Monday, November 14, 2016

सैतानाच्या तोंडी बायबल?

saradha scam के लिए चित्र परिणाम

बॅन्केच्या दारात लागलेल्या रांगा व ताटकळणारी गर्दी दाखवण्यात सध्या सर्व वाहिन्या गर्क आहेत. पण ज्या हेतूने नोटाबंदी करण्यात आली, त्याचे काही विधायक परिणामही होत आहेत. ते दाखवण्याची कोणाला इच्छाही झालेली नाही. उदाहरणार्थ रांगा लगल्या आहेत, त्या चलनी मोटा नव्या हव्यात म्हणून. नोटांची सख्या कमी असल्याने प्रत्येकाला हव्या तितक्या नोटा मिळू शकत नाहीत. पण दुसरीकडे याच निर्णयाने रद्द झालेल्या अब्जावधीच्या नोटांचे काय झाले, त्याचा तपशील फ़ारसा सांगितला जात नाही. साडेतेरा लाख कोटी रुपयांच्या नोटा रद्द झाल्या आहेत. इतक्या नोटा आता कामाच्या राहिलेल्या नाहीत. त्यामुळेच त्या बदलून घेतल्या नाही, तर मतीमोल व्हायच्या आहेत. सहाजिकच त्या बॅन्केत जाऊन नव्या स्वरूपात ताब्यात घ्यायला हव्यात. पण त्या नोटा आल्या कुठून, त्याचा हिशोब द्यावा लागणार ही अडचण आहे, पाचपन्नास हजार रुपयांच्या नोटा घेऊन गेल्यास फ़ारशी अडचण नाही. वेळ लागेल. पण नव्या नोटा मिळतील. आज जुन्या खात्यात जमा करायच्या आणि दिडदोन महिन्यांनी नव्या घ्यायच्या. असे काही लाख कोटी रुपये आतापर्यंत जमा झालेले आहेत. ते जमा करणार्‍यांना कुठल्याही नव्या नोटा मिळू शकलेल्या नाहीत. ज्या नोटा बॅन्केत भरल्या, तितकी रक्कम खात्यात जमा झालेली आहे. एका आकडेवारीनुसार साडेतीन लाख कोटी रक्कम जमा झालेली आहे. शुक्रवारपर्यंत ती रक्कम जमा झालेली आहे. उरलेली दहा लाख कोटी रक्कम शुक्रवारपर्यंत भरली गेलेली नव्हती. जितक्या नोटा आहेत, तितक्या जमा झाल्या नाहीत, तर राहिलेल्या नोटा काळा पैसा मानता येईल. ज्यांनी भरल्या त्यांची तपासणी होईल आणि अफ़ाट रक्कम व्यवहारात येईल. त्याचा एकत्रित परिणाम अर्थव्यवस्थेवर होणार आहे. ती रक्कम व्यापार उदीमाला उपयुक्त ठरल्यास दुरगामी लाभ कोणाचा असणार आहे?

बॅन्केबाहेर रांगा लागल्यात त्यात कोण अमिर आहे? कोण काळापैसावाला आहे? असे सवाल ऐकायला चटकदार वाटतात. कारण त्यातले अर्धेही सहसा बॅन्केतकडे कधी फ़िरकणारे नाहीत. सवाल त्यांच्या तिथे ताटकळण्याचा नाही. त्यांच्यासाठी हा निर्णय झालेलाच नाही. सामान्य माणसाला थोडा त्रास होणार हे सहज लक्षात येऊ शकते. कितीही मोठी यंत्रणा कामाला लावली तरी देशातल्या प्रत्येक नागरिकाला एका आठवड्यात आधारकार्ड देता येणार नाही. मतदारयादीत सर्वांचीच नावे दाखल होत नाहीत. त्यात कुठेतरी त्रुटी रहातेच. मग साडेतेरा लाख नोटा दोनतीन दिवसात बदली करून मिळण्याची अपेक्षा कितीशी बरोबर ठरते? थोडाफ़ार त्रास होणारच. कितीही टाळायचे म्हटले तरी परिपुर्ण व्यवस्था असू शकत नाही. पण हेतू पवित्र असेल, तर थोडा त्रास काढायची तयारी राखावी लागते. भारतीय नागरिक तो त्रास काढताना दिसत आहेत. कारण त्यामागचा पवित्र हेतू त्यांना उमजला आहे. उलट त्यांच्या वतीने गळा काढणार्‍यांचे कर्तृत्व किती मोठे आहे? सर्वात पुढे दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल आहेत. गेल्या एप्रिल महिन्यात त्यांना सुप्रिम कोर्टाने दिल्लीतील प्रदुषणाला आवर घालण्यासाठी कुठले उपाय योजावेत, याचा काटेकोर आदेश दिलेला होता. त्याची किती अंमलबजावणी केजरीवाल करू शकले? एप्रिलपासून आक्टोबर उजाडला, तरी केजरीवाल नायब राज्यपाल व केंद्राशी भांडत बसले होते. पण प्रदुषण रोखण्यासाठी कोर्टाने दिलेली योजना त्यांनी हाती घेतली नाही. म्हणून आज दिल्लीत आठवडाभर शाळाही बंद ठेवाव्या लागल्या आहेत. कारण दिल्लीत आज प्रदुषित हवेत मुलांना शाळेत रस्तावर हिंडूफ़िरू देणेही प्राणघातक झाले आहे. इतका बेजबाबदार माणूस देशव्यापी योजना अल्पावधीत यशस्वी कशी झाली नाही, त्यावर सवाल उभे करतो आहे. याला बेशरमपणा सोडून दुसरा कुठला सभ्य शब्द वापरणे शक्य आहे काय? सैतानाच्या तोंडी बायबल म्हणतात, त्यातला प्रकार.

राहुल गांधी व कॉग्रेसची गोष्टच वेगळी आहे. त्यांना आता मोदींचा कुठलाही निर्णय विरोधासाठी हवा असतो. कारण त्याच्या विरोधात गदारोळ करण्याखेरीज पक्षाकडे कुठली भूमिका वा कार्यक्रम शिल्लक उरलेला नाही. मोदी सरकारने काही करावे आणि त्यामुळे आम आदमी गरीब जनतेचे कसे हाल होत आहेत, तेवढेच दाखवायला राहुलनी धाव घ्यावी, हा कॉग्रेससाठी एक कलमी कार्यक्रम झाला आहे. दिल्लीत शीला दिक्षीतांच्या वा मनमोहन सिंगांच्या कारकिर्दीत वीजेची टंचाई होती, रस्त्यावर उतरून लोक निदर्शने करीत होते, तेव्हा आपण कुठल्या जनतेच्या समर्थनाला धावलो होतो, हे राहुल सांगू शकतील काय? विविध घोटाळे चव्हट्यावर आणले जात होते तेव्हा गरीब जनतेला सुखचैनीत जगायला दिलासा मिळाला होता, असे राहुलना सांगायचे आहे काय? आयुष्यात कधी बॅन्केचे तोंड बघितले नाही, असा माणूस उठून एकेदिवशी नोटा बदलण्याच्या रांगेत येऊन उभा ठाकला, तर लोकांना काय वाटेल? विनोदीच वाटणार ना? कारण त्याचे जे चित्रण वाहिन्यांवर प्रसारीत झाले, त्यामध्ये राहुल उसने अवसान आणुन बोलत होते. पण भोवताली जमलेल्यांना तो सगळा विनोदी प्रकार वाटत होता. अनेकजण हसतखेळत गर्दीतल्या राहुलसोबत उभे राहून सेल्फ़ी घेत होते. मस्त हसत खिदळत होते. गरीबांच्या अशा त्रासलेल्या अवस्थेत फ़ोटो कसले घेता, म्हणूनही त्या उत्साहींना झापावे, इतकी बुद्धी राहुलना नसल्यावर लोकांनी हसावे की रडावे? असे लोक सामान्य माणसापाशी नव्या नोटा नाहीत आणि जुन्या नोटा रद्द झाल्याचे काहुर माजवित आहेत. त्यांनाच प्रसिद्धी देताना आपण खळबळजनक पत्रकारिता करीत असल्याने वाहिन्या खुश आहेत. मग सहासात महिन्यांनी त्याचे लाभ गरीबाला मिळाल्यावर अशा उतावळ्यांना धक्का बसणार आहे. जशी ट्रंप जिंकल्यावर अमेरिकन माध्यमे हादरली आहेत.

सारदा चिटफ़ंडात लक्षावधी लोकांनी कष्टाने कमावलेला घामाचा पैसा लुटला गेला. त्यातले लुटेरे कोण होते? त्याचा सुत्रधार फ़रारी झाला, त्याला काश्मिरात पकडण्यात आले. त्याचे सर्व भागिदार तृणमूल कॉग्रेसचे नेते आणि खुद्द ममता बानर्जीच संशयित आहेत. तेव्हा आपल्या आयुष्याची कमाई मातीमोल झाली म्हणून धाय मोकलून टाहो फ़ोडणार्‍या कुणाचे अश्रू पुसायला ममता गेल्या होत्या काय? आज रांगेत ताटकळणार्‍यांना आणखी दोन आठवड्यांनी हा होईना नोटांचे मूल्य मिळणार आहे. त्याची फ़िकीर करण्याचे कारण नाही. पण सारदा चिटफ़ंड म्हणून ममताच्या आशीर्वादाने लोकांचे अब्जावधी रुपये हडपले गेले, त्यातली कवडीही दोन वर्षे उलटून गेल्यावर सामान्य गरीबाला मिळू शकलेली नाही. त्यांच्यापाशी त्या चिटफ़ंडाचे प्रमाणपत्र नावाचा एक कागद फ़क्त उरला आहे. अशा लक्षावधी लोकांनी आक्रोश केला त्यावर गप्प बसलेल्या ममतांना आज कंठ फ़ुटला आहे. उशीरा पैसे मिळणार म्हणून चिंता वाटते आहे. किती म्हणून शहाजोगपणा असावा? हा अशा लोकांचा चेहरा आहे. त्यामुळे दिशाभूल करण्यात त्यांनी आपली शक्ती पणाला लावली आहे. मात्र त्याचवेळी साडेतेरा लाख कोटी रुपयांपैकी किती कोटी बॅन्केत जमा झाले आहेत, त्याविषयी बोलायचे यातला प्रत्येकजण टाळतो आहे. कारण तीनचार लाख कोटी रुपये जरी अशा रितीने जमा झाले, तरी बाजारातल्या काळ्यापैशाला मोठाच पायबंद घातला जाणार आहे. तेच मान्य करायचे कर मोदी सरकारचे यश मान्य करावे लागेल. म्हणून मग दिशाभूल करण्यासाठी बॅन्केपुढे रांगेत उभे असलेल्या सामान्य माणसांच्या त्रासाचे भांडवल केले जात आहे. आणखी दोन आठवड्यात पुरेशा नोटा लोकांच्या हाती आलेल्या असतील आणि त्यातून चलनवलन सुरू झालेले असेल. मात्र दरम्यान अब्जावधी रुपये काळ्याबाजारातून बाद झाल्याने पडलेला फ़रक लोकांच्या अनुभवास येणार आहे. तेव्हा अशा टिकाकार विरोधकांचा चेहरा बघण्यासारखा झालेला असेल.

3 comments:

 1. भाऊ तुमचे म्हणणे शंभर टक्के खरे ठरो हीच इच्छा आहे . पण तसे न झाल्यास मोदींना जड जाईल पुढे .

  ReplyDelete
 2. आज व्हॉट्सैपवर आलेला विनोद, राहुल वगैरे सर्वांना लागू

  मोदी - हे पार्थ,बाण चलाओ!

  अमित शाह- परन्तु किस पर चलायें प्रभु?

  मोदी - पार्थ…तुम सिर्फ बाण चलाओ…केजरीवाल खुद उछल के बीच में आ जाएगा |

  ReplyDelete