Thursday, November 17, 2016

गरीबी हटावची गोष्ट

(माजी राष्टपती व्ही. व्ही. गिरींसमवेत इंदिराजी)

indira gandhi VV giri के लिए चित्र परिणाम

कुठल्याही देशात वा समाजात सामान्य गांजलेली त्रासलेली माणसे सहसा तक्रारी करीत नाहीत. उलट ज्यांना प्रस्थापित व्यवस्थेचा सर्वाधिक लाभ मिळालेला असतो, तेच सतत कुठल्या ना कुठल्या कारणास्तव त्रुटी काढून रडत असतात. आपले अधिकार वा हक्क यासाठी तासभर सलग बोलणार्‍यांना मतदानासाठी जाताना सहसा तुम्ही बघणार नाही. मतदान हा आपला हक्क आहे आणि तो बजावण्याची त्यांना गरज वाटत नसते. पण रस्त्यावर संसार मांडलेला किंवा चाळ झोपडीत गुजराण करणारा सामान्य गरीब, अगत्याने मतदानाला रांग लावलेला दिसेल. ही नेहमीची बाब आहे. त्यात नवे काहीच नाही. म्हणूनच नोटाबंदीचा गरीबांना किती भयंकर त्रास होतोय, हे सांगण्याची सर्वात मोठी तारांबळ असे सुखवस्तु लाभार्थी करताना दिसत आहेत. कारण त्यांना त्यातला कुठलाही त्रास झालेला नाही. ज्यांच्या मुलाखती वाहिन्यावर, खरेदीला खिशात पैसे नाहीत म्हणून दाखवल्या जात आहेत. किंवा लांब रांगा दाखवल्या जात आहेत, त्यांची वेशभूषा बघितली, तरी अशा लोकांना घरची चुल पेटण्याची चिंता असू शकत नसल्याचे सहज लक्षात येऊ शकेल. कारण तेच समाजातील कुठल्याही प्रगति विकासाचे खरे लाभार्थी असतात. गेल्या सत्तर वर्षात गरीबी हटावच्या जितक्या योजना व कल्पना आल्या, त्यातून गरीब कधीच सुखवस्तु झाला नाही. पण किरकोळ श्रीमंत होते, तेच अधिकाधिक श्रीमंत होत गेले. १९६९ सालात राहुलच्या दादीने गरीबी ह्टावची घोषणा करीत चौदा व्यापारी बॅन्कांचे राष्ट्रीयीकरण केले. त्याचा सर्वात मोठा लाभार्थी सध्या ब्रिटनमध्ये बसून मजा मारतो आहे. त्याला आठदहा हजार कोटी रुपये बुडवण्याची संधी राष्ट्रीयीकृत बॅन्कांनीच दिली ना? इंदिराजींनी गरीबी हटवण्यासाठी राष्ट्रीयीकरण केले, तर विजय मल्या हजारो कोटी रुपयांची लूट सहजगत्या कशी करू शकला? त्याचा त्रास कोणालाच कसा झालेला नाही?

गतवर्षी म्हणजे २०१५ साली नरेंद्र मोदी यांनी जनधन योजना म्हणून कुठल्याही गरीबा खिशात पैसाही नसताना बॅन्केत खाते उघडण्याचा अधिकार दिला. इंदिराजींनी १९६९ सालात मोठ्या बॅन्का गरीबांच्या हवाली करत असल्याचे सांगून राष्ट्रीयीकरण केले. पण तिथेच गरीबाला ४६ वर्षे खातेही उघडता आलेले नव्हते. मात्र विजय मल्यासारख्यांना कोट्यवधी रुपयांची विनातारण कर्जे देण्याची तरतुद झालेली होती. कुठल्याही सरकारी मालकीच्या बॅन्केतून कर्ज काढणे वा बुडवणे, ही सरकारी बाब होऊन गेली. तसे नसते तर मल्या इतके मोठे कर्ज घेऊ शकला नसता. चिदंबरम व युपीएच्या कालखंडात त्याला हे कर्ज मिळू शकले. कारण बॅन्कांवर सरकारची हुकूमत होती. पण त्याच बॅन्कांमध्ये सामान्य नागरिकाला एकदोन लाखाचे कर्ज मागताना चौपट किंमतीचे तारण दाखवावे लागत होते. याला राहुलच्या दादीने गरीबांच्या हवाली केलेल्या बॅन्का म्हणतात. मल्याला पळून कसा जाऊ दिला, असा जाब मोदी सरकारला विचारण्यात प्रत्येक कॉग्रेसवाला आघाडीवर आहे. पण मल्याला कुठल्याही तारणाशिवाय इतकी मोठी कर्जे दिली कशी? ह्या प्रश्नाचे उत्तर तेच लोक देत नाहीत. कारण ती कर्जे त्यांच्याच कारकिर्दीत दिली गेलेली आहेत. याला बनवेगिरी नाही, तर काय म्हणायचे? पण सामान्य माणूस असाच डोळे दिपवणार्‍या गोष्टींना फ़सत असतो. म्हणूनच अशाच भामटेगिरीतून इंदिरा नेहरू खानदानाचे साम्राज्य निर्माण झाले. बॅन्कांचे राष्ट्रीयीकरण म्हणजे गरीबी हटाव, असा पवित्रा घेऊन इंदिराजींनी तेव्हा आपले देव्हारे माजवून घेतले आणि विनाविलंब त्याचा लाभ उठवण्यासाठी थेट लोकसभाही बरखास्त केली होती. त्यांना प्रचंड बहूमत मिळाले आणि कॉग्रेस पक्षातली लोकशाही रसातळाला गेली. इंदिराजींचा वारस म्हणजे कॉग्रेस नेतृत्व, अशी व्याख्या तिथून सुरू झाली. त्यासाठी देशातल्या सामान्य कष्टकर्‍यांच्या घामातला पैसा बॅन्कांनी मोजला आहे.

चौदा बॅन्कांचे राष्ट्रीयीकरण म्हणजे समाजवाद अशा भुलभुलैयाला फ़सलेल्या पुरोगाम्यांनी, त्या दोलायमान काळात इंदिराजींची पालखी उचलली आणि इंदिराजींना पक्षात असलेले ज्येष्ठ संपवायला हातभार लावला. मग त्याच देव्हार्‍यात बसून इंदिराजी गरीबांच्या कैवारी झाल्या. त्यांना बहूमत व निरंकुश सत्ता मिळाली. कारण मतदारापुढे त्यांनी एकच निवेदन केले होते. ‘मै कहती हू गरीबी हटाव. बाकी लोग कहते है इंदिरा हटाव’. बस्स १९७१ च्या मध्यावधी निवडणूकीत सगळ्याच विरोधकांचा सफ़ाया झाला. कारण इंदिराजी प्रेषित असल्याचे जनमानसात फ़िट बसले होते. मात्र आजपर्यंत त्याच बॅन्कात त्याच गरीबाला खातेही काढता आले नाही, की चार रुपयेही मिळू शकले नाहीत. आज तेव्हाच्या इंदिराजींची भूमिका कोण करतो आहे? पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या नरेंद्र मोदी यांनी, नोटाबंदीचा निर्णय घेऊन नेमके तसेच काहीसे आवाहन जनसामान्यांना केलेले आहे. थोडी कळ काढा! थोडा त्रास सहन करा. अब्जावधी कोट्यवधी रुपयांचा काळापैसा उघडकीस आणला, मग त्याचा लाभ सामान्यांना मिळणार आहे. एका रात्रीत काळ्यापैशाची श्रीमंती आपण मातीमोल करून टाकली म्हणणारे मोदी, त्या गरजू गरीबाला भावत असतात. आपल्या खिशात वा खात्यात येणार्‍या पैशापेक्षा, त्या गरीबाच्या दुखर्‍या मनाला मौजमजा करणार्‍या श्रीमंताच्या तोंडचा काळ्यापैशाचा घास काढून घेतला जाण्याविषयी जास्त आत्मियता असते. तीच त्याची खरी अपेक्षा असते. एकप्रकारच्या सूडबुद्धीने तो गरीब धुसमटलेला असतो. त्याच्या मनातल्या भावनांशी असा राजकीय खेळ होत असतो. काळापैसा बाहेर आल्याने काही किमान लाभ सामान्यांना मिळणार आहेत. पण तोही त्याच्या तोंडी लागू नये म्हणून तमाम मोदी विरोधक एकवटले आहेत, असे चित्र मोदींसाठी मोठेच राजकीय लाभाचे असणार आहे. तेही मग राहुलच्या आजीचे शब्द उच्चारत म्हणतील. ‘मी काळापैसा हटवा म्हणतो आणि माझे विरोधक मात्र मोदी हटाव म्हणतात’. आता जनतेच कोणाला ते हटवावे. मोदींची अपेक्षा काय हे यातून समजू शकेल.

राहुल गांधी यांनी तुंबलेल्या रांगेत येऊन काय साधले? गोव्यातील सभेत मोदींनी त्याचाही लाभ उठवला. ज्यांनी कधी बॅन्केच्या दारात पायधुळ झाडलेली नाही, त्यांनाही आज चार हजार रुपयांसाठी रांगेत येऊन उभे रहावे लागते आहे’ असे मोदी म्हणाले. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, की सामान्य माणसाच्या मनात राजकीय व प्रतिष्ठीत लोकांविषयी जी घृणा आहे, त्याला मोदी अशा विधानातून खतपाणी घालत होते. तोंडात चांदीचा चमचा घेऊनच जन्माला आलेल्या अतिश्रीमंत लोकांबद्दल गरीबामध्ये एकप्रकारचा आकस असतो. आपल्याला काही मिळण्यापेक्षा दुसर्‍या मौज करणार्‍याविषयीचा आकस त्यांचे दु:ख बघून सुख देत असतो. मोदींनी राहुलच्या बेंन्करांगेत उभे रहाण्यातून सामान्य लोकांना तेच समाधान दिले. ह्याला राजकारण म्हणतात आणि आपल्या विरोधकाला तशी संधी नाकारण्यालाही राजकारण म्हणतात. राहुल तिथेच कमी पडले. १९७०-८० च्या जमान्यात इंदिराजी गरीबांची मते त्याच आधारावर मिळवत होत्या आणि गरीबांच्या मसिहा झालेल्या होत्या. पण आजीचा वारसा सतत सांगणार्‍या नातवाला त्यातले नाट्य कधी ओळखता आले नाही. मोदी मात्र त्यातला आशय ओळखून इंदिराजींचे नेमके अनुकरण करताना दिसतात. तेच मोदींच्या सततच्या राजकीय यशाचे रहस्य आहे. काळापैसा ही सामान्य माणसाला खुपणारी गोष्ट आहे. त्याच्या त्याच भावनेला हात घालण्याचे राजकारण मोदींनी केले आहे. त्याचा किरकोळ लाभही सामान्य माणसाला सुखावणारा आहे आणि त्यासाठी थोडे कष्ट घ्यायलाही सामान्य माणूस तयार आहे. मात्र बदल्यात बोनस म्हणून त्याला श्रीमंतांची तारांबळही बघायची आहे. काळापैसा वा राजकारण्यांची मस्ती उतरताना बघण्यात अधिक समाधान आहे. हे असेच होत असेल तर मोदींना हटवण्यापेक्षा काळापैसा हटाव त्याला आवडणारच. मात्र त्यात बाकीच्या राजकीय पक्षांचा हकनाक बळी पडणार आहे.

4 comments:

  1. छान भाऊ (अपूर्ण)

    ReplyDelete
  2. अप्रतिम विश्लेषण, भाऊ!
    एकदा NDA मध्ये राहून उद्धव यांचे ममतागमन का? नोटबंदी मुळे ते का इतके विव्हळत आहेत, यावर हि प्रकाश टाका

    ReplyDelete
  3. भाऊ लोक फारच खुश आहेत "त्रास होतोय पण असुदे काही हरकत नाही निर्णय योग्यच आहे" अशा प्रतिक्रिया सगळेच देतायत

    ReplyDelete
  4. सुखाला आधी लाथ मारा त्वरेने |
    उठा मार्ग चला कड्या निश्चयाने ||
    जगी गांडूळासारखे ना जगावे |
    उरी 'बाजी तानाजीला' संस्मरावे ||
    गुरुवर्य भिडे गुरुजी .....

    ReplyDelete