Thursday, November 24, 2016

अमेरिकेनंतर फ़्रान्स?

marine le pen के लिए चित्र परिणाम

अमेरिकेतल्या निवडणूकीचे निकाल लागलेले आहेत अणि तिथे उजव्या विचारसरणीचा प्रभाव असलेले डोनाल्ड ट्रंप विजयी झालेले आहेत. मग पुढे आपले भवितव्य काय अशी चिंता डाव्या किंवा उदारमतवादी गटाला सतावते आहे. उजवे म्हणजे जातियवादी वा धर्मांध अशी आपल्याकडे ज्यांची संभावना नित्यनेमाने होत असते असे लोक किंवा पक्ष. निकाल लागल्यावर अमेरिकेत प्रथमच निवडून आलेल्या अध्यक्षाच्या विरोधातली निदर्शने काही काळ चालू राहिली. पण आठवडाभर संपण्याच्या आत त्यातला उत्साह मावळला आहे. आता डेमॉक्रेट पक्षाचे भवितव्या काय अशी चिंता सर्वांना भेडसावते आहे. दिर्घकाळ हिलरी व ओबामा यांच्या भोवती घोटाळलेल्या त्या पक्षाला आता चार वर्षात नवे नेतृत्व उभे करावे लागणार आहे. कारण समोर ट्रंप यांच्यासारखा धश्चोट अध्यक्ष उभा आहे. पण हा विषय अमेरिकेपुरता राहिलेला नाही. ट्रंप यांच्या यशाने युरोपमध्ये नवी लाट उसळली आहे. गेली चार दशके तिथे प्रस्थापित असलेल्या उजव्या डाव्या मध्यममार्गी राजकारणाची घसरगुंडी होताना दिसते आहे. प्रामुख्याने डाव्या मानल्या जाणार्‍या पक्ष व नेत्यांनी अतिरेकी डाव्या भूमिका घेऊन मवाळ मध्यममार्गी उजव्यांना नामोहरम करून टाकण्यासाठी अति उजव्यांना मदत केलेली आहे. त्याचा परिणाम आता स्पष्टपणे दिसू लागला आहे. कारण पाच वर्षापुर्वी नाही इतका प्रतिसाद आज या अति उजव्या पक्षांना व नेत्यांना मिळताना दिसते आहे. अगदी स्पष्ट शब्दात सांगायचे तर अति उजवे म्हणजे गोर्‍या वंशवादाचे आग्रही व वर्णवादी असेही म्हणायला हरकत नाही. निर्वासितांच्या वाढत्या मोकाट गर्दीने सामान्य जनतेला त्यांच्या बाजूला ढकलण्यास मदत केली आहे. त्यातून वर्णवादाचा नवा राष्ट्रवाद जन्माला येतो आहे. कदाचित येती निवडणूक त्याच वर्णवादी पक्षाला जिंकणे शक्य होईल अशी भिती फ़्रान्सच्या विद्यमान पंतप्रधानांना भेडसावते आहे.

फ़्रान्समध्ये स्पष्ट बहूमताने अध्यक्ष निवडला जातो, त्यासाठी दोन फ़ेर्‍यांमध्ये मतदान होत असते. पहिल्या फ़ेरीत सर्व उमेदवार आपले नशिब आजमावत असतात. त्यात जे पहिल्या दोन क्रमांकावर येतील, त्यांच्यात दुसर्‍या फ़ेरीचे मतदान होते. त्यात पन्नास टक्केहून अधिक कौल मिळवेल तोच अध्यक्ष म्हणून निवडला जातो. गेल्या वेळी उजव्या पक्षाचे निकोलाय सारकोझी अध्यक्ष होते आणि त्यांची फ़ेरनिवड होऊ शकली नाही. त्यांच्या जागी समाजवादी पक्षाचे ओलंदे निवडून आलेले होते. पण दुसर्‍या फ़ेरीत त्यांनी बाजू मारली होती. पहिल्या फ़ेरीत पहिल्या तीन उमेदवारात सारकोझी आणि ओलंदे यांच्यात फ़क्त एकदिड टक्का इतकाच मतांचा फ़रक होता. पण तिसर्‍या क्रमांकावर असलेल्या मरीन ली पेन यांना लक्षणिय मते मिळालेली होती. ओलंदे यांना २८ टक्के तर ली पेन यांना १८ टक्के मते होती. सध्या ज्या मतचाचण्या घेतल्या जात आहेत त्यात पेन यांना २५ टक्के मते मिळताना दिसत आहेत आणि दिवसेदिवस त्यांची लोकप्रियता वाढते आहे. त्यांनी अतापासूनच आपली उमेदवारी घोषित केलेली आहे. थोडक्यात गेल्या खेपेस झालेल्या मतांच्या तुलनेत बघितल्यास २५ टक्के मतांच्या आसपास पहिल्या फ़ेरीत जाणारा उमेदवार विजयाच्या निर्णायक फ़ेरीत पोहोचत असतो. त्यामुळेच ली पेन यांना निर्णायक दुसर्‍या फ़ेरीत पोहोचण्याची खात्री वाटू लागली आहे, निर्वासितांच्या लोंढ्यामुळे संपुर्ण युरोपीयन देशात जी सार्वत्रिक नाराजी पसरलेली आहे, त्याचे पडसाद सर्वत्रच उमटत आहेत, त्यात पुढाकार घेणार्‍या जर्मनीच्या एंजेलो मरकेल यांच्या पक्षाला बालेकिल्ला मानल्या जाणार्‍या प्रांतातच स्थानिक निवडणूकीत दणका बसला आहे. त्यानंतर त्यांनीही निर्वासितांबद्दल आस्था दाखवणे कमी केले आहे, फ़्रान्सच्या ली पेन त्याच लाटेवर स्वार होऊन अध्यक्ष होण्याची स्वप्ने बघत आहेत.

फ़्रान्सच्या ली पेन वा हॉलंडचे विल्डर्स अशा अनेक नव्या पिढीच्या नेत्यांनी उघडपणे मुस्लिम विरोधी पवित्रा घेतलेला आहे. गेली कित्येक वर्ष युरोपच्या विविध देशात निर्वासित वा स्थलांतरीत म्हणजे मुस्लिमांच्या वाढत्या संख्येविषयी नाराजीचे नेतृत्व आरंभलेले आहे. त्यांच्यावर वंशवादाचे व धर्मांधतेचे आरोप होत राहिले व त्यापासून पारंपारिक उजवे पक्षही दूर रहात गेले. पण त्यामुळेच आरंभी क्षीण असलेला अशा नेतृत्वाचा प्रभाव वाढत गेला आहे आणि त्यांना थांबवणे अशक्य झालेले आहे, डाव्या समाजवादी विचारांच्या लोकांकडून कोणी देशभक्ती वा राष्ट्रभक्तीची अपेक्षा करत नाही. पण उजवे मवाळही त्यांच्याच पंक्तीत जाऊन बसू लागल्याने हा नवा राजकीय पर्याय बहुतांध युरोपियन देशात उदयास येत गेला. त्यांना पाठींबा देणारे सगळेच सरसकट वंशवादी किंवा वर्णवादी नाहीत. पण वाढत्या स्थलांतरीत निर्वासित मुस्लिम संख्येमुळ आपण मायदेशातच उपरे होण्याची भिती ज्यांना सतावू लागली असा जनसमुदाय त्यांच्या बाजूला झुकत गेला आणि या अति उजव्यांचे बळ वाढत गेले आहे. त्याला शह देण्याचे अकम प्रस्थापित मवाळ उजव्यांनी केले असते आणि डाव्या पक्षांनी इस्लामची खुशमस्करी केली नसती, तर हा तटस्थ युरोपियन समाज एकाएकी दुसर्‍या टोकाला जाऊ शकला नसता. दुसर्‍या महायुद्धातील वंशवादाचे चटके सोसल्याने ह्या विविध देशातील समाज वंशवादापासून दुरावलेला होता आणि त्या पठडीत बसणार्‍या पक्षांना फ़ारसे स्थान राहिलेले नव्हते. पण मध्यंतरीच्या निर्वासित मुस्लिमांचे लोंढे आणि त्याच्याही आधीपासून वैध मार्गाने आलेल्या मुस्लिमांनी घातलेला धुमाकुळ यांनी सरसामान्य युरोपियनाला आपल्या अस्तित्वाची भिती निर्माण केली. ती ओळखण्यात डावे व उजवे पक्ष कमी पडले आणि पर्याय म्हणून अती उजव्यांना संधी मिळत गेली. ली पेन त्यांचेच नेतृत्व करतात.

आगामी मे महिन्यात फ़्रान्सची अध्यक्षीय निवडणूक व्हायची असून त्यात विद्यमान फ़्रेंच पंतप्रधान मॅन्युएल वाल्स इच्छुक उमेदवार आहेत, ते समाजवादी असून त्यांना ली पेन दुसरी फ़ेरी नक्की गाठू शकतील असे वाटते. अर्थात उजव्या मवाळ पक्षाचे माजी राष्ट्राध्यक्ष निकोलाय सारकोझी यांनी आपली इच्छा जाहिर केली आहे. तेही लढतीमध्ये असतील. पण यात प्रस्थापित पक्षांना मागे टाकून ली पेन यांनी दुसरी फ़ेरी गाठली तर चिंतेचा विषय आहे. कारण दिवसेदिवस फ़्रेंच समाजाची दुहेरी विभागणी होत चालली आहे. विचारसरणी बाजूला पडून भणंग मुस्लिम निर्वासितांचा हा फ़्रान्समध्ये निवडणूकीचा विषय बनत चालला आहे. त्यात ट्रंप यांच्याप्रमाणे टोकाची भूमिका घेण्याची हिंमत डावे दाखवू शकत नाहीत, ही बाब स्पष्ट आहे. पण किमान उजवे मवाळ म्हणून सारकोझी तरी मुस्लिम निर्वासित आवरा म्हणायला पुढे सरसावले नाहीत, तर ली पेन यांचा मार्ग सोपा होणार आहे. हिलरी व अन्य उदारमतवाद्यांनी अमेरिकेत जसा राष्ट्रवादाची खिल्ली उडवली, तशीच फ़्रेंच डाव्यांनी भूमिका घेतली आणि उजवे मवाळ त्याला चोख उत्तर देऊ शकले नाहीत, तर ली पेन सहज निवडून येऊ शकतील. तो त्यांच्या अतिरेकाला जनतेचा पाठींबा असणार नाही तर प्रस्थापित पक्षांच्या नेभळटपणाचा व धरसोडवृत्तीचा परिणाम असेल. निर्वासितांमुळे स्थानिकांचे जगणे असहाय झाले आहे, ही वस्तुस्थिती नाकारण्याने ली पेन यांचे पारडे आधीच जड केले आहे. ट्रंप यांच्या विजयाने त्यांच्या समर्थकांना चालना मिळालेली आहे. त्यात डाव्यांनी अतिरेकी मुर्खपणा करून राष्ट्रवादी खिल्ली उडवली तर फ़्रान्सचा आगामी अध्यक्ष वंशवादी असेल आणि तिथून मग अवघ्या युरोपमध्ये मुस्लिम विरोधी वंशवादी राजकारणाला प्राधान्य मिळण्याची प्रक्रीया वेगाने आरंभ होईल. त्याचे पाप डाव्या अतिरेकाच्या माथी असेल.

No comments:

Post a Comment