Monday, November 14, 2016

वॉशिंग्टन डीसीचा पराभव

CNN hillary के लिए चित्र परिणाम

सामान्य माणसाच्या जीवनात राजकारणाचे स्थान प्रतिकात्मक असते आणि तथाकथित अभिजनांच्या जीवनात प्रतिकांना वास्तवाचे स्थान असते. त्यामुळेच अमेरिकन राजकारणात डोनाल्ड ट्रंप यांचा झालेला विजय, किंवा हिलरी क्लिंटन यांचा झालेला पराभव; हा प्रतिकात्मक आहे. त्यात एका प्रतिकासाठी दुसर्‍या प्रतिकाचा मतदाराने पराभव केला आहे. हिलरी ही एका पक्षाची उमेदवार नव्हती, तर ती एका मुजोर अशा प्रस्थापित वर्गाची प्रतिक वा उमेदवार होती. हिलरी म्हणजे १९९२ ते २००० पर्यंत अमेरिकेचे अध्यक्ष असलेल्या बिल क्लिंटन यांची पत्नी होय. तेव्हापासूनच अध्यक्षपदाची महत्वाकांक्षा हिलरी बाळगून होत्या. मात्र तात्काळ त्यांना ती निवडणूक लढवणे शक्य नसल्याने, त्यांना थोडे थांबावे लागले. मग बुश यांच्या जमान्यात त्यांनी सिनेटर होऊन आपली स्वतंत्र वाटचाल सुरू केली, तरी त्यांची राजकीय पुंजी बिल क्लिंटन यांची पत्नी इतकीच होती. २००८ मध्ये त्यांनी अध्यक्षीय उमेदवारी आरंभली, तेव्हा अखेरच्या क्षणी त्यात बराक ओबामा या तरूण कृष्णवर्णिय नेत्याने उडी घेतली. त्यामुळे हिलरीना पक्षातच मोठे आव्हान उभे राहिले. मात्र त्यावर मात करता आली नाही, म्हणून त्यांना आणखी आठ वर्षे प्रतिक्षा करावी लागली. २००८ सालात ओबामा अध्यक्ष झाले आणि पुढल्या वेळी त्यांनाच उमेदवारी निश्चीत असल्याने, २०१६ पर्यंत हिलरींना कळ काढावी लागली होती. मात्र त्यात हिलरीनी उडी घेतल्यापासून पतिदेव क्लिंटन यांच्यासह तमाम वॉशिंग्टन गोटाने त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केलेले होते. ही अमेरिकन राजधानी सर्व ताकदीनिशी हिलरींना अध्यक्ष म्हणून निवडून आणायला सज्ज झालेली होती. आपल्या तालावर अमेरिकेला नाचवणार्‍या याच वर्गाला अमेरिकन नागरिकाने धडा शिकवलेला आहे. हिलरी त्या राजकीय मस्तीचे प्रतिक होते. उलट डोनाल्ड ट्रंप हे दुर्लक्षित वंचित अमेरिकनांचे प्रतिक होते.

आता डोनाल्ड ट्रंप यांच्याकडे बघूया. हा माणुस कधीच राजकारणात नव्हता. त्याने कधी कुठल्याही राजकीयपद वा सत्तापदासाठी निवडणूक लढवली नाही, किंवा राजकीय आखाड्यात उडी घेतली नव्हती. राजकारणाची सुत्रे जिथून हलवली जातात, त्या राजधानी वॉशिंग्टन डीसी या महानगराशी ट्रंप यांचा कधी संबंध आला नाही. त्यामुळेच अमेरिकन राजकीय वर्तुळात वा त्यातल्या कुठल्याही गोटात, ट्रंप हा उपरा होता. अमेरिकनांचे मत आम्ही ठरवतो आणि अमेरिकन अभिमान वा संस्कृती आम्ही निश्चीत करतो, अशा मस्तीत जगणार्‍या वागणार्‍या लोकांपासून पुर्णपणे अलिप्त असलेला डोनाल्ड ट्रंप; म्हणूनच सामान्य माणसाचे प्रतिक होता. अर्थात सामान्य म्हणजे वंचित, गरीब वा बेकार वगैरे असा नव्हे. तर देशाचे व समाजाचे भवितव्य खेळण्यासारखे वापरणार्‍या वर्गाकडून नाडला पिळला गेलेला, असा सुखवस्तु माणूस; इतकेच ट्रंप यांची सामान्य अमेरिकनाशी साधर्म्य असू शकते. पण म्हणूनच तो त्या सामान्य अमेरिकनाच्या भावना विकारांचेही प्रतिक होता. अशा मस्तवाल राजकीय मक्तेदारांना लोक कंटाळलेले होते आणि त्यांच्या सर्वप्रकारे लादल्या जाणार्‍या मतांचे विरोधक होते. पण साधनसंपत्ती वंचित असलेल्या त्या सामान्य अमेरिकनाकडे अशा मस्तवाल राजकीय वर्गाशी लढण्याची क्षमता नव्हती. ती साधने व जिद्द असलेल्या माणसाची त्यांना नेता म्हणून गरज वाटत होती. ट्रंप यांच्या रुपाने तोच उमेदवार अशा निराश वंचित अमेरिकनासमोर आला. मग हिलरी विरोधातले प्रतिक होऊन गेला. कशासाठी लोकांना हिलरी नको होती वा ट्रंप कशासाठी लोकांना हवाच होता? पुरोगामी, उदारमतवादी म्हणून ज्या कल्पना दिर्घकाळ सामान्य अमेरिकनाच्या माथी मारल्या गेलेल्या आहेत, त्या झुगारून लावण्यासाठी त्यांना ट्रंपसारखा दांडगा सेनापती हवा होता. म्हणून तो या लढतीचा सेनापती होऊन गेला.

वॉशिंग्टन डीसी आणि नवीदिल्ली यात फ़रक नाही. लंडन, पॅरीस वा कुठल्याही युरोपियन राजधानीत बसलेला एक प्रस्थापित वर्ग; अनेक गोष्टी सामान्य माणसाच्या गळी मारत असतो. आपल्या विचार व मतांशी सहमत नसलेल्यांचा विविध मोहिमातून काटा काढणे वा त्याला बदनाम करून संपवणे; ही अशा वर्गाची रणनिती होऊन बसली आहे. त्या मस्तवालपणाला किंवा जबरदस्तीला आव्हान देणार्‍याला असहिष्णू ठरवणे, हुकूमशहा फ़ॅसिस्ट ठरवून अपप्रचार करणे, ही हत्यारे झालेली आहेत. अशा लोकांना देश, देशाभिमान, देशभक्ती हे धोके वाटत असतात. आपल्याकडे पुरस्कारवापसी किंवा मोदी निवडून आल्यास देश सोडून पळावे लागेल, अशी झालेली भाषा आठवून बघा. आपल्या उच्चभ्रू वर्चस्ववादाला समता व सहिष्णूता ठरवून, इतरांना सतत दुय्यम लेखणारा हा वैचारिक मस्तवालपणा, आजकाल जगभर उदारमतवादी डावेपणा म्हणून ओळखला जातो. त्याला देशाच्या भौगोलिक सीमा मान्य नाहीत, की त्या त्या देशाच्या प्रतिष्ठा व अभिमानाची प्रतिकेही अमान्य आहेत. त्यातूनच मग अशा प्रतिकांची हेटाळणी व विध्वंस आरंभला जातो आणि त्यालाच सहिष्णुता असे लेबल लावले जाते. नेहरू विद्यापीठातील देशविरोधी घोषणा किंवा काश्मिरातील हिंसेचे समर्थन करणारा इथला वर्ग आणि अमेरिकेत जिहादविरोधात बोलण्याला वंशवादाचे लावलेले लेबल तपासून बघा. तरच लक्षात येईल, ही निव्वळ बदमाशी आहे. कुठलाही देश त्या भौगोलिक तुकड्यावर वसलेल्या समाजाच्या अभिमानातून उभा राहिलेला असतो. त्याचा तोच अभिमान खच्ची करायचा आणि खच्चीकरणात देश समाजाचे हित असल्याचा डांगोरा पिटायचा; ही अशा वर्गाची शैली बनलेली आहे. त्याच वर्गाचे प्रतिक हिलरी झालेल्या होत्या. म्हणूनच त्यांनी अमेरिकेत स्थलांतरीत होणार्‍या घुसखोरीला आव्हान देणार्‍या ट्रंपना गुन्हेगार ठरवण्यापर्यंत मजल मारली होती.

एकूण ट्रंप व हिलरी प्रचाराची रणधुमाळी बघितली, तर अमेरिकेविषयी अभिमान वा तिच्या भौगोलीक सीमांविषयी चिंता व्यक्त करण्यालाच, अमेरिकेसाठी धोका ठरवले जात होते. असा पवित्रा घेणार्‍यांचे प्रतिक म्हणून हिलरी पुढे आलेल्या होत्या. आपल्याकडे हा तमाशा नविन राहिलेला नाही. जिहादी, दहशतवादी, नक्षली यांच्या सुखरूपतेसाठी आकांडतांडव करणार्‍यांना आपल्याकडे पुरोगामी म्हणून प्रतिष्ठीत केले जाते. अशा हिंसाचारी व देशाला धोका असलेल्यांच्या विरोधात बोलणार्‍यांना संकुचित व घातक ठरवले जात असते. हाच दिल्लीतला वर्ग आणि अमेरिकेच्या वॉशिंग्टनमधला वर्ग सारखाच आहे. त्याला वास्तव देश व समाजाशी कर्तव्य उरलेले नसून, आपल्या कल्पनेतल्या समतावादी समाजाच्या निर्मितीसाठी त्यांनी अस्तित्वातल्या देश व समाजांना उध्वस्त करण्याच्या मोहिमा आखलेल्या आहेत. त्यातूनच मग त्यांना संपवण्याची आकांक्षा जगातल्या प्रत्येक समाजात उदभवली आहे. मात्र प्रत्येक समाज देशाला त्या लढाईसाठी आवश्यक नवा नेता शोधावा लागतो आहे. आज उपलब्ध असलेले पक्ष वा नेते त्यासाठी लायक उरलेले नाहीत. म्हणूनच प्रस्थापित राजकीय पक्ष, संस्था वा नेतृत्वाला बाजूला सारून, नव्या चेहरे व व्यक्तीना सामान्य जनताच हुडकून काढते आहे. घातक उदारमतवादाचे प्रतिक व म्होरके बनलेल्यांना संपवताना, बाकीच्या बर्‍यावाईट गोष्टींकडेही सामान्य जनता दुर्लक्ष करू लागली आहे. अन्यथा ट्रंप यांच्यासारख्या धश्चोट व्यक्तीची अमेरिकन अध्यक्षपदी निवड होऊ शकली नसती. हिलरीपेक्षा हा माणूस उत्तम अध्यक्ष होऊ शकेल, असे कोणी म्हणणार नाही. पण हिलरी वा ती प्रतिनिधीत्व करत असलेल्या विचारांपेक्षा अन्य कोणीही चालेल; अशा मानसिकतेचा हा निर्वाळा आहे. किंबहूना उदारमतवादाला झुगारणे, हीच आता लोकांना आश्वासक गोष्ट वाटू लागल्याचा तो स्पष्ट संकेत आहे. अर्थात संकेत समजून घेतला तर! म्हणूनच हा हिलरी क्लिंटन यांचा पराभव नाही, तो अमेरिकेच्या राजधानी वॉशिंग्टन डीसी या राजधानीत दिर्घकाळ वैचारिक दांडगाई करणार्‍या मुजोरपणाचा दारूण पराभव आहे.

2 comments: