Wednesday, November 23, 2016

नोटाबंदी आणि ‘अनटचेबल्स’

the untouchables के लिए चित्र परिणाम

विधानसभेच्या राजकारणात शिवसेनेला स्थान मिळाले त्याला आता पाव शतकाचा काळ उलटून गेला आहे. १९९० सालात शिवसेनेचे ५४ आमदार निवडून आले आणि विरोधी नेतेपदी मनोहर जोशी यांची निवड झाली. शरद पवार चौथ्यांदा मुख्यमंत्री झाले होते आणि गृहखाते त्यांच्याकडेच असताना, त्यांचे अत्यंत विश्वासू सहकारी अरूण मेहता त्याच खात्याचे राज्यमंत्री झालेले होते. योगयोग असा, की आरंभीच्या काळात अरूण मेहताही शिवसेनेचेच नेते होते. मनोहर जोशी यांच्यासमवेत मेहतांनी शिवसेनेच्या अनेक प्रचारसभा गाजवलेल्या होत्या. असे दोन नेते १९९१ सालात एकाच शिष्टमंडळातून उल्हासनगरला गेलेले होते आणि तिथे मनोहर जोशींनी काढलेले उदगार आजही आठवतात. रिंकू पाटील नावाच्या विद्यार्थिनीला परिक्षाकेंद्राच्या वर्गातच रॉकेल ओतून जाळण्यात आल्याची भीषण घटना घडली होती. त्याचा राज्यव्यापी गदारोळ झाल्याने सर्वपक्षीय शिष्टमंडळ तिथे पाठवण्यात आलेले होते. तर राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर तुटून पडताना मनोहर जोशींनी मुंबई परिसराचे शिकागो झाले आहे, असे म्हटलेले होते. जगात अराजकला तीच उपमा दिली जात होती. कारण एका जमान्यात शिकागो या अमेरिकेतील महानगराचा कारभारच अल कापोन नावाचा मफ़िया हाकत होता आणि त्याला कुठला कायदा वा सरकार वेसण घालू शकलेले नव्हते. त्याच्या मर्जीनुसार न्यायाधी्श, पोलिस आयुक्त, राज्यकर्तेच नव्हेतर तमाम राजकारणीही त्याची कठपुतळी म्हणून वागत होते. अल कापोन हा माफ़िया बॉस होता. त्यामुळेच जगात कुठेही गुन्हेगारी शिरजोर झाली, तर त्याला शोकागो झाले म्हणायची फ़ॅशन झालेली होती. जसे आजकाल सर्जिकल स्ट्राईक म्हणायची फ़ॅशन आहे. पण फ़ार काळ कापोन मस्तवालपणा करू शकला नव्हता. त्याला पुरून उरणारा एक अधिकारी उदयास आला आणि त्याने कापोनचे साम्राज्य धुळीस मिळवलेले होते. आज त्याचे स्मरण का व्हावे?

हजार पाचशेच्या नोटा रद्द करून पंतप्रधान नरेंद्र मोदी दिर्घकालीन काळापैसा व समांतर अर्थव्यवस्था निकामी कशी करणार, हा प्रश्न विचारला जात आहे. अर्थशास्त्रज्ञ आणि अनेक जाणकार मोदींच्या निर्णयावर जितके प्रश्न विचारत आहेत, तसेच प्रश्न अल कापोनच्या शिकागोतील गुन्हेगारी साम्राज्याबद्दल विचारले गेले होते. कापोन व त्याच्या गुन्हेगारीला संपवणेच अशक्य मानले जात होते. पण इलियट नेससारख्या एका माणसाने त्यावर उपाय काढला होता आणि यशस्वीरित्या सिद्धही करून दाखवला होता. तो सगळा प्रकार तेव्हा चमत्कार म्हणून बघितला गेला. त्या कारवाईला मोजक्या प्रामाणिक अधिकार्‍यांच्या कर्तबगारीने यशस्वी केले होते आणि त्यांना पुढल्या काळात ‘अनटचेबल्स’ अशा नावाने ओळखले गेले. त्यावर अनेक पुस्तके शेकडो लेखही लिहीले गेले. चित्रपटही निघाला. मात्र ती कारवाई अंमलात आणण्याविषयी अनेकांच्या मनात शंका होत्या. त्यामागची कल्पनाच जगावेगळी व अजब होती. कापोनचे गुन्हेगारी साम्राज्य अभेद्य मानले जात होते. संघटित गुन्हेगारीतून येणारा अफ़ाट फ़ायदा व पैसा; यामुळे कुणालाही भ्रष्ट करण्याची, विकत घेण्याची वा संपवून टाकण्याची ताकद त्याने आत्मसात केली असल्याची प्रत्येकाला खात्री वाटत होती. म्हणूनच त्याला वेसण घालणे वा संपवणे सर्वांनाच अशक्य वाटत होते. ते एक दुष्टचक्र होते. गुन्हेगारी लाभदायक होती. त्यातून मिळणारा अफ़ाट पैसा पोलिस व सरकारी यंत्रणेला किड लावत होता. त्यामुळे गुन्हेगारी अधिक शिरजोर व्हायची आणि म्हणूनच गुन्हेगारी वा बेकायदा कृत्ये अधिक सुरक्षित झालेली होती. अधिक पैसा, अधिक भ्रष्टाचार व अधिक गुन्हेगारी असे ते दुष्टचक्र भेदण्याची कुणाला हिंमत होत नव्हती आणि तशी शक्यताही वाटत नव्हती. तशी इच्छाशक्तीही सर्वजण गमावून बसलेले होते. पण इलियट नेस हा त्याला अपवाद होता. तो एक सामान्य पोलिस अधिकारी होता.

पण इलियट नेसकडे वळण्यापुर्वी अल कापोनचे साम्राज्य समजून घ्यावे लागेल. आपण इथे आज ज्याला काळापैसा वा समांतर अर्थव्यवस्था म्हणतो, तशीच त्याची व्यवस्था होती. त्याच्याच पैशावर निवडणुका जिंकल्या जात होत्या आणि अधिकार्‍यांच्या नेमणूका वा बदल्या व्हायच्या. अगदी कुठल्याही पक्षाचे शिकागोतील उमेदवार कापोनच्या मर्जीने ठरायचे आणि कुठल्या विभागात कुठला गुन्हेगारी धंदा वा कायदेशीर व्यवसाय व्यापार कोणी करायचा, तेही कापोनच ठरवू शकत होता. आपल्याकडे आज त्याला काळापैसा असे संबोधले जाते. सहाजिकच कापोनला हात लावणे वा त्याचे साम्राज्य उध्वस्त करणे कायद्याला वा न्यायव्यवस्थेलाही अशक्य होते. कारण ते अभेद्य दुष्टचक्र असल्याची ठाम समजूत प्रत्येकाने करून घेतलेली होती. पण ती भेदावी असे वाटणारेही अनेकजण होते. त्यात पोलिस व प्रशासकीय अधिकारी वा समाजसेवी राजकारणीही होते. मात्र त्यांना उपाय सापडत नव्हता. ते सतत त्यावर विचार करत होते आणि चाचपडत होते. त्यामध्ये एक माजी अटर्नी जनरलचा समावेश होता आणि काही उद्योजक प्राध्यापकही होते. असा गट कापोनला संपवायचा विचार करत होता. आपल्याकडे मध्यंतरी लोकपाल आंदोलनाच्या निमीत्ताने एक सिव्हील सोसायटी नावाचा गट निर्माण झाला होता, तसाच हा काहीसा आठ दशकापुर्वीचा शिकागोतला गट होता. तेव्हाच इलियट नेस शिकागो पोलिसात एक सामान्य अधिकारी होता. त्याला आपल्या अंगावरच्या वर्दीचीही शरम वाटत होती. तो स्वच्छ चारित्र्याचा असला तरी प्रशासनाचा भाग म्हणून त्याला आपणही कापोनचे कुत्रे असल्याच्या अपराधगंडाने पछाडले होते. म्हणून तोही कापोन साम्राज्य संपवण्याच्या विचाराने व्यग्र होता. त्यातून त्याला काही कल्पना सुचल्या आणि त्याचाच नातलग सिव्हील सोसायटी गटात असल्यामुळे नेसने आपली कल्पना त्या ज्येष्ठाच्या कानी घातली होती. तिथून ‘अनटचेबल्स’ची सुरूवात होते.

जेव्हा कुठलीही अनाकलनीय भलतीच गोष्ट समोर येते, तेव्हा ती जुन्या मापदंडाने मोजता येत नाही आणि म्हणूनच जुन्या निकषावर तिचे मूल्यांकन होऊ शकत नाही. परिणामी त्याबद्दलचे आकलन व निदानच चुकीचे ठरत असल्याने, नव्या अपवादात्मक मार्गानेच त्याकडे बघावे लागते. कापोनचे गुन्हेगारी साम्राज्य आवाक्याबाहेरची गोष्ट असल्याने, कायदेशीर मार्गापेक्षा वेगळ्या प्रकाराने त्याचा निचरा करण्याचा विचार आवश्यक होता. इलियट नेसनेही तसाच पर्याय शोधलेला होता. मात्र त्यासाठी आवश्यक असलेले अधिकार व साधने त्याच्यापाशी नव्हती. म्हणूनच त्याने त्या अभ्यासक गटासमोर आपली कल्पना मांडली आणि त्यापैकी एकाने त्याची व अमेरिकन अटर्नी जनरलची भेट घडवून आणली. कारण अमेरिकन कायदा व्यवस्था हाताळणारा तो सरकारी प्रमुख वकीलही कापोन समोर हात टेकून बसला होता. तोही पर्याय शोधत होता. इलियट नेसची अपवादात्मक कल्पना त्याला आवडली. पण नेसही प्रामाणिक आहे की अधिक पैसे काढण्यासाठी अधिक अधिकार मागतोय; अशी त्यालाही रास्त शंका आलेली होती. पण त्याचा गैरसमज नेसने तात्काळ दुर केला. आपल्याला पोलिस असल्याची शरम वाटते आणि आपल्याविषयी शंका असेल, तर हीच कल्पना अन्य कुणा प्रामाणिक अधिकारी पथकाकडून राबवून घ्यावी, असेही नेसने तात्काळ सांगून टाकले. त्यातले काही होणार नसेल, तर नेस पोलिस खात्याची नोकरी सोडणार होता. कारण त्याला पोलिस म्हणजे कापोनचे कुत्रे असल्याच्या भावनेने शरम वाटू लागली होती. अखेर त्याची कल्पना एटर्नी जनरल यांनी स्विकारली आणि ‘अनटचेबल्स’चा खेळ आकाराला येऊ लागला. त्यांच्या पुढे अल कापोनचे गुन्हेगारी साम्राज्य पत्त्याच्या इमल्याप्रमाणे ढासळत गेले. नोटाबंदीचा धाडसी निर्णय त्याची आठवण करून देणारा असल्याने, अनटचेबल्स नव्याने सांगण्याची गरज आहे. (अपुर्ण)

2 comments:

  1. Since last three days I was desperately waiting for your articles to have different point of view. Thank you Bhau thank you to give me the assurance that this step is not a stupid test. Even my brother started raising the doubts for the implementation lapses and so the motive. Thank you for giving new life to my conviction and hope

    ReplyDelete