Wednesday, November 9, 2016

कृतीवीर आणि शब्दवीर

साडेतीन वर्षापुर्वी अकस्मात उत्तराखंडात ढगफ़ुटी झाली आणि तिथे पर्यटनाला गेलेल्या हजारो लोकांसह स्थानिक नागरिकांचे जीव संकटात सापडले होते. हजारो लोकांचा बळी गेला. त्याला त्सुनामी संबोधले गेले. हळुहळू तिथपर्यंत अनेक वाहिन्यांचे वार्ताहर व फ़ोटोग्राफ़र्सही पोहोचले. मग ज्यांचे जीव वाचले होते किंवा सैनिकांनी आपला जीव धोक्यात घालून त्यांना वाचवले होते, त्यांच्या कहाण्या समोर येऊ लागल्या. पहिला प्रश्न काय विचारला जात होता? तुम्हाला काय सोयी मिळाल्या आहेत? शासन तुमच्यासाठी काय करते आहे? थंडीवार्‍यात तुम्हाला आडोसा मिळाला आहे काय? या निवा‍र्‍यात काय सुविधा आहेत? एकूण असेच प्रश्न विचारले जात होते आणि नंतर कुठल्या राज्यातून तिथे आलेल्या पर्यटकांच्या गैरसोयी कशा झाल्या, त्याचाही पाढा वाचला जात होता. पण जे नैसर्गिक संकट आलेले होते, ते सरकारने आणले नव्हते. अशा विपरीत स्थितीत लोकांना पंचतारांकित सुविधा नको असतात. जीवावर बेतलेले असते, तेव्हा जीव बचावला, हीच सर्वात मोठी मदत असते. पण सामान्य माणसाची अपेक्षा वा इच्छा याचा थांगपत्ता नसलेले प्रश्न त्यांना विचारले जात होते आणि त्यातून राज्यकर्ते वा राजकारणी यांना गुन्हेगार ठरवण्याची स्पर्धा सुरू झाली होती. हिमाचलचे मुख्यमंत्री विरभद्रसिंग तिथे होते आणि त्यांनी आपल्याला राज्यकर्ता म्हणून प्रथम सैनिकांनी सुरक्षित जागी घेऊन जाण्याचा आग्रह धरला होता. पहिले काही दिवस राज्याचे मुख्यमंत्री तिथे फ़िरकू शकले नाहीत. केंद्राचे नेतेही जाऊ शकले नाहीत. अशा वेळी कुठल्याशा बैठकीला दिल्लीत आलेल्या गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी तिकडे जाण्याचा निर्णय घेतला. कारण मोठ्या प्रमाणात तिथे गुजराती पर्यटक असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. मग परक्या राज्यात मोदी काय दिवे लावणार, अशी टवाळी सुरू झालेली होती.

अर्थात मोदींनी तिकडे जाऊ नये असे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी फ़र्मावले होते आणि मोदी तिकडे गेल्यास त्यांना सुरक्षा देता येणार नाही, असा इशाराही दिला होता. तरीही मोदी तिकडे गेले आणि तत्पुर्वी त्यांनी गुजरातच्या आपत्ती व्यवस्थापनाचे आयुक्त तिकडे बोलावून घेतलेले होते. गुजरातच्या पर्यटकांना आपल्या घरी परतण्यास कुठली अडचण येऊ नये, अशी व्यवस्था करण्याचे काम आपल्या अधिकार्‍यांवर सोपवून मोदी माघारी आपल्या राज्यात गेलेले होते. मग एटाईम्स ऑफ़ इंडियामध्ये एक बातमी झळकली मोदींनी १५ हजार गुजराती पर्यटकांना संकटातून बाहेर काढले. पुढे मुख्य माध्यमे व सोशल माध्यमातून मोदींची राम्बो अशा शब्दात हेटाळणी दिर्घकाळ चालू होती. कारण एका दिवसात १५ हजार लोकांना वाचवणे अशक्य असल्याचे कोणीही सांगू शकेल. तसा दावा मोदी वा भाजपाने केला असेल तर त्याची टवाळीच व्हायला हवी होती. पण तसा दावा मोदींनी वा भाजपाने केला होता काय? जेव्हा खुपच गाजावाजा झाला, तेव्हा टाईम्समध्ये मुळातच बातमी देणार्‍या वार्ताहराला खुलासा करावा लागला. खुद्द टाईम्सने आपल्याकडून आगावूपणा झाल्याचा एक इवलासा खुलासा दिलेला होता. राई एवढ्या त्या खुलाशाने मोदींच्या खंडीभर झालेल्या टवाळीची भरपाई होऊ शकते काय? पण तोही विषय सोडून देऊ. ही आता नेहमीची गोष्ट झाली आहे. सामान्य लोक व वाचक त्याची गंभीर दखल घेत नाहीत. पण स्वत:ला बुद्धीजिवी समजणार्‍यांना साध्या गोष्टी कळत नाहीत आणि सामान्य माणसाला कितीही क्लिष्ट गुंतागुंतीच्या गोष्टी सहज कळत असतात काय? समजून घेणे म्हणजे तारतम्य वापरून समोरच्या गोष्टीचे आकलन करणे असते. त्यासाठी मोठी कुशाग्र बुद्धी आवश्यक नसते. आजकाल शहाणे म्हणवणार्‍यांना त्याचाच विसर पडला आहे. म्हणून त्यांना साध्या साध्या गोष्टीही समजेनाशा झाल्या आहेत.

कुठल्याही गोष्टीत पराचा कावळा करण्याला आजकाल बुद्धीवाद समजले जाण्याचा तो दुष्परिणाम आहे. म्हणून मग ‘अच्छे दिन’ वा मदत म्हणजे काय, त्याचा थांगपत्ता शहाण्यांना लागत नाही आणि सामान्य लोकांना ते आधीच समजलेले असते का? संकटातून जीव वाचला तर तीच मोठी मदत असते. हे संकट अनुभवणार्‍याला कळत असते. त्याचे दूरून दर्शन घेऊन भाष्य करणार्‍यासाठी संकटही भासमान असते. त्यामुळेच फ़रक पडत असतो. संकटग्रस्ताला जीव वाचला हीच मोठी मदत वाटते आणि ज्याने चित्र बघून मत बनवले, त्याच्यासाठी जीव वाचलेल्यांना कपडे खाऊ नसल्याचे दु:ख दिसत असते. एकूणच देशाची स्थिती अशी विभागली गेलेली आहे. वृत्तपत्र वा वाहिन्यांच्या वातानुकुलीत कचेर्‍यांमध्ये बसून मतप्रदर्शन करणार्‍यांना वास्तवाची जाणिव उरलेली नाही की भान राहिलेले नाही. मग ते माजी निवृत्त जवानाच्या आत्महत्येचे काहुर माजवतात आणि तिथे जाऊन देखावा करणार्‍या राहुल वा केजरीवालना डोक्यावर घेऊन नाचतात. उलट आज सीमेवर हुतात्मा झालेल्या सैनिकाच्या बलिदानाची त्यांना खबरबातही नसते. त्यांच्या अंत्ययात्रेकडे राहुल केजरीवाल कशाला फ़िरकले नाहीत, असा प्रश्न या आभासावर चिंता व्यक्त करणार्‍यांना पडत नाही. हल्ली देश असा कल्पना आणि वास्तव यांच्यात विभागला गेलेला आहे. त्यामुळे वास्तवाची माहिती सामान्य माणसाला परस्परांशी संपर्क साधून मिळवावी लागते आणि कल्पनेत जगणार्‍यांनी मारलेल्या थापा तपासून बघाव्या लागतात. हे इथेच चालले आहे असेही नाही. जगाच्या पाठीवर जिथे म्हणून अशी विभागणी झालेली आहे, तिथे हेच चालू असलेले दिसेल. मग ती अमेरिकन अध्यक्षपदासाठी चाललेली निवडणूक असो, किंवा जम्मू काश्मिरमध्ये चाललेला हिंसाचार असो. कृतीवीर आणि शब्दवीर अशा दोन गटात जगभर तुंबळ युद्ध भडकलेले आहे.

एका बाजूला ज्यांना काही करायचे आहे असे लोक काहीतरी करत आहेत आणि ज्यांच्यामध्ये काहीही करण्याची कुवत नाही, ते नाकर्ते आपणच सर्वकाही करू शकतो, हा आभास निर्माण करण्यात रमलेले आहेत. पण जे काही व्हायचे ते कल्पनेत होऊ शकत नसते. लोकांना विश्वास वाटला पाहिजे, तर घडायचे ते वास्तवात घडावे लागते. दिल्लीत लक्षावधी सामान्य नागरिक धुसमटलेला असतो आणि प्रदुषणाने बेजार झालेला असतो. त्याची चर्चा वाहिन्यांवर किंवा वृत्तपत्राच्या कुठल्या पानावर आढळत नाही. पण माध्यमांची अधिक जागा माजी जवानाच्या आत्महत्येने व त्यावरील तमाशाने व्यापलेली असते. तिथे धाव घेणार्‍या केजरीवाल राहुल यांना प्रसिद्धीच्या झोतात आणले जाते. मात्र घुसमटून मरू घातलेल्या लक्षावधी दिल्लीकरांची दादफ़िर्याद घेतली जात नाही. दोनच दिवसात सामान्य माणूस पिसाळल्यासारखा बोलू लागतो, तेव्हा राहुल केजरीवाल मागे पडतात आणि दिल्लीचे प्रदुषण शहाण्यांना बोलावे लागते. कारण माजी सैनिकांना निवृत्तीवेतन वा दिल्लीला आत्महत्या भेडसावत नव्हती; इतकी दिल्लीकरांची श्वास घेण्याची गरज प्राधान्याची होती. पण किती चर्चा त्यावर होताना आपण बघू शकलो? त्यापेक्षा सर्व बुद्धीजिवी आत्महत्या, आणिबाणी यावरच बोलत होते ना? कारण त्यांच्यासाठी खरा भारत अस्तित्वात नाही. त्यांच्यासाठी भारत ही कल्पना असते आणि म्हणूनच त्याला कुठल्या भौगिलीक सीमा नसतात. मग त्या सीमा राखायला कोणी सैनिक कशाला हवा आणि तो बलिदान तरी कशाला देईल? त्यांच्यासाठी माजी सैनिकाने निवृत्तीवेतनासाठी आत्महत्या करणे, हे बलिदान असते. कारण सगळेच काही काल्पनिक आहे, तर भावना क्षोभ व लाभही काल्पनिकच असतात. कल्पनेत त्यांना वाटेल ते करण्याची मुभा असते. वास्तवात काहीही करायचे तर कुवत वा हिंमत आवश्यक असते ना? शब्दवीरापाशी ती नसते. तिथे कृतीवीराची गरज असते.

3 comments:

 1. भाऊ,ही मीडिया हे गाढव राजकारणी यांना जनता टाईम पास म्हणून बघते

  ReplyDelete
 2. आदरणीय भाऊ , नमस्कार . मी जागता पहारा या ब्लॉगचा नित्य वाचक आहे . सध्या भारत पाकिस्तान सीमेवर दहशतवाद व नित्य गोळीबार चालू आहे . पाकिस्तान विषयी व पाकिस्तान प्रणीत दहशतवादाविषयी व भारताने पाकिस्तान सोबत कसे संबंध ठेवावेत, पाकिस्तान विरुद्ध युद्ध करावे कि नाही , त्याविषयी जम्मू काश्मीर मधील प्रस्थापित PDP सरकार, विरोधी पक्ष व तेथील जनतेच नेमकं काय मत असेल किंवा आहे, हे जर का तुम्ही पुढील एखाद्या ब्लॉग मधून आम्हाला मार्गर्दशन कराल का? एक विनंती.
  ReplyDelete


 3. भाऊराव,

  दोनच दिवसात सामान्य माणूस पिसाळल्यासारखा बोलू लागतो, हे तुमचं निरीक्षण अगदी समर्पक आहे. यावरून गोधरा हत्याकांडाची आठवण झाली. हिंदू करसेवकांचा जाळून कोळसा झाला तरी कोणी वृत्तवाहिन्यांनी हिंदूंच्या वेदनांवर फुंकर घालण्याचं साधं सौजन्यही दाखवलं नाही. मग हिंदू असेच भडकले. या आधी याच वाहिन्यांनी राममंदिराच्या नावाने मुस्लिमांत भयगंड निर्माण केला. मग गोधरा दंगलींकडे दुर्लक्ष करून हिंदूंत भयगंड जोपासला. (संदर्भार्थ तुमचा लेख : http://bhautorsekar.blogspot.co.uk/2012/09/blog-post.html )

  बरखा दत्तने कुराणाचे जळलेले पान टीव्हीवरून प्रसारित केलं आणि दंगलीला हातभार लावला.
  संदर्भ : https://youtu.be/12qeH4LbeEM?t=29m56s

  भारतीय प्रसारमाध्यमांना फक्त मुस्लिमांना चिथावण्या देऊन दंगली घडवायच्या आहेत. सामान्य माणसाच्या वेदनांशी त्यांना काडीमात्र देणंघेणं नाही.

  आपला नम्र,
  -गामा पैलवान

  ReplyDelete