Wednesday, November 16, 2016

शिवसेनेची पन्नाशी


bal thackeray के लिए चित्र परिणाम
१९ जुने १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना झाली आणि तीन महिन्यांनी तिचा पहिला विराट मेळावा शिवाजी पार्क येथे झाला. त्या मेळाव्यानंतर जी रणधुमाळी माजली, तिथून शिवसेना बातम्यांमध्ये आली. अन्यथा तीन महिने आधी या संघटनेची स्थापना झाली, तेव्हा तिचे नावनिशाण कुठल्या वर्तमानपत्रात वा माध्यमात झळकले नव्हते. ‘मार्मिक’ हे ठाकरे बंधूंचे व्यंगचित्र साप्ताहिक होते आणि त्यातूनच आधीच्या काळात सेनेविषयी माहिती प्रसिद्ध होत असायची. तशी संघटना असावी किंवा नाही, हा विषय त्यात दुय्यम होता. मोठे आंदोलन करून बिगरकॉग्रेसी पक्षांच्या एकजुटीने मराठी प्रांतासाठी लढा दिलेला होता. त्यात शिवसेनेचा कुठलाही सहभाग नव्हता. कारण त्या कालखंडात ही संघटना अस्तित्वात आलेली नव्हती. तर बिगरकॉग्रेसी विरोधी पक्ष व काही चळवळ्ये यांच्या पुढाकाराने तो भाषिक राज्याच्या मागणीचा लढा उभा राहिला होता. त्यात वैचारिक भूमिका गुंडाळून सगळे पक्ष सहभागी झाले होते. पण पंडित नेहरूंच्या दबावामुळे झुकलेल्या कॉग्रेसच्या मराठी नेत्यांना ती हिंमत दाखवता आलेली नव्हती. तरीही काही कॉग्रेसजन त्यात वेगळा गट करून सहभागी झालेले होते. तेव्हा बिगरकॉग्रेसी पक्ष आजच्यासारखे सशक्त नव्हते. नव्याने स्वातंत्र्य मिळालेले होते आणि कॉग्रेसमधूनच बाजूला झालेले अनेक वैचारिक गट नव्याने पक्ष म्हणून आपल्या पायावर उभे रहात होते. त्यांनी खुल्या मनाने कधी मराठी अभिमानाचा विषय मांडलेला नव्हता. पण राजकीय लाभावर डोळा ठेवून १९५५ नंतर ही मंडळी त्या लढ्यात उतरत गेली. त्याचे श्रेय प्रबोधनकार ठाकरे व आचार्य प्रल्हाद केशव अत्रे अशा लेखक पत्रकारांना द्यावे लागेल. त्यांनीच ही संयुक्त महाराष्ट्र समितीची मोट बांधली होती. त्या भावनात्मक आवाहनामुळे मराठी भाषिक त्या समितीमागे एकवटत गेला. तेव्हाच्या मुंबई राज्यातील मराठी प्रदेशात मग कॉग्रेसची धुळधाण उडाली आणि नेहरूंनाही शरणागती पत्करावी लागली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला. पण त्याचा मुहूर्त होण्याआधीच एक आव्हानात्मक राजकीय आघाडी झालेल्या समितीला तडे जाऊ लागले. त्यात सहभागी झालेल्या विविध बिगरकॉग्रेसी पक्षात आपापल्या राजकीय भूमिकांवरून खटके उडू लागले आणि समिती ढासळू लागली. त्याचे कारण समितीला मिळालेले राजकीय यश होते. समितीच्या नावाखाली जो मतदार प्रत्येक समितीवादी उमेदवाराला विजयी करून गेला होता, ते यश आपल्या पक्षाचे बळ समजून समितीमध्ये लठ्ठालठ्ठी सुरू झाली होती. मात्र वस्तुस्थिती भलतीच होती. जो मतदार मराठी अभिमानाने समितीच्या पाठीशी उभा ठाकला होता, तो त्यात सहभागी असलेल्या कुठल्याही एका पक्षाचा अनुयायी नव्हता. तो समितीचा मतदार पाठीराखा होता. पण त्याची जाणिव नसलेल्या नेते व पक्षांनी निवडणूकीतील यश आपले समजून समितीचे दायित्व झटकून टाकण्याचे पवित्रे घेतले. हे आचार्य अत्रे व प्रबोधनकारांचे दु:ख होते. त्यांनी या विविध पक्षांना समितीत एकत्र ठेवून कॉग्रेसला नव्या राज्यात एकमुखी पर्याय उभा करण्याचा आटापिटा चालविला होता. पण पक्ष व नेत्यांच्या अहंकारापुढे या दोन्ही दिग्गजांचे काही चालू शकले नाही. त्यामुळेच संयुक्त महाराष्ट्राची स्थापना होत असतानाच समिती मात्र विखुरली जात होती. पर्यायाने समितीच्या पाठीशी उभा राहिलेला मतदार व मराठी तरूण यांची निराशा होत गेली होती. त्याच वेदनेतून एक भूमिका उभी रहात गेली, तिला पुढल्या इतिहासात जगाने शिवसेना म्हणून ओळखले आहे.

त्या काळात आचार्य अत्रे यांचा दैनिक ‘मराठा’ हे मराठी अभिमानाचे प्रतिक व मुखपत्र होते. पण समितीत फ़ुट पडू लागली आणि निराशा व्यक्त करायलाही स्थान उरले नाही. त्याच दरम्यान प्रबोधनकारांचे दोन पुत्र व्यंगचित्रकार बाळ ठाकरे व श्रीकांत ठाकरे यांनी आपले स्वतंत्र साप्ताहिक सुरू करण्याचा निर्णय घेतला. ते साप्ताहिक दोन वर्षातच लोकप्रिय झाले. त्यात मराठी अस्मितेला चुचकारणारी ठाम भूमिका मांडली जाऊ लागली. कुठल्याही पक्ष वा विचारसरणीला ठाकरे बांधील नव्हते, म्हणूनच त्यांनी जी मराठी अस्मितेची तळी उचलून धरली, त्यामागे समितीचा तरूण कार्यकर्ता एकवटू लागला. प्रामुख्याने समिती फ़ुटण्याचे दुखणे मुंबईचे होते. कारण मुंबई वगळता उर्वरीत महाराष्ट्रात तेव्हा भाषिक वादाला कारण नव्हते. पण मुंबई मराठी राज्याची राजधानी असूनही इथले अनेक व्यवहार अमराठी लोकांच्या हाती होते. त्यात पुन्हा केंद्रीय, शासकीय ब बड्या कंपन्यांच्या रोजगारसंधी अमराठी बळकावतात, अशी एक धारणा होती. फ़ोनधारक तेव्हा सुखवस्तु मानला जायचा. अशा काळात मुंबईच्या जाडजुड फ़ोन डिरेक्टरीत पन्नास पाने केवळ शहा पटेल अशा आडनावांनी भरलेली. केंद्र सरकारच्या कचेर्‍या वा आस्थापनांमध्ये अमराठी नावे भरलेली. शिवाय मराठी भाषिकांची अवहेलना करण्याचेही प्रकार व्हायचे. त्याची चिड तरूणांमध्ये वाढत असताना, चुचकारण्याचे काम वास्तविक संयुक्त महाराष्ट्र समितीने करायचे होते. कारण तिच्याच भोवती हा मराठी तरूण एकावटला होता. पण त्याची वेदना बघण्याचेही भान नेत्यांना उरले नाही आणि आपापले राजकीय हट्ट पुर्ण करताना समिती विखरून गेली. पर्यायाने मराठीच्या न्याय्य हक्कासाठी लढायचे व्यासपीठही अस्तंगत झाले. ते काम कॉग्रेसकडून होणे शक्यच नव्हते. नेहरूंच्या ताटाखाली मांजर होऊन राहिलेल्या कॉग्रेसच्या मराठी नेत्यांकडून ती अपेक्षा बाळगणेही चुक होते. सहाजिकच राजकीय व सामाजिक क्षेत्रात मराठी अस्मितेची जपणुक करणारे नेतृत्व किंवा संघटना, यांच्यासाठी एक मोठी पोकळी तयार झाली. त्याला ‘मार्मिक’ साप्ताहिक वगळता कोणी चुचकारत नव्हता. कम्युनिस्टांच्या आहारी गेलेले आचार्य अत्रेही त्यासाठी काही करू शकले नाहीत. त्यामुळे मार्मिक हेच मराठी अस्मितेचे व्यासपीठ होत गेले. त्याचाच परिणाम पुढल्या दोनतीन वर्षात शिवसेनेच्या स्थापनेत झाला. आरंभी तक्रारी झाल्या. त्याला मार्मिकमधून आवाज मिळाला. पण पुढे काय, असा प्रश्न उभा राहिला आणि मोजक्या लोकांनी फ़क्त मराठी हितासाठी ठामपणे उभी राहिल अशा संघटनेला आकार देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १९६६ च्या जुन महिन्यात साध्या घरगुती समारंभात शिवसेना स्थापन झाली. तोच आजही सेनेचा वर्धापनदिन म्हणून साजरा होतो. पण व्यवहारात ती नुसती घोषणा होती. पुढे मुंबई ठाण्याच्या गल्लीबोळात बैठका सभा घेऊन कार्यकर्ते गोळा करण्यात आले, त्यांना भूमिका समजावण्यात आली आणि पहिल्या मोठा मेळाव्याची तयारी करण्यात आली. राजकारणापासून अलिप्त राहून मराठी माणसासाठी लढणारी संघटना, इतकेच त्या जमावाचे उद्दीष्ट होते. पण इतिहासाच्या मनात काही वेगळेच होते.

१९६६ च्या विजयादशमीच्या मुहूर्तावर सिमोलंघन करीत शिवसेनेने आपल्या शक्तीचे दर्शन जगाला घडवले. त्या पहिल्याच मेळाव्याला कोणीही मोठा मराठी नावाजलेला नेता वक्ता नसताना अफ़ाट गर्दी लोटली. वाजतगाजत मिरवणूका काढून तरूणांनी उत्साहाचे प्रदर्शन केले. तिथे मुंबईत जे अमराठी आक्रमण झाले आहे व दादागिरी चालते, त्यावर झोड उठवली गेली. त्याचा परिणाम सभा संपताच जाणवला. सभेहून परतणार्‍या जमावाने दाक्षिणात्य उडपी हॉटेलांना आपल्या हिंसेचे लक्ष्य बनवले. तिथून दाक्षिणात्य व शिवसेना यांच्यात हाणामारी सुरू झाली. त्यात केरळ तामिळनाडूच्या कम्युनिस्ट नेत्यांनी मुंबईचे दौरे करून तेल ओतले आणि दाक्षिणात्यांच्याच बरोबरीने डाव्यांशी शिवसेनेचा संघर्ष सुरू झाला. वास्तविक कम्युनिस्ट व डाव्यांचा तेव्हाचा प्रभाव मराठी वस्तीपुरता मर्यादित होता आणि मराठी मतांवरच हे पक्ष उभे होते. पण त्यांच्या अशा दाक्षिणात्य पक्षपातातून त्यांनीच आपले बालेकिल्ले ढासळून टाकले. अर्थात शिवसेना राजकारणात नव्हती, की निवडणूकीतली प्रतिस्पर्धी नव्हती. म्ह्णून तर सेनेची लोकप्रियता अनेकांनी आरंभी वापरून घेतली. वर्षभरात आलेल्या सार्वत्रिक निवडणूकीत सेनेने कुठे समाजवादी तर कुठे कॉग्रेस उमेदवारांना पाठींबा दिला, पण झाडून डाव्या समिती उमे़दवारांना कडाडून विरोध केला. तरीही फ़र्नांडीस डांगे असे डावे लोकसभेत निवडून आले. अनेक जागी समितीचे आमदारही विजयी झाले. मात्र त्यातून सेनेला आपल्या विस्कळीत दिसणार्‍या संघटनेची शक्ती उमजलेली होती. म्हणूनच दिड वर्षातच आलेल्या नगरपालिका मतदानात सेनेने उडी घेतली. तेव्हा शिवसेना फ़क्त मुंबई परिसरातच गाजत होती. मुंबई पलिकडे पुणे नाशिकातही सेनेचा कुठलाही प्रभाव नव्हता. कल्याण व ठाणे नगरपालिकात सेनेने यश मिळवले, तर ठाण्यात सेनेचा उमेदवार नगराध्यक्ष म्हणूनही सत्तेवर येऊन बसला. मात्र ह्या दणदणित आरंभानंतरही शिवसेनेला मुंबई पलिकडे कधी आपला जम बसवता आला नाही. कारण स्पष्ट होते. मराठी अभिमान, अस्मिता वा न्याय्य हक्काची गरज मुंबईला जितकी होती, तितकी उर्वरीत महाराष्ट्रातली ती समस्या नव्हती. म्हणूनच १९६६ पासून १९८७ उजाडेपर्यंत शिवसेनेला उर्वरीत महाराष्ट्रात आपले पाय रोवता आले नाहीत, की बस्तान बसवता आले नाही. प्रादेशिक पक्ष म्हणूनही मान्यता मिळवता येणे सेनेला शक्य झाले नाही. अशी शिवसेना पुढल्या आठ वर्षात थेट आपला मुख्यमंत्री राज्यात आणू शकली, किंवा कायम महाराष्ट्रातला मुख्य प्रादेशिक पक्ष बनून गेली, ही बाब लक्षणिय आहे. ज्या पक्षाकडे कुठलीही राजकीय विचारसरणी वा तत्वज्ञान नाही, अशी संघटना आज राज्यव्यापी पक्ष बनली आहे. पन्नास वर्षे उलटून गेल्यावर सुद्धा टिकून ठामपणे उभी राहिली आहे. तिचे योग्य मुल्यमापन तेव्हा झाले नाही, की आजही होताना दिसत नाही.

याच प्रदिर्घ कालावधीमध्ये अनेक राजकीय उलथपालथी झाल्या. अनेक पक्ष संघटना स्थापन झाल्या व अस्तंगतही होऊन गेल्या. सेनेच्या स्थापना कळात महाराष्ट्रात जे राजकीय प्रवाह जोरात वहात होते आणि प्रभावशाली होते, ते कालौघात कुठे लुप्त झाले त्याचीही दादफ़िर्याद आज घेतली जात नाही. खरे म्हणजे ह्या अर्धशतकात जी राजकीय उलथापालथ महाराष्ट्राने बघितली, त्याचे वास्त्ववादी विश्लेषण कधीच झाले नाही. आपापले पुर्वग्रह आणि समजुतींच्या निकषावर त्याचे अर्थ लावले गेले. पण सत्यशोधनाचा प्रयासच झाला नाही. म्हणून मग कधी हिंदूत्वामुळे शिवसेना वाढली टिकली अशी टिका झाली; तर कधी मराठीची अस्मिता सेनेने सोडल्याची टवाळी झाली. पण कधीही वास्तविक उहापोह होऊ शकला नाही. शिवसेना ही झुंडशाही आहे असे म्हटले गेले. खंडणीखोर असेही आरोप झाले. पण अशी संघटना लोकांनी इतकी वर्षे उचलून कशाला धरली? पुढल्या काळात तिला राज्यव्यापी पक्ष होण्यापर्यंत कशामुळे मजल मारता आली? याकडे अभ्यासकांनी कधी डोळसपणेही बघितले नाही. उलट आपल्या ठरलेल्या ठाशीव मतांच्या आधारे निष्कर्ष काढत नुसती नाके मुरडली आहेत. या अर्धशतकात हळुहळू सगळेच पक्ष व राजकारण शिवसेनेच्या वाटेने जाऊ लागले ही वस्तुस्थिती आहे. ज्या सेनेच्या कार्यशैलीची कायम टिंगल होत राहिली, तिचेच अनुकरण अन्य पक्षांनी केलेले दिसून येईल. सेनेमुळे विभाग वॉर्ड शाखा अशा स्थानिक पातळीपर्यंत पक्षाची संघटना येत गेली. इवली जागा असेल तिथे शाखा व शाखेचे फ़लक. वेळोवेळी लोकांना शुभेच्छा देण्याची शैली नाक्यानाक्यावर पक्षाचे झेंडे फ़डकावणे, ही १९६०-७० साली नवलाई होती. तेव्हा कुठल्याही नाक्यावर शिवसेनेच्या शाखेचे फ़लक दिसत. त्यावर सुचना वा बातम्याही लिहीलेल्या असायच्या. सेनेचे मेळावे, जाहिरसभा, विविध कार्यक्रमांचा प्रचार अशा फ़लकावरून चालायचा. ही पद्धत त्यापुर्वी कुठल्या पक्षाने अंगिकारलेली नव्हती. पण आज ती सार्वत्रिक झाली आहे. मात्र इतके करूनही सेनेला पुढल्या पंचवीस वर्षात आपला राजकीय प्रभाव मुंबईतही दाखवता आलेला नव्हता.

१९६६ पासून १९८९ पर्यंत शिवसेनेला आपला राजकारणातील प्रभाव मुंबईतही दाखवता आला नव्हता. किंबहूना मुंबईकर मराठी माणुसही सेनेकडे राजकीय पर्याय म्हणून बघत नव्हता. तर मराठी अस्मितेचा राखणदार आणि स्थानिक विषय सोडवू शकणारा कार्यकर्ता, अशीच सेनेविषयीची प्रतिमा होती. याचे प्रमुख कारण सेनेत तरूणांचा भरणा होता आणि राजकीय आर्थिक गुंतागुंतीचे विषय सेनेच्या आवाक्यातले नाहीत, असे तिचा पाठीराखा मतदारही मानत होता. म्हणूनच १९७० सालात पोटनिवडणूक जिंकून सेनेचा पहिला आमदार वामनराव महाडिकांच्या रुपाने विधानसभेत पोहोचला, तरी सेनेला पुढल्या अनेक निवडणूकात राजकीय यश मिळू शकले नाही. पण त्याच दरम्यानच्या बहुतांश पालिका निवडणूकात सेनेला मोजके पण लक्षणिय यश मिळत राहिले. आपल्या भागातली तरूण कार्यकर्त्यांची फ़ौज कार्यरत रहावी आणि कृतीशील रहावी अशी काळजी मुंबईकर घेत राहिला. कारण सेनेपेक्षाही प्रभावी ठरू शकतील असे पर्याय कॉग्रेस व अन्य विरोधी पक्षात नेतृत्व करायला समर्थ होते. ती कोंडी तब्बल दोन दशकांनंतर फ़ुटली. शरद पवार यांनी अणिबाणीनंतर कॉग्रेस सोडून विरोधकांचे नेतृत्व पत्करले आणि त्यांच्या प्रभावाखाली पारंपारिक विरोधी राजकीय पक्ष आपली ओळख गमावत गेले. पवारांचा पुलोदचा प्रयोग या प्रस्थापित बिगरकॉग्रेसी पक्षांच्या अस्ताला कारणीभूत झाला. आपले विचार, भूमिका व संघटनांचे स्वतंत्र अस्तित्वच हे पक्ष पुरते विसरून गेले. अपवाद फ़क्त भाजपाचा होता. भाजपा पुलोदशी तडजोडी करीत राहिला तरी त्याने आपले वेगळे अस्तित्व जपलेले होते. त्यामुळेच १९८६ अखेरीस महाराष्ट्राच्या राजकारणात कॉग्रेस विरोधी राजकारणाचा चेहरा असलेले शरद पवार आपला पक्ष विसर्जित करून कॉग्रेसमध्ये गेले आणि बहुतांश पारंपारिक विरोधी पक्षांची अनाथ बालकासारखी दुर्दशा होऊन गेली. त्यांना आपले भवितव्य कळत नव्हते की काय करायचे तेही सुचत नव्हते. पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात १९६० च्या दशकातील मुंबईकर मराठी तरूणांसारखी स्थिती आली? प्रामुख्याने कॉग्रेसविरोधी मतांवर किंवा भूमिकेवर ज्यांचा पिंड पोसलेला होता, असे कार्यकर्ते, तरूण व मतदार पवारांच्या जागी अन्य नेतृत्वाचा पर्याय शोधू लागले होते. त्यांच्यासमोर तो पर्याय ठेवण्यात शेकाप, जनता दल वा कम्युनिस्ट यांच्यासहीत भाजपाही अपेशी ठरला. तिथून शिवसेना राज्यव्यापी पक्ष होत गेली. पवारांचे कॉग्रेसमध्ये परत जाणे आणि शिवसेनेने मुंबई स्वबळावर जिंकून राज्यात घोददौड सुरू करण्याची डरकाळी फ़ोडणे; या समकालीन घटना आहेत. त्यावेळी सेना महाराष्ट्रात जाण्यापेक्षा महाराष्ट्र सेनेत येण्याची प्रक्रिया सुरू झालेली होती. कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र वा अन्य भागातून बिगरकॉग्रेसी राजकारणाने भारावलेले तरूण मुंबईत शिवसेना भवनाच्या पायर्‍या झिजवू लागले होते. किंबहूना त्याची साक्ष वर्ष दिड वर्षातच मिळाली.

मुंबईत पार्ला येथील विधानसभेची पोटनिवडणूक शिवसेनेने अमराठी बहुसंख्य असूनही स्वबळावर आणि हिंदूत्वाच्या विषयावर लढवली. त्यात भाजपाही सेनेच्या विरोधात होता. तरीही सेनेचे डॉ. रमेश प्रभू यांनी बाजी मारली आणि कॉग्रेसला नव्याने विचार करणे भाग पाडले. मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी पार्ल्याची लढत व्यक्तीगत प्रतिष्ठेची बनवली होती आणि त्यातच त्यांचे मुख्यमंत्रीपद गेले. कारण या निवडणूकीच्या निकालाने सेनेचा राज्यव्यापी प्रभाव नजरेत आला होता. शिवसेनेचे नवे आव्हान स्विकारण्यासाठी शरद पवार यांना सेनापती करण्याचा निर्णय राजीव गांधी यांना करावा लागला. मात्र काम सोपे नव्हते. कारण पाठोपाठ औरंगाबाद या मराठवाड्याच्या मोक्याच्या महापालिका लढतीमध्ये एकट्याने उतरलेल्या शिवसेनेने मुसंडी मारली. तिथून राज्यातील समिकरणे बदलू लागली. शिवसेना राज्यव्यापी पक्ष होत असल्याची ती कबुली होती. कॉग्रेसने आपली धुरा पवारांकडे सोपवली, तर भाजपाने गांधीवादी समाजवादाची कास सोडून हिंदूत्वाच्या तत्वावर शिवसेनेशी राज्यव्यापी युती करून टाकली. त्याचा लाभही भाजपाला मिळाला. पुलोदममध्ये जागावाटप करूनही २० आमदारांची मजल कधी न मारलेल्या भाजपाला युतीमुळे ४४ आमदार निवडून आणता आले. दहा खासदारही लोकसभेत विजयी झाले. तर पाव शतक ओलांडल्यावर सेनेला विधानसभेत आपली छाप पाडता आली. मात्र त्याचे श्रेय हिंदूत्व किंवा बाळासाहेबांच्या नेतृत्वाला देण्याचीच स्पर्धा चालते. प्रत्यक्षात प्रस्थापित बिगरकॉग्रेसी पक्षांनी आपली प्रसंगोपात भूमिका पार पाडली असती आणि शरद पवारांनी या पक्षांना दगा दिला नसता, तर त्याही काळात शिवसेनेला महाराष्ट्रव्यापी पक्ष होणे सोपे ठरले नसते. इतरांनी आपापला राजकीय अवकाश सेनेला मोकळा करून दिला नसता, तर सेनेला इतक्या सहज मोठी मजल मारता आली नसती. मुंबईची आणि बाकीच्या महाराष्ट्राची शिवसेना यात जमिन अस्मानाचा फ़रक आहे. आजही मुंबईची शिवसेना स्थानिक गरज आहे. तशी ग्रामिण उर्वरीत महाराष्ट्रातील शिवसेना होऊ शकलेली नाही. मुंबईच्या कुठल्याही भाषिकासाठी आपल्या गल्ली मोहल्ल्यातील सेनेची शाखा ही तात्काळ मदतकेंद्र असल्यासारखी सुविधा आहे. बाकीच्या महाराष्ट्रात तसे संघटन शिवसेनेला अजून उभारता आलेले नाही. पण अन्य पक्षांनी गुंडाळलेला कारभार सेनेच्या पथ्यावर पडून, तो राज्यव्यापी पक्ष होऊन गेला. त्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांची विराट प्रतिमा कारण झाली हे नाकारता येणार नाही. अत्रे, डांगे, एसेम अशा एकाहून एक मोठ्या राजकीय व्यक्तीमत्वांच्या तुलनेत बाळासाहेबांची उंची खुप कमी आहे. पण त्या मोठ्या नेत्यांनी कधी सत्तापालटाचा विषय जनतेपुढे मांडलाच नव्हता. बाळासाहेबांनी सत्तापालट मागितलाच, पण उत्तम राजकीय पर्यायाची हमीही मतदाराला देऊ केली. त्याचा लाभ सेनेला झाला. शिवाय सेनेच्या संघटनात्मक रुपाचे विश्लेषणही अगत्याचे ठरावे. एकहाती बाळासाहेब हे संघटन मुठीत कसे ठेऊ शकले?

मुंबई ठाण्याच्या परिसरात जन्मलेली व वाढलेली शिवसेना, १९८५ नंतर राज्यव्यापी पक्ष व्हायला निघाली तेव्हा तिच्यापाशी ग्रामिण म्हणावा असा एकही चेहरा नव्हता. भुजबळ ग्रामिण भागावर प्रभाव पाडू शकणारे व्यक्तीमत्व असले तरी ग्रामीण मुशीतून आलेला कोणीही नेता सेनेपाशी नव्हता. सगळेच्या सगळे नेते मुंबईकर शहरी होते. पण त्यांना ग्रामिण नेतृत्व देण्यापेक्षा बाळासाहेबांनी ग्रामीण नवोदितांचेच नेतृत्व घडवण्याचा संकल्प केला. त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारे मुंबईतून नेमलेले संपर्कप्रमुख ही गंमत होती. जिल्हा तालुका अशा प्रत्येक पातळीवर संपर्कप्रमुख मुंबईचा असायचा. हे मुंबईकर शिवसैनिक बाळासाहेबांची खरी ताकद होती. त्यांच्या मार्फ़त त्यांनी राज्यव्यापी पक्षाच्या संघटनेवर कायम प्रभूत्व राखले. मात्र सत्तेबाहेर असतानाची संघटना व सत्तेपर्यंत पोहोचलेली संघटना यात फ़रक असतो. सत्ता आळशी व चैनबाज बनवते. सत्तेत अनेक मोहांचे बळी व्हावे लागते. सेनेचे नेते व निवडून आलेल्या कनिष्ठ नेत्यांना त्याची बाधा झाल्यास नवल नव्हते. पण स्वत: कुठल्याही सत्तापदाच्या मोहापासून दूर राहिलेल्या बाळासाहेबांनी सत्तापदाने मुजोर होण्याला कधी मोकळीक दिली नाही. अनेकदा तर सरकार वा पालिकेच्या कारभारातही त्यांनी फ़ारसे लक्ष घातले नाही. किंबहूना आपल्या सहकार्‍यांना तशी मोकळीक देऊन त्यांच्या स्पर्धेपासून बाळासाहेब दूर राहिले. निवडून आलेल्या व सत्ताधीश सहकार्‍यांपेक्षा त्यांनी नुसते कार्यकर्ते व संघटनात्मक पदाधिकार्‍यांना अधिक प्रोत्साहन दिले. त्यातून मुंबईवर आपला वरचष्मा ठेवता आला आणि पर्यायाने संपुर्ण महाराष्ट्रभर पसरलेल्या संघटनेवर त्यांचे नियंत्रण राहिले. आरंभीच्या काळात सेनेतून बहेर पडण्याची भिती बाळगली जाई. कारण भावनाविवश शिवसैनिक त्याला गद्दारी समजून अंगावर जात. पुढल्या काळात आमदार नगरसेवक अशा अनेकांनी सेना सोडली म्हणून काही फ़रक पडला नाही. सत्ता आली गेली, तरी मुंबईवर सेनेची हुकूमत राहिली. मात्र बाळासाहेबांनंतर कोण व सेनेचे भवितव्य काय, अशी चर्चा होत राहिली. असे प्रश्न प्रत्येक संघटना वा राजकीय पक्षाच्या बाबतीत विचारले जातातच. पण शिवसेना त्यातला अपवाद आहे. बाळासाहेब हयात नाहीत. पण म्हणून मुंबईकराची शिवसेना नावाची गरज संपलेली नाही. शिवसेना ही आमदार खासदार वा नगरसेवक, मतांची टक्केवारी यात मोजण्याची गोष्ट नाही. शिवसेना ही गल्लीबोळातल्या गजबजलेल्या शाखा व क्षणार्धात रस्त्यावर उतरणारा तरूणांचा जत्था, अशा मापाने मोजण्याची बाब आहे. त्याच्या परिणामी बाळासाहेबांच्या अफ़ाट व्यक्तीमत्वाने शिवसेना जशी झाकोळलेली होती, तसेच अन्य नेतेही खुप खुजे व नगण्य ठरलेले होते. पण शिवसेना म्हणजे सत्तापदामध्ये वाटली गेलेली संघटना नव्हे. शिवसेना ही मुंबईकर आणि प्रामुख्याने इथल्या मराठी माणसाची गरज आहे. तिच्या स्थापनेला बाळासाहेब जितके जबाबदार होते, तितकीच मुंबईची गरजही कारणीभूत होती. आज त्यातले आमदार वगैरे निवडून येतात. सत्ता मिळते. पण ती मिळवणारी संघटना हे सेनेचे खरे रुप नाही. ते स्वरूप म्हणजे आज दिसणारा शिवसेना नावाचा राजकीय पक्ष होय. पण त्यापासून दुर राहून आपापल्या परिसरात विविध उपक्रम चालवणारा, कुठल्याही प्रसंगी धावून येणारा आणि अन्यायाची दाद मागायला येणार्‍यांसाठी सज्ज असणारा तरूण, ही खरी शिवसेना आहे. त्याला पावती फ़ाडून सदस्य होण्याची गरज नसते किंवा कुठले तरी पद उपपद पक्षप्रमुखाने देण्याची अपेक्षा नसते. आपल्यापाशी सवड आहे, अंगात काहीतरी करण्याची उर्मी आहे आणि धिंगाणा करण्याची मस्तीही आहे, असा तरूण आपोआप सेनेत दाखल होत असतो.

‘मार्मिक’चा कार्यकारी संपादक म्हणून काम करत असताना बाळासाहेबांशी अनेक गोष्टी तपशीलात बोलता आल्या, समजून घेता आल्या. त्यांनीच शिवसैनिक व शिवसेना नावाच्या पक्षातला हा भेद सहज उलगडून सांगितला होता. अन्य पक्ष संघटनांप्रमाणे शिवसेनेत अभ्यासवर्ग, सेमिनार वा शिबीरातून कार्यकर्ता घडवला जात नाही. ज्या मराठी तरूणामध्ये वयाच्या तेरा चौदाव्या वर्षी मस्ती धुमसू लागते, तो आपोआप शिवसैनिक होतो. त्याला अन्य कुठल्या पक्ष संघटनेत वाव नाही, मग असा तरूण दगड मारायला उतावळा असू शकतो, किंवा नुसत्या विधायक कामासाठी वाहून घ्यायला सज्ज असतो. चर्चा, वादावादी किंवा पोपटपंची करण्याखेरीज कृती करण्यासाठी त्याला संधी हवी असते. त्याला कुठल्या विचार भूमिका वा तत्वज्ञानाशी कर्तव्य नसते. अशा तरूणाला ती संधी शिवसेनेत मिळते. बदल्यात त्याला पद वा किंमतही नको असते. तो शिवसैनिक होतो आणि प्रत्येक पिढीत असे तरूण शिवसेनेत दाखल होत गेले. त्यांच्यातल्या झुंजारवृत्तीला प्रोत्साहन देऊन त्यांना कार्यरत ठेवण्याचे प्रयास बाळासाहेबांनी केले. ज्यांना ही शिवसेना समजून घेता येईल, त्यांनाच सेनेचे भवितव्य उमजू शकते. कुठलाही कार्यक्रम, भूमिका वा विचारसरणी नसताना ही राजकीय सामाजिक संघटना इतका दिर्घकाळ कशाला टिकून राहिली, त्याचे उत्तर बाळासाहेबांच्या शब्दात शोधता आले पाहिजे. तरच बाळासाहेब निवर्तले असतानाही शिवसेना अजून का भरभराटली आहे, त्याचे उत्तर मिळू शकेल. कारण बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली नाही. ती संघटना नाही, तर ती एक मनोवृत्ती आहे. संयुक्त महाराष्ट्र समिती म्हणून तिने पहिला अवतार घेतला. त्याचे विसर्जन राजकीय पक्षांनी केल्यावर त्याच मानसिकतेने शिवसेना असा आकार धारण केला. साहेबांनी तिची जोपासना केली. त्यांच्यामागे तिची जोपासना किती होईल ते काळच ठरविल. पण तिला मरण नाही, तिला शेवट नाही. कारण तो पक्ष नाही की संघटना नाही, ती मानसिकता आहे. जोवर मराठी मुले जन्माला येणार आहेत आणि वयात येऊन धुमसणार आहेत, तोवर शिवसेना अबाधितच राहिल.

10 comments:

 1. छानच भाऊ सुंदर,मुंबईचे माहित नाही पण आज फुटलेल्या ममतेच्या पाझराने उर्वरीत महाराष्ट्रात सगळेच सेनेवर नाराज आहेत आगदी सामान्य शिवसैनिकही. स्वर्गीय बाळासाहेब असते तर त्यांनी नक्की मोदीजींना पाठिंबा दिला असता

  ReplyDelete
  Replies
  1. कुलकर्णी नाराज फक्त नमोभक्त आहेत . कारण त्यांनी वास्तवाशी फारकत घेतलीय .

   Delete
  2. सेनेने वेगळी भूमिका घेतली म्हणून नाही तर चोरांच्या गळ्यात गळे घातले म्हणून शिवसैनिक नाराज आहेत

   Delete
 2. bhau he kharach aahe.....khup chhan vishleshan aahe.

  ReplyDelete
 3. लेख छान !!...पण बाळासाहेबान्च्या नसण्याने...त्यान्च्या वक्त्रुत्वाची जाणवणारी उणीव , बाळासाहेबान्ची धक्कातन्त्राची झालेली सवय...यागोष्टी ठाकरे घराण्यातील पुढील पिढीत अस्तित्वातच नाहीत.....त्यामुळे त्या सन्घटनेचा भविष्यकाळ ???

  ReplyDelete
 4. घराणेशाहीवर कडाडून टीका करताना स्वतःच्याच मुलाकडे आणि भविष्यात नातवाकडे वारशाबरोबर कार्याध्यक्ष कसे गेले याचा पण ऊहापोह निष्पक्षपणे केलात तर बरे होईल.

  ReplyDelete
 5. भाऊ जसा सेने मुळे भाजपाचा फायदा झाला तसा भाजपा मुळे सेनेचाही जास्तच फायदा झालेला आहे ,युती करायच्या आगोदर भाजपाचे आमदार सेन् पेक्षा जास्तच होते व अत्ताही युती तुटल्यावर भाजपाच् आमदार जास्तच आहेत , सेना मणजे घरानेशाही ,संधीसाधु लोकांची टोळी ,खंडणी खोर लोकांची जमात , वेळ प्रसंगी याच शेनेने मुस्लिम लिग बरोबरही घरोबा केलेला होता , यांनी सुरूवातीला कॉंग्रेसलाही जाहिर समर्थन दिल्ले होते , आज शरज पवारांच्या नावाने नाक मुरडणार्यांनी पंतप्रधान पदासाठू त्यंाना समर्थन दिलेल् होते

  ReplyDelete
 6. खूपच सुंदर विश्लेषण भाऊ ....कुठल्याही पक्षाशी युती असो वा नसो. ...उर्वरित महाराष्ट्रात लोक नाराज असो वा नसो.... जो पर्यंत हि मानसिकता कायम आहे तो पर्यंत ह्या संघटनेला मरण नाही हेच खरे आहे.

  ReplyDelete
 7. पाकिस्तानातील जनतेला तेथील सरकारी यंत्रणा भारत आपल्यावर हल्ला करेल म्हणून जशी घाबरू ठेवते तशीच सेनेची सवय आहे मराठी माणसाला मुबईत अमराठी च्या नावानी घाबरव्हायचे. मुंबई च्या आर्थिक नाड्या या परप्रांतीयांच्या ताब्यात आहेत हे वास्तव आहे आणि मराठी माणसाचा आवाज हा फक्त घोषणेत राहिला आहे..

  ReplyDelete