Thursday, November 17, 2016

नाईकाची गठडी वळली

zakir naik के लिए चित्र परिणाम

देशात सगळीकडे नव्या नोटा मिळवण्याची गडबड चालू असताना डॉ. झाकीर नाईक यांच्या इस्लामिक रिसर्च फ़ौंडेशन या संस्थेवर बंदी घालणारा निर्णय पचून गेला आहे. अन्यथा एव्हाना त्यावरून किती गदारोळ माजला असता? धार्मिक पक्षपात किंवा हिंदूत्वाची अरेरावी असाही आरोप मोदी सरकारवर होऊ शकला असता. मध्यंतरी बांगलादेशची राजधानी ढाका येथे मोठी घातपाती घटना घडलेली होती. त्यात गुंतलेले जिहादी पकडले गेले आणि ते सुशिक्षित असल्याने खळबळ माजली होती. त्यांचा तपास सुरू झाला आणि झाकीर नाईक यांच्या भानगडी उजेडात आल्या. आपण जिहादची प्रेरणा नाईक यांच्या भाषणातून व प्रवचनातून घेतली, असे या ढाक्याच्या जिहादींनी सांगितले. तेव्हा भारत सरकारचे लक्ष तिकडे गेले. अर्थात लक्ष गेले असेही म्हणण्यात अर्थ नाही. कारण नाईक यांच्या उचापतींची माहिती पुर्वीपासूनच मुंबई पोलिसांना होती आणि अशा संस्था संघटनेवर बंदी घातली जावी, असे पोलिसांनी केंद्र सरकारला कळवलेले होते. पण बंदी घालाण्यासाठी ‘हिं’दू शब्द त्यात नसल्यामुळे केंद्राने त्यात लक्ष घातले नव्हते आणि नाईक यांच्या उचापती निर्धास्तपणे चालू राहिल्या होत्या. स्वत:ला सेक्युलर वा बुद्धीमंत म्हणवणारे अनेकजण नाईकांच्या त्या प्रवचनांना अगत्याने हजेरी लावत होते. मात्र ढाक्यातून कबुलीजबाब आले आणि भारत सरकारला मुंबई पोलिसांच्या मागणीत लक्ष घालावे लागले. आताही भारतात जे सरकार सत्तेत आहे, त्याच्यावर हिंदूत्ववादी असा कायमचा शिक्का असल्याने मुस्लिम संस्था संघटनेवर बंदी घालताना सरकारला काळजी घ्यावी लागते. म्हणूनच ढाका येथील माहिती हाती आली, तरी केंद्राने मुंबई पोलिसांकडून नव्याने माहिती मागवून घेतली होती. त्याच आधारे आता नाईक यांच्या संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र नाईक इथे नाहीत आणि नजिकच्या काळात ते मायभूमीत येण्याची शक्यता नाही.

जेव्हा ढाक्याची घटना घडली तेव्हा नाईक भारतात नव्हते. परदेशी गेलेले होते. त्यांच्या पराक्रमाचा गवगवा झाल्यावर त्यांनी मायदेशी परतण्याचा विचार सोडून दिलेला आहे. कारण माघारी आल्यास कायद्याच्या जंजाळात फ़सण्याची त्यांनाही खात्री आहे. म्हणूनच परदेशी बसून आपण निर्दोष असल्याची वक्तव्ये नाईक करीत असतात. आपल्या सफ़ाईदार भाषणाने व कुशाग्र स्मरणशक्तीने श्रोत्यांना भारावून टाकण्यात झाकीर नाईक वाकबगार आहेत. पण त्याचवेळी त्यांची धार्मिक विवेचन करण्याची शैली भुलभुलैया निर्माण करणारी आहे. काही पटवून देता येत नसेल, तर समोरच्याचा मानसिक गोंधळ उडवून द्यावा, असे इंग्रजी व़चन आहे. नाईक त्याचा सफ़ाईदार वापर करतात. त्यामुळे कुठल्याही धर्मग्रंथातील कुठलाही उतारा वा संदर्भ घेऊन इस्लाम सर्वश्रेष्ठ व शांतीचा धर्म असल्याचा दावा करीत असतात. सामान्य माणसे बुद्धीमान नसतात आणि अशा भुलभुलैयाला बळी पडतात. प्रामुख्याने दुबळ्या मनाची माणसे या चातुर्याने भारावूनही जाणारी असतात. त्यांचा कुशलतेने वापर करण्यात नाईक हुशार आहेत. म्हणूनच त्यांच्या बुद्धीला आव्हान देणारा प्रश्न कोणी विचारण्याचा धोका ते पत्करत नाहीत. असा कुठलाही प्रश्न विचारला गेलाच, तर आपला विद्यार्थीही त्याचे उत्तर देऊ शकतो, असे सांगून पळ काढण्याचीही नाईक यांची ख्याती आहे. पण त्यांच्या भुलभुलैयात फ़सलेल्या अनेक तरूणांची वाटचाल हिंसक धर्माचरणाकडे म्हणजे जिहादकडे होऊ लागते. सहाजिकच जागतिक पातळीवर जिहाद चालवणार्‍यांना प्राथमिक भरतीसाठी नाईक यांचा खुप उपयोग होत असतो. आताही बांगलादेशातल्या कुठल्या जिहादी संघटनेशी नाईक यांचा थेट संबंध जोडता येणार नाही. पण नाईक यांच्याकडून प्रेरणा घेऊनच अनेकजण पुढे अशा जिहादी संघटनांकडे ओढले जात असतात. म्हणून ही बंदी आवश्यक होती.

झाकीर नाईक हे प्रामुख्याने ‘दावा’ कार्यक्रम राबवत असतात. दावा याचा अर्थ बिगर मुस्लिमांना मुस्लिम होण्यासाठी प्रवृत्त करणे वा आमंत्रित करणे होय. त्यासाठी प्रथम अशा व्यक्तीच्या मनामध्ये त्याच्या विद्यमान धर्म वा श्रद्धेविषयी शंका निर्माण करणे आवश्यक असते. त्यात नाईक तरबेज आहेत. बायबलपासून गीतेपर्यंत कुठल्याही धर्मग्रंथातील उल्लेख श्लोक घेऊन त्याची कुराणाशी तुलना करायची. त्याआधारे कुराण कसे सर्वश्रेष्ठ आहे, त्याचा प्रभाव संबंधिताच्या मनात निर्माण करायचा, हेच त्यांचे प्रमुख काम राहिलेले आहे. एकदा त्यातून माणुस भारावला मग तो मुस्लिम असल्याने त्याचे इतिकर्तव्य अल्लाची सत्ता पृथ्वीतलावर प्रस्थापित करण्यासाठी वाहून घेणे असल्याचेही पटवून दिले जाते. त्यातून मग अशा भारावलेल्या व्यक्तीला इराकमधील खिलापत नामक नव्या जिहादी संघटनेत सहभागी होण्याचे आकर्षण वाटू लागते. अशा लोकांच्या शोधात इसिस वा अन्य जिहादी संघटना व त्यांचे हस्तक असतात. ढाक्यातील घातपात करणारी सुशिक्षित मुले किंवा केरळातून इराकला निघालेले काही मुस्लिम तरूण, हे आरंभी अशाच झाकीर नाईक यांच्या मायावी प्रवचनाने भारावलेले होते. त्यांच्या जीवनात आरंभी वा कोवळया संस्कारक्षम वयामध्ये नाईक आलेच नसते; तर कदाचित त्यांना जिहादकडे जाण्याचा विचारही शिवला नसता. नाईक यांचे काम किती घातक आहे, त्याची कल्पना यातून येऊ शकते. सामान्य मध्यमवर्गिय घरातील निरागस मुले बोलताबोलता जाळ्यात ओढण्याने किती हिंसक बनवता येतात; त्याचे जीताजागते प्रात्यक्षित म्हणून झाकीर नाईक यांच्या संस्थेकडे बघता येईल. पण ते चालून गेले कारण त्यांना सेक्युलर आशीर्वाद व अभय लाभलेले होते. म्हणूनच मुंबई पोलिसांनी तसे पत्र केंद्राला पाठवूनही कुठली कृती होऊ शकलेली नव्हती. आताही ते काम सोपे नव्हते.

सध्या भारतात नोटाबंदीचा विषय गाजतो आहे आणि त्यामुळेच त्याचा राजकीय लाभ उठवायला टपलेले विरोधी व सेक्युलर पक्ष, झाकीर नाईक यांच्या बंदीमध्ये लक्ष घालायला वेळ घालवणार नाहीत, याची मोदी सरकारला खात्री असावी. म्हणून असेल, याच गडबडीत नाईक यांच्या मुसक्या बांधून घेण्याचा विचार केंद्राने केला असावा. मध्यंतरी जेव्हा नाईक हा विषय पटलावर आला, तेव्हा विविध वाहिन्यांनी कितीतरी तास चर्चा व माहिती देण्यात दवडलेले होते. पण आता प्रत्यक्षात इस्लामिक रिसर्च फ़ौंडेशनवर बंदी घालण्यात आली आहे, तर कुठल्या वाहिनीला त्याची बातमीही देण्याची गरज वाटलेली नाही. सामाजिक व धार्मिक वितुष्ट निर्माण करणारी भाषणे व प्रयास केल्याचे कारण दाखवून ही बंदी लागू करण्यात आलेली आहे. ताज्या निर्णयानुसार ही बंदी पाच वर्षासाठी असेल आणि नंतर त्यावर फ़ेरविचारही होऊ शकेल, सीमी संघटनेवर अशीच बंदी घालण्यात आली होती. प्रत्येक वेळी न्यायालयाकडून त्या बंदीची मुदत वाढवून घ्यावी लागलेली आहे. काही वर्षापुर्वी अशीच मुदत संपली असताना त्यात वेळीच वाढ केली नाही आणि सीमीवरील बंदी एका कनिष्ठ न्यायालयाने उठवण्याची नामूष्की केंद्रावर आलेली होती. मग धावपळ करून मुदतवाढ मिळवण्यात आलेली होती. एकूणच आपल्याकडे पत्रकारिता व बुद्धीवाद किती उथळ झाला आहे, त्याचे प्रतिक म्हनून या ताज्या बंदीकडे बघता येईल. काही महिन्यापुर्वी ज्या विषयावर लागोपाठ चारपाच दिवस चर्चेचा रतीब घातला गेला. ती बंदी लागू झाल्यावर साधी बातमी देण्याचेही अगत्य कुठल्या वाहिनीने दाखवलेले नाही. कारण कुठलेही असो, चांगला निर्णय झाला हे मान्य करावे लागेल. आता ही बंदी लागू असेपर्यंत झाकीर नाईक मायदेशी परतण्याचीही शक्यता दुरावली आहे. मध्यंतरी पित्याचे निधन झाल्यावरही अंतिम दर्शनाला ते फ़िरकले नव्हते. आता तर विषयच संपला आहे.

2 comments: