Tuesday, November 1, 2016

कोणाला कोणाचे ‘पटेल’

sardar patel statue modi के लिए चित्र परिणाम

3१ आक्टोबर रोजी इंदिरा गांधी यांची पंतप्रधान निवासातच त्यांच्या विश्वासू अंगरक्षकांनी हत्या केली आणि देशात एकच काहूर माजले होते. सोमवारी त्याला ३२ वर्षे होऊन गेली. त्या निमीत्ताने राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली राजधानी दिल्लीत कॉग्रेसजनांनी शक्तीस्थळ म्हणजे इंदिरा गांधींचे स्मारक असलेल्या स्थानापर्यंत मिरवणूक काढली होती. तर देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तोच दिवस सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला. राष्ट्रीय एकता दिवस म्हणून तो साजरा करण्याचा निर्णय त्यांनी पुर्वीच घोषित केलेला आहे. ह्यात अर्थातच राजकारण सामावलेले आहे. दोन्ही बाजूंनी आपापल्या पद्धतीने त्यात उदात्तता आणायचा प्रयास केला असला, तरी त्यात एकमेकांवरचे आरोप प्रत्यारोप सामान्य माणसाला खटकणारे आहेत. यापैकी इंदिराजींचा स्मृतीदिन साजरा करण्याविषयी मोदी वा भाजपाने तक्रार केलेली नाही. मग कॉग्रेसने पटेलजयंती साजरी करण्याविषयी तक्रार करण्याचे काहीही कारण नव्हते. पण प्रत्येक बाबतीत मोदींना वा भाजपाला दोष देण्यापलिकडे कॉग्रेसपाशी सध्या कुठलाच अन्य कार्यक्रम नसल्याने असे खुळचट प्रकार त्या सर्वात जुन्या पक्षाकडून होत असतात. किंबहूना वाद राजकीय नसून वेगळा आहे. कॉग्रेस म्हणजे नेहरू घराण्याची खाजगी मालमत्ता असल्याचा प्रकार सुरू झाला, तिथून कॉग्रेसची अशी घसरण झालेली आहे. सोमवारचे दोषारोप त्यातुनच आलेले आहेत. या पक्षाने पटेलजयंती साजरी करण्याविषयी मौन पाळायला अजिबात हरकत नव्हती. वास्तविक तो दिवस इंदिराजींच्या हत्येपुर्वीच कॉग्रेस साजरा करत आली असती, तर मोदी वा भाजपाला त्यावर अधिकार गाजवण्याची संधीच मिळाली नसती. पण पटेलच कशाला अन्य बहुतांश कॉग्रेसी नेते वा स्वातंत्र्यसेनानींकडे कॉग्रेसने साफ़ दुर्लक्षच केल्याने ही दुर्दैवी स्थिती उदभवली आहे.

स्वातंत्र्याला येत्या वर्षी सत्तर वर्षे पुर्ण होतील. या प्रदिर्घ काळात सरदार पटेल वा अन्य कुणा तात्कालीन नेत्याचे भव्य स्मारक कॉग्रेसने केले नाही, नेहरूंच्या लागोपाठ तीन पिढ्यांना भारतरत्न हा देशातला सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला. पण अन्य किती लोकांना त्याने सन्मानित करण्यात आले होते? इंदिरा वा पंडीत नेहरूंनी तर आपल्या हयातीतच तो पुरस्कार स्वत:ला घेतला. पण सरदार पटेलांना मृत्यूनंतर कित्येक दशके तो नाकारला गेला. नेहरूंचे नातू राजीव गांधी यांना व पटेलांना एकाच वेळी तो पुरस्कार मरणोत्तर देण्यात आला. हा सरदारांचा अवमान नव्हता काय? हा अन्याय त्यांच्यावर त्यांच्याच सत्तेतल्या पक्षाने केलेला आहे. स्वातंत्र्य कॉग्रेसमुळेच देशाला मिळाले आणि कॉग्रेस म्हणजे नेहरू घराणे; हा सिद्धांत प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात बहुतांश अन्य कॉग्रेस ज्येष्ठांच्या वाट्याला अन्याय वा वनवास आला. पण त्यातले सरदार पटेल हे नेहरूंना तुल्यबळ म्हणून आव्हान होते. देशाचे पहिले गृहमंत्री म्हणून त्यांनी विविध संस्थाने संघराज्यात विलीन करून घेण्याचा पराक्रम केला होता. पण काश्मिर हे एकच राज्य त्यांच्या अखत्यारीत नव्हते आणि नेहरू तो विषय हाताळत होते. तेवढीच एक समस्या देशाला अजून सतावते आहे. तरीही पटेलांच्या पराक्रमाची कधी कदर झाली नाही. उलट शक्य होईल तितके त्यांना इतिहासजमा करून, नेहरूंचे व त्यांच्या कुटुंबियांचे महात्म्य देशाच्या माथी मारण्याचा प्रयास झाला. कोट्यवधी अब्जावधी पैसे या खानदानाच्या स्मरणार्थ खर्च झाले. तर सरदार दुर्लक्षित राहिले. त्या अडगळीत पडलेल्या कर्तबगार स्वातंत्रसेनानीला मोदींनी बाहेर काढून सन्मानित केल्याने कॉग्रेसला पोटदुखी होण्याचे काय कारण आहे? खायी त्याला खवखवे म्हणतात, त्यातला प्रकार! आपण ज्याचे नामोनिशाण पुसून टाकायचा प्रयास केला, त्याला मिळणारा सन्मान नेहरूवादी कॉग्रेसला सतावतो आहे काय?

गेली ३२ वर्षे इंदिराजी स्मृतीदिन साजरा करणार्‍यांनी कधीतरी त्या दिवशी येणारा पटेल जयंतीचा सोहळा साजर केला होता काय? नसेल तर आजच त्यांना वल्लभभाई पटेल हे कॉग्रेसचे असल्याचा साक्षात्कार होण्याचे कारण काय? तुमचे असते तर आजवर तुम्हीच हा सोहळा साजरा केला असता ना? आजही तुम्ही तसे काहीही साजरे केलेले नाही. तुम्ही शक्तीस्थळावरच मग्न होतात. मग मोदी काय करतात, याची पोटदुखी कशाला? पटेल भाजपाचे नाहीत म्हणून राग आहे, की नेहरू खानदानाच्या इंदिराजींचा स्मृतीदिन मोदींनी दुर्लक्षिल्याचे दुखणे आहे? देशातल्या बहुतांश कॉग्रेस समित्यांनी सरदार पटेल यांनाच पंतप्रधान करण्याचा प्रस्ताव केलेला होत. पण त्यात पाचर मारून महात्माजींनी नेहरूंना सिंहासनावर बसवले. पुढे लौकरच मतभेदामुळे नेहरूंनी पटेलांन बाजूला करून त्यांचे नामोनिशाण पुसून टाकले. त्यामुळे कॉग्रेसजन वा नेहरूवाद्यांना ते घराणे म्हणजेच कॉग्रेस आणि कॉग्रेस म्हणजेच भारत असे वाटत राहिले आहे. तसाच इतिहास लिहून भारतीयांच्या गळी मारण्याचा अखंड प्रयास झाला आहे. मोदींच्या प्रयत्नांनी त्यालाच तडा दिला जातो आहे, अशी ही पोटदुखी आहे. त्यामुळे आपण गाडून टाकलेला आपलाच एक खुप जुना नेता आपला असल्याचे कॉग्रेसजनांना नव्याने उमजते आहे. त्यातून मग मोदी कॉग्रेसचा वारसा पळवून नेत असल्याचा दोषारोप सुरू झाला. पण गेल्या सत्तर वर्षात कॉग्रेसने कधी सरदारांचा वारसा आपल्याकडे असल्याने कुठल्या कार्यक्रम सोहळ्यातून वा निर्णयातून दाखवले नाही. मग आताच त्यांना पटेलांचा वारसा कुठून आठवला? ज्याला पक्ष व कॉग्रेसचा वारस म्हणून डोक्यावर घेतले आहे, तो निव्वळ धोंडा असल्याची व्यथा त्यामागे पुरेपुर आहे. अन्यथा पटेलजयंती कोणीही साजरी केल्यामुळे कॉग्रेसजनानी विचलीत होण्याचे काहीही कारण नव्हते.

तुम्ही रस्त्याने जाताना किंवा घराची सफ़ाई करताना काही वस्तु फ़ेकून देता. ती वस्तु अन्य कोणी उचलली आणि आपल्या घरात नेउन सजवली, मग त्याच्यावर चोरीचा आरोप करण्यात अर्थ नसतो. संजय गांधींपासून आजोबापर्यंत प्रत्येकाची स्मारके व सोहळे करणार्‍यांनी पहिल्यापासून सरदार पटेलांचा सन्मान राखला असता, तर त्यांच्यावर आज अशी केविलवाणी पाळी आली नसती. सरदार कॉग्रेसचे असे म्हणायचीही वेळ आली नसती. पण त्यांचे दुर्दैव असे आहे, की त्यांनी कॉग्रेसचा वारसा म्हणून ज्यांना डोक्यावर घेतले, त्यांनीच कॉग्रेस धुळीला मिळवली आहे. मोदी कॉग्रेसच्याच अन्य नेत्यांचा आदर्श मानून काम करत असताना यशस्वी होत आहेत. त्यातून ही पोटदुखी जन्माला आलेली आहे. त्यात पटेलांविषयीची आस्था शून्य आहे. त्यापेक्षा मोदींच्या यशाची खंत अधिक आहे. आपणच आजवर सरदारांवर केलेल्या अन्यायाचे पाप बोचते आहे. हा इतिहास भले शाळेत शिकवला जात नसेल. पण नेहरूपुजेला कंटाळलेल्या भारतीयांना तो अन्याय जाणवला आहे. म्हणूनच मोदी अधिक ठळकपणे नेहरू घराण्याची पापे जगासमोर आणण्याचे प्रयत्न सतत करीत असतात. सरदार पटेल यांची जयंती मोठ्या धुमधडाक्यात साजरी करण्यामागे मोदींचे तेच तर राजकारण आहे. एका बाजूला कॉग्रेसच्याच महान नेत्याची जयंती साजरी करायची आणि कॉग्रेसच्या पापाला वाचा फ़ोडायची, हेच मोदींचे राजकारण आहे. पण त्यात बोलायचे कसे आणि काय, हे समजत नसल्याने कॉग्रेसची भलतीच कोंडी झाली आहे. पटेल कॉग्रेसचे होते, तर इतकी वर्षे त्यांना अडगळीत कशाला फ़ेकून दिले होते, त्याचे उत्तर कोणा कॉग्रेसवाल्यापाशी आहे काय? नसेल तर आमचा नेता मोदींनी पळवला हे कोणाला ‘पटेल’? दोन्हीकडून आरोप आणि प्रत्यारोप होत आहेत. पण कोणाला कोणाचे ‘पटेल’? वारसा घराण्यात नव्हे, तर कर्तबगारीत असतो.

3 comments:

  1. कांग्रेसने सावरकरांना दुर्लक्ष करुन देशाचा फार मोठा गुन्हा केला आहे. त्यांना गांधी हत्या , इग्रजाची माफी असे आरोप लावुन बदनाम केले गेले. जर सावरकर आमलात आणले असते तर आज देशाचे चित्र वेगळे असते . शेषेराव मोरे सारखे साहित्यिक आज नव्याने सावरकर जनतेत आणीत आहेत. काग्रेसच्या फुटक्या मण्याने ( मणीशंकर अय्यर साठी शिवसेनेचा प्रतिशब्द ) अंदमानातील सावरकरांच्या काव्यपंक्ती खोडल्या होत्या.

    ReplyDelete