Monday, November 7, 2016

बाबासाहेब आंबेडकर कोणाचे?

Image result for ambedkar

३१ आक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाजतगाजत सरदार पटेल यांची जयंती साजरी केली आणि कॉग्रेसच्या पोटात कळ आली, तर नवल नाही. मोदींनी काहीही केले तर चुकीचे ठरवणार्‍या राजकीय बुद्धीमंतांची जगात कमी नाही. त्यासाठी मोदींनी चुकीचे काही करण्याची गरजही नसते. त्यांनी काहीही करणे पुरेसे असते. मग त्यात मोदी कसे चुकले, हे सिद्ध करण्याची स्पर्धा सुरू होते. त्यामुळेच पटेलजयंती साजरी करण्याच्या मोदींच्या हक्कापासून, संघाचे स्वातंत्र्य चळवळीतले योगदान किती, इथपर्यंत चर्चा सुरू झाल्या. अर्थातच सरदार पटेल कॉग्रेसमध्ये होते आणि संघात नव्हते, हे कोणी नाकारू शकत नाही. अधिक संघावर बंदी आणली गेली, तेव्हा पटेलच गृहमंत्री होते, हे सुद्धा कोणी नाकारू शकणार नाही. पण म्हणून त्यांच्यासारख्या कर्तबगार नेत्याची जयंती साजरी करण्यात कॉग्रेसला पोटदुखी व्हायचे कारण काय? आम्ही ज्याचे कर्तृत्व झाकून ठेवले आणि ज्याला इतिहासातून पुसण्याचा आटोकाट प्रयत्न केला, त्याला मोदी उजाळा देतात, ही पोटदुखी आहे काय? पटेलांपुढे नेहरूंचे कर्तृत्व झाकोळले जाते, अशी या नेहरूवाद्यांची भिती आहे काय? नसेल तर पोटशूळ कशाला? उलट ज्यांनी संघावर बंदी घातली, त्याचेच स्मरण संघाला करावे लागते, याचा अभिमान कॉग्रेसने बाळगायला हवा. तमाम पुरोगाम्यांनीही त्यासाठी आनंदित व्हायला हवे ना? पण अनुभव वेगळाच आहे. प्रत्येक वेळी संघ अथवा मोदींनी सरदार पटेलांचे नाव घेतले, की नेहरूवाद्यांना पोटशूळ सुरू होतो. पटेल तुमचे नाहीत असे सांगायची स्पर्धा सुरू होते. यावेळी त्याच्याही पुढे जाऊन आमचे सरदार पटेल मोदींनी पळवले; अशी भाषा ऐकू आली. ही भाषा मात्र मोठीच विनोदी आहे. म्हणजे असे की दुसर्‍यांची मुले पोरे पळवण्यातच हयात घालवलेल्याने दुसर्‍या कुणावर आपले मुले पळवल्याचा आरोप करण्यासारखे हास्यास्पद वाटले.

नेते आणि महापुरूष पळवण्याची भाषा कॉग्रेस किंवा नेहरूवाद्यांनी करावी काय? यांना आज गुजरातमध्ये कोणी आपला वारसदार उरलेला नाही. ज्याच्यापाशी कॉग्रेसी संस्कृतीत राजकारणाचे संस्कार झालेत, असा कोणी नेता त्या पक्षाकडे नाही. विधानसभेतला विरोधीनेता म्हणून शंकरसिंह वाघेला यांना पुढे करावे लागते. तर पक्षाची संघटना बांधण्यासाठी संघाच्या संस्कारात वाढलेल्या मधूसूदन मिस्त्रींना मोदीविरोधात उभे करावे लागते. ही माणसे कोणी कुणाकडून पळवली? वाघेलांना गुजरातमध्ये ओळख कुठून मिळाली? कुणाच्या संस्कारातून वाघेला सार्वजनिक जीवनात आले? मधूसूदन मिस्त्री तर राहुल गांधींचे लोकसभा मतदान संपेपर्यंत सल्लागार होते. त्यांना कुठल्या सुतिकागृहात कॉग्रेस नावाच्या मातेने जन्म दिला होता? अशा शेकडो लोकांची यादी सादर करता येईल. तिकडे उत्तरप्रदेशात आज कॉग्रेसचा प्रांताध्यक्ष कोण आहे? राज बब्बर यांना राजकारणात कोणी आणले? समाजवादी संस्कारात, युवा चळवळीत वाढलेला हा अभिनेता, पुढे मुलायममुळे राजकारणात आला. कॉग्रेसने त्याला दत्तक घेतला, की तेही पळवून आणलेले मुल आहे? आज कॉग्रेसची उत्तरप्रदेश निवडणुक रणनिती ज्याच्या तालावर नाचते आहे, तो प्रशांत किशोर कुणाकडून उधार घेतलेला आहे? कुठल्या वारसा व संस्काराच्या गोष्टी कॉग्रेसवाले आणि नेहरूवादी बोलत असतात? गेल्या तीन दशकात कॉग्रेसची संघटना अशाच पळवून आणलेली मुले व कार्यकर्ते नेत्यांच्या बळावर उभी राहिलेली आहे. मुळचा कॉग्रेस वंश म्हणावा असे आहेच काय? इतिहासाचे हवाले देणार्‍यांना इतिहास सोयीनुसार वापरता येत नसतो. त्याअर्थाने कॉग्रेसचा कधीच निर्वंश झाला आहे. सगळी उधारी व उसनवारी म्हणजे आजची कॉग्रेस आहे. त्यांनी सरदार पटेल आमचे वा कॉग्रेसची मिळकत असल्यासारखी भाषा बोलणे हास्यास्पद आहे. सरदार पळवले म्हणणे तर त्याहीपेक्षा विनोदी आहे.

सरदार वा शिवराय हे राष्ट्रीय महापुरूष असतात. त्यांच्यावर कुणा एका घराण्याचा अधिकार नसतो, तर एका पक्षाने वा संघटनेने तसा दावा करणे गैरलागू असते. त्यात पुन्हा ज्यांना केवळ पळवापळवी व उधारीवर संघटना उभी करावी लागते, त्यांनी असे बोलण्यात कसला अर्थ? कर्नाटकातले मुख्यमंत्री सिद्धरामय्या कुठून आले? देवेगौडांचा शिष्य असलेल्या माणसाला आज कर्नाटकात मुख्यमंत्रीपदी बसवावे लागले आहे. जिथे अशी पळवापळवी शक्य नाही, तिथे कॉग्रेसचे नामोनिशाण शिल्लक उरलेले नाही. पण महापुरूषांचाच विषय असेल, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोणाचे असतात? त्यांना अगतिकता म्हणून नेहरूंनी पहिल्या मंत्रिमंडळात समाविष्ट करून घेतले होते. मात्र त्यांचा घटना बनवण्यासाठी उपयोग करून घेताना अतिशय महत्वाच्या कुठल्याही मंत्रीपदाचा भार त्यांच्याकडे दिला नाही. बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल बनवले त्यांना तोंडघशी पाडून त्यांची घटनासमितीत कोंडी कोणी केली होती? नेहरूंनीच केली होती ना? बाबासाहेबांवर राजिनामा देण्याची वेळ नेहरूंनीच आणली आणि त्यांना राजिनाम्याचे भाषणही करू दिले गेले नाही. अशा बाबासाहेबांचा अखंड नामजप आजची कॉग्रेस करीत असते. आम्हाला बाबासाहेबांनी घटनेतून अमूक अधिकार दिला, तमूक अधिकार दिला; असे सांगणार्‍या कॉग्रेसवाल्यांना आपल्या पुर्वज नेहरूंचा इतिहास कितीसा ठाऊक असतो? त्याच नेहरूंनी पहिल्या लोकसभा निवडणूकीत त्याच बाबासाहेबांना पराभूत करण्यासाठी काय काय खेळ केले होते? बाबासाहेबांना पराभूत करण्यात धन्यता मानणार्‍यांचा आजचा दिवस त्यांच्याच नावाची जपमाळ ओढल्याशिवाय जात नाही. ते बाबासाहेब कॉग्रेसमध्ये कधी होते? नसतील, तर त्यांच्या नावाचा सर्रास वापर कॉग्रेसवाले कशासाठी करीत असतात? त्याला पळवापळवी नाहीतर दुसरे काय नाव आहे? सरदार पटेल कॉग्रेसचे असतील, तर बाबासाहेब कॉग्रेसचे कसे?

हा प्रश्न फ़क्त कॉग्रेससाठी नाही. जे कोणी बुद्धीमंत विचारवंत किंवा अभ्यासक म्हणून आपली अल्पबुद्धी मिरवत पटेल संघाचे नव्हेत असे शिकवत असतात, त्यांनीही जरा डॉ. बाबासाहेब आबेडकर कोणाचे, तेही तितक्याच आवेशात सांगायला हवे ना? बाबासाहेब कॉग्रेसचे नाहीत आणि कधीही नव्हते; असेही तितकेच ठणकावून सांगायला नको काय? पण असे शहाणे विश्लेषक बाबासाहेबांचा वारसा सांगण्याची वेळ आली, मग गांधीवादी होऊन मौन धारण करतात. मात्र संघाने किंवा नरेंद्र मोदींनी सरदार पटेलांचा गौरव करायचा प्रयास केला; मग त्यांना पटेल कॉग्रेसचे असल्याचे स्मरण होते. पण फ़क्त सरदारांचेच स्मरण वा स्मारक करण्याचा विषय आला, मग मात्र सरदार कोणाचेच नसतात. किंबहूना दुर्लक्षित करायचा मामला असतो. त्यांच्या सोयीचे असेल तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरही कॉग्रेसचे होतात. पण श्रेयाचा प्रसंग आला, मग सर्वकाही नेहरू खानदानाची घरगुती मालमत्ता असते. यातली पोटदुखी मुळात मोदींनी पटेलांचे गुणगान करण्यातही नसते. मोदी कित्येक वर्षे सरदार पटेलांचे गुणगान करीत आहेत. कारण संघातही पटेलांच्या कर्तबगारीचे कौतुक आहे. नेहरू असतानाही आपल्या कुवतीवर पटेलांनी देशातली संस्थाने विलीन करून घेतली आणि त्यात नेहरूंना ढवळाढवळ करू दिली नाही; म्हणून संघाला पटेलांचे कौतुक आहे. त्याच संस्कारात वाढले म्हणून मोदींना सरदारांविषयी आदर आहे. आज सत्ता हातात आल्यावर त्या महापुरूषाची देशाला नव्याने ओळख करून देण्याचे मोदींना अगत्य वाटले. तीच नेहरूवादी व कॉग्रेसी पोटदुखी आहे. आपण पुसलेला खरा राष्ट्रपुरूष लोहपुरूष म्हणून नव्या पिढीसमोर आणला जातो, ही पोटदुखी आहे. म्हणून मग आमचा सरदार पळवल्याची भाषा बोलली जाते. पण आपणच मागली चार दशके इतरांचे कार्यकर्ते नेते पळवून पक्ष चालवतो आहोत, याची शरमही त्यापैकी कुणाला वाटत नाही.

1 comment: