाला शोधपत्रकारिता करावी लागत नाही. छुपे कॅमेरे घेऊन चित्रणही करावे लागत नाही. आसपास वावरणारा कोण किती पैसे खातो वा ‘कमावतो’, हे लोकांना अनुभवातून माहिती झालेले असते. अशा भ्रष्ट लोकांना भले बॅन्केच्या रांगेत उभे रहाण्याची वेळ आलेली नसेल. पण त्यांच्या जगण्यात नोटाबंदीने उडालेली तारांबळ सामान्य लोक आपल्या डोळ्यांनी आज बघत आहेत. त्यात कोपर्‍यावरचा नगरसेवक असतो किंवा कोणी पुढारी कंत्राटदारही असू शकतो. या लोकांची श्रीमंती व त्यातून आलेला माज ८ नोव्हेंबरच्या रात्री कसा क्षणार्धात उतरला; हे लोक साक्षात बघत आहेत. त्यांना अदानी अंबानीशी काडीचे कर्तव्य नाही. सामान्य माणसाला मल्ल्या किंवा अंबानी यांच्या काळ्यापैशापेक्षा आपल्या नजिकच्या मुजोर पैसेवाल्याची काळी माया ठाऊक आहे. आज त्याचाच उतरलेला नूर त्याच सामान्य माणसाला दिसलेला आहे. त्याने कुणावर विश्वास ठेवायचा?

वाहिन्या दाखवतात, त्या बातमीवर की कुणा पुढार्‍याने जनतेला त्रास होतोय, म्हणून केलेल्या आक्रोशावर लोकांनी विश्वास ठेवायचा का? कालपरवा विधान परिषदेच्या निवडणूका झाल्या आणि त्यात जिंकलेल्या नेत्यांच्या जाहिराती किती झळकल्या? असे निकाल लागल्यावर वर्तमानपत्रात विजयी उमेदवाराच्या जाहिराती असतातच. पण त्याचे बगलबच्चे आपल्य भाऊ, दादा, अण्णाचे अभिनंदन करणार्‍या जाहिराती देतात. नाक्यानाक्यावर त्यांच्या विजयाचे फ़लक झळकतात. त्याचा कुठे पत्ता नाही. हे कशाचे लक्षण आहे? किळस यावी असे शेकड्यांनी फ़लक झळकलेले बघणार्‍या सामान्य माणसाला फ़रक दिसतच नाही, असा कुणा पत्रकाराचा दावा आहे काय? हा त्रास कुणाला सामान्य माणसाला होतो आहे काय? आपल्या याच कृतीने सामान्य जनतेला मोदींनी खोट्या श्रीमंतीचा माज उतरवून दाखवला आहे. म्हणून त्रास होत असूनही जनता त्यांच्यावर रागावलेली नाही, की रोज गळा काढणार्‍या कुणा नेत्याच्या मोर्चा धरण्यात सामील झालेली नाही. फ़ार कशाला कुणा नेत्याची वा पक्षाची असा मोर्चा काढण्याचीही हिंमत झालेली नाही. कुणा माजी सैनिकाने आत्महत्या केल्यावर त्याच्या अंत्ययात्रेला जमलेल्या आयत्या गर्दीत पोहोचणारे राहुल केजरीवाल, आज निषेधाचा मोर्चा काढायला का थांबलेत? त्यांना गर्दी जमवणे अशक्य आहे. लोक त्रासलेले असले तरी चिडलेले नाहीत. लोक मोर्चाला येणार नाहीत, याची खात्रीच या नेत्यांना नुसती कॅमेरासमोर बडबड करायला भाग पाडत आहे. मात्र दूर बसून पंतप्रधान या लोकांची तारांबळ बघत आहेत. कारण आपण लोकहिताचा निर्णय घेतला तर लोक त्रासही सहन करतील, पण भोंदू विरोधकाना साथ देणार नाहीत, हा आत्मविश्वासच मोदींची खरी शक्ती आहे. मात्र आपल्याला विरोधकांनी कडाडून विरोधच करावा, अशीही मोदींची अपेक्षा आहे. त्याचे कारण काय असावे?

आपण एकटेच काळ्यापैशाच्या विरोधात आहोत आणि इतरांचे राजकारण काळ्यापैशानेच चालते; हेच तर मोदींना जनमानसावर बिंबवायचे आहे. सहाजिकच नोटाबंदीला जो कोणी विरोध करील, त्याच्याविषयी जनमानसात शंका पेरली जावी, ही मोदींची अपेक्षा आहे. आपल्या आसपासचे कोण काळेपैसेवाले आहेत, ते लोकांना अनुभवातून माहिती असते. पण राजकारणातल्या काळ्यापैशाने कोण किती विचलीत होतो, याच्या प्रदर्शनावरच राजकीय पक्षांची विश्वासार्हता अवलंबून असते ना? ज्यांच्यापाशी खरा कष्टाचा पैसा आहे, त्याला घाबरण्याचे कारण नाही. तो नोटा बदलून देण्याची अपुरी सोय म्हणून शिव्याशाप देईल. पण जुन्याच नोटा हव्या, असा आग्रह धरणार नाही. जो कोणी तसा आग्रह धरील, त्याच्यापाशी काळापैसा आहे, म्हणूनच तो बोंबा मारतोय, हे लोकांना वाटणार. म्हणून तर मोदी तोच डावपेच खेळत आहेत. प्रामाणिकपणे जर लोकांसमोर कॅमेरा घेऊन गेले आणि त्यांना कोणापाशी काळापैसा आहे म्हणून विचारले, तर एकसूरात लोक याच ओरडणार्‍या नेत्यांकडे आणि पक्षांकडे बोट दाखवतील. हाच तर मोदींचा डाव आहे. म्हणून एक असा निर्णय घेतला, की ज्याला विरोधकांनी हट्टाने विरोधच केला पाहिजे. पण त्यांच्या त्या विरोधामुळे तेच लोकांपुढे काळापैसावाले म्हणून उघडे पडतील. पर्यायाने मोदी हाच एकाटा स्वच्छ चारित्र्याचा नेता ठरावा, असा तो डाव आहे. त्यात मग अदानी अंबानीना आणुन काहीही उपयोग नाही. कारण लोकांना त्या बड्या उद्योगपतींशी कर्तव्य नाही. लोकांना आपल्या आसपास वावरणार्‍या मुजोर काळ्यापैसेवाल्यांची तारांबळ बघायची आहे. मोदींनी तशी संधी लोकांना दिलेली आहे आणि त्या अनुभूतीने लोक कमालीचे सुखावलेले आहेत. हाच मोदींचा नोटाबंदीतला खरा डाव आहे. मात्र त्यात उतावळेपणाने धावत जाऊन उडी घेणार्‍या विरोधकांनी स्वत:लाच मोदींच्या पेचात अडकवून घेतले आहे.

No comments:

Post a Comment