Thursday, November 24, 2016

इंदिराजी जन्मशताब्दी


indira cartoon by laxman के लिए चित्र परिणाम
आज नोटाबंदीने देशभर वा माध्यमातून काहुर माजले असताना इंदिराजींच्या जन्मशताब्दीला शनिवारी आरंभ झाला. कॉग्रेस पक्षाने त्या निमीत्ताने योजलेल्या एका सोहळ्यात राष्ट्रपती प्रणबदा मुखर्जी अगत्याने उपस्थित होते. तिथे त्यांचे इंदिरास्मृती सांगणारे भाषणही झाले. मात्र त्यातून किती कॉग्रेसजन काय शिकतील याची शंकाच आहे. पण म्हणून प्रणबदांच्या त्या भाषणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण त्यांनी कॉग्रेसच्या पुनरुत्थानाचा मार्ग तिथे सांगितलेला आहे. डबघाईला गेलेला कॉग्रेस पक्ष इंदिराजींनी दोनदा फ़ोडून, पुन्हा नव्याने कसा जनमानसात रुजवला, त्याचे दाखले मुखर्जींनी दिलेले आहेत. माजी सैनिकाची निवृत्ती वेतनासाठी आत्महत्या किंवा नोटाबंदीच्या गर्दीत घुसून राहुल गांधी जो तमाशा करतात, त्यासाठीच बहुधा प्रणबदांनी हा इतिहास तपशीलात सांगितलेला असावा. आपल्या पडत्या काळातले राजकारण कसे करून पुन्हा उर्जितावस्थेला यावे, त्याचा वस्तुपाठच इंदिराजींनी त्यावेळी कृतीतून घालून दिलेला होता. त्याचेच स्मरण त्यांनी आपल्या भाषणातून करून दिले आहे. ते संदर्भ लक्षात घेतले व तपासून बघितले, तर राहुल सोनियांचे राजकारण आज कुठे फ़सते आहे, त्याचा थोडाफ़ार अंदाज येऊ शकतो. १९७७ सालात इंदिरा गांधी जमिनदोस्त झाल्या होत्या. सत्तेतून त्यांचा नुसता पराभव झालेला नव्हता, तर स्वत: त्याच आपल्या रायबरेली मतदारसंघात राजनारायण यांच्याकडून पराभूत झालेल्या होत्या. अशी प्रचंड विरोधीलाट इंदिराजींनी कशी माघारी फ़िरवली, त्याचा तो चित्तथरारक इतिहास आहे. त्यातला पहिला मुद्दा म्हणजे त्यांनी सरकारची कुठे कोंडी केली नाही, की त्यांना चुकीचे ठरवण्यासाठी कुठला आटापिटा केला नाही. उलट मोरारजी सरकारला अधिकाधिक आत्मविश्वास देऊन नवनव्या चुका करायला भाग पाडण्याची रणनिती इंदिराजींनी राबवली होती. त्याचेच स्मरण प्रणबदांनी करून दिलेले आहे.

आधी आपण १९७७ आणि २०१४ मधल्या कॉग्रेसच्या पराभवातला फ़रक समजून घेतला पाहिजे. तेव्हा इंदिराजींना आजच्या कॉग्रेसपेक्षा दुप्पट मते मिळाली होती आणि लोकसभेतील जागाही जवळपास चौपट होत्या. खुद्द इंदिराजी, संजय या पुत्रासह पराभूत झालेल्या होत्या. सोनिया पुत्रासह त्याच दोन मतदारसंघात विजयी झालेल्या आहेत. मात्र सोनियांच्या नेतृत्वाखाली कॉग्रेसला १९७७ च्या तुलनेत निम्मेहून कमी टक्के मते मिळालेली आहेत. याचा अर्थ असा, की तेव्हा इंदिराजी आजच्या सोनिया कॉग्रेसपेक्षा अधिक सबळ होत्या. तरीही त्यांनी निवडून आलेल्या जनता सरकारच्या कामात अडथळे आणण्याचे कुठलेही प्रयत्न केले नव्हते. उलट या सरकारला मतदाराने कौल दिला असल्याने त्यांचे सरकार पुर्ण मुदतीपर्यंत चालले पाहिजे; असे इंदिराजींनी स्पष्टपणे सांगून टाकलेले होते. तिथेच न थांबता त्यांनी मोरारजी सरकारला खोटा आत्मविश्वास यावा, यासाठी प्रयत्नपुर्वक मदत केलेली होती. कारण जनता पक्षाकडे जनतेचा झुकाव होता आणि त्याची अडवणूक करणे म्हणजे त्याच जनतेला दुखावणे ठरले असते. त्यामुळेच त्या मतदाराचा सन्मान करत असल्याचे दाखवून इंदिराजी अधिकाधिक सहानुभूती आपल्या्कडे यावी म्हणून प्रयत्न करीत होत्या. म्हणूनच त्या सरकारच्या कामातील चुका शोधून त्याचे भांडवल करण्यापेक्षा, त्या सरकारला आपण सहकार्य करीत असल्याचा देखावा छानपैकी उभा करण्यात इंदिराजी यशस्वी झाल्या होत्या. पण त्याचवेळी जनता पक्षाने नवनव्या चुका करून आपल्याच कर्माने जनमानसातून उतरावे, असाही त्यांचा प्रयत्न होता. त्यासाठी जनता पक्ष व त्याच्या सरकारने लोकांना त्रासदायक होतील वा पचनी पडणार नाहीत, अशा चुका करण्याची गरज होती. त्याचा परिणाम म्हणून लोकांचा ओढा आपोआप इंदिराजींकडेच येणार होता. कारण अन्य कुठला राजकीय पर्याय देशासमोर नव्हता.

इंदिराजींचा विरोध हे जनता पक्षाचे व त्यात सहभागी झालेल्या विविध राजकीय गट व नेत्यांचे सुत्र होते. त्यांना एकत्रित बांधून ठेवणारा तोच धागा होता. जोवर तोच धागा ढिला होत नाही, तोवर जनता पक्षात बेबनाव होऊ शकणार नव्हता. सहाजिकच इंदिरा नावाचे आव्हानच आपल्यापुढे नाही, याची जनता नेत्यांना खात्री पटवणे भाग होते. इंदिराजींची रणनिती नेमकी तीच होती. त्यांनी कुठल्याही प्रकारे जनता सरकारची अडवणूक केली नाही, की राजकीय कोंडी करण्याचा प्रयासही केला नाही. सहाजिकच इंदिरा विरोध सैल होत गेला आणि जनता पक्षांतर्गत असलेले विविध अंतर्विरोध उफ़ाळून बाहेर येऊ लागले. त्याचाही कुठला राजकीय फ़ायदा उठवण्याचा उतावळेपणा इंदिराजींनी केला नाही. उलट एका क्षणी जनता पक्षाचे दोन तुकडे पडायची वेळ आली; तेव्हा त्यातल्या एका गटाने पाठींबा मागितल्यावर इंदिराजींनी त्याला होकार भरला होता. थोडक्यात विविध परस्पर विरोधी गटांची ही खिचडी सरकार चालवू शकत नाही, हेच लोकांच्या मनात ठसवण्याचे राजकारण इंदिराजी तेव्हा खेळत होत्या. त्यांचा आतविश्वास आणि संयम किती असेल? जनता पक्षात दुफ़ळी माजत असताना त्यांनी स्वपक्षातली एकजूट टिकवण्याचीही पर्वा केली नाही. एका प्रसंगी त्यांच्याशी पक्षातले सहकारी डाव खेळू लागले, तेव्हा नवख्या सहकार्‍यांना हाताशी धरून इंदिराजींनी कॉग्रेसमध्ये दुसरी फ़ूट घडवुन आणली. त्यामुळे तर जनता पक्षात इंदिरा नावाचे आव्हानही उरले नाही. कॉग्रेस फ़ुटली म्हणून बेफ़िकीर झालेल्या जनता पक्षीयांनी उच्छाद म्हणावा, इतका गोंधळ घालायला आरंभ केला. त्यातून इंदिराजींचा परतीचा रस्ता तयार होत गेला. मतदारात जनता पक्षाविषयी राग आणि त्यांना पुर्ण संधी देणार्‍या इंदिराजींबद्दल विश्वास, असे राजकारण पुढे सरकले.  अडीच वर्षात इंदिराजींना नाकारणार्‍या जनतेनेच त्यांना प्रचंड बहूमताने सत्तेत आणून बसवले होते.

आज सोनिया व राहुल यांच्या नेतृत्वाखालच्या कॉग्रेसने पहिल्या दिवसापासून मोदी सरकारची कोंडी करण्यातून आपल्या विरोधातील विविध मतप्रवाहांना मोदींच्याच पाठीशी ठाम राखण्याचे प्रयास चालविले आहेत. राहुल वा सोनिया मोदींना चुकाही करू देत नाहीत. मोदी जे काही करतील ते चुकीचेच असल्याचा सिद्धांत लोकांसमोर घेऊन जात आहेत. त्यात कधीच तथ्य नसते. म्हणून जनता अडिच वर्षे उलटून गेल्यावरही मोदींपासून दुरावल्याची कुठलीही चिन्हे नाहीत. उलट हेच दोन्ही कॉग्रेसनेते मोदींना कुठलेही काम करू देत नाहीत, अशी लोकभावना होण्याला मात्र या मायलेकरांनी मोठा हातभार लावलेला आहे. मात्र दुसरीकडे मोदी विरोधाच्या धाग्याने उर्वरीत सर्व पक्षांना एकत्र करण्यात कुठलेही यश त्यांना मिळवता आलेले नाही. ममतांनी नोटाबंदीला विरोध करत मोर्चा काढला, त्यांच्या सोबत जाणे राहुलना जमलेले नाही. मायावती मुलायम वा डाव्यांसह प्रादेशिक पक्षांची भक्कम मोट बांधण्याचेही गणित साधलेले नाही. थोडक्यात इंदिरा (मोदी) विरोधातली (आजच्या) जनता पक्षासारखी मोट बांधण्यात सोनिया अपेशी झाल्या आहेत, तर दुसरीकडे कुठेही जाऊन बेताल बडबड करण्यातून राहुल गांधी पक्षाची उरलेली पुण्याई मातीमोल करण्यात अखंड रमलेले आहेत. ही गोष्ट कॉग्रेसमध्येच आयुष्याची उमेद खर्ची घालणार्‍या प्रणबदा मुखर्जींना बोचत असेल, तर नवल नाही. म्हणूनच त्यांनी इंदिराजींचा वारसा आपलाच असा दावा करणार्‍या सोनिया व राहुल गांधी यांना, इंदिराजींनी कॉग्रेसचे पुनरुत्थान कसे केले त्याचे दोन ऐतिहासिक प्रसंग सांगण्याची संधी, शताब्दी सोहळ्याचे निमीत्त साधून घेतलेली असावी. मोदींच्या राजकीय वाटचालीत त्यांना १९६०-७० च्या दशकातील इंदिराजी दिसत असतील, तर त्यांनी वेदना बोलून तरी कुठे दाखवायची? पण त्याचा उपयोग नाही. कोणीही प्रणबदांचे शब्द मनावर घेणार नाही.

2 comments:

  1. प्रणबदांनी भाषणातून पक्ष फोडण्याचा सल्ला इतर काँग्रेस जनांना दिला असु शकतो.
    आता इंदिराजीं एवढी कुवत व वकूब आणायचा कुठुन हा प्रश्ण शिल्लक राहतोच.
    भुमिका मांडायची तर विचार करावा लागतो. ना संघटना बांधणीचा अनुभव, ना विचार करण्याची सवय. पण मोदी विरोध सोपा मार्ग. जय काँग्रेस, जय सोनिया. . . . . .

    ReplyDelete