Tuesday, November 15, 2016

राहुलच्या आजीचे अनुकरण

indira rahul के लिए चित्र परिणाम

१८ सप्टेंबर २०१६ रोजी अकस्मात काश्मिरच्या उरी भागात भारतीय लष्करी तळावर पाक जिहादींनी घातपाती हल्ला केला आणि त्यात १९ भारतीय जवानांना मृत्यू झाला. त्यापैकी अनेकजण झोपेत होते वा गाफ़ील होते. त्याचा मोठा गाजावाजा झाला आणि देशभर संतापाची लाट उसळली होती. पाकला धडा शिकवावा म्हणून मोदी सरकारवर मोठेच राजकीय मानसिक दडपण आले होते. मात्र पंतप्रधान मोदी शांत होते आणि त्यांनी या हत्याकांडाचा जोरदार निषेध केला होता. भारतीय लष्कराच्या प्रवक्त्याने योग्यवेळी व योग्य असेल, तसे पाकला चोख उत्तर दिले जाईल; असे सांगितले होते. पण नेहमीप्रमाणे भारत काहीही करणार नाही आणि पुढल्या हल्ल्यापर्यत वातावरण शांत होऊन जाईल; अशीच बहुतेकांची अपेक्षा होती. आपले जवान योग्य उत्तर देतील आणि पाक जनतेनेच आता सावध रहावे, असा एक इशारा मोदींनी केरळातील एका जाहिर सभेत दिलेला होता. तेवढा इशारा वगळता मोदी उरीविषयी काहीही बोललेले नव्हते आणि दिवसरात्र वाहिन्यांवर, माध्यमातून पाक्ला धडा शिकवण्याची चर्चा वाढलेली होती. पण धडा म्हणजे काय, त्याचे चित्र स्पष्ट होत नव्हते. अशावेळी अमेरिकेच्या ‘वॉलस्ट्रीट जर्नल’ नावाच्या प्रतिष्ठीत दैनिकात एक लेख प्रसिद्ध झाला होता. त्याचा आशय मोठा सूचक होता. तो पाकिस्तानसाठी होता. अलिकडले भारतीय नेते आणि विद्यमान भारतीय नेता, यात फ़रक आहे. नरेंद्र मोदी हे आज भारताचे पंतप्रधान आहेत आणि हा नेता धोका पत्करणारा माणूस आहे, असा त्याचा आशय होता. तो पाकिस्तानला उमजला नाही आणि नंतर दोनच दिवसात पाकचे नाक कापणारा सर्जिकल स्ट्राईक झालेला होता. तेव्हा पाकिस्तानला जे उमजले नाही, तसेच आज नोटाबंदीच्या निर्णयानंतर भारतीय विरोधी पक्षांना अजून मोदींच्या राजकारणाचे डावपेच उलगडलेले नाहीत.

मोदी यांनी काहीही करावे आणि आपण त्याला कडाडून विरोध करावा, ही बाब वगळता आजकाल भारतीय राजकारण्यांपाशी अन्य कुठला कार्यक्रम वा धोरण उरलेले नाही. म्हणूनच मग नोटाबंदी नंतर देशाच्या प्रत्येक बॅन्केच्या दारात रांगा लागल्या. त्याचा लाभ उठवायला राहुल गांधी तिथे जाऊन पोहोचले आणि केजरीवाल यासारखे भुरटे राजकारणी जनता खुप त्रस्त असल्याचे नाटक रंगवू लागले. पण मोदींना असा विरोध हवा आहे की नको, याचा विचार एकाच्याही मनाला शिवला नाही. किंबहूना मोदींना आपल्या विरोधात असाच कल्लोळ व्हावा आणि नंतरच लोकांना नोटाबंदीचा लाभ मिळावा, असा डाव असेल तर? अधिकाधिक लोकांना लाभ देऊन आपल्याकडे ओढण्यासाठी नरेंद्र मोदी काहीही करू शकतात. त्यात जसा सामान्य माणसाचा आर्थिक लाभ असतो, तसाच विरोधकांचा आक्रस्ताळा विरोधही आवश्यक असतो. थोडी आशंका मनात असेल आणि अनपेक्षित काही लाभ झाला, तर त्याचा आनंद अधिक असतो. नोटाबंदीचा लाभ सर्वसामान्य जनतेला मिळणारच आहे. कारण त्यामधून मोठ्या प्रमाणात काळापैसा निकालात निघणार आहे. म्हणजेच त्याचा जनतेला मिळणारा लाभ हमखास आहे. सहाजिकच त्याला विरोधकांनी पाठींबा दिला असता, तर त्याचे एकहाती श्रेय मोदींना घेता आले नसते. देशाच्या हितासाठीचा निर्णय असल्याने सर्वच पक्ष मोदींच्या पाठीशी उभे राहिले असते, तर आमच्याच दिर्घकालीन मागणीमुळे हा निर्णय सार्वत्रिक असल्याचाही दावा विरोधकांना करता आला असता. थोडक्यात श्रेयात भागिदार उभे राहिले असते. आता तसे होणार नाही. विरोधकांनी आपल्याला कडाडून विरोध झाला आणि शेवटी थोडाफ़ार त्रास होऊनही जनतेलाच लाभ मिळाला. कारण जनता आपल्या पाठीशी ठामपणे उभी राहिली, हेच मोदींना सिद्ध करायचे आहे. त्यासाठीच त्यांना विरोध हवाच होता, त्यासाठी तर त्यांनी धोका पत्करला आहे.

अशा कुठल्याही उपायांनी जनतेचे हित साधले जाईल. पण आपली मते कमी होती आणि जनतेला त्रास झाल्याचे खापर मात्र आपल्या माथी फ़ुटेल. अशी थोडी शक्यता असती, तरी मोदींनी असा धोका पत्करला नसता. कितीही झाले तरी हा माणूस संतमहंत नाही. तो राजकारणी आहे आणि मतांवर राजकारण चालते, याची त्याला खात्री आहे. सवाल इतकाच होता, की त्याचे श्रेय एकट्याच्या खात्यात कसे ओढायचे? त्यासाठी लोकांना थोडा त्रास होणे आवश्यक होते आणि त्यातून लोकांमध्ये स्वत:ही काही त्याग केल्याची भावना साधली जाणे अगत्याचे होते. जितके विरोधक लोकांच्या त्रास व अडचणींचा पाढा वाचतील, तितके लोकांनाही आपण काही देशासाठी केले, याचे समाधानही मिळू शकते. अगदी गोळाबेरीज सांगायची, तर एकट्या मोदींमुळे काळापैसा कमी झाला नाही, की नोटाबंदी यशस्वी झाली नाही. माझ्यासारखा सामान्य माणूस ठामपणे त्रास सोसून निर्णयाच्या मागे उभा राहिला; म्हणून हे साध्य झाले अशी धारणा होऊ शकते. किंबहूना तेच मनात ठेवून मोदींनी हा धोका पत्करला आहे. कोट्यवधी जनता म्हणजे मतदार आणि पंतप्रधान यांचे दु:खवेदना सारखी आहे, अशी जाणिव त्यातून निर्माण करण्याचा राजकीय डाव हा माणुस मोठ्या चलाखीने खेळला आहे. अर्थात विरोधकांनी बिनशर्त पाठींबा दिला असता, किंवा लोकांनी थोडा काळ कळ सोसून देशहिताच्या निर्णयाला हातभार लावावा असे आवाहन केले असते, तर मोदींचा डाव उधळला गेला असता. पण तसे होणे अशक्य होते. कारण मोदीनी उजाडणार्‍या सूर्याला सुर्य म्हटले, की आपण तोच पौर्णिमेचा चंद्र असल्याचे युक्तीवाद करण्याला आजकाल राजकारण समजले जाते आहे. त्यामुळे नोटाबंदीला आपले विरोधक कडाडून विरोध करणार; याविषयी मोदी नि:शंक होते. त्यासाठीच त्यांनी लोकांना त्रास होण्याचा धोका पत्करून हे पाऊल उचलले आहे.

आजच्या पिढीला इंदिराजींनी बॅन्कांचे राष्ट्रीयीकरण केले त्याचे अनुभव नसतील. पण तशा निर्णयाने त्यांनी एका खेळीत पक्षातले व पक्षाबाहेरचे खंदे विरोधक जमिनदोस्त केले होते. १९६९ साली कॉग्रेसमध्ये संघटना व सत्ताधारी यांच्यात बेबनाव निर्माण झालेला होता. पक्षश्रेष्ठी इंदिराजींना बाजूला करण्यापर्यंत कारस्थान करीत होते. अशावेळी त्यांनी उपपंतप्रधान व अर्थमंत्री मोरारजी देसाई यांचे अर्थखाते काढून घेतले आणि मोरारजींना राजिनामा देण्यास भाग पाडले होते. तिथून कॉग्रेसमधला संघर्ष शिगेस जाऊ लागला. अशावेळी विरोधक त्या फ़ाटाफ़ूटीच्या लाभ उठवण्यासाठी उतावळे झालेले होते. मग इंदिराजींनी एका मध्यरात्री १४ मोठ्या व्यापारी बॅन्कांचे राष्ट्रीयीकरण व संस्थानिकांच्या तनखेबंदीचा निर्णय घोषित करून टाकला होता. राष्ट्रपतींनी वटहुकूमावर सही केली आणि मगच विरोधकांना जाग आली. त्यामुळे मग राजकारण विभागले गेले होते. पक्षातले विरोधक व उजवे पक्ष इंदिराजींच्या विरोधात गेले, तर विरोधातले डावे, समाजवाद आलाच म्हणून धावत इंदिराजींच्या संरक्षणाला जाउन उभे राहिले. तिथून मग इंदिराजींनी गरीबी हटावची घोषणा केली होती. देशभरच्या सामान्य नागरिकाला आता बॅन्का आपल्याच मालकीच्या झाल्याची भावना निर्माण करण्यात इंदिराजी यशस्वी झाल्या. कॉग्रेस पक्ष फ़ुटला तरी त्यांना बहूमताची फ़िकीर करावी लागली नाही. त्यांच्या मागे डावे पक्ष उभे राहिले होते. तितके साध्य झाल्यावर वर्षभरात इंदिराजींनी लोकसभा बरखास्त करून गरीबी हटवण्यासाठी लोकांकडे मते मागितली आणि त्यांना दोन तृतियांश बहूमत लाभले होते, त्या वादळात उजवे वाहून गेले, तसेच डावेही गटांगळ्या खात बुडाले होते. राहुल आपल्या आजीचे हौतात्म्य नेहमी सांगत असतो आणि मोदी त्याच्या आजीचे राजकीय अनुकरण नित्यनेमाने करताना आढळत आहेत. धोका पत्करणे ही इंदिराजींची शैली होती. मोदी काय वेगळे करीत आहेत?

7 comments:

  1. भाऊ,सोशल मिडीयावर काही वाघ तसेच इतर ,वेडे वाकडे मेसेज टाकत आहेत परंतु सामान्य वाघ या मोठ्या वाघांना व इतरांना धुवत आहेत.दुर्भाग्य आहे की वाघाला ममतेचा पाझर फुटलाय वाघ काही दिवसांपुर्वीचे हिंदूंवरील बंगाली अत्याचार विसरलाय आता वाघ इतिहासजमा होईल असवाटतय

    ReplyDelete
  2. very nice kulkarni saheb mi pan sangicha aahe

    ReplyDelete
  3. मस्त लेख !!....एका दगडात अनेक पक्षी...!! अतिरेकी ,नक्सलवादी यान्चा अर्थपुरवठा थाम्बला....उत्तर प्रदेश , पन्जाब , मुम्बई महानगरपालिका ....पैसे वाटायचे कसे ??....चित्रपटस्रुष्टी अर्थपुरवठा ठप्प.....लालू व त्यान्च्यासारखे अनेक राजकारणी ' बेहाल '....केजरीवाल पुढील निवडणुकीत अद्रुश्य होइल...��

    ReplyDelete
  4. भाऊ मोदींचे खरे शत्रु आंधळे झालेले नमोभक्तच आहेत असं राहून राहून वाटतंय .

    ReplyDelete
  5. 60,000 शेतकर्यांनी आतपर्यंत आत्महत्या केल्या त्यावेळेला कुठे होत्या सहकारी बँका... आत यांच्या नाड्या अवल्या तेव्हा बोंबलतायत... सहकार हा पूर्णपणे फ्लॉप आहे... राजकारण्यांचा ब्लॅक मनी व्हाईट करण्याचा अड्डा आहे...

    ReplyDelete