Tuesday, November 1, 2016

युद्धाची चाहुल

kashmir LOC के लिए चित्र परिणाम

भारत-पाक सीमेवर ज्या घडामोडी घडत आहेत, त्याकडे बघता, दोन देशातील युद्ध आपले दार ठोठावते आहे, हे नक्की! त्या युद्धाचे स्वरूप काय असेल आणि किती भीषण असेल, त्याचा अंदाज आताच करता येणार नाही. पण पाकिस्तान दिवसेदिवस युद्ध अपरिहार्य करीत चालले आहे. त्यातून त्याही देशाची सुटका नाही. मागल्या सत्तर वर्षात त्या देशाच्या कुठल्याही नेतृत्वाला आपल्या जनतेच्या आकांक्षा अपेक्षा ओळखता आल्या नाहीत, की त्यांना पुर्ण करता आल्या नाहीत. सहाजिकच त्यांना सतत जनतेला भयभीत करूनच आपल्या सत्तापदावर टिकून रहाणे भाग होते. आजही त्यात किंचीत बदल होऊ शकलेला नाही. पण असा भुलभुलैया फ़ार काळ टिकत नसतो आणि एकेदिवशी त्याचा बुडबुडा फ़ुटत असतो. मागल्या चार युद्धात भारताकडून भरपूर मार खाल्लेल्या पाकला, कधी त्यापासून धडा घेता आला नाही. पण अण्वस्त्र आणि भारताचा चांगुलपणा ही पाकिस्तानी नेत्यांना आपली शक्ती वाटली आणि अलिकडल्या काळात त्यांना मस्ती चढत गेली. त्यातून आजची विपरीत स्थिती उदभवली आहे. गेल्या पंचवीस वर्षात पाकिस्तानने दहशतवाद किंवा जिहाद हे आपले संरक्षणाचे धोरण बनवले. अर्थातच त्यात पाकसेनेला आपले वर्चस्व उभे करता आले. नाकर्ते राजकीय नेतृत्व आणि नसलेली दुरगामी दृष्टी, यांनी पाकिस्तान आपणच बनवलेल्या सापळ्यात आता फ़सला आहे. यापुर्वीच्या युद्धात पाकमध्ये निदान दोन बाजू होत्या, एका बाजूला सेना व दुसरीकडे नागरी नेतृत्व! पण मध्यंतरी त्यांनी जिहादची कास धरली आणि आता मोकाट जिहादी ही पाकिस्तानची तिसरी बाजू बनली आहे. त्यापैकी कोण कोणाला दाद देत नाही आणि त्या चक्रव्युहात सामान्य जनताही फ़सलेली आहे. त्याचा एकत्रित परिणाम युद्धाकडेच घेऊन जाणारा आहे. सध्या त्याचीच चाहुल लागलेली आहे.

मुळात उरीचा हल्ला हा पाकला परवडणारा नव्हता. त्यात पाकसेनेचा कितीही हात असला, तरी त्याला वरीष्ठ सैनिकी नेतृत्वाची मान्यता असेलच असे नाही. कारण भारतात नेतृत्व बदल झाल्यापासून पाकिस्तान अतिशय सावधपणे पावले उचलत होता. पंतप्रधान नवाज शरीफ़ यांनी सतरा वर्षापुर्वीही वाजपेयी यांच्याशी मैत्रीचा हात पुढे केला होता. त्यात तात्कालीन सरसेनापती जनरल परवेझ मुशर्रफ़ यांनी बिब्बा घातला. पण अखेरीस त्यांनाही भारतापुढे शरणागत होऊन शस्त्रसंधी करावी लागली होती. आताही शरीफ़ यांचा प्रयास काहीसा तसाच होता. तो भले पाकसेनेला मान्य नसला तरी ती सेना आता युद्धाच्या सज्जतेमध्ये नाही. म्हणूनच सेनेलाही शरीफ़ यांच्याच मागे फ़रफ़टणे भाग होते. पण मध्यंतरीच्या कालखंडात पाक गुप्तचरखाते आणि जिहादी यांच्या संगनमताने वेगळेच सत्ताकेंद्र उदयास आलेले आहे. त्यापैकी कोणी सेना वा सरकारला दाद देत नसतो. ते लोक परस्पर आपले निर्णय घेतात आणि त्यातूनच अलिकडल्या घडामोडींना वेग आला आहे. पाक सरकार व पाकसेनेने भारताशी मैत्री केलीच, तर जिहादींच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह लागू शकते. सहाजिकच आपले अस्तीत्व व महत्व टिकवण्यासाठी त्यांना भारताशी शत्रूत्व जपणे भागच आहे. त्यातून आजची दुर्दैवी स्थिती उदभवली आहे. उरीच्या हल्ल्याला जिहादी व स्थानिक लष्करी अधिकारी जबाबदार होते. पण सर्जिकल स्ट्राईकचे चटके पाकसेनेला भोगावे लागले आहेत. निवृत्त होण्यापुर्वी जनरल राहिल शरीफ़ यांना पराभवाचा कलंक आपल्या कारकिर्दीवर नको आहे. म्हणूनच मग त्यांना कठोर भूमिका घेणे भाग झाले आणि स्थिती चिघळत गेली आहे. कारण अशारितीने कुरापतींकडे काणाडोळा करणारा राज्यकर्ता आज भारताच्या सर्वोच्चपदी बसलेला नाही. नरेंद्र मोदी अतिशय निर्धारपुर्वक वागणारे आहेत आणि तिथेच पाकिस्तानचे गणित बिघडले आहे.

मैत्रीसाठी शरीफ़ यांच्या वाढदिवशी थेट लाहोरला गेलेले मोदी, प्रसंग आल्यावर सर्जिकल स्ट्राईकपर्यंत आले. त्याचा अर्थ स्पष्ट आहे. समोरच्याला युद्धाचीच भाषा समजणार असेल, तर त्याच भाषेत बोलण्याची सज्जताही मोदींनी केलेली आहे. वास्तविक मनोहर पर्रीकर यांच्यासारखा खमक्या व स्वयंभू नेता संरक्षणमंत्री पदावर आणून बसवला, त्यातूनच मोदींनी एक संकेत दिलेला होता. आपण फ़क्त पुर्णवेळ संरक्षणमंत्री नेमलेला नाही, तर पुर्ण अधिकार देऊनच त्याला तिथे बसवला आहे. त्यामुळेच देशाच्या सुरक्षेचा विषय आला, मग आपले निर्णय घ्यायला पर्रीकर स्वतंत्र असल्याचा तो संकेत होता. पर्रीकर यांनीही सुत्रे हाती घेतल्यापासून अनेक ठाम पावले उचललेली आहेत. त्यात देशाच्या सुरक्षेला प्राधान्य आणि त्यात कुठलीही तडजोड नाही, हे त्यांनी वारंवार बोलून दाखवलेले आहे. पुढल्या काळात इशान्येकडील दहशतवाद मोडून काढताना थेट म्यानमारच्या हद्दीत घुसून केलेली कारवाई त्याचा पुरावा होती. किंबहूना त्यावर पहिली प्रतिक्रीयाच पाकिस्तानातून आलेली होती. असे हल्ले म्यानमारमध्ये ठिक आहेत. पाकिस्तानात येऊन असे काही करण्याची स्वप्ने बघू नका. आमची अण्वस्त्रे दिवाळीचे फ़टाके नाहीत. असे तेव्हा प्रत्येक पाकिस्तानी नेता व सेनापती बोललेला होता. पण आता दिवाळीचे खरे फ़टाके भारतात वाजत असताना खुद्द पाकिस्तानी सेनापतीही आपली अण्वस्त्रे विसरून गेले आहेत. गेले काही दिवस येणार्‍या बातम्या काळजीपुर्वक वाचल्या, तर सीमा आणि ताबारेषेवर होणार्‍या घटना सूचक आहेत. त्यात भारतीय जवान शहीद झाल्याच्या घटना आहेत, त्यापेक्षा अधिक संख्येने पाकसैनिक व जिहादी मारले गेल्याच्या बातम्या येत आहेत. काही बातम्यात भारतीय सैनिक रेषा ओलांडून पलिकडे हल्ले करीत असल्याचीही चाहुल लागते. पाकसेना व जिहादी बचावात्मक पवित्र्यात असल्याचे लपून राहिलेले नाही. हा कसला संकेत आहे?

वाहिन्यांवर चर्चेसाठी येणार्‍या माजी सेनाधिकार्‍यांची भाषा अतिशय स्पष्ट आहे. अशारितीने सर्जिकल स्ट्राईक वा पाकच्या हल्ल्यांना चोख उत्तर देण्याचे दिवस संपलेले आहेत. आता पाकला धडा शिकवायचा म्हणजेच दिर्घकाळ पाकिस्तानी ताब्यात असलेला काश्मिरी प्रदेश पुन्हा ताब्यात घेण्याला पर्याय नाही, असेच हे सांगत आहेत. लेफ़्टनंट जनरल वा ब्रिगेडीयर असे निवृत्त अधिकारी आज सेनेत सहभागी नसले तरी त्यांचा तिथे संपर्क असतो. त्यांना सीमेसह छावण्यांमध्ये घडणार्‍या घटनांचा सुगावा लागतच असतो. त्यामुळे त्यांची भाषा ही सैन्याच्या मानसिकतेचे निदर्शक असते. भारतीय सेना व तिच्या विविध तुकड्या युद्धाच्या पवित्र्यात येत असल्याचे त्यातून कळू शकते. उठसुट हल्ले आणि त्यावर प्रतिहल्ला हे नाटक आता पुरे झाले. एकदाच कायतो जिहादी खेळ संपवाय़चा आणि त्यासाठी पाकव्याप्त काश्मिर मुक्त करायचा, अशा मनस्थितीत आज भारतीय सेनादल येऊन पोहोचले आहे. कुठल्याही क्षणी युद्धाचा भडका उडेल आणि त्यात उर्वरीत काश्मिर भारतात आणायचा आहे, अशी तयारी सुरू असल्याचे ते लक्षण आहे. त्याची कोणी उघड घोषणा करणार नाही. पण एकेदिवशी अशाच किरकोळ वाटणार्‍या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारत-पाक युद्ध सुरू झालेले असेल. मात्र त्यापुर्वी पाकिस्तानी सेना व सरकार यांचे मनोबल जितके खच्ची झालेले असेल, तितके युद्ध सोपे व अल्पकालीन असेल. पाकवर तशी पाळी आणण्याचा खेळ सध्या चालू आहे. चहुकडून फ़सलेला पाकिस्तान व त्याची सैरभैर सेना, यांना अल्पकाळात पराभूत करायचे असेल, तर तशा अगतिक अवस्थेत त्यांना घेऊन जाणे, ही प्रारंभिक रणनिती असू शकते. तसेच काहीतरी सीमेवर चालू आहे आणि म्हणूनच सध्या घडणार्‍या घडामोडी ही येऊ घातलेल्या व्यापक व निर्णायक युद्धाची चाहुल भासू लागली आहे. २०१७ सालात आजचा पाकिस्तान शिल्लक असेल काय?

7 comments:

 1. 2017 मध्ये पाकिस्तानच शिल्लक राहू नये अशी आमची इच्छा आहे

  ReplyDelete


 2. भाऊराव,

  युद्ध सुरू होणारं नाही. युद्ध सुरू झालं आहे. निदान बातम्या तरी अशाच येताहेत. पाकिस्तानी सैन्याने त्यांचे ६० लोकं मेलेत म्हणून सांगितलं आहे :

  https://www.superstation95.com/index.php/world/2345

  ही बातमी २९ ऑक्टोबरची आहे. आज ५ दिवसांनी २ नोव्हेंबर रोजी भरपूर साफसफाई झालेली असेल.

  मोदी म्हणतील ते मान्य करणे हा एकमेव पर्याय दोन्ही शरीफांकडे उरला आहे.

  आपला नम्र,
  -गामा पैलवान

  ReplyDelete
 3. भाऊ एकदम सही

  ReplyDelete
 4. It will be more of a Attrition War (which involves wearing down the enemy to the point of collapse through continuous losses) rather than conventional Total War.

  A good article by Lt Gen Kamal Davar (retd) explains the open options:

  http://www.tribuneindia.com/news/comment/strategise-to-fight-the-war-of-attrition/300592.html

  ReplyDelete
 5. img {
  max-width: 100%;
  height: auto;
  }

  Image chi height widhth madhe proper disel saglya Device madhe

  ReplyDelete