Wednesday, November 9, 2016

बदलणारी भाषा

congress working committee के लिए चित्र परिणाम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारची एक जाहिरात आहे. ‘देश बदल रहा है’. देश किती बदलला आहे, किंवा बदलतो आहे, माहित नाही. पण हल्ली भाषा किंवा भाषेतल्या शब्दांचे अर्थ मात्र आमुलाग्र बदलत चालले आहेत. म्हणजे असे, की पुर्वी जो मारला जायचा, मार खायचा, त्याला बळी म्हणायचे. आजकाल जो मार खातो, त्याला मारेकरी म्हटले जाते. तसे नसते तर कर्नाटक वा केरळात भाजपाचे कार्यकर्ते मारले जात आहेत. त्यांचे मुडदे पाडले जात आहेत. मात्र आरोप त्याच भाजपावर असहिष्णुतेचा आरोप होत असतो. कर्नाटकात कॉग्रेसची सत्ता आहे आणि केरळात मार्क्सवादी पक्षाची सत्ता आहे. तिथेच भाजपाचे कार्यकर्ते मारले जात आहेत. पण मोदी सत्तेत आल्यापासून विरोधकांची मुस्कटदाबी होत असल्याचा आरोप कॉग्रेस आणि मार्क्सवादीच करताना दिसत आहेत. त्यामुळे आजकाल शब्दांचे अर्थच आमुलाग्र बदलून गेलेत किंवा कसे, असा प्रश्न विचारणे भाग आहे. कारण सत्तेची असहिष्णुता असती, तर सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते मारले गेले नसते. उलट त्यांच्याच विरोधातले जे कार्यकर्ते वा कोणी असतील, त्यांचे मुडदे पडताना दिसले असते. मग अशा बातम्या देणार्‍यांना वा त्यावर चर्चा करणार्‍यांना, तेच बोलत असलेल्या शब्दांचा अर्थ ठाऊक नाही म्हणायचे का? की शब्दांचे अर्थ बदलण्याचे काम सुरू आहे असे म्हणायचे? देशात मतदाराने ज्यांच्या हाती सत्ता सोपवली, त्यांनाच कुठलाही कायदा वापरण्याचा अधिकार नाही आणि त्यांनी सरकार कसे चालवावे, हे पराभुत पक्षांनी ठरवायचे असते काय? ही कुठली लोकशाही आहे आणि कुठली भाषा आहे, त्याचाच हल्ली पत्ता लागेनासा झाला आहे. त्यातच राहुल गांधी यांनी लोकशाहीचा सर्वात काळाकुट्ट कालखंड चालू असल्याचे वक्तव्य करावे आणि इतरांनी त्याला आणिबाणी ठरवून काहुर माजवावे, हा प्रकार आकलनापलिकडला होऊ लागला आहे.

सोमवारी कॉग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक झाली. त्यात ज्येष्ठ नेत्यांनी राहुलना पक्षाचे नेतृत्व हाती घेण्याचा आग्रह धरला आणि तसे जगालाही ओरडून सांगितले. आता असा निर्णय कार्यकारिणीने घेतला आणि त्यांनी तो निर्णय पक्षाध्यक्षा सोनिया गांधींना कळवला आहे. त्यावर सोनियांनी निर्णय घ्यावा, अशी या अन्य नेत्यांची अपेक्षा आहे. म्हणजे कार्यकारिणीला वाटते म्हणून सोनियांनी राहुलकडे अध्यक्षपद सोपवावे. कार्यकारिणीला तसे वाटत असेल, तर त्याच्याही पुढे जाऊन नकार देण्याची अध्यक्षाची काय बिशाद असू शकते का? अध्यक्षापेक्षा कार्यकारिणी महत्वाची असते. तसे नसते, तर १९९८ सालात कार्यकारिणीने सोनिया गांधी यांना अध्यक्षपदी कसे बसवले असते? यापैकी अनेकजण तेव्हाही कार्यकारिणीचे सदस्य होते आणि पक्षाच्या अधिवेशनात तात्कालीन पक्षाध्यक्ष सीताराम केस्ररी निवडून आलेले होते. पण याच कार्यकारिणीने सोनियांना अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव आणला आणि त्याला केसरींनी नकार दिला होता. तेव्हा त्यांनी घेतलेला निर्णय कार्यकारिणी म्हणवणार्‍यांनी मानला होता काय? सोनियांसाठी अध्यक्षपद केसरी सोडेनात, तेव्हा पक्षाच्या मुख्यालयातून त्यांना हुसकावून लावण्यात आले होते. चपला व दगड फ़ेकून त्याच अध्यक्षाला पिटाळून लावण्यात आले होते. मग सोनियाजी कार्यालयात आल्या आणि कार्यकारिणीच्या निर्णयानुसार त्यांनी पक्षाध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतली होती. कॉग्रेस कार्यकारिणी इतकी बलवान असते. मग आज तीच कार्यकारिणी राहुलना अध्यक्ष बनवण्याचा प्रस्ताव करीत असेल, तर त्याची अंमलबजावणी सोनियांच्या मर्जीवर कशी अवलंबून असू शकते? तसे असेल तर मुळातच अठरा वर्षापुर्वी सोनियांची पक्षाध्यक्षपदी झालेली निवड गैरलागू व गुंडगिरी होती ना? त्याला लोकशाहीचा कुठला अवतार म्हणायचे? पण असे प्रश्न विचारायचे नसतात.

तेव्हाची सोनियांची निवड योग्य असेल, तर आज सोनियांनी गुपचुप आजचा प्रस्ताव मान्य करावा आणि राहुलच्या हाती पक्ष सोपवावा. पण तसे होत नाही, झालेले नाही. सोयीनुसार कार्यकारिणी निर्णायक अधिकारी असते आणि सोयीनुसार कार्यकारिणी अध्यक्षाची मोलकरिण असते. मागल्या खेपेस लोकसभेत कॉग्रेसचा मोठा पराभव झाला, तेव्हा त्याची जबाबदारी घेऊन सोनिया व राहुल यांनी पक्षातील आपापल्या पदाचे राजिनामे दिलेले होते. पण कार्यकारिणीने ते राजिनामे फ़ेटाळून लावले आणि त्यांना आपापल्या पदावर कार्यरत रहाण्याचे आदेश दिले होते. त्याही मायलेकरांनी कार्यकारिणीचा आदेश शिरसावंद्य मानून मान झुकवली होती. कारण तेव्हा ते सोयीचे होते आणि आज तीच कार्यकारिणी आपल्या आदेशावर विचार करण्यासाठी विनंती करते आहे. ही लोकशाही असते काय? पक्षांतर्गत लोकशाहीत कार्यकारिणीला महत्व असते आणि अध्यक्ष तिला झुगारू शकत नाही. आपली अध्यक्षपदी निवड करते, तेव्हा सोनियांना कार्यकारिणी निर्णायक अधिकारी वाटत असते आणि आपल्या गैरसोयीचे होईल, तेव्हा कार्यकारिणीला किंमत नसते. वाहिन्यांवर किंवा वृत्तपत्रातून अशा विषयांची चर्चा करणार्‍या कुणा महाभागाने कधी याविषयी उहापोह केला आहे काय? कॉग्रेसवाल्यांना वा त्यांच्या प्रवक्त्यांना ह्या पक्षांतर्गत लोकशाहीबद्दल खुलासे विचारले आहेत काय? एका खानदानाच्या वारसाच्या चरणी शरणागत झालेल्या शतायुषी पक्षाच्या नेत्यांना हा सगळा कारभार कुठल्या लोकशाही व्याख्येत बसणारा आहे? त्याचे उत्तर मागितले जाते काय? नसेल तर पत्रकारांनी आपल्या तर्कबुद्धीची स्वत:च मुस्कटदाबी करणे, कुठल्या अविष्कार स्वातंत्र्याच्या व्याख्येत बसते? असाही प्रश्न उभा रहातो. नेत्याच्या विरोधात एक शब्द उच्चारला तर पक्षातून हाकालपट्टी करण्यात कुठली सहिष्णुता आहे, हे विचारायची हिंमत गमावण्याला स्वातंत्र्य म्हणतात काय?

कॉग्रेसच्या अंतर्गत कारभार व कार्यशैलीच्या संदर्भातले हे प्रश्न कोणी कधी उपस्थित केले आहेत काय? ज्यांना असे प्रश्न उपस्थित करता येत नाहीत, त्यांची सहिष्णुता वा लोकशाहीची व्याख्या काय असते? की शब्दांचे अर्थ सोयीनुसार आणि राजकीय भूमिकेनुसार बदलत असतात? राहुल गांधी आज लोकशाहीचा काळा कालखंड सुरू झाल्याचा दावा करतात, तेव्हा त्यांच्याच आजीने लावलेल्या आणिबाणीविषयी किती पत्रकार संपादकांनी प्रतिप्रश्न केला आहे? राहुल आपल्या आजीच्या त्या कारकिर्दीला अंधारयुग म्हणायला राजी आहेत काय? असा प्रश्न कोणी विचारला आहे काय? मोदी वा भाजपाचे सरकार भविष्यात असे काही करील, म्हणून रोजच्या रोज गळा काढला जातो. पण ज्यांना अशाच काळरात्रीचा अभिमान आहे आणि तोच वारसा सांगत जे राजकारणात आलेले आहेत, त्यांना त्याविषयी सवालही विचारण्याची हिंमत होत नाही. ह्याला अविष्कार स्वातंत्र्य म्हणतात काय? कुठल्या युगात आणि कुठल्या भाषेत हा बुद्धीवाद चालली आहे? सामान्य माणूस वाचक किंवा श्रोता तद्दन मुर्ख असल्याची, इतकी खात्री अशा विद्वानांना कुठून झाली आहे? अशाच भंपकपणाला कंटाळून लोकांनी मोदींना अपुर्व यश मिळवून दिले. मोदींना मिळालेले यश त्यांचीच व्यक्तीगत लोकप्रियता नव्हती. त्यांच्या कार्यक्रम धोरणांना मिळालेली ती मते नव्हती. बुद्धीवाद वा पुरोगामी युक्तीवाद म्हणून जो राजरोस खोटेपणा चालतो, त्यालाच संपवण्यासाठी मोदींकडे मतदार झुकला. मोदींना सत्तेवर आणून बसवणार्‍या मतदाराने सोनिया वा कॉग्रेसला पराभूत केलेले नव्हते. मतदाराने म्हणजेच पर्यायाने सामान्य  जनतेने पुरोगामी बुद्धीवाद म्हणून बोकाळलेल्या खोटेपणाला पिटाळून लावले होते. देश म्हणजे सामान्य जनता असते आणि ती जनता बदललेली नाही, की तिची भाषा बदललेली नाही. शहाणे मात्र इतके बदलले आहेत, की त्यातला कोण राहुल इतका निर्बुद्ध झालाय त्याचा तपास जनता करते आहे.

2 comments:

  1. छान भाऊ बरोबर

    ReplyDelete
  2. काँग्रेसचा कोळसा उगळावा तेवढा काळा.

    ReplyDelete