Saturday, November 26, 2016

पावशतकापुर्वी मारलेला अर्थशास्त्री

manmohan cartoon के लिए चित्र परिणाम

परवा राज्यसभेत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना बोलताना ऐकून मोठी मौज वाटली. जागतिक किर्तीचे अर्थशास्त्री अशी त्यांची ओळख नेहमी करून दिली जाते. त्याला शोभेसेच भाषण त्यांनी करावे, ही अपेक्षाही बाळगावीच लागते. कारण ते खरे़च अर्थशास्त्री असतील, तर त्यांनी मुरब्बी बनेल राजकारण्यासारखे बोलता कामा नये. बोलायचे राजकारणी भाषेत आणि त्यावर सवाल विचारला गेला, की अर्थशास्त्री मुखवट्याआड लपायचे, याला अर्थ नसतो. कुठल्याही भ्रष्टाचाराचा ज्यांच्यावर आरोप होऊ शकत नाही असे व्यक्तीमत्व म्हणून त्यांच्याभोवती एक कवच उभे करण्यात येते. पण त्यांच्याच दुसर्‍या कारकिर्दीत भारत सरकारची तिजोरी दिवसाढवळ्या लुटली जात होती. त्यावेळी मनमोहन काय करू शकले होते? सर्वात गाजलेले घोटाळे त्यांच्याच कृपादृष्टीखाली झालेले आहेत. कोळसा घोटाळ्यातले खाणवाटप तर त्यांच्याकडेच कोळसा मंत्रालय असताना घाईगर्दीने उरकले गेलेले आहे. तरीही हे गृहस्थ निष्कलंक कसे ठरवले जातात, याचे उत्तर कोणाकडे नाही. त्यामुळेच त्यांची अतिशय केविलवाणी अवस्था होऊन गेलेली आहे. मात्र त्यांच्याभोवती उभ्या केलेल्या कवचकुंडलांचा लाभ उठवण्यासाठीच त्यांना गुरूवारी राज्यसभेत नोटाबंदीवर बोलायला पुढे करण्यात आलेले होते. वरचा आदेश त्यांनी व्यवस्थित पाळला. पण त्यात एक वाक्य सिंग बोलायचे राहून गेले असे वाटते. देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आणली गेली आणि आर्थिक दिवाळखोरीच्या कडेलोटावर देश उभा आहे, हे आरोप आता नवे राहिलेले नाहीत. पण असेच होणार हे भाकितही मनमोहन सिंग यांचेच होते ना? लोकसभा निवडणूकीचे वेध लागल्यावर सिंग यांनी प्रथमच पत्रकार परिषद घेतली, त्यात हेच तर भाकित केलेले होते. त्यांनाच आज ते भाकित आठवत नसेल, तर इतर कोणाला आठवायचे? खरे तर राज्यसभेत त्यांनी त्या भाकिताची आठवण करून देत स्वत:ची पाठ थोपटून घ्यायला हवी होती.

२०१४ च्या आरंभीच म्हणजे पहिल्या आठवड्यात सरकारच्या प्रसिद्धी खात्यातर्फ़े ही दुर्मिळ पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली होती आणि त्यासाठी आधीच प्रश्नही मागवण्यात आलेले होते. जेणेकरून अर्थशास्त्री प्राध्यापकांना ऐनवेळी उत्तरे शोधायची गरज भासू नये. देशाची अर्थव्यवस्था, भ्रष्टाचार व महागाई अशा ठराविक प्रश्नांवर मनमोहन त्यात प्रश्नांना उत्तरे देणार होते. पण त्यातच एकाने प्रश्न विचारला होता, की नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरले आहेत. मोदी खरोखरच पंतप्रधान झाले, तर काय होईल? असा तो प्रश्न होता आणि मोजक्या शब्दात मनमोहन उत्तरले होते, देशासाठी तो विनाशक निकाल असेल. थोडक्यात मोदी पंतप्रधान होणे देशासाठी घातक असल्याचे भाकित जवळपास तीन वर्षापुर्वी याच शास्त्रीबुवांनी केलेले होते. पण तेव्हापासून आजपर्यंत मधल्या अडिच वर्षात मोदी पंतप्रधान झाले असताना, देशाच्या अर्थव्यवस्थेचा कुठलाही आढावा सिंग यांनी घेतला नाही. त्याची वाच्यता कुठे केली नाही. नोटाबंदी होईपर्यंत ते पुन्हा मौनीबाबा होऊन गेलेले होते. आता देशाचा वाढता जीडीपी घसरगुंडीला लागल्यावर त्यांनी मौन सोडले आहे. या वर्षाच्या पहिल्या दोन तिमाहीमध्ये अर्थकारणाची कमान चढती होती आणि तिसर्‍या तिमाहीत ती उतरणीला लागली. आता तर नोटाबंदीने पुरता तळ गाठला जाईल, असे त्यांनी मतप्रदर्शन केले आहे. त्यावर शंका घेण्याचे कारण नाही. पण पहिल्या दोन तिमाहीमध्ये अर्थकारणाची कमान चढती असताना, मनमोहन सिंग यांनी एकदा तरी मोदींची पाठ थोपटली होती काय? खरा अर्थशास्त्री असता तर तेव्हाच पुढाकार घेऊन मोदींचे कौतुक केले असते. कौतुक सोडा, देशाची प्रगती चालूच रहावी, म्हणून मोदींना अधिक धोका पत्करू नका वा कुठला जुगार खेळू नका; असे तरी मनमोहन सिंग बजावू शकले असते ना? पण त्या पहिल्या नऊ महिन्यात त्यांनी मौन का सोडले नव्हते?

आज या महोदयांना देशाच्या अर्थव्यवस्थेचा मोठा उमाळा आलेला आहे. त्यांनाच कशाला? अनेकांना त्यांच्या अर्थशास्त्रज्ञ असल्याचाही नको तितका उमाळा आलेला आहे. पण आज जे मनमोहन सिंग आपल्यात आहेत, ते अर्थशास्त्रज्ञ अजिबात नाहीत. त्यांच्यातल्या अर्थशास्त्रज्ञाचा अवतार पंचवीस वर्षापुर्वीच अस्ताला गेला होता. नव्याने वाचू लिहू लागणार्‍यांन कदाचित तो इतिहास आठवत नसावा. नव्या पिढीची गोष्टच सोडा; आनंद शर्मा, गुलाम नबी आझाद इत्यादी तात्कालीन १९९१ च्या कॉग्रेसमंत्री असलेल्यांनाही तेव्हाचे त्यांनीच ‘मारून टाकलेले अर्थशास्त्री’ मनमोहन सिंग आज आठवेनासे झालेले आहेत. कारण तो इतिहास त्यांनाच सोयीचा राहिलेला नाही. १९९१ साली लोकसभेची मध्यावधी निवडणूक चालू होती आणि अर्ध्याहून अधिक मतदानही पुर्ण झालेले होते. इतक्यात तामिळनाडूच्या पेरांबुदूर येथे प्रचाराला गेलेल्या राजीव गांधी यांच्यावर घातपाती हल्ला झाला आणि त्यातच त्यांचा अंत झाला. त्यामुळेच नंतर पुर्ण झालेल्या मतदानातून कॉग्रेस अल्पमताने सत्तेत आली आणि पंतप्रधानपदी नरसिंहराव या निवृत्त नेत्याला बसवण्यात आले. त्यांनीच मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री पदावर आणलेले होते. मग डबघाईला आलेली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी या अर्थशास्त्रज्ञाने भारताचा नेहरूंपासून चालत आलेला समाजवादी अर्थकारणाचा वारसा निकालात काढून मुक्त अर्थव्यवस्थेचा पाया घातला. त्यातून आज इतक्या मोठ्या प्रमाणात पैसा व संपत्ती निर्माण होऊन त्यालाच आर्थिक सुधारणांचे लेबल लावले जात आहे. त्याचे जनकत्व मनमोहन यांना दिले जात आहे. पण अर्थमंत्री पदवर टिकून रहायचे असेल, तर आपल्यातला अर्थशास्त्रज्ञ गळा घोटून मारला पाहिजे, याचा साक्षात्कार त्यांना विनाविलंब झाला होता. तिथून त्या गृहस्थांचा राजकारणी नेता म्हणून नव्याने जन्म झाला. आज जे बोलत आहेत, ते तेच राजकीय नेते मनमोहन सिंग! कोणी कसा मरला होत तो अर्थशास्त्री?

त्या निवडणूक प्रचारात पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी कॉग्रेस व राजीव गांधींनी जो जाहिरनामा तयार केला होता, त्यामध्ये अवघ्या शंभर दिवसात महागाई निम्मे कमी करून दाखवण्याचे आश्वासन दिलेले होते. पण ते पुर्ण करायला राजीवच हयात राहिलेले नव्हते. त्यांच्या घातपाती हत्येमुळे त्यांना हौतात्म्य प्राप्त झालेले होते. नरसिंहराव सिंहासनावर पादुका ठेवून राज्य चालवावे, तसे कारभार करत होते आणि त्यांचे अर्थशास्त्री अर्थमंत्री तर राजकारणात नवखे होते. म्हणूनच पहिलीवहीली पत्रकार परिषद घेताना त्यांनी शंभर दिवसात महागाई खाली आणण्याचे स्वप्न साकार होणेच अशक्य असल्याचे ‘अर्थपुर्ण’ वक्तव्य केलेले होते. ते शंभर टक्के खरेही होते. किंबहूना तीन वर्षात ते साध्य होईल असेच त्यांचे प्रामाणिक मत होते. पण ते राजकारणाला पचणारे नव्हते. म्हणूनच तमाम राजीवनिष्ठ कॉग्रेसजनांनी या नव्या अर्थमंत्र्याच्या विरोधात काहूर माजवले आणि त्याला आपले शब्द मागे घेण्यास भाग पाडले होते. आपले खरे अर्थविषयक ज्ञान गुंडाळून मनमोहन सिंग यांनी आपले शब्द मागे घेतले आणि एका राजकारणी नेत्याचा कॉग्रेसमध्ये जन्म झाला. त्याला आजचे जग माजी पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणुन ओळखते. ज्यांना कोणाला खातरजमा करून घ्यायची असेल, त्यांनी १९९१ च्या राजकीय नोंदी तपासून घ्यायला हरकत नाही. आपल्यातल्याच अर्थशास्त्रीय मतांची गळचेपी करून घेणार्‍याच्या नंतरच्या कुठल्याही मताला व कृतीला अर्थशास्त्रानुसार अर्थ राहिलेला नव्हता. म्हणून तर हे गृहस्थ लोकसभाही न लढवता दहा वर्षे पंतप्रधान राहू शकले आणि त्यांच्या अपरोक्ष त्यांच्या नावाने कोणीही कारभार चालवू शकला होता. अशा मनमोहन सिंग यांनी आज अर्थशास्त्रज्ञ  म्हणून मिरवणे ही निव्वळ तोतयेगिरीच नाही काय? मग आज नोटाबंदीवर त्यांनी अर्थशास्त्री म्हणून मतप्रदर्शन करणे कितपत प्रामाणिक आहे?

4 comments:

 1. जबरदस्त पंच 👊👊👊 भाऊ

  ReplyDelete
 2. मनमोहन सिंग यांच्या पत्नीने मानले मोदींचे आभार.


  दहा वर्षे जगातील तज्ञ डॉक्टरना दाखवून सुध्दा काही फरक पडला नाही.

  मोदींनी नोटा बंद करण्याचा निर्णय जाहीर करताच आचानक कंठ फुटला.

  सर्व ENT तज्ञाना आश्चर्याचा धक्का.

  दैवी चमत्कार घडल्याची सर्वत्र चर्चा.

  ReplyDelete