Wednesday, November 9, 2016

पिवळागांधी तांबडागांधी

indian currency notes के लिए चित्र परिणाम

२००९ च्या लोकसभा निवडणूका झाल्या तेव्हा शरद पवार यांनी आपला बारामती मतदारसंघ कन्येला सोडून दिला होता आणि ते बाजूच्या माढा मतदारसंघातून लोकसभेत निवडून आले होते. त्यानंतर काहीकाळ ते तिकडे सतत येजा करीत राहिले. पुढल्या काही महिन्यांनी विधानसभा निवडणूका झाल्या, त्यात सातार्‍याच्या माण खटाव मतदारसंघातही त्यांनी प्रचार केलेला होता. पण राष्ट्रवादी व कॉग्रेस यांची युती असूनही, तिथे पवारांच्या निष्ठावान सदाशीव पोळ या उमेदवाराचा जयकुमार गोरे नामक बंडखोर अपक्ष कॉग्रेसनेत्याने पराभव केला होता. पुढल्या खटाव भेटीत एका सभेत त्या पराभवाचा उल्लेख शरद पवार यांनी एका चमत्कारीक शब्दावलीने केला होता. ‘माण-खटावमध्ये गांधीने घोटाळा केला’ असे शब्द पवारांनी वापरले होते. योगायोग असा, की ज्या खटावमध्ये पवारांनी ते शब्द वापरले, तिथूनच गुजरातला जाऊन स्थायिक झालेले रा. स्व. संघाचे एक प्रचारक ‘वकीलसाब’ म्हणून ओळखले जायचे. नरेंद्र मोदी हा त्याच वकीलसाब यांचा शिष्य आणि मंगळवारी त्याच मोदींनी पुन्हा ‘गांधी घोटाळा’ केला. भारतातील बहुतांश वृत्तवाहिन्या अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणूकीचे आकडे व चर्चा करत असताना अकस्मात, पंतप्रधान देशाला उदेशून भाषण करणार असल्याची बातमी आली आणि काही मिनीटातच प्रत्येक दुरदर्शन पडद्यावर मोदी झळकूही लागले. आपल्या नेहमीच्या शैलीत गंभीरपणे मोदींनी देशाला भेडसावणार्‍या अर्थकारणाचा व विविध विषयांचा उल्लेख केला. त्यातच ५०० व १००० रुपयांच्या नोटांचा विविध गुन्ह्यामध्ये कसा वापर होत आहे त्याचीही चर्चा केली. या दोन्ही नोटांवर महात्मा गांधींचे ठळक चित्र छापलेले असते आणि त्याचाच उल्लेख पवारांनी खटावच्या सभेत केला होता. गांधींनी घोटाळा केला म्हणजे अशा मोठ्या रकमेच्या गांधींचे छायाचित्र असलेल्या नोटांनी घोटाळा केला, असेच पवारांना म्हणायचे होते. मंगळवारी तोच घोटाळा मोदींनी संपवला.

नोटेवरचा गांधी म्हणजे पवारांनी तशा मोठ्या नोटा वाटून निवडणूक जिंकण्यात आली, असे म्हटलेले होते आणि देशात अशा पिवळ्या व तांबड्या गांधींच्या नोटा किती धुमाकुळ घालत आहेत, तेच पवारांनी सुचित केले होते. मोदींनी त्याच नोटावर घाला घातला आहे. कारण सोमवारी मोदींनी अकस्मात जनतेसमोर येऊन या दोन मोठ्या रकमेच्या नोटाच व्यवहारातून बाद केल्याची घोषणा करून टाकली. त्यामुळे आता या दोन नोटांमध्ये लपवून ठेवलेला अब्जावधी कोट्यवधी रुपयांचा काळापैसा निकामी होऊन गेला आहे. एका घोषणेने कोट्यवधी रुपयांचा काळापैसा आता बाजारात आणावा लागेल आणि त्यासाठी गुन्हे अंगावर घ्यावे लागतील. किंवा त्यावर पाणी सोडावे लागणार आहे. या नोटा केवळ काळापैसाच नाही, त्या मोठ्या प्रमाणात खोटापैसाही आहे. कारण पाकिस्तानी गुप्तहेरसंस्था दाऊदच्या टोळीला हाताशी धरून अशा मोठ्या रकमेच्या नोटा छापून भारतात वितरीत करीत असते. त्या अधिकृत नसल्या तरी सामान्य भारतीयांना तो फ़रक कळत नाही आणि पर्यायाने भारतीय अर्थिक व्यवस्थेला त्यातून इजा होत असते. त्याला पायबंद घालण्याचे विविध उपाय आजवर निरूपयोगी ठरलेले आहेत. अशा नोटा रद्द करण्याची मागणी अनेकदा पुढे आलेली होती आणि त्यावर विचार करून बाजूला ठेवली गेली होती. कारण विविध धंदे उद्योग व त्यांचे हितसंबंध यांच्यापुढे सरकारने नेहमीच गुडघे टेकलेले होते. पण नरेंद्र मोदी हा धाडसी राजकारणी आहे आणि त्याला कुणासमोर गुडघे टेकायची वेळ येऊ नये, असे मताधिक्य जनतेने दिलेले आहे. त्याचा अर्थ समजण्याची बुद्धीही मोदींपाशी आहे. म्हणूनच त्यांनी असा निर्णय घेत पिवळागांधी व तांबडागांधी रद्द करण्याचे धाडस केलेले आह. धाडसी निर्णय घेणे सोपे असले तरी निर्णयाची अंमलबजावणी सोपी नसते. त्यासाठी गोपनीयता व आकस्मिकता अगत्याची असते.

भारतातील सगळ्या वाहिन्या मंगळवारी अमेरिकन अध्यक्षपदाच्या मतदानात रमलेल्या असताना मोदी मंत्रिमंडळाची बैठक चालू होती. ती संपताच पंतप्रधान नरेद्र मोदी राष्ट्रपतींना भेटायला गेले. राष्ट्रपती भवनातून ते बाहेर पडत असताना त्यांचेच राष्ट्राला उद्देशून भाषण होणार असल्याची बातमी आली. अनेक वाहिन्यांनी आपले कान टवकारले आणि तशी घोषणा ब्रेकिंग न्युज म्हणून दिली. काही मिनीटे होण्याच्या आत म्हणजे संध्याकाळी आठ वाजता दुरदर्शनवर मोदींचे देशातील जनतेला साद घालणारे भाषण सुरूही झाले. ज्यांनी बारकाईने बघितले असेल, त्यांच्या लक्षात आले असेल, की हे भाषण लाईव्ह किंवा थेट नव्हते. तर आधीच चित्रीत करून सज्ज ठेवलेले भाषण होते. फ़क्त निर्णय झाल्यावर त्याचे प्रसारण व्हायचे होते. त्या भाषणात त्यांनी व्यवहारातील दोन मोठ्या नोटा रद्दबातल केल्याची घोषणा केली असली तरी त्याचा सुगावा कुणालाही लागू शकला नाही. अन्यथा आपले पत्रकार व वाहिन्या कमालीच्या तेज असतात आणि घटना घडण्यापुर्वीच त्यांच्याकडे बातम्या तयार असतात. पण दुर्दैव असे, की ही बातमी कुणाकडे नव्हती. तसे काही होऊ घातल्याचा सुगावाही कोणाला लागला नव्हता. बहुधा मोदी सरकारने यांना तसा सुगावा लागू दिलेला नव्हता. अशा कृतीचा आधी गाजावाजा झाला असता, तर अब्जावधी रुपयांच्या नोटा कधीच निकालात काढून अनेकांनी आपली काळीसंपत्ती सफ़ेद करून घेतली असती. सप्टेंबर अखेर तशी संधी होती आणि ती मुदत संपली तरी ‘आपला बाल बाका होणार नाही’ याची प्रत्येकाला खात्री होती. म्हणूनच सगळे बेफ़िकीर होते आणि त्यांना तसे बेफ़िकीर ठेवण्यातच घोषणेचे यश झाकलेले होते. त्यात मोदींनी कमालीचे यश मिळवले. कारण भाषणात त्यांनी दोन नोटा रद्द केल्याची घोषणा करताच तमाम अर्थजगताचे धाबे दणाणले. कारण आणखी तीन तासात पिवळा व तांबडा गांधी रद्दबातल व्हायचा होता.

किती लोकांना ठाऊक आहे, की मुंबईत काळागांधी व गोरागांधी अशी आडनावे होती. ह्या नावाची अनेक दुकाने मध्यमुंबईत दिसायची. प्रामुख्याने आयुर्वेदिक औषधे व जडीबूट्टी विकणारी ही दुकाने, आजकाल फ़ारशी दिसत नाहीत. पण त्यांच्या नावातला गांधी वेधक असायचा. ताज्या निर्णयानंतर पिवळागांधी (५०० रुपयांची नोट) आणि तांबडागांधी (हजार रुपयांची नोट) असे दोन शब्द प्रचारात येऊ शकतील. कारण अजून दिड महिन्यांनी अशा नोटा बदलणेही अशक्य होणार आहे. कारण ज्यांच्यापाशी अशा नोटा आहेत, त्यांना ३१ डिसेंबरपुर्वी त्या बदलून घ्याव्या लागतील. त्यासाठी बॅन्का, पोस्टकचेर्‍या व अन्य ठराविक जागी अदलाबदलीची व्यवस्था सरकारने केलेली आहे. पण ज्यांच्यापाशी खोट्या वा काळ्या पैशातले असे गांधी असतील, त्यांना बदलून घेताना तारांबळ होणार आहे. ज्यांच्यापाशी लाखो वा करोडोच्या संख्येने अशा नोटा आहेत, ते उजळमाथ्याने आपल्याकडे असलेल्या रकमेचा उल्लेख बोलण्यातही करू शकणार नाहीत. त्यामुळे अशा नोटांची अदलाबदली वा व्यवहारात, पिवळागांधी वा तांबडागांधी असे सांकेतिक शब्द प्रचारात येऊ शकतील. लोकसभा निवडणूकीपुर्वी स्वामी रामदेव यांनी अशा नोटा रद्द करण्याची मागणी केलेली होती. तशी मागणी दिर्घकाळ ‘अर्थक्रांती’ नियतकालिकातून व त्यांनी योजलेल्या चर्चेतूनही पुढे आलेली होती. त्याचे लाभही त्यांनी स्पष्ट केलेले होते. पण त्याविषयी कुठलाही बदल ज्यांना नको असतो, त्यांना आजकाल पुरोगामी म्हटले जात असल्याने, तसे धाडस आधीच्या पुरोगामी सरकारला करता आले नव्हते. मोदी हे मुळातच प्रतिगामी असल्याने प्रतिगामी लोकांची ही़च अपेक्षा होती आणि प्रतिगामी मोदींनी ती पुर्ण केली आहे. त्याच्या व्यापक परिणामांविषयी सवडीने लिहीता येईल. पण पिवळागांधी व तांबडागांधी यांच्या जडीबुट्टीचे रेचक पंतप्रधानांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला दिले हे आज मान्य करावे लागेल.

4 comments:

  1. Jai Hind, asach neta aaplyala hava hota.
    Anni toh aaj aahe hi khup aanandachi bab aahe.

    Bhau tumhi savistar lihach, politics pexa hi khup kahi sapdel hyatun aani aamhala pan kalel.

    Bhau u always give different but logical and true approach to see such news, mainly reading between the lines.

    thanks a lot.
    Jai Hind Vande Mataram.

    ReplyDelete
  2. मोदी हेभांडवलदारांचे हस्तक आहेत असे म्हणणारांचे दात मोदीनी त्यांच्या च घश्यात घातले. एक मात्र खरे कि मोदीवर जेवढे आरोप झाले किंवा जाणूनबुजून केले गेले ते कालांतराने खोटे पडले. हा माणुस देश हितासाठी कितीही कठोर निर्णय घेउ शकतो. मतपेटीचा विचार न करता .

    ReplyDelete
  3. गुजरातच्या ' अकिला ' या वर्तमानपत्राने सात महिन्यांपूर्वी सरकार नोटा बदलणार अशी वार्ता छापली होती त्याचे वृत्त लोकसत्ता पान सहावर आले आहे शेवटी तो एप्रिल फुल चा प्रकार होता असेही आहे . तरीपण हा योगायोग लक्षात घेण्यासारखा आहे .

    ReplyDelete