Sunday, November 27, 2016

निर्बुद्ध रांगेतले शहाणे

amartya sen के लिए चित्र परिणाम

“The man who reads nothing at all is better educated than the man who reads nothing but newspapers.”  ― Thomas Jefferson

बुद्धी हा अनुभवाचा आणि तर्कावर चालणारा प्रकार असतो. बुद्धीमंत म्हणून मिरवणार्‍यांनी आपल्या प्रत्येक विधान व वक्तव्याला तर्काने सिद्ध करण्याची गरज असते. पण तर्क हा सुद्धा अनुभव आणि साक्षात पुराव्याच्या आधारावरच चालत असतो. कुठलीही गोष्ट वा मुद्दा मांडताना, तो आकलनीय करण्याची जबाबदारी त्याच बुद्धीवादी व्यक्तीवर असते. पण शेवटी अशी व्यक्तीही माणुस असते आणि मानवी विकार, समजूतीपासून बुद्धीमंताचीही सुटका होत नसते. त्यामुळेच शहाणे मानले जाणार्‍यांकडूनही अनेकदा तद्दन मुर्खपणाचे युक्तीवाद केले जाऊ शकतात. सध्या भारतातल्या अनेकांना त्याच आजाराने पछाडले आहे. नजिकच्या काळात त्याच आजाराचे नाव ‘मोदी फ़्लू’ असे ठरवले गेल्यास नवलही वाटण्याचे कारण नाही. कालपरवा अर्थशास्त्री माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नोटाबंदीवर आपले अतर्क्य शास्त्र प्रतिपादन केलेले होते. आता त्यांच्याच पंगतीतले डॉ. अमर्त्य सेन यांनी आपल्या अकलेचे प्रदर्शन मांडलेले आहे. एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी मोदी सरकारच्या नोटाबंदीवर केजरीवादाच्या आधाराने टिकास्त्र सोडले आहे. कुठलेही बेताल आरोप करण्याला आजकाल केजरीवाद संबोधले जाते. त्यामुळे अमर्त्य सेन यांनीही केजरीवाल यांच्याच पद्धतीने नव्हेतर केजरीवाल यांनीच केलेल्या आरोपाचा पुनरुच्चार केलेला आहे. नागरिकाला कष्टाच्या कमाईचे पैसे बदलून घ्यायला रांगेत आणून उभा करणारा हा नोटाबंदीचा निर्णय, म्हणजे प्रत्येक भारतीयावर गुन्हेगार नसल्याचे सिद्ध करण्याची सक्ती असल्याचे सेन यांचे मत आहे. हे मत आपण वादासाठी मान्य करून, त्या तर्कातला शहाणपणा शोधायला हरकत नसावी. प्रत्येकाला आपण निर्दोष नसल्याचे सिद्ध करण्याची सक्ती? मग अशी सक्ती जगभर कुठेही राजरोस होत राहिली, तेव्हा सेन महाशय झोपा काढत होते काय?

मोदी सरकारने अकस्मात नोटाबंदी केल्याने अनेकांना आपापल्या खिशातल्या वा कपाटात जपून ठेवलेल्या हजार पाचशेच्या नोटा स्वरूपातले पैसे, खोटे ठरल्याने बॅन्केच्या दारात जाउन उभे रहावे लागले आहे. कित्येक तास ताटकळावे लागले आहे. अनेक बॅन्केत पैसे बदलून घेण्याची सुविधाही पुरेशी नसल्याने लोकांना वणवण करत पायपीट करावी लागली आहे. हे कोणी नाकारू शकत नाही. पण राहुल गांधी, केजरीवाल यांच्यापासून मनमोहन सिंग वा अमर्त्य सेन यांना कुठल्या रांगेत उभे राहून नोटा बदलण्याची सक्ती झालेली नाही. बाकी सामान्य लोकांवर तशी सक्ती झालेली आहे. मग ते सामान्य लोक बोलले तर समजू शकते. पण राहुल वा अमर्त्य सेन कशासाठी कल्लोळ करीत आहेत? लोकांवर अशी सक्ती झाल्याचे त्यांना कुठून समजले? तर त्यांनी वाहिन्यांवर किंवा वर्तमानपत्रातून तशा बातम्या वाचलेल्या आहेत. त्यामधून लोकांचे किती हाल होत आहेत, त्याचा शोध अशा एकाहून एका महापुरुषांना लागलेला आहे. अमेरिकन राज्यघटनेची रचना करणार्‍यापैकी एक असलेला थॉमस जेफ़रसन, अशा इन्फ़ॉर्म्ड म्हणजे जाणत्यांविषयी काय म्हणतो? तर असे भरपूर वाचणारे सामान्य अडाण्यांपेक्षा कमी जाणते असतात. कारण त्यांच्यापाशी कुठलाही अनुभव नसतो. अन्य लोकांनी कथन केलेले खरेखोटे अनुभव मान्य करून, असे बहुश्रूत लोक शहाणपणा सांगत असतात. पण सामान्य माणूस मात्र अनुभवातून शिकत असतो. त्यामुळे ज्यांना स्वत:चा असा अनुभव नसतो, त्यांना जगात वास्तवात काय चालले आहे त्याचेही भान नसते. तसे भान सेन यांना असते, तर याच्याही आधी त्यांनी असल्या सक्तीविषयी कित्येक वर्षापुर्वी आक्रोश केला असता. कारण त्यांनाही गेली पंधरा वर्षे सतत चोरासारखे रांगेत उभे करून सक्तीने गुन्हेगार नसल्याचे पुरावे सतत मागितले गेले आहेत. पण तसे काही झाल्याचे ह्या महोदयांना अजून उमजलेले सुद्धा नाही.

अमर्त्य सेन यांना जगभरची मान्यता मिळालेली आहे. ते महान प्राध्यापक आहेत. नोबेल पारितोषिक व भारतरत्न त्यांना लाभलेले आहे. त्यांची जगभरात उठबस चालू असते आणि म्हणूनच त्यांना सतत जगाच्या कानाकोपर्‍यात फ़िरावे लागत असते. सहाजिकच आहे, की हा माणूस हजारो मैल चालत पायपीट करीत जाणार नाही वा कुठली आपली मोटार घेऊन फ़िरणार नाही. त्याला विमानाचाच प्रवास करावा लागतो. त्यामुळेच वारंवार सेन यांना जगातल्या विविध विमानतळांवरून येजा करावी लागत असणार. तिथे त्यांना थेट आपले सामान घेऊन विमानात चढता येते काय? पुर्वी असे होत असे. सामान जमा करायचे आणि तिकीट घेऊन विमानात चढायचे. पण २००१ नंतर विमानतळावर पदोपदी तुम्हाला आपली ओळख दाखवावी लागते. आपले सामान तपासून घ्यावे लागते. तुम्ही कोणी घातपाती जिहादी नाही वा तुमच्या सामानात कुठे स्फ़ोटके बॉम्ब नाहीत, याची साक्ष द्यावी लागत असते. हा अनुभव सेन वा केजरीवालच नाही, जगातल्या कोट्यवधी विमान प्रवाश्यांना रोज घ्यावा लागतो. मोदी सरकारने नोटबंदी करण्यापुर्वी पंधरा वर्षे ही सक्ती जगभर सुरू झाली. जगातल्या प्रत्येक देशात आणि प्रत्येक विमानतळावर ही सक्ती अखंड चालू आहे. त्यापैकी किती लोक घातपाती जिहादी आहेत? किती प्रमाणात घातपाती आहेत? दहाविस कोटीतला एखादा असा मिळू शकलेला नाही. पण ९/११ च्या न्युयॉर्कच्या त्या भीषण घटनेनंतर, जगभर अशी सक्ती झाली आहे. अकारण प्रत्येक प्रवाश्याला घातपाती असल्यासारखे रांगेत उभे करून बारीकसारीक सामान तपासून मगच विमानात बसण्याची मुभा असते. त्याला सक्ती नाही तर काय म्हणायचे? जगभरच्या वीसतीस कोटी प्रवाश्यांपैकी एक असा जिहादी मिळणार नाही. पण तसा कोणी असू शकतो, यासाठी कोट्यवधी प्रवासी गुन्हेगार ठरवले गेलेले नाहीत काय? सेन त्याविषयी कधी बोलल्याचे आपण ऐकले आहे काय?

कारण तिथे विमानतळावर होणारी छाननी व चाचपणी लोकहितासाठी व सुरक्षित प्रवासासाठीच आहे, हे आपण मान्य केले आहे. लाखभर विमान उड्डाणानंतरही एकदोन असे घातपात होत असू शकतील. पण म्हणून लाखभर विमान उड्डाणात कोट्यवधी प्रवासी गुन्हेगारासारखे तपासले जात आहेत ना? अगदी केजरीवाल सेन यांनाही तशाच सक्तीला सामोरे जावे लागले आहे. पण त्यांनी कधी ‘आम्हाला घातपाती ठरवता काय’, अशी तक्रार केल्याचे कोणी ऐकलेले नाही. निदान कुठल्या मुलाखतीतून सेन वा तत्सम बुद्धीमंताने तशी तक्रारही केल्याचे वाचनात आलेले नाही. याचे दोन अर्थ होऊ शकतात. या लोकांना तशी काही सक्ती असल्याचे अनुभवातून समजूच शकलेले नसावे. किंवा त्यांना अनुभवापेक्षाही माध्यमातून आलेल्या बातम्यातून अनुभव घेण्याची परावलंबी संवय जडलेली असावी. अन्यथा त्यांनी कधीच विमानतळावर होणार्‍या अपमानास्पद झडतीविषयी असाच आक्रोश केला असता. पण स्वानुभवापेक्षा इतरांच्या उष्ट्या खरकट्या अनुभवातून ज्ञानार्जन करायची सवय अंगवळणी पडली असेल, तर स्वानुभव घेण्याच्या बौद्धिक क्षमतेला गंज चढत असतो. म्हणून पंधरा वर्षे शेकडो विमानतळावर आपलीच झाडाझडती घेतली जात असताना, आपल्यालाही जिहादी घातपाती ठरवले जात असल्याची जाणिवही अमर्त्य सेन यांच्या बुद्धीला झाली नाही. त्यांना आजवर जो अनुभव विविध विमानतळावर प्रवास करताना आला, तो प्रत्यक्षात सक्ती असल्याचे ध्यानात येण्यासाठी त्यांना वाहिन्यांवरच्या बातम्या बघाव्या लागल्या. ज्यांच्या व्यक्तीगत जाणिवा आणि स्वानुभव घेण्याची बुद्धी इतकी बोथट झालेली आहे, त्यांना आजकाल माध्यमातून बुद्धीमंत विचारवंत म्हणून पेश केले जाते. त्यांच्याकडून आपल्यासारख्या स्वानुभवाने जग ओळखणार्‍यांनी कितीसा विश्वास ठेवायचा? ज्ञानी नसल्याचा सामान्यांना किती आनंद होत असेल ना? आपल्याकडे लपवायला पैसे नाहीत, याचा आनंदही तितकाच मोठा आहे. पण इतक्या मोठ्या शहाण्यांना त्या रांगेतला आनंद कसा कळायचा?

9 comments:

 1. भाऊ या यादीत एक नाव वाढलय दिवसा ढवळ्या थेट देशाच्या पेशव्याला हलवायाची उपमा देतायत डोक फिरलय यांच जनाची नाही तर निदान महाराजांची ठेवा

  ReplyDelete
 2. खांग्रेसने पोसलेले जे काही ' तथाकथित ' विचारवंत ...........त्यातला हा एक ' गंज ' चढलेला अर्थशास्त्री याला ' यू.पी.ए ' च्या काळात एक युनिव्हर्सिटी चे कुलगुरूपदी देण्यात आले होते. तीन वर्षे नुसते भत्ते घेऊन ह्या महाशयांनी त्या युनिव्हर्सिटीमध्ये काही किरकोळ ' बुद्धिवादी / पुरोगामी ' लोकांची निवड केली. मोदी सरकार आल्यावर या महाशयांची ' गच्छंती ' झाली. त्यामुळे हे महाशय अशीच गरळ ओकणार हे निश्चित. ........हा आधीच ' बंगाली बाबू ' ..त्यामुळे बंगाली बाबुंचा आधीच जन्मजात ' बुद्धिमान ' असल्याचा मोठा ' गैरसमज '.........स्वतःच्या बायको मुलीला टाकून अमेरिकेत पळून गेलेला आणि तेथे वेगळे लग्न करणारे हे ' महाशय '

  ReplyDelete
 3. भाऊ एकदम छान लिहले आहे. तुमच्या लेखामुळे आम्हाला आमची बुद्धी निरखून निघते

  भाऊ जरा उत्तर प्रदेशचे भाजपचे भावी मुख्यमंत्री म्हणून वरूण गांधी या विषयी जरा लिहले तर बरे होईल

  ReplyDelete
 4. Bhau, paravach pardeshvari ani vimanpravasacha yog ala ani me Mazya sagalya mitrana konatyahi bank athavan ATM peksha jast rang vimantalavar lavavi lagate hyachi gamatine athavan Karun dili hoti.....pan co. Chya kharchane ka asena pan vimanpravas karanare "aam Adami" gatat modat nasalyane yavirodhat koni andolan karanare nahi☺

  ReplyDelete
 5. काही विचारवंत त्यांना मिळालेल्या मानसन्मानाच्या प्रमाणात विचारांचा उत्सर्ग करीत असतात.ह्या बाबाला नालंदातून हाकलून दिल्यानंतर सूडबुद्धिने बरळतो आहे.
  आधुनिक काळातील विद्वानांच्या स्वभावातील हा एक गुणच म्हणायला हवा.

  ReplyDelete
 6. काँग्रेस सरकार प्रणीत अनेक घोटाळ्यासाठी "मी निर्दोष आहे, मी त्यातला नाही, माझ्यावर विश्वास ठेवा", असे श्री ममनमोहन सिंह यांना सारखे कळवळून सांगावे लागत होते.
  हा इतिहास फार जुना नाही.
  मित्र अमर्त्य सेन वयोमानानुसार वा सोयिस्करपणे विसरले असावेत.

  ReplyDelete
 7. हा ज्ञान आणी माहीती यातला फर

  ReplyDelete
 8. हा ज्ञान आणी माहीती यातला फरक आहे . ज्ञान ही अंतरिक क्रिया तर माहीती ही बाह्य क्रिया होय. शिक्षणाने व्यक्ती माहितीवंत होऊ शकतो पण ज्ञानवंत होईलच असे नाहि. वरिल दोघे याचे साक्षात् उदाहरणे आहेत एक iit तर एक नोबेल विजेता.

  ReplyDelete
 9. भाऊ, तुमच्या लेखांमध्ये नोट बंदी बद्दल सकारात्मक गोष्टी बघायला मिळतात आणि दुसरीकडे राजु परुळेकरांच्या फेसबुक वर पूर्ण वेगळं चित्र आहे. अर्थात प्रत्येकाला स्वतःच मत असतंच. पण मग सामान्य माणसांनी काय समजावे?

  पुद्गे सगळं नीट होणार आहे का परुळेकर म्हणतात तसं chaos होणार आहे?

  ReplyDelete