Wednesday, November 2, 2016

निर्लंज्जम सदासुखी

gajendra singh suicide के लिए चित्र परिणाम

एक पद एक निवृत्तीवेतन हया मागणीसाठी दिर्घकाळ माजी सैनिकांनी लढा दिलेला आहे. त्यासाठी अनेक वर्षे सरकार दरबारी दाद मागितली होती. पण पन्नास वर्षे सत्ता हाती असूनही कॉग्रेस वा राहुल गांधी कधी अशा आंदोलकांची दादफ़िर्याद घेण्य़ासाठी तिकडे फ़िरकले नाहीत. मग सत्ता गमावल्यावर त्यांनी अशाच एका आंदोलनाच्या वेळी जंतरमंतर येथे धरण्याला भेट दिली होती. पण त्यांना तिथल्या व्यासपीठावर चढू देण्यास आंदोलकांनी नकार दिला आणि मान खाली घालून त्या वेडपट माणसाला तिथून काढता पाय घ्यावा लागला होता. पण कसलीच समज नसलेली माणसे असेच सगळीकडून जोडे खात फ़िरत असतात. मध्यंतरी उत्तरप्रदेशात किसानयात्रा चालू असताना सीमेवर सर्जिकल स्ट्राईक झाला आणि दोन दिवसांनंतर राहुलनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिले चांगले काम केल्याची ग्वाही देत अभिनंदन केले होते. पण अभिनंदन, टिका किंवा आरोप अशा कुठल्याही गोष्टीतला फ़रक उमजत नसल्याने, पुढल्या दोन दिवसात त्याच राहुलनी मोदींवर सर्जिकल स्ट्राईकद्वारे खुनकी दलाली करीत असल्याचाही आरोप केला होता. अशा माणसाकडून शतायुषी पक्षाला अवेळी मरण येण्यापलिकडे काहीही साधले जाऊ शकत नाही. म्हणूनच त्यांनी आणखी एका जागी धाव घेतली. दोन दिवसांपुर्वी माजी सैनिकांच्या अशाच एका धरण्यात सहभागी झालेल्या एका निवृत्त जवानाने निवृत्तीवेतनातील समानतेसाठी संरक्षणमंत्र्यांना पत्र लिहून आत्महत्येचे पाऊल उचलले. त्याची खबर लागताच राहुल तिथेही जाऊन पोहोचले. अर्थात त्यातूनही प्रसिद्धी पदरात पडण्य़ापलिकडे त्यांना काहीही साध्य करायचे असणार नाही, हे उघड आहे. पण त्यांचा बुरखा मृत जवानाच्या पुत्रानेच फ़ाडला. कृपया आपल्या पित्याच्या मरणाचे राजकीय भांडवल करू नका, असे तो पुत्र म्हणाला. त्याचा अर्थ राहुलनी खुन की दलाली करू नये असाच होतो ना?

आता थोडे इतरही संदर्भ तपासून बघुया. दोनच दिवसांपुर्वी मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ येथे तुरूंग फ़ोडून आठ अतिरेकी जिहादींनी पलायन केले होते. त्यासाठी त्यांनी तिथे पहार्‍यावर असलेल्या रमाशंकर यादव नावाच्या शिपायाचा गळा चिरून खुन पाडला. भिंत पार करून ते फ़रारी झाले. मग या फ़रार कैद्यांचा शोध सुरू झाला आणि भोपाळपासून जवळच असलेल्या एका गावात दडी मारून बसलेल्या आठही जणांना पोलिसांनी एका चकमकीत कंठस्नान घातले. मग त्या आठजणांना पोलिसांनी खोट्या चकमकीत ठार मारल्याचा आक्रोश राहुलच्या कॉग्रेस पक्षानेच सुरू केला. पण त्याच घटनेत गळा चिरून मारल्या गेलेल्या पोलिस शिपायासाठी दोन अश्रू ढाळले नव्हते. आठ जिहादी मारेकर्‍यांसाठी आकांत करणार्‍या राहुलनी भोपाळला जाऊन त्या रमाशंकर यादवच्या आप्तस्वकीयांचे सांत्वन केले का? मरणार्‍या सैनिक पोलिस शिपायांविषयी इतकीच सहानुभूती असेल, तर आत्महत्या करणारा जवान आणि अतिरेक्यांच्या हल्ल्यात मारला गेलेला जवान, यात फ़रक पडू शकत नाही. पण राहुल, कॉग्रेस वा तमाम सेक्युलर लोकांना त्यातही फ़रक दिसतो. ज्याचे राजकीय भांडवल करून प्रसिद्धी मिळवता येते, अशाच आत्महत्या किंवा हत्याकांडाविषयी या लोकांना सहानुभूती असते. रमाशंकर यादवचा गळा चिरला असला तरी त्याच्या आप्तस्वकीयांचे सांत्वन करून यादवांची मते मिळण्याची शक्यता नसते. म्हणून राहुल तिकडे फ़िरकत नाहीत. पण त्यालाच ठार मारणार्‍या आठ जिहादींसाठी आक्रोश करतात. कारण ते मुस्लिम असतात आणि त्यांच्यासाठी मातम केल्यास मुस्लिमाची मते कॉग्रेसला मिळू शकतील, अशी अपेक्षा असते. याला खुनकी दलाली म्हणतात. कधी आपल्या पिता वा आजीच्या हौतात्म्याची दलाली राहुल करतात, कधी ते आत्महत्या करणार्‍या जवानाच्या मृत्यूचे भांडवल करायला पुढे सरसावतात.

राहुल वा कॉग्रेसवाले परवडले असे म्हणायची पाळी आजकाल आम आदमी पक्षाच्या भुरट्यांनी आणली आहे. राहुलच्या पाठोपाठ त्या जवानाच्या कुटुंबाचे सांत्वन करून राजकीय लाभ उठवायला दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष शिसोदिया तिथे पोहोचले. या दोघांनाही पोलिसांनी मृतदेह असलेल्या इस्पितळात घुसू दिले नाही. कारण अशा भुरट्यांना आपल्या पित्याच्या मृत्यूचे राजकीय भांडवल करू देण्याचा त्या कुटुंबियांनाच राग आलेला होता. यातले शिसोदिया म्हणजे बेशरमपणाचा जगावेगळा नमूना आहे. दोन महिन्यापुर्वी अवघी दिल्ली न्युमोनिया व स्वाईनफ़्लूच्या साथीने बेजार झालेली होती. तेव्हा आपली जबाबदारी झटकून हा माणूस युरोपच्या दौर्‍यावर भटकत होता. इथे लोकांना औषधे व उपचार मिळत नसताना त्यांना वाचवण्याची त्याला गरज वाटली नाही. आपल्या कर्तव्यावर लाथ मारून मौजमजा करणारा हाच माणूस, आज माजी जवानाच्या न्यायाचे नाटक रंगवायला इस्पितळात पोहोचला होता. पण प्रत्यक्षात आपलाच गजेंद्र सिंग नावाचा एक सहकारी जंतरमंतर येथील एका झाडाला लटकून आत्महत्या करीत असताना, शिसोदियांनी काय केले होते? व्यासपीठावरून केजरीवाल शिसोदिया भाषणे करीत होते आणि गजेंद्र सिंगाने आपल्या मानेभोवती गळफ़ास लावला होता. तो झाडाला लटकून तडफ़डत होता. तर भाषणे थांबवून त्याला वाचवण्यासाठी यापैकी एकाही आम आदमी पक्षाच्या नेत्याने धाव घेतली नव्हती, ते आरामात व्यासपीठावरून तो मृत्यूचा तमाशा बघत भाषणे करीत होते आणि त्यांचे इतर सहकारी टाळ्या पिटत व घोषणा देत आत्महत्येला प्रोत्साहन देत होते. असा हा माणूस आज माजी जवानाच्या आत्महत्येसाठी भारत सरकारला जाब विचारतो आहे. माणसाने किती म्हणून बेशरम असावे ना? यापैकी किती आपनेत्यांची गजेंद्र सिंगच्या कुटुंबाला भेटण्याची हिंमत झालेली होती?

त्या आत्महत्येनंतर वाहिनीवर बोलताना आप प्रवक्ता आशुतोष याच्याकडे शब्द नव्हते. तो ढसढसा रडला होता. मग मुख्यमंत्री केजरीवाल यांनी गजेंद्रच्या कुटुंबाला भरपाई म्हणून पाचदहा लाख रुपये भरपाई देऊ केलेली होती. पण त्याच गजेंद्राच्या बहिणीने केजरीवाल शिसोदियांना केलेल्या सवालाचे उत्तर हे बेशरम लोक आजवर देऊ शकलेले नाहीत. ती भगिनी म्हणाली होती. ‘तुम्ही देत आहात त्याच्या दुप्पट भरपाई आम्ही कुटुंबातर्फ़े तुम्हालाच उलटे देतो. आमच्यासाठी एकच काम करा. तुम्ही गळफ़ास लावून लटकून दाखवा. आम्ही तुम्हाला दुप्पट भरपाई देऊ’. शिसोदिया तिला अजून उत्तर देऊ धजावलेले नाहीत. आज असा बेशरम माणूस जवानाच्या कुटुंबाला सहानुभूती दाखवायला धाव घेतो, हा भारतीय राजकारणातला व सार्वजनिक जीवनातल्या निर्लज्जपणाचा कळस आहे. सामान्य माणसाची स्मरणशक्ती दुबळी असते, याची यांना इतकी खात्री आहे, की आत्महत्या, हत्याकांड किंवा घातपाताचीही दलाली करण्याची त्यांना लाज वाटेनाशी झाली आहे. तसे नसते तर जवानाच्या आत्महत्येसाठी असला तमाशा करायला हे लोक तिथे इस्पितळात पोहोचले नसते. त्यापैकी एकालाही भोपाळच्या रमाशंकर यादवच्या कुटुंबाचे सांत्वन करायची गरज वाटली नाही. पण त्याचा खुन पाडणार्‍यांच्या हत्येसाठी त्यांनी शोकसभा भरवायची बाकी ठेवली आहे. मात्र दिल्लीत त्यांनी मुखवटा बदलून सैनिकाच्या आत्महत्येसाठी आक्रोशाचे नाटक रंगवले आहे. जितकी अशी नाटके सातत्याने रंगवली जातील, तितके असे लोकच उघडे पडत जाणार आहेत. ताज्या घटनेत मृत जवानाच्या पुत्रानेच त्यांना चपराक लगावली आहे. आपल्या पित्याच्या मृत्यूचे राजकारण करू नका, हे त्या पिडीत मुलाचे शब्द त्यांना कळणार नाहीत आणि कळले तरी उपयोग नाही. कारण दलाल बेशरम असतात. लोकलज्जेशी त्यांना कुठले कर्तव्य असणार ना?

4 comments:

 1. निर्लज्जः सदा सुखी असे हवे

  ReplyDelete
 2. हाराम खोरांची टोळी

  ReplyDelete
 3. भाऊ, अप्रतिम...
  हॉस्पिटल मधील कॉग्रेसचे उपाध्यक्षांची विधाने ऐकून जाणवले की त्यांना विषयाची माहितीच नव्हती...व तेथे तथ्यहिन विधाने केलीत...

  ReplyDelete