Thursday, November 24, 2016

स्टींग ऑपरेशनचा जन्म?

reddy marriage के लिए चित्र परिणाम

नोटाबंदी आणि त्यामुळे सामान्य माणूस हक्काच्या चलनाला वंचित झाला असताना, भाजपाचा एक माजी मंत्री आपल्या मुलीच्या शाही विवाह सोहळ्यावर पाचशे कोटी रुपये उधळत असल्याची चर्चा गेला आठवडाभर रंगली होती. जनार्दन रेड्डी ह्या कर्नाटकच्या माजी मंत्र्याने हा सोहळा केला म्हणून खुप काहूर माजलेले होते. त्यावरून माध्यमे व पत्रकारांनाही त्रासलेल्या जनतेचा प्रचंड कळवळा आलेला होता. तो कळवळा तसा नवा नाही. आता तो विषय मागे पडला आहे. संसदही सुरू झाली आहे आणि तिथेही धुडगुस चालू आहे. खरे तर अशा विषयात लोकसभेमध्ये हक्काने बोलू शकणारा एक सदस्य आजही उपलब्ध आहे. पण त्याने तसे काही बोलण्याचा प्रयत्नही केला नाही, म्हणून आठवणी चाळवल्या. गेल्या लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादी व कॉग्रेस अशा दोन्ही पक्षांचा महाराष्ट्रात धुव्वा उडत असताना, माढा मतदारसंघातून विजयसिंह मोहिते पाटिल प्रथमच संसदेत निवडून आले. त्यापुर्वी ते संसदेत नव्हते आणि महाराष्ट्रात त्यांनी दिर्घकाळ सत्तेत रहाण्याचा विक्रम केलेला आहे. पण ही त्यांची असण्यापेक्षा त्यांच्या पित्याची राजकीय पुण्याई आहे. यशवंतराव चव्हाण वा वसंतदादा पाटिल यांच्या जमान्यात विजयसिंहांचे पिताजी शंकरराव मोहिते पाटिल सोलापूर जिल्ह्यातील अकलुजचे आमदार होते. सहकार व साखर उद्योगात त्यांच्या नावाचा दबदबा होता. १९७१ साली इंदिराजींनी गरीबी हटाव आणि समाजवादाची कास धरली, तेव्हाही शंकरराव इतरांच्या सोबत त्या दिंडीत सहभागी झालेले होते. त्याच काळात विजयसिंह वयात आले आणि त्यांचा विवाह करण्याची गरज निर्माण झाली. आपल्या प्रतिष्ठेला साजेसा सोहळा त्यावेळी शंकाररावांनी साजरा केला होता. त्याचा तेव्हा देशव्यापी गाजावाजा झालेला होता. पंचेचाळीस वर्षापुर्वी तो सोहळा लक्षभोजन म्हणून गाजला होता. पण बहुधा जगातले पहिले स्टींग ऑपरेशनही तेव्हाच झाल्याचीही वदंता होती.

विजयसिंह यांच्या त्या विवाहासाठी अफ़ाट खर्च झाला आणि लाखो लोकांना आमंत्रित करून भोजनावळी घातल्या गेल्या, अशा बातम्या झळकल्या होत्या. महाराष्ट्रात तेव्हा दुष्काळ सादृष परिस्थिती असताना झालेल्या त्या लक्षभोजन सोहळ्याच्या बातम्या देशभरच्या माध्यमांना चक्रावून गेल्या होत्या. विहीरीमध्ये बर्फ़ सोडून पाहुण्यांना गार पाणी पंगतीत दिले गेले वगैरे, अनेक दंतकथा आलेल्या होत्या. साधे फ़ोन घरात नसायचा तो जमाना. टिव्हीनी नव्हते किंवा मोबाईलही नव्हते. त्यावेळी ही बातमी देशव्यापी होऊन गेलेली होती. त्यावर लेख लिहीले गेले आणि संपादकीय गदारोळ झालेला होता. अखेर त्याची म्हणे इंदिराजींनाही दखल घ्यावी लागली आणि शंकरराव मोहिते पाटिल यांना दिल्लीला जाऊन स्पष्टीकरण द्यावे लागलेले होते. त्यांचा खुलासा सोपा होता. दिर्घकाळ त्या परिसराचे नेतृत्व यशस्वीरित्या केले असल्याने, तालुक्यातील प्रत्येकाला आपल्या घरचेच कार्य असल्यासारखे वाटत होते. लोकांनीच त्यात सहभागी होऊन त्या विवाहाचा महोत्सव साजरा केला होता. पण हे ऐकून कोण घेणार? पत्रकार तर घटनास्थळी हजर नसला तरी त्याचाच शब्द खरा असतो ना? त्यामुळेच कितीही खुलासे देऊन उपयोग झाला नाही. बिचार्‍या शंकररावांना माध्यमांच्या तोफ़खान्यानंतर इंदिराजींच्या भडीमाराला सामोरे जावे लागलेले होते. तर त्यांनी माध्यमांना निरूत्तर करावे, असा पर्याय मोहिते पाटलांसमोर ठेवला गेला होता. त्यामुळेच त्यांनी मुंबई पुण्याच्या महान संपादक व ज्येष्ठ पत्रकारांना अकलूजला येऊन लोकांचा सहभाग समजून घेण्य़ाचे आमंत्रण दिलेले होते. त्यात अर्थातच अनेक पत्रकार संपादक सहभागी झाले आणि त्यांच्या पाहुणचाराची पुरती साग्रसंगीत व्यवस्था शंकररावांनी केलेली होती. त्या पाहुणचारानंतर अकस्मात लक्षभोजनाचा विषय गुंडाळला गेला होता.

मग शंकरराव मोहिते पाटिल यांचा खुलासा पत्रकारांना तपासून घेतल्यावर पटला होता काय? संपादक मंडळींनी त्याची खातरजमा करून घेतली होती काय? त्याविषयी कोणी उघडपणे काही लिहीले वा छापलेले नव्हते. पण त्यानंतरच्या काळात पत्रकारी जगतामध्ये एक अफ़वा दिर्घकाळ घिरट्या घालत होती. त्यानुसार शंकररावांनी पुणे मुंबईहून आलेल्या तमाम पत्रकार संपादकांची मस्त उठबस केली व त्यांना ऐतिहासिक पाहुणचार घडवला होता. खाण्या-पिण्याची अशी रेलचेल केलेली होती, की अनेक जाणत्यांची शुद्ध हरपली होती. शंकररावांची लोकप्रियता आणि संपुर्ण मतदारसंघात पसरलेले त्यांचे कुटुंबिय बघून, हा सोहळा उधळपट्टी नव्हेतर घरगुती समारंभ असल्याचाही साक्षात्कार माध्यमांना झाला होता. म्हणून तर तो विषय गुंडाळला गेला असे मानले गेले. पण असेही म्हटले जात होते, की या खास आमंत्रितांच्या मेजवानी सोहळ्याचे संपुर्ण चित्रणच शंकररावांनी खास फ़ोटोग्राफ़र बोलावून केलेले होते. मुंबई पुण्यातले बुद्धीमान संपादक पत्रकार ‘भारावून’ गेल्यावर कशा अवस्थेत असतात व त्यांचे वर्तन किती सभ्य असते; त्याचे चलतचित्रणच त्यांनी करून घेतल्याचे दबल्या आवाजात ऐकायला येत होते. पण ठामपणे कोणी त्या्ला दुजोरा देत नव्हता. त्यामुळे खरेखोटे कोणी आज सांगू शकत नाही. विजयसिंह यांच्याच विवाह सोहळ्याचा विषय असल्याने त्यांनी मनावर घेतले, तर आजही त्यावरचा पडदा उठू शकेल. कारण ते चित्रण झाले तरी तो चित्रपट कधी पडद्यावर आलेला नव्हता. सहाजिकच तसा काही चित्रपट चित्रित झाला होता किंवा कसे; हे विजयसिंहच सांगू शकतील. त्यामुळे तेव्हाच्या इतिहासात काही मोठा फ़रक पडणार नसला, तरी नव्या दमाने रेड्डी विवाह सोहळ्यावर लिहीण्याचा उत्साह असलेल्यांना काही जुने संदर्भ उपलब्ध होऊ शकतील. त्या काळात अर्थातच स्टींग ऑपरेशन हा शब्दही अस्तित्वात आलेला नव्हता.

पंचेचाळीस वर्षापुर्वी चोरून फ़ोटो काढणेही पराकोटीचे जिकीरीचे काम होते आणि कॅमेरेही सरसकट लोकांपाशी नसायचे. विवाह सोहळ्यात खेड्यातल्या समारंभाचे फ़ोटो काढण्याला श्रीमंती समजले जायचे. अशा कालखंडातली ही गोष्ट आहे. फ़ार कशाला वर्तमानपत्रात एखादा फ़ोटो छापण्यालाही खर्चिक बाब मानली जात होती. त्यामुळे अशा इतिहासात एका नेत्याने थोर संपादक पत्रकारांचे चक्क सिनेमासारखे चित्रण केल्याची ही दंतकथा, खरोखरच मनोरंजक ठरू शकेल. पण ती कधी बातमी होऊ शकली नाही आणि दबल्या आवाजातली अफ़वाच होऊन विस्मरणाच्या कबरीत गाडली गेली. आज केजरीवाल कोणालाही स्टींग ऑपरेशन करायला सांगतात आणि कुठेही लोक खिशातला मोबाईल काढून थेट घटनेचे चित्रणीही करतात. विनाविलंब त्याची क्लिप सोशल माध्यमात प्रक्षेपितही होते. तंत्रज्ञानाने किती मोठी झेप घेतली आहे ना? अशा जमान्यात रेडडी कुटुंबाबे पाचशे कोटी खर्चले, उधळले तर त्याला बातमी म्हणण्यात काय मोठे? फ़ाटक्या कपड्यातला भारतीयही आज मोबाईलमध्ये चलतचित्रण करू शकणारा कॅमेरा बाळगतो. पण स्वत:ला स्टींग ऑपरेशनचे मास्टर समजणार्‍या किती लोकांना त्या तंत्राचा जनक ठाऊक असेल? खरेच शंकररावांनी तेव्हा तसे काही केले होते किंवा नाही, हे ठाऊक नाही. पण दबल्या आवाजात मिळालेली माहिती अशी होती, की चित्रणाची फ़िल्म हाती आल्यावर ठराविक संपादक पत्रकारांना त्याचे अंश शंकररावांनी खाजगीत दाखवले आणि त्यांच्या लक्षभोजनाचा विषय गुंडाळला गेलेला होता. १९७० च्या कालखंडात पत्रकारितेमध्ये मिरवणार्‍यापैकी काही ज्येष्ठ आजही मुंबई पुण्यात हयात आहेत. त्यांनीही अशा जुन्या गोष्टी आपल्या दोन पिढ्यानंतरच्या पोरांना सांगितल्या, तर विस्मृतीत गेलेल्या इतिहासाला उजाळा मिळू शकेल. किंवा दुसरा पर्याय विजयसिंहांचा आहे.

2 comments:

  1. भाऊ पुण्यातील युवकांसारखी (रविवार)आवस्था झाली आहे Saturday night full tite इतक्या लेखांच्या पार्टी मुळे नशा चढलीआहे उतारा अपेक्षित आहे

    ReplyDelete