शनिवारी इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दीचा सोहळा कॉग्रेस पक्षाच्या वतीने साजरा करण्याला प्रारंभ झाला. देशाच्या माजी अत्यंत धाडसी पंतप्रधान अशी इंदिराजींची ओळख आहे. हे वर्ष त्यांच्या शताब्दीचे म्हणून साजरे करण्याचा पक्षाचा प्रयास असणार आहे. त्याच निमीत्ताने राष्ट्रपती प्रणबदा मुखर्जी यांना समारंभाचे आमंत्रण देण्यात आलेले होते. ते निव्वळ आमंत्रण नव्हते तर त्यांचेही बहुमोल भाषण योजण्यात आलेले होते. याला आजच्या संदर्भात मोठे महत्व आहे. कारण आजच्या नव्या कॉग्रेसमध्ये इंदिराजींच्या समवेत दिर्घकाळ अतिशय जवळून काम केलेला तोच एक नेता आज उपलब्ध आहे. त्यांनी आपल्या राजकीय जीवनाचे धडेच मुळात इंदिराजींकडून गिरवले असे म्हणायला हरकत नाही. या निमीत्ताने योजलेल्या कार्यक्रमात कॉग्रेसच्या विद्यमान अध्यक्षा सोनिया गांधी व्यासपीठावर होत्या आणि त्यांनी आपण इंदिराजींकडून जीवनाचे धडे घेतल्याची कबुली यावेळी दिली. पण जे धडे इंदिराजींनी दिले असे सोनियांना म्हणायचे आहे, त्यापेक्षा प्रणबदा त्यातून काय शिकले याला प्राधान्य आहे. त्याचीच आठवण त्यांनी आजच्या संदर्भात करून दिली. कारण आज कॉग्रेस सत्तेपासून दूर फ़ेकली गेली असून, पुन्हा आपले स्थान शोधण्यासाठी हा पक्ष धडपडतो आहे. अशावेळी प्रणबदांनी १९७७ च्या सुमारास इंदिराजींनी कसे राजकारण केले, किंवा १९६९ च्या सुमारास कॉग्रेस पक्षातच उलथापालथ चालू असताना इंदिराजी कशा राजकारण खेळल्या, त्याचा उलगडा राष्ट्रपतींनी यावेळी करून दाखवला. मात्र त्याची कितीशी दखल आजचे राजकीय अभ्यासक वा कॉग्रेसजन घेतात, हा संशोधनाचा विषय असेल. खरे तर तोच धडा शिकण्याची गरज आहे. मात्र तसे होण्याची शक्यता फ़ार कमी आहे. त्याची प्रचिती नित्यनेमाने कॉग्रेसच्या राहुलप्रणित राजकारणातून येत आहे. बहुधा त्यामुळेच प्रणबदांनी जाहिरपणे काही खडे बोल ऐकवलेले असावेत.
१९७७ सालात आणिबाणीनंतर झालेल्या निवडणूकीत कॉग्रेस पक्षाचा दारूण पराभव झाला होता आणि त्याची जबाबदारी अन्य कशावर तरी ढकलून इंदिराजींनी पळ काढला नव्हता. त्यांनी बरेवाईट जे काही घडले, त्याची संपुर्ण जबाबदारी स्वत:कडे घेतली होती, याचे स्मरण प्रणबदांनी यावेळी बोलताना करून दिले. त्याचा अर्थ असा, की जनता लाटेत कॉग्रेस पराभूत झाली, त्याला इंदिराविरोधी प्रचार व अपप्रचार कारणीभूत झाला होताच. पण अशा अपप्रचार वा अफ़वांना आणिबाणीत्ल्या अनेक घटनाही कारणीभूत होत्या. त्याची जबाबदारी अर्थातच इंदिराजींना नाकारता येत नव्हती. विरोधकांनी काहुर माजवले तरी त्यासाठी त्यांच्या हातात कोलित देण्याचे काम सत्ताधारी पक्षाकडूनच होत असते. इंदिराजींनी ते कोलित देण्याची आपली चुक मान्य केली होती. ते पाप त्यांनी दुसर्याच्या माथी मारून पळ काढला नाही. थोडक्यात आज कॉग्रेसची जी दारूण परिस्थिती आहे, त्याला सर्वस्वी मोदी वा भाजपाने केलेला विरोधी प्रचार कारण नसून, आधीच्या युपीए सरकारचे काही चुकीचे निर्णय आणि कारभारही जबाबदार आहे. त्याची जबाबदारी त्या कारभाराचे सुत्रधार असलेल्या नेतृत्वाने घ्यायला हवी. ती जबाबदारी सोनिया किंवा राहुल गांधींसह त्यांच्या निकटवर्ति कुणा नेत्याने घेतली नाही. मोदींनी भुलभुलैया उभा करून विजय मिळवला, असा कांगावा कायम केला जात राहिला. पण आपल्या पराभवाला आपणही जबाबदार आहोत, हे सत्य कॉग्रेसचे नेते व श्रेष्ठी अजून स्विकारू शकलेले नाहीत. याकडे प्रणबदांनी लक्ष वेधलेले आहे. एकीकडे जवाबदारी नाकारणे आणि दुसरीकडे प्रतिकुल काळात योग्य पावले उचलणेही नव्या नेतृत्वाला शक्य झालेले नाही. त्याच दुखण्यावर बोट ठेवण्यासाठी प्रणबदांनी पराभवातून इंदिराजी कशा सावरल्या आणि प्रतिकुल काळात त्यांनी कशी वाटचाल केली, त्याचे स्मरण करून दिले.
१९६९ सालात पक्षातच उलथापालथ चालू असताना पक्षश्रेष्ठी म्हणून काम करणार्या नेत्यांनी पंतप्रधानपदी बसलेल्या इंदिराजींना शह देण्यासाठी राष्ट्रपती पदाचा वापर करण्याचा डाव खेळला होता. पंतप्रधानाच्या पायात बेडी टाकण्यासाठीच कॉग्रेसश्रेष्ठींनी संजीव रेड्डी या तुलनेने तरूण वयाच्या व्यक्तीला राष्ट्रपती पदाचा उमेदवार म्हणून पुढे केलेले होते. अशा वयातला नेता निव्वळ शोभेचे पद कशाला स्विकारणार? त्याचा अर्थच रेड्डींना राष्ट्रपती भवनात आणून, इंदिराजींच्या अधिकाराला वेसण घालण्याचा डाव श्रेष्ठींनी आखलेला होता. पण संसदीय लोकशाहीत पंतप्रधान हाच लोकांचा खरा प्रतिनिधी असतो आणि त्याची अडवणूक होता कामा नये, असेच तेव्हा इंदिराजींचे मत होते. म्हणून त्यांनी संजीव रेड्डी यांना पाठींबा देण्याचे नाकारून, पक्ष नेतृत्वाला आव्हान उभे केले होते. गिरी यांना अपक्ष म्हणून मैदानात आणून रेड्डी यांच्या पराभवाची सज्जता केलेली होती. यातला एक अर्थ असा, की आज सतत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोंडी करण्याचे व त्यासाठी घटनात्मक अडथळे आणण्याचे डावपेच कॉग्रेस खेळत आहे. ते नकारात्मक राजकारण असून इंदिराजींच्या भूमिकेला छेद देणारे आहे, असेच प्रणबदांना सुचवायचे आहे. पण तिथेच विषय संपत नाही. अशाच स्थितीत तेव्हा इंदिराजी होत्या आणि त्यांनी चुका मान्य करतानाही आपल्या कामाविषयी शरमेने मान खाली घालण्याचे नाकारले होते, त्याकडेही लक्ष वेधलेले आहे. विरोधात बसलेल्या पक्षाला जनतेचे प्रश्न घेऊन सत्ताधार्यांना कोंडीत पकडायचे असते. नुसती सत्तेची अडवणूक करायची नसते. गोंधळ घालून कोंडी होते, पण त्यातून राजकीय प्रभाव निर्माण करता येत नाही. सत्ताधार्यांना चुका करायला भाग पाडणे आणि त्याचा लाभ उठवणे, ही इंदिराजींची शैली होती. सत्ताधार्यांच्या प्रत्येक कृतीत इंदिराजी चुका शोधत बसल्या नव्हता, ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे.
पहिली गोष्ट म्हणजे एकाच पक्षाच्या बळावर सत्ता राबवलेल्या इंदिराजींना पक्षांतर्गत असणारे बेबनाव कळत होते. त्यामुळेच चार पक्षांची खिचडी म्हणून जन्मलेल्या जनता पक्षातले अंतर्विरोध उफ़ाळण्यास त्यांना मोकाट रान मिळण्याची गरज त्यांनी ओळखली होती. जोवर इंदिराविरोधाची धार पक्की आहे, तोवर जनता पक्ष फ़ुटण्याची शक्यता नाही. म्हणूनच इंदिराजींनी जनता सरकारला आपल्यापासून धोका नसल्याची ग्वाही देऊन टाकली होती. पाच वर्षे हे सरकार चालणार असे, इंदिराजींनी खुले सांगून टाकले आणि जनता पक्षाला कमालीचा आत्मविश्वास वाटू लागला. त्यातून त्याच पक्षात एकत्र आलेल्या विविध भिन्न मतांच्या गटांमध्ये आपापसात भांडणाला ऊत येत गेला. त्याचा लाभ उठवत आणि त्यापैकी काही नेत्यांच्या महत्वाकांक्षांना खतपाणी घालत, इंदिराजींनी अडीच वर्षात जनता पक्षाला धुळीस मिळवले होते. पण तसे करताना त्यांनी जनतेने आपल्या नेतृत्वाकडेच पुन्हा अपेक्षेने बघावे, अशाही हालचाली चतुराईने केल्या होत्या. त्यात कुठेही नकारात्मकता नव्हती. जनता सरकार पाडण्याचा वा त्याचे कामकाज ठप्प करण्याचा कुठलाही प्रयास इंदिराजींनी केला नव्हता. ज्याचा संपुर्ण अभाव आजच्या सोनिया व राहुल नेतृत्वामध्ये दिसतो, असेच प्रणबदांना सांगायचे आहे. असे ते तोंडावर त्या दोघांना सांगू शकत नव्हते. शक्य असते तर केंद्रीय मंत्रिमंडळात असतानाच त्यांनी त्या दोघांचे कान उपटले असते व पुढे कॉग्रेसची इतकी दाणादाण उडाली नसती. पण तेव्हा किंवा आजही सत्य ऐकण्याच्या मनस्थितीत राहुल-सोनिया नाहीत, म्हणून प्रणबदांना असे जाहिरपणे सांगावे लागलेले आहे. पण त्यातला धडा घेण्याइतके तेच दोघे व त्यांचे समर्थक शुद्धीत असले, तर त्याचा उपयोग आहे. ज्या पक्षात आयुष्य घालवले त्याविषयीच आपुलकी असल्याने, या जाणत्याने सल्ला दिला आहे. पण लक्षात कोण घेतो?
सुंदर भाऊ
ReplyDelete