Saturday, November 12, 2016

बोकड-बाटलीचा दुष्काळ

Image result for मटन दारू पार्टी

शुक्रवारी रात्री सोनुचा फ़ोन आला हो्ता. गावाहून याचा फ़ोन इतक्या रात्री कशाला, म्हणून मी चकीत झालो होतो. सोनु गावातला एक दुकानदार आणि बारीकसारीक कंत्राटे घेऊन कामे करून देणारा. त्या खेड्यात व्हिडीओ, आधारकार्ड वा मोबाईल रिचार्ज किंवा नवा मोबाईलही तुम्हाला सोनुच्या दुकानात मिळू शकतो. तसा खेड्यातला सुखवस्तु माणूस! त्याने काही बोलण्याआधीच विचारले, नोटा बदलायच्या आहेत काय? सोनु मनापासून हसला. म्हणाला नाही! इतका मोठा विषय आहे आणि चर्चेला तुम्ही टिव्हीवर दिसला नाही, म्हणून फ़ोन केला. असे विषय तुम्हीच चांगले बोलू शकता, वगैरे. त्याला म्हटले मागल्या सव्वा वर्षात मीच वाहिन्यांच्या चर्चेत जायचे बंद केले आहे. आता अचानक तिकडे जाण्याचा संबंधच काय येतो? त्या खेड्यातला मी एक सेलेब्रिटी आहे. कोणीतरी मोठा माणूस इतकीच माझी तिथली ओळख आहे. कारण अशा दुर्गम दुष्काळी खेड्यात मी विश्रांतीसाठी जातो आणि कुणाशीही गप्पा छाटत बसतो. टिव्हीवर दिसतो म्हणून लोकांना खुपच कौतुक! किंबहूना म्हणूनच भाऊ कोणी मोठा माणूस असल्याचा त्यांचा गैरसमज आहे. जेव्हा वाहिन्यांच्या चर्चेत भाग घ्यायचो, तेव्हाची गोष्ट आहे. एका संध्याकाळी एबीपी माझा वाहिनीवरून प्रसन्ना जोशीचा फ़ोन आला. त्याला म्हटले मी दुर्गम खेड्यात आहे. तुमच्या स्टुडीओत येऊ शकत नाही आणि तुमची ओबीव्ही या गावापर्यंत येऊ शकत नाही. त्यामुळे चर्चेत सहभागी होणे अवघड आहे. तर प्रसन्ना उत्तरला फ़ोनवर तरी बोलू शकाल ना? तुमचा फ़ोटो टाकून भागवू. म्हटले हरकत नाही. त्या दिवशी सोनुच्याच घरातून एबीपी वाहिनीला फ़ोनो दिलेला होता. सहाजिकच गावकर्‍यांना आणखी कौतुक! आपल्या गावातून कोणीतरी वाहिनीवर थेट बोलला वगैरे. अशा गावातून सोनुने शुक्रवारी फ़ोन केला होता. त्याला खरेच रद्द झालेल्या नोटांविषयी काही सांगायचे होते.

पाचशे हजाराच्या नोटा रद्द झाल्याने काय साध्य होईल, असा त्याचा प्रश्न होता. त्याला अशा निर्णयाचा कुठलाही फ़टका बसलेला नव्हता, किंवा त्याची काही तक्रार नव्हती. मग उरलेले काही पक्ष वा नेते कशाला ओरडा करत आहेत, ते सोनुला समजून घ्यायचे होते. अर्थात त्यालाच त्रास होत नसेल तर घायकुतीला आलेल्या कोणाला कशासाठी त्रास होतोय, तेच त्याच्या लक्षात येत नव्हते. सामान्य लोकांना नागरिकांना किंवा खेडूतांना पाचशे हजाराच्या नोटा रद्द झाल्याने कुठला त्रास होतोय, हे त्याच्या लक्षात येत नव्हते. कारण तिथे गावातही कोणाची फ़ारशी तक्रार नव्हती. राहुल गांधी यापुर्वी कधी बॅन्केत गेल्याचे त्याने बघितले ऐकले नव्हते. त्यामुळे त्याला कुतूहल होते. मुंबई पुण्यासारख्या शहरात माणसे एटीएम मशीनमधून पैसे काढतात आणि लागेल तसे वापरतात. खिशात मोठी कॅश बाळगत नाहीत. काही लोक तर आठदहा पाचशे हजाराच्या नोटा खिशात बाळगून वावरतात. त्यांना अकस्मात नोटा रद्द झाल्याचा त्रास होणारच, हे त्याला लगेच पटले. पण ज्यांच्यापाशी अशा मोठ्या नोटा खिशातच नाहीत किंवा एटीएम कार्ड नसते, त्यांना कुठला त्रास होतोय? सोनुचा हा प्रामाणिक प्रश्न होता. त्याला म्हटले सोडून दे. त्यात राजकारण आहे. पण अनायसे त्याचाच फ़ोन आला आणि तो गावातला दुकानदार; म्हणून त्याला म्हटले गावात नाही तरी तालुक्यात दुकानदारांना व्यवहार चालवायला कटकटी होतच असतील ना? हसायला लागला. म्हणाला, काय भाऊ तुम्ही गावात येऊन रहाता आणि वावरता. इथले व्यवहार तुम्हाला माहित नाहीत काय? सगळा उधार उसनवारीचा खेळ असतो. कुठल्या नोटा घेऊन बसलात. आठवडा महिन्यांनी गिर्‍हाईक थकबाकी चुकती करत असते. रोखीतले रोजचे व्यवहार करायचे, तर आम्हाला दुकानेच बंद करावी लागतील ना? सोनु शब्दश: सत्य बोलत होता. कारण थकबाकीवरून उधारीसाठी होणार्‍या तिथल्या हुज्जती मी अनुभवलेल्या आहेत.

पण विषय तिथे संपत नव्हता. सोनु वा त्याच्यासारखे गावातले काही दुकानदार उधारी देतात हे सत्य असले, तरी उसनवारी करणार्‍यांना त्यांनी सुनवलेले शब्द मला आठवत होते. उधारी मागणार्‍याला ते ऐकवतात. कुठून उधारी द्यायची? आम्हाला घाऊक खरेदीचे पैसे आधी भरावे लागतात ना? मग त्याचे काय? तोच सवाल मी सोनुला विचारला. तुम्ही घाऊक माल आणताना कसे होणार मग? त्याचे उत्तर सोपे होते. आमचीही घाऊक व्यापार्‍याकडे उधारी असतेच आणि आजकाल खेड्यापाड्यात पुरवठेदार आलेले आहेत. त्यांना रोखीत पैसे देण्याची गरज नाही. गल्ल्यात पैसे नसतील, तर पुरवठेदार पुढल्या खेपेस पैसे वसुल करतो. असे अनेकदा होते. आजतर नोटाच रद्द झाल्यात. त्यामुळे नोटा नसल्याची अडचण आमच्या सप्लायरला कळू शकते आणि त्यालाही एकदोन आठवडे कळ काढण्यात काही अडचण येणार नाही. म्हणजे गावात कुठे नोटांचा तुटवडा ही अडचण वा समस्या नव्हती. मग हे केजरीवाल, राहुल कुणाच्या वेदना बोलून दाखवत आहेत? जी कहाणी माझ्या गावातल्या व्यवहार व्यापाराची आहे, तीच देशातल्या हजारो खेड्यातली आहे. चाळी वस्तीतली आहे. उधारीवर अर्धी लोकसंख्या गुजराण करते. त्यांना आठदहा दिवस नोटांची चणचण कशाला त्रासदायक होऊ शकते? मॉल वा महागड्या दुकानात रोखीने व्यवहार करणार्‍यांची समस्या नक्की आहे. पण असे लोक क्रेडीटकार्ड डेबीटकार्ड वापरू शकतात. कटकट बसने प्रवास करणार्‍यांसाठी आहे. कामाच्या जागी हॉटेलात गेल्यास मोजाव्या लागणार्‍या रोखीचा प्रश्न आहे. मल्टीप्लेक्स सिनेमात जाऊन सलमान खानचा चित्रपट बघणार्‍यांची समस्या नक्कीच आहे. एक दिवस सलमान आमिरचा चित्रपट बघता आला नाही, तर त्यांचे प्राण धोक्यात येऊ शकतात, हे मानावे लागेल. इतका मोठा निर्णय सरकार राबवित असेल, तर तितका त्रास सोसावाच लागणार ना?

मोदी सरकारचा निर्णय सामान्य व लोकसंख्येला काहीसा त्रासदायक होणार यात शंकाच नाही. तसा त्रास कुठलेही वैद्यकीय उपचार घेताना शस्त्रक्रीया करताना होतच नसतो का? मुरलेला आजार दुखणे असले तर उपचार अधिकच वेदनामय असतात. काळ्यापैशाचे दुखणे खरेच दुर्घर असेल, तर त्यावरचा उपाय हसतखेळत होणारा असू शकत नाही. कुठे दुखणे खुपणे व्हायचेच. पण काही लोकांना वाटते शस्त्रक्रीया ही गुदगुल्या करणारी असायला हवी. इंजेक्शन टोचले तर मोरपीस फ़िरवल्यासारखा अनुभव यायला हवा. दुखणार्‍या सुन्न करणार्‍या शत्रक्रीया करणारा डॉक्टर काय कामाचा? बहुधा वैदूच असावा! कुठलीही मोठी कृती काही त्रास देऊन जातेच ना? तिथे सीमेवर पहारा देणार्‍या एकाही सैनिकाचा बळी पडता कामा नये, असा आग्रह सेनेतील जवानांनी धरला तर सुरक्षा कशाला म्हणायचे? हौतात्म्य कशाला म्हणायचे? इथे एकदोन दिवस बॅन्केच्या दारात ताटकळत थांबण्याच्या वेदना असह्य होणार्‍यांना, महापूर दंगल वा भूकंपाच्या वेळी सैनिक कुठले कष्ट उपसतो, त्याचे भान तरी आहे काय? अर्थात ज्यांना समजून घ्यायचे नाही, त्यांना कोणी कसे समजवावे? तुकाराम ओंबळेच्य कुटुंबाच्या वेदना ज्यांना कधी उमजल्या नाहीत, त्यांना बॅन्केच्या दारात उभे रहाणेही मरणाच्या दारी आल्यासारखे वाटल्यास नवल नाही. असो, फ़ोन बंद करण्यापुर्वी सोनुने मला बातमी दिली आणि त्यावर लिहायला सुचवले. सोनु बुद्धीमंत नसूनही त्याच्यातल्या जाणत्याचा साक्षात्कार घडला. तो सांगणे मला अगत्याचे वाटले. दोन महिन्यात जिल्हा तालुक्याच्या निवडणूका आहेत आणि यावेळी बोकड-बाटलीचा प्रबंध होणार नाही. म्हणून गावातले परिसरातले ‘कार्यकर्ते’ हवालदिल झालेत, अशी सोनुने दिलेली बातमी आहे. मोदी सरकारने दोन मोठ्या नोटा रद्द केल्याचा हा परिणाम मला कुठल्या वाहिनी, वृत्तपत्र किंवा संपादकीयाने अजून सांगितला नव्हता.

5 comments:

 1. भारतासारख्या देशात बँकेत लाईनला ऊभे राहण्याचा त्रास होतोय असे म्हणणे खरोखरच हस्यास्पद आहे. येथे लोकलला लोंबकळून प्रवास करावा लागतो , आठ- आठ दिवस नळाला पाणी येत नाही, रस्त्यावर प्रचंड खड्डे ,लोडशेडींग आणखी काय काय . इंदिरा गांधीनी म्हटले होते ' life in india is not easy for anyone ; literate -iliterate, poor _rich. काँग्रेस ने भारतीयासाठी जिवन कधीही सुसह्य करुन ठेवले नव्हते. त्यामुळे त्यांनी लोकांच्या त्रासाची मुळी काळजी करु नये. राहुल मुर्ख कि केजरीवाल मुर्ख अशी ही स्पर्धा आहे. बहुतेक दोघेही जिंकणार.

  ReplyDelete
 2. हीच खरी गंमत आहे..
  दुखणे वेगळेच आहे आणि हा उपचार राजकीय आयुष्यासाठी त्रासदायक ठरतोय हे लक्षात आल्याने कळवळा आलाय.

  ReplyDelete
 3. The demonetization could have been more foolproof and flawless if some silly arrangements would have been taken care of. Some times, hype and publicity be overcome with facts and figures.

  ReplyDelete
 4. या सगळ्याला शिवसेना विरोध करत आहे, हे बगून खुप वाईट वाटतय भाऊ,
  विधानसभेच्या निवडनूकीच्या वेळी भाजपा ने सेनेला फसवल या एका भावनेन जनतेन सेनेला मत दिली होती.
  नोटा बंदीचा निर्नय सर्व सामान्य जनतेला आवडला आहे, आणि ती सगळी मोदींच्या पाठीशी उभी असताना सेनेचा विरोध ?

  ReplyDelete