Tuesday, November 8, 2016

शिरपेचात नवा तुरा

rahul prashant kishore के लिए चित्र परिणाम

सोमवारी कॉग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली आणि त्यात पक्षाध्यक्षा सोनिया गांधी सहभागी होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनाच बैठकीची अध्यक्षता करावी लागली. तेही स्वाभाविक आहे. कारण मागले वर्षभर तरी पक्षाचे नेतृत्व राहुलच करीत आहेत आणि प्रत्येक काही महिन्यांनी आता त्यांच्याकडेच अध्यक्षपद सोपवले जाणार, अशी बातमी येत असते. मात्र तशी वेळ जवळ आली मग राहुलचे अध्यक्षपद लांबले, अशा बातम्या सुरू होतात आणि विषय अडगळीत जाऊन पडतो. सोनियांनी कॉग्रेसचे अध्यक्षपद दिर्घकाळ भूषवून एक विक्रम केलेलाच आहे. आता राहुल गांधी बहुधा दिर्घकाळ अध्यक्षपदाच्या प्रतिक्षेतले उपाध्यक्ष, असा काही विक्रम प्रस्थापित करतील असे दिसते. तसे बघायला गेल्यास राहुलनी मागल्या पाचसहा वर्षात अनेक विक्रम साध्य केलेले आहेतच. पक्षात त्यांच्यासाठी प्रथमच उपाध्यक्षपद निर्माण झाले. इंदिराजी, संजय वा राजीव किंवा सोनिया यांच्यासाठी असे कुठले पद पक्षाने कधी निर्माण केले नव्हते. पण राहुलसाठी तसे पद निर्माण करण्यात आले आणि अन्य कोणी उमेदवार नसल्याने त्यांचीच तिथे नेमणूक करण्यात आली. सोनिया गांधींनी १९९८ सालात पक्षाची सुत्रे आपल्या हाती घेतली आणि प्रथमच कॉग्रेसला तोपर्यंतच्या सर्वात कमी जागा १९९९ सालात मिळवून देण्य़ाचा विक्रम केला होता. पण २०१४ सालात पक्षाची प्रचारधुरा राहुलनी हाती घेतली आणि पक्षाला थेट ४४ जागांपर्यंत खाली आणून ठेवण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला. त्यामुळेच राहुल हे कॉग्रेसच्या इतिहासात नवनवे विक्रम प्रस्थापित करणारे नेते अशीच इतिहासाला नोंद घ्यावी लागेल. सध्या त्यांनी उपाध्यक्ष म्हणून जसा पक्ष चालविला आहे. त्यात नवा बळी घेण्याचाही एक विक्रम स्थापित होण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे. तो बळी आधुनिक चाणक्याचा असेल.

गेल्या लोकसभा निवडणूकीत आजवरच्या तमाम राजकीय अभ्यासकांना व विश्लेषकांना धक्का देत, प्रशांत किशोर नावाचा नवा चाणक्य भारतीय राजकारणात अवतरला होता. मोदींनी भाजपाला बहूमत मिळवून देईपर्यंत प्रशांत किशोरचे नाव कुणाच्या खिजगणतीमध्ये नव्हते. पण मोदींच्या एका हातात भारतीय जनता पक्ष व संघाची संघटना होती. तर दुसर्‍या बाजूला प्रशांत किशोर याचे नवे आधुनिक कल्पक प्रचारतंत्र होते. त्यात मोदींचा दबदबा वाढू लागल्यावर कॉग्रेस गडबडून गेली होती. अशाच एका प्रसंगी कॉग्रेसचे बुद्धीमान नेते मणिशंकर अय्यर यांनी ‘वोह चायवाला’ अशा हेटाळणीयुक्त शब्दात मोदींची टिंगल केली होती. तेच सुत्र पकडून प्रशांतने मोदींच्या देशव्यापी ‘चायपे चर्चा’ योजल्या होत्या. अतिशय नव्या व वेगळ्या प्रचारतंत्राचा वापर करून प्रशांत किशोरने लोकसभा निवडणूकीचे चित्र पालटून टाकले होते. मग वर्षभरातच आलेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणूकीत त्याने केजरीवाल यांनाही मदतीचा हात दिला होता. तिथेही भाजपाच्या संघटनेला व प्रचाराला दणका देऊन प्रशांतने आम आदमी पक्षाला मोठे बहूमत मिळवून दिले होते. ‘पाच साल केजरीवाल’ ही त्याचीच घोषणा होती असे म्हणतात. पण नंतर त्याने बिहारच्या निवडणूकीत नितीशकुमार व लालूंना साथ देण्याचा पवित्रा घेतला आणि ती त्याची खरी कसोटी होती. कारण तेव्हाही मोदीलाट अस्तित्वात होती आणि त्यावरच स्वार होण्याचा अमित शहा व भाजपा यांचा मनसुबा प्रशांतने उधळून लावला होता. त्याच्या तालावर लालू व नितीश नाचले आणि भारतीय राजकारणाला नव्या चाणक्याची ओळख झाली होती. कारण बदनाम लालू व निराश नितीश ,यांना एकत्र आणून प्रशांतने भाजपाला मतदानात शह देऊन दाखवला होता. त्यामुळेच प्रथम पंजाबचे कॉग्रेसनेते अमरिंदर सिंग यांनी प्रशांतला हातशी धरले आणि तिथून त्याचे व राहुलचे साटेलोटे जमले.

पंजाब बाजूला पडला आणि उत्तरप्रदेशात नव्याने कॉग्रेसला संजीवनी देण्याचे कंत्राट प्रशांतने घेतले. तीनशे कोटी रुपये देऊन कॉग्रेसने त्याच्यावर जबाबदारी सोपवल्याचे म्हटले गेले. दोनतीन महिने खपून प्रशांतने उत्तरप्रदेशातील कॉग्रेस संघटना व एकूण राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. मात्र त्याच्याशी स्थानिक वा ज्येष्ठ कॉग्रेस नेते सहकार्य करीत नसल्याच्या बातम्या येत राहिल्या. प्रथम त्याने या राज्यात कॉग्रेसने ब्राह्मण चेहरा मुख्यमंत्रीपदासाठी पुढे करण्याचा सल्ला दिला. त्यासाठी त्याने राहुल वा प्रियंका गांधींचे नाव जाहिर करण्याचा आग्रह धरला होता. प्ण नेहरू खनदानात पंतप्रधानच जन्माला येतात, अशी ठाम श्रद्धा असलेल्या कॉग्रेसी नेतृत्वाने त्याचा सल्ला फ़ेटाळून लावला आणि तिथूनच त्याच्या चाणक्यगिरीला शह मिळू लागला. अखेर तडजोड म्हणून दिल्लीतून निवृत्त झालेल्या शीला दिक्षीतना मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार म्हणून पुढे करण्यात आले. तर उत्तरप्रदेशात राहुलची दिर्घकालीन किसानयात्रा काढायची कल्पना राबवली गेली. चारपाच हजार मैल प्रवास करणारी ही यात्रा, मोठ्या गावात खाटचर्चा करणार होती. पण पहिल्याच अशा खाटचर्चेच्या शेवटी जमलेल्या गर्दीने खाटाच पळवून नेल्या आणि पुढल्या प्रत्येक खाटसभेत त्याचीच पुनरावृत्ती होत गेली. सहाजिकच किसानयात्रेला मिळणार्‍या प्रतिसादापेक्षाही खाट पळवणारा जमाव ,हाच बातमीचा विषय होऊन गेला. मग त्या यात्रेचा पुरता बोजवारा उडाला. तरीही अनेक तडजोडी करीत प्रशांतने कल्पकता राबवली. पण ज्येष्ठ जुन्या कॉग्रेस नेत्यांना हा नवा चाणक्य पचवता आला नाही आणि आता तर त्यालाच हाकून देण्याचा विचार पक्षात बळावला असल्याचे म्हटले जाते. ते कितपत खरे आहे ठाऊक नाही. पण पक्षाचे राजकीय निर्णय परस्पर प्रशांत घेऊ लागल्याने नेते व प्रशांत यांच्यात बेबनाव निर्माण झाल्याचे म्हटले जात आहे.

किसानयात्रेचा बोजवारा उडाला आणि समाजवादी पक्षात भाऊबंदकी निर्माण झाल्याने, उत्तरप्रदेशी राजकारणाला वेगळेच वळण लागले आहे. त्यामुळे भाजपाला हरवणे तर कठीण झाले आहेच. पण स्वबळावर कॉग्रेस उभी करणे असंभव होऊन गेले आहे. अशा स्थितीत मुलायम बिहार पद्धतीने महागठबंधन करण्याच्या विचारात असल्याचे कळताच, प्रशांत किशोरने त्यांची थेट भेट घेतल्याची बातमी आली. अशा महाआघाडीत कॉग्रेसही सहभागी होणार असल्याच्या बातम्यांनी ज्येष्ठ कॉग्रेस नेते विचलीत झाले. आपल्याला कल्पनाही न देता प्रशांत परस्पर मुलायमना भेटायला गेल्याने कॉग्रेसच्या गोटात संताप निर्माण झाला आणि त्यातूनच आता प्रशांतला डच्चू देण्याचा विचार होत असल्याचे वृत्त आहे. अर्थात त्यामुळे प्रशांतचे कुठले आर्थिक नुकसान होणार नाही. पण त्याने मोदींना दैदिप्यमान यश मिळवून देत आणि त्यानंतर बिहारमध्ये भाजपाला दणका देऊन संपादन केलेली प्रतिष्ठा मात्र धुळीस मिळणार आहे. कारण उत्तरप्रदेशात कॉग्रेसला सत्ता नाही तरी चांगले यश त्याने मिळवून द्यावे, अशी किमान अपेक्षा होती. पण त्याच्या सर्व कल्पकता किंवा रणनितीचा राहुलनी पुरता बोर्‍या वाजवला आहे. मात्र त्याचे खापर प्रशांत किशोरवर फ़ोडले जाणार आहे. खरेतर त्याने ही जबाबदारी घेण्यापुर्वी देशातील त्या मोठ्या राज्यात कॉग्रेसची असलेली दुर्दशा विचारात घ्यायला हवी होती. मोदींना यश मिळवून देताना संघाची शक्ती पाठीशी होती आणि बिहारमध्ये रणनिती आखताना नितीश-लालूंच्या किमान काही संघटनेचे पाठबळ पाठीशी उभे होते. कॉग्रेसपाशी कुठलेच संघटन नाही की कार्यकर्ते नसतील, तर रणनिती काय उपयोगाची? तिथेच प्रशांत किशोर फ़सला आणि त्याच्या अब्रुचे धिंडवडे निघणार आहेत. कॉग्रेससारख्या शतायुषी पक्षानंतर एका आधुनिक राजकीय रणनितीकाराला मातीमोल करण्याचा नवा विक्रम मात्र राहुल गांधींच्या खात्यात जमा होणार आहे.

2 comments:

  1. मुळात कॉग्रेसला काही नवीन विचारसरणी पचनी पडणे शक्यच नाही.

    ReplyDelete