पन्नास वर्षापुर्वी प्रथमच आम्हाला शाळेत हिंदी हा विषय शिकवला जाऊ लागला. तेव्हा पुस्तकात एक मजेशीर धडा होता. ‘रातोरात लंबी दाढी’ असे त्याचे शीर्षक होते. लेखक कोण होते आठवत नाही. पण मस्त गोष्ट होती. कोणी एक भांगेच्या नशेत कायम जगणारा इसम असतो आणि एका रात्री त्याला बदाम खाण्याची लहर येते. उशीरा बाहेर पडल्याने बाजारातली दुकाने बंद झालेली असतात आणि एक दुकान बंद होत असताना दिसताच, हा गडी तिथे जाऊन धडकतो. तर दुकानदार उद्या ये म्हणून त्पिटाळत असतो. पण हा गडी माघार घ्यायला राजी नसतो. अखेरीस अनिच्छेनेच तो दुकामदार त्याला बदाम देतो. पण रुपयातले आठ आणे सुट्टे नसल्याने उद्या मिळतील असे बजावतो. ग्राहकाला पर्वा नसते. बदाम मिळाल्याने तो खुश असतो आणि म्हणूनच होकार भरून बदाम घेऊन निघतो. चार पावले पुढे आल्यावर त्याला स्मरण होते, की आठ आणे परत घेण्यासाठी दुकान उद्या ओळखायचे कसे? माघारी येईपर्यंत दुकानदार गायब झालेला असतो आणि काळोखात त्याला फ़लकही वाचता येत नाही. पण दुकानासमोर एक बैल रवंथ करत बसलेला असतो. तितकीच खूण लक्षात ठेवून ग्राहक निघून जातो. दुसर्या दिवशी दुपारी आपले उरलेले आठ आणे घेण्यासाठी तो बाजारात येतो आणि बैल कुठे बसलाय हे शोधत दुकान गाठतो. पण हे दुकान किराणामालाचे नसते, तर तिथे एक शिंपी कपडे शिवत बसलेला असतो. ग्राहक त्याच्याकडे आठ आणे मागू लागतो आणि काल बदाम खरेदी केल्याचेही सांगतो. तर शिंपी वैतागतो. नशेत आहेस काय? शिंप्याच्या दुकानात बदाम कोण देणार तुला, असे उलट विचारतो. तर ग्राहक शांतपणे म्हणतो, यार काय सांगू? चल तुला आठ आणे माफ़ केले. माझे आठ आणे हडपण्यासाठी तू रातोरात धंदा बदलून टाकलास, तुला दाद द्यावी लागेल. पण तुझ्या या चतुराईचे एक रहस्य उलगडून सांगशील का?
ते दुकान शिंप्याचे असते आणि त्याविषयी कुठला वाद होऊ शकत नसतो. दुकानदार आपला धंदा बदलू शकणेही तर्कात बसणारे होते. पण त्या शिंप्याचा अवतार मात्र ह्या नशेबाज ग्राहकाला चक्रावून सोडणारा होता. कारण बदाम देणारा दुकानदार गुळगुळीत दाढी केलेला ग्राहकाला आठवत होता आणि हा शिंपी मात्र चांगली हातभर लांब दाढी वाढवलेला दिसत होता. तेच रहस्य उलगडण्यासाठी नशेबाज आठ आण्यावर पाणी सोडायला तयार होता. तो त्या शिंप्याला म्हणतो, पैसे हडपण्यासाठी रातोरात तू धंदा बदलू शकतोस हे मान्य! पण एका रात्रीत इतकी लांब दाढी कशी वाढवू शकलास? थोडक्यात बैल ही खुण नसते आणि तो बैल आज इथे तर उद्या उठून अन्यत्र कुठेही बसू शकतो. ही साधी गोष्ट त्या नशेबाजाच्या मेंदूत शिरत नसते. तिथे सर्व घोटाळा असतो. मात्र आपण चुकीची खुण लक्षात ठेवली, किंबहूना बैल दारात बसला ही दुकान ओळखण्याची खुण असू शकत नाही, हा आपला वेंधळेपणा त्याला मान्य नसतो. तिथे गडबड होत असते. कुठल्याही तर्कवाद युक्तीवादात तोच घोटाळा नेहमी होत असतो. नसलेल्या व्याख्या वा तपशीलाचे गोंधळ घातले जातात. त्यामुळे वादविवाद भडकत जात असतात. आताही अनेकांना अमेरिकेत डोनाल्ड ट्रंप जिंकल्याचे त्यामुळेच आश्चर्य वाटते आहे. कारण त्यांनी बैल बसला तीच दुकान ओळखण्याची खुण मानलेली असते. ट्रंपविषयी जे मत माध्यमातून बनवून दिले, ते जितके खोटे व भ्रामक होते; तितक्याच हिलरी वा बराक ओबामा यांच्या शासनाविषयी करून दिलेल्या समजुतीही खोट्या होत्या. त्याचा निवडणूकीतला परिणाम समोर आल्यावर अनेक गट रस्त्यावर उतरून ट्रंप यांच्या विरोधात गर्जना घोषणा करीत आहेत. पण खुद्द ओबामा मात्र आपल्या कारकिर्दीवर पडलेले डाग धुण्याच्या घाईला आलेले आहेत. तसे नसते तरा अकस्मात त्यांनी सिरीयातील युद्धनिती ट्रंप विजयानंतर बदलली नसती.
सिरीयातील बशर अल असद यांना हटवण्याचा आग्रह कतार व सौदी अरेबियाने धरला आणि त्याला हिलरीच्या आग्रहाखातर ओबामांनी परराष्ट्र निती बनवले होते. त्यातून सिरीया इराकमध्ये नरसंहार सुरू झाला. बदल्यात या दोन्ही अरब देशांच्या राजांनी हिलरी क्लिंटन यांच्या फ़ौंडेशनला अब्जावधी डॉलर्सच्या देणग्या दिल्या होत्या. कुठलाही कामधंदा न करता क्लिंटन आपले खाजगी विमान बाळगू शकतात आणि त्यातून जगभर पर्यटन करू शकतात. असे हे दांपत्य ट्रंप या उद्योगपतीने सरकारी कर बुडवला, किंवा कोणते आर्थिक घोटाळे केले; त्याचा अखंड गाजावाजा करीत होते. त्याला माध्यमे ठळकपणे प्रसिद्धी देत होती. पण यापैकी कुणा शोध पत्रकाराने क्लिंटन यांच्या खिशात येणार्या वा त्यांच्या चैनमौजीवर खर्च होणार्या पैशाचा शोध घेतला नाही. तशी माहिती उपलब्ध झाल्यास त्याला प्रसिद्धी दिलेली नव्हती. पण तोही विषय बाजूला ठेवा. त्याची किंमत लक्षावधी सिरीयन व लिबियन निर्वासितांना मोजावी लागते आहे आणि त्याला ओबामा यांची पश्चीम आशियातील रणनिती कारण झाली आहे. ट्रंप यांनी त्यावर प्रचारमोहिमेत जोरदार हल्ला चढवला होता आणि आता सत्तासुत्रे हाती घेतल्यावर ती निती आमुलाग्र बदलली जाणार यात शंका नाही. तसे झाले, मग ओबामा कारकिर्दीची लक्तरेच जगाच्या वेशीवर टांगली जाणार होती. सहाजिकच हिलरीच्या प्रचारातील अतिरेकामुळे ओबामा यांची अब्रु उघडी पडायची वेळ आली आहे. म्हणून मग आता त्या नामुष्कीतून बाहेर पडण्यासाठी ओबामांनी रातोरात आपल्या पश्चीम आशियाई नितीचा त्याग केला असून, सिरीयातील अल नुसरा जिहादी संघटनेचा तातडीने खात्मा करण्याचे आदेश पेन्टागॉन या संरक्षण खात्याला दिले आहेत. थोडक्यात कालपर्यंत ज्या संघटनेला ओबामा सरकारने हत्यारे व आयुधे पुरवली, त्यांचा खात्मा करण्याचे आदेश दिले आहेत. साध्या भाषेत याला पुरावे नष्ट करणे म्हणतात.
सिरीयात हुकूमशहा असला तरी असद हा निवडून आलेला अध्यक्ष आहे आणि तो शिया असल्याने त्याची हाकालपट्टी करण्याचा सौदीच्या नियोजित राजपुत्र तलाल याचा अट्टाहास आहे. त्यातूनच सिरीयात धुमाकुळ सुरू झाला आणि त्यांनीच इराकमध्ये इसिस नावाच्या संघटनेला बळ पुरवले आहे. तोयबा वा मुजाहिदीन हे वास्तवात पाकिस्तानी सैनिकच असतात, तसे इसिसचे लढवय्ये प्रत्यक्षात सौदीचे हस्तक म्हणून सगळा खेळ करत होते. त्यांना बळ देण्यासाठी अमेरिकन हवाई दलाने सिरीयात हल्ले करून असदच्या सेनेचे शिरकाण केले. दुसरीकडे असदविरोधी बंडखोर व जिहादींना हत्यारेही ओबामा शासन पुरवित होते. त्याला रशियाने प्रतिहल्ला करून काही प्रमाणात शह दिला. पण आता ओबामांची कारकिर्द संपली आहे आणि हिलरी त्यांच्या जागी येणार नसल्याने, सर्व पापे चव्हाट्यावर येण्याचा धोका निर्माण झाला आहे. म्हणूनच निकालाच्या दुसर्याच दिवशी ट्रंपना राष्ट्रपती निवासात बोलावून ओबामांनी चर्चा केली आणि त्याच रात्री आपल्या सुरक्षा यंत्रणेला अल नुसराचा खात्मा करण्याचे आदेशही जारी करून टाकले आहेत. गेली दोन वर्षे ज्या पापाला पोसले, त्याचाच आता बळी घेणारे ओबामा, यांना मग शांततेचे नोबेल पारितोषिक कशासाठी मिळाले असेल? सगळा किती ढोंगी पाखंडी प्रकार असतो, त्याचा हा दाखला आहे. मुद्दा इतकाच, की त्या अल नुसरा संघटनेला दिर्घकाळ हत्यारे पुरवून सिरीया बेचिराख करणार्या ओबामांचा ताजा आदेश म्हणजे रातोरात लंबी दाढी म्हणावी तसाच नाही काय? ८ नोव्हेंबरपर्यंत ट्रंप अमेरिकेचा सरसेनापती व्हायला अपात्र असल्याची हमी देणारे व जाहिरसभेत सांगणारे ओबामा; ट्रंप जिंकताच त्याचीच रणनिती कशाला राबवू लागले आहेत? अमेरिकेच्या मुख्य शहरात निदर्शने करणार्या किती शहाण्यांपाशी अशा यक्षप्रश्नाचे उत्तर असू शकेल?
No comments:
Post a Comment