Monday, November 7, 2016

उपयुक्त मुर्खांची गोष्ट

khomeini के लिए चित्र परिणाम

कुठलेही वरदान हे फ़ुकटात मिळत नसते. घोर तपस्या केल्यावरच वरदान मिळत असते. पण त्यातून जी अमोघ शक्ती आपल्या हाती येत असते, तिचा जबाबदारीने वापर करण्याचे बंधनही असते. जर त्या वरदानाचा गैरलागू वा अतिरेकी वापर झाला, तर त्याच वरदानाची शापवाणी होण्याचीही तरतुद असते. अर्थात ही पौराणिक समज वा श्रद्धा असल्याने, आजकालच्या पुरोगामी विचारवंतांना त्यातले बंधन नको असते. त्यांना फ़क्त वरदान हवे असते आणि ते मिळवण्यासाठी मेहनतही करायची इच्छा नसते. आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य किंवा घटनादत्त अधिकार अकस्मात कोणी मेहरबानी म्हणून दिलेले नाहीत. अनेक पिढ्यांनी स्वातंत्र्यलढा दिला आणि राष्ट्रवादाचे साकडे सामान्य समाजाला घातले, त्यातून मिळालेले हे स्वातंत्र्य आहे. त्यासाठी अनेकांनी आपल्या आयुष्याची वा संसाराची आहुती दिलेली आहे. पण त्याचे भान आज कुणाला उरलेले आहे? प्रत्येकाला आपल्याला मिळालेला अधिकार तेवढा ठाऊक आहे. पोलिसाला गणवेश मिळाल्यावर त्याच्या अंगात मस्ती संचारते आणि त्याच मिजाशीत त्याने सामान्य नागरिकांना हाणावे-मारावे, त्यापेक्षा आजच्या अविष्कार स्वातंत्र्याचा बेतालपणा किंचीतही वेगळा उरलेला नाही. त्या स्वातंत्र्याचा झेंडा जो खांद्यावर मिरवत असतो, त्याला जबाबदारीचे किती भान आहे? अशी जबाबदारी पोलिसांनी पार पाडली नाही, तर त्याला जाब विचारायला हेच पत्रकार हिरीरीने पुढे येतात. कालपरवा भोपाळच्या चकमकीविषयी शेकडो प्रश्न विचारणार्‍यांना कोणी सवाल करायचा? कोणी अशा लोकांचा कान पकडून त्यांना जबाबदारीचे भान आणायचे? जे स्वातंत्र्य आहे ते जपण्याची तरी जबाबदारी तुमच्यावर आहे की नाही? वैचारिक स्वातंत्र्य म्हणून आपल्याच पायावर धोंडा मारण्याला काय म्हणायचे? इराणचे एक भयंकर उदाहरण आपल्यासमोर आहे. आज तिथे कोणाला कसले स्वातंत्र्य आहे?

आजकाल जिहादी, अतिरेकी, दहशतवादी वा नक्षलवादी यांच्या खांद्याला खांदा लावून बोलायला सज्ज असलेले स्वातंत्र्यवीर बघितले; मग चार दशकापुर्वीच्या इराणच्या घडामोडी आठवतात. जवळपास अशीच स्थिती तिथे होती आणि अशीच सरमिसळ झालेली होती. इराणचा शहा मोठा उदारमतवादी होता असे कोणी म्हणू शकणार नाही. त्याला हटवण्यासाठी उदारमतवादी व डाव्यांनी थेट इस्लामिस्टांशी हातमिळवणी केली होती. आज आपल्या देशातले पुरोगामी व धर्मांध मुस्लिम यांच्यातली युती सर्रास बघायला मिळते; तशीच काहीशी स्थिती १९७७ सालात इराणमध्ये होती. तेव्हा खोमेनीला परागंदा होता आणि इराक व नंतर फ़्रान्समध्ये त्याने आश्रय घेतला होता. पण त्याचे इराणमध्ये मोठ्या संख्येने अनुयायी होते. त्याच्या भाषण प्रवचनाच्या कॅसेट चोरून आणून इराणमध्ये ऐकवल्या जात होत्या. अशावेळी तिथल्या कम्युनिस्ट, उदारमतवादी व डाव्या मंडळींना खोमेनी आपला उद्धारक वाटला होता. शहाची सत्ता संपवण्यासाठी म्हणूनच या डाव्यांनी इस्लामिस्ट खोमेनी अनुयायांशी हातमिळवणी केली आणि क्रमाक्रमाने शहाविरोधी आंदोलन डाव्यांच्या हातून खोमेनी समर्थकांच्या हाती गेले. पण त्यात येऊ घातलेला विनाश डावे बघू शकले नाहीत, की समजू शकले नाहीत. खोमेनी समर्थकांच्या जमणार्‍या गर्दीने डावे सुखावले, कारण गर्दीमुळे शहाची सत्ता डळमळू लागली होती. ती कोसळली आणि शहा अमेरिकेला पळून गेला. मग ती सत्तेची पोकळी भरून काढण्याची वेळ आली, तेव्हा आपोआप प्राधान्य खोमेनी समर्थकांच्या गटाला म्हणजेच इस्लामिस्टांना मिळाले. एकेदिवशी खोमेनी इराणमध्ये येऊन दाखल झाला आणि त्याने सत्तासुत्रे हाती घेतली. मग कायदा व घटना संपली आणि खोमेनीचे फ़तवे सुरू झाले. त्यातला पहिला अडथळा होता डाव्यांचा आणि एका फ़तव्याने त्यांचेच सर्वप्रथम शिरकाण झाले.

थोडक्यात एका छोट्या राक्षसाला संपवण्याच्या घाईत, मोठा राक्षसाला डाव्यांनी हाताशी धरले आणि त्यानेच इराणी डाव्या उदारमतवाद्यांचा खात्मा घडवून आणला. आज इथे भारतात उदारमतवादी किंवा डाव्यांच्या हालचाली बघितल्या, तर चार दशकापुर्वी इराणमध्ये घडलेल्या इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. नरेद्र मोदी किंवा भाजपा संघाच्या तिरस्काराने भारावून गेलेल्या उदारमतवाद्यांना, आपण कोणाशी हातमिळवणी करीत आहोत याचेही भान उरलेले नाही. ३६ वर्षे बंगालमध्ये सत्ता भोगणार्‍या डाव्यांनी मुस्लिम धर्मांधतेशी हातमिळवणी केली आणि पाच वर्षातच त्याच धर्मांधांना आपल्याकडे ओढून ममताच्या तृणमूल कॉग्रेसने डाव्या आघाडीला संपवून टाकले. आता तर त्यांना कॉग्रेससोबत जाऊनही आपले अस्तित्व टिकवणे अवघड झाले आहे. उलट बंगालमध्ये कधी नव्हे इतका इस्लामिस्टांचा धिंगाणा वाढलेला आहे. पलिकडे पश्चीम आशियात इजिप्तमध्ये तेच झाले होते. तहरीर चौकात उदारमतवाद्यांनी आंदोलन केले आणि दिर्घकालीन लष्करी हुकूमशहा म्हणून राज्य करणार्‍या होस्ने मुबारकची सत्ता कोसळून पडली. पण त्या आंदोलनात आपला चेहरा लपवून सहभागी झालेल्या मुस्लिम ब्रदरहुडच्या लोकांनी लौकरच आंदोलनाचा ताबा घेतला आणि निवडणुकीने सत्ता हाती घेतली. पण सत्ता हाती आल्यावर त्यांनी आपला धर्मांध अजेंडा राबवायला आरंभ केला. मग उदारमतवाद्यांना लष्करालाच सत्तांतर घडवून आणायचे आवाहन करावे लागले होते. एक कोणी चुकीचा आहे, हे मान्य करायला हरकत नाही. पण त्याला हटवण्याच्या सुडबुद्धीने त्याच्याहीपेक्षा भयंकर असा कोणी राक्षस आपल्या मूळावर येणार नाही, इतकी तरी बुद्धी ठिकाणावर असायला हवी. सध्या भारतात जमा होणारे समिकरण नक्षलवादी, दहशतवादी, जिहादी आणि उदारमतवादी असे चमत्कारीक आहे. त्याचा पुढला मार्ग इराणच्या इतिहासातून जाणारा आहे.

एक जुना दाखला दिला जातो, तो कितपत खरा आहे ठाऊक नाही. रशियन कम्युनिस्ट क्रांतीनंतर पाश्चात्य देशातील उदारमतवाद्यांना लेनिनचे खुप कौतुक वाटत होते. पण पाश्चात्य देशातील मुक्तविचार स्वातंत्र्यामुळे आणि व्यवस्थेमुळे त्यांना सत्तेवर टिका करण्याची मुभा मिळालेली होती. उलट लेनिनच्या कम्युनिस्ट रशियात मुक्त अविष्कार स्वातंत्र्याची मुस्कटदाबी करण्यात आलेली होती. असे असतानाही हे मुक्त स्वातंत्र्यवादी लेनिनचे कौतुक करीत होते. त्याविषयी कोणीतरी लेनिनकडेच विचारणा केली. तर लेनिनने त्या शहाण्यांची ‘उपयुक्त मुर्ख’ अशी संभावना केलेली होती. मुर्ख उपयुक्त कसा असू शकेल? तर तो स्वत:साठी मुर्ख आणि शत्रूसाठी उपयुक्त असतो. इराणच्या कम्युनिस्टांनी ते साध्य करून दाखवले आणि इराणमध्ये धर्मसत्ता प्रस्थापित व्हायला बहुमोल हातभार लावला होता. आपल्याकडे सध्या काहीही वेगळे चाललेले नाही. मोदींना हटवण्यासाठी मणिशंकर अय्यर पाकिस्तानात जाऊन त्या देशातील राजकारण्यांची मदत मागतात. भारतातल्या कलाकार लेखक वर्गाला पाकिस्तानी कलावंतांची इथे कदर करण्यात मोठी धन्यता वाटते. पण त्यांच्याच कलाकृती वा वाहिन्यांना पाकिस्तानातच बंदी घातली असताना, वेदना होत नाहीत. उलट इथे पाकिस्तानला उपयुक्त ठरणारी माहिती प्रसारीत केली, म्हणून बडगा उगारला की त्यांचे अविष्कार स्वातंत्र्य धोक्यात येत असते. त्यांना खुलेआम जिहादी असलेल्यांची वा धर्मांध मुस्लिम नेत्यांची भिती वाटत नाही. पण त्यांना संघाच्या कुठेही नसलेल्या व न दिसलेल्या धर्मांधतेच्या भितीने पछाडलेले असते. तिला संपवण्यासाठी त्यांनी जिहादींशी हातमिळवणी करण्यापर्यंत मजल मारलेली आहे. तसे नसते तर एनडीटीव्ही वाहिनीसाठी इथल्या संपादक पत्रकारांनी गळा काढला नसता. पण शेवटी इतिहासाची पुनरावृत्ती होतच असते. मोदी किती रोखू शकतात बघायचे.

5 comments:

  1. लेख छान च !! शेवट अस्वस्थ करणारा.....परन्तु भारतात अजूनतरी जनमत मोदी यान्च्यामागे आहे.....तोपर्यन्त तरी धोका नाहि इसे वाटते

    ReplyDelete
  2. सुंदरच भाऊ मस्त

    ReplyDelete
  3. yathochit Bhau!!! pothinisht davyanni kayam deshacha nuksan kelay

    ReplyDelete