Wednesday, November 30, 2016

मोदी हे वाजपेयी नाहीत

Image result for modi vajpayee

हजार पाचशेच्या नोटा बदलताना मुळातच देशाच्या अर्थव्यवस्थेला ढवळून काढण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हेतू होता. त्यांनी तसे त्या घोषणेतच बोलून दाखवलेले होते. पण नंतरचा घटनाक्रम बघता, नोटाबंदीने देशाचे राजकारण पुरते ढवळून निघाले आहे. महिनाभरापुर्वी प्रत्येक नेता व राजकीय पक्षाची जी आधी ठरलेली जाहिर राजकीय भूमिका होती, त्यात मोठमोठ्या उलथापालथी घडताना दिसत आहेत. नोटाबंदीच्या निर्णयाला आरंभापासून को्ण विरोध करणार हे ठरलेले होते. पण अकस्मात त्यात शिवसेनेने प्रवेश केला आणि मोदींना आपले सहकारी पक्षही सोबत राखता येत नसल्याची टिका झाली होती. पण आता तीन आठवडे उलटून गेल्यावर चित्र कमालीच्या वेगाने पालटू लागलेले दिसते आहे. पहिली गोष्ट म्हणजे अचानक आजवरचे कट्टर विरोधक व बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मोदींच्या त्याच निर्णयाचे जोरदार समर्थन केले. नुसते समर्थन करून नितीश थांबले नाहीत, तर मोदींच्या या धाडसासाठी त्यांच्याच पाठीशी आपण उभे राहिले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी आपल्या सहकार्‍यांना केले. खरे तर त्यामुळे त्यांच्याच पक्षातल्या अनेकांची तारांबळ उडाली. कारण मोदी काहीही करतील, त्याला विरोधच करण्याचे जदयुचे धोरण ठरलेले होते. अशा बाबतीत सरकारला समर्थन देण्यास वेळोवेळी पुढे आलेले ओडीशा़चे मुख्यमंत्री नविन पटनाईक, यांचा पाठींबा मोदींनी गृहीत धरलेला होता. पण नितीशचे मतपरिवर्तन हा राजकीय गरजेच्या वेळी बोनस होता. मात्र त्यामुळे नुसती जदयुमध्ये खळबळ माजली नाही, तर बिहारच्या सत्तारूढ महागठबंधन आघाडीतही गडबड सुरू झाली. कारण त्या सत्तेत कॉग्रेस व लालू भागिदार आहेत. त्यामुळे नितीशना रोखण्यासाठी लालू व सोनिया यांच्यात खलबते झाली. पण नितीश बदलणे दूरची गोष्ट झाली. प्रत्यक्षात लालूंनीच कोलांटी उडी मारली आहे.

आठवडाभर आधी लालूंचा पक्ष नोटाबंदीवर तुटून पडला होता व देशाचे वाटोळे करणारा निर्णय; अशी त्यांनी नोटाबंदीची हेटाळणी केलेली होती. मोदींचे नितीशनी कौतुक केल्यावर घाईघाईने लालूंनी सोनियांशी संपर्क साधला होता. त्यानंतर त्यांनी बुधवारी आपल्या आमदारांसह नितीशची भेट घेतली. खरे तर त्यानंतर नितीश आधी घेतलेली नोटाबंदी समर्थनाची भूमिका शिथील करतील, अशी अपेक्षा होती. पण झाले उलटेच! लालूंनी नितीश भेटीनंतर स्वत:च नोटाबंदीचे समर्थन सुरू केले आहे. आपला विरोध नोटाबंदीला नव्हता, तर त्यातून सामान्य माणसाला होणार्‍या त्रासासाठी होता; असे लालूंनी म्हटले आहे. लालूंचा आधीचा पवित्रा बघूनच ममतांनी बिहारमध्ये नोटाबंदीच्या विरोधात मोठी सभा योजण्याची घोषणा केली होती. तिथे लालूही उपस्थित रहातील अशी अपेक्षा होती. पण ममता पाटण्याला पोहोचल्या, तेव्हा लालूंनी त्यांच्याकडे पाठ फ़िरवली होती. ममतांना नोटाबंदी मान्य नसून, त्यांनी जुन्या नोटा वापरण्याची आजही मोकळीक असावी, असा आग्रह धरला आहे. सहाजिकच लालूंच्या नव्या भूमिकेने ममताचा उत्साह मावळला आहे. पण त्याहीपेक्षा दिल्लीत कॉग्रेसची तारांबळ करून टाकली आहे. तिथे नितीशच्या जदयुचे सदस्य कॉग्रेससोबत कामकाज ठप्प करण्यात गर्क असताना, बिहारमध्ये नितीशनी नवी समस्या उभी केलेली आहे. लालूंनाही नितीशनी पटवल्याने संसदेतील नोटाबंदी विरोधाची धार बोथट होण्याची स्थिती येत चालली आहे. लालूंची चिंता आणि कॉग्रेसचे राजकारण वेगवेगळे आहे. लालूंना दिल्लीची पर्वा नाही. दिर्घकाळानंतर बिहारमध्ये हाती आलेली सत्ता त्यांना गमवायची नाही. त्यांच्या दोन मुलांना मिळालेली मंत्रीपदे अधिक महत्वाची आहेत. म्हणूनच नितीश भाजपच्या गोटात जाऊन चालणार नाही. किंबहूना तेच दुखणे ओळखून नितीशनी लालूंना नोटाबंदीच्या समर्थनाला उभे रहायची वेळ आणलेली आहे.

ज्या विरोधकांपाशी कुठलेही ध्येय वा उद्दीष्ट नसते, त्यांना भवितव्य नसते. नरेंद्र मोदी यांना आपली सत्ता टिकवण्याची चिंता नाही, हेच त्यांचे सर्वात मोठे बळ आहे. ही बाब विसरून त्यांच्या विरोधातले राजकारण करता येणार नाही. जे कोणी विरोधक मोदींची अडवणूक करायला टपलेले आहेत, त्यांना अटलबिहारी वाजपेयी आणि मोदी यातला फ़रक अजून समजून घेता आलेला नाही. वाजपेयी हा सभ्य माणूस होता. मोदीही सभ्य असले तरी चांगुलपणाचा गैरफ़ायदा घेणार्‍यांशीही चांगुलपणा दाखवण्याइतकी त्यांची नम्रता नाही. म्हणूनच चांगुलपणा दाखवण्यासाठी डावपेचांना शरण जाणे वा त्यापुढे नांगी टाकणे; हा मोदींचा स्वभाव नाही. ते बोलून कोणाला ‘मन की बात’ सांगत नाहीत. तर कृतीतून मनकी बात करत असतात. त्यामुळेच आपल्याला विरोधक कुठे गोत्यात टाकू बघतील वा टाकतील, त्याचा मोदी आधीपासून विचार करत असतात. त्याप्रमाणे विरोधकांनी डाव खेळला, की त्याला चोख उत्तर देण्याची सज्जता त्यांनी ठेवलेली असते. विरोधकांचा डाव त्यांच्यावरच उलटून टाकायचा आणि गंमत बघत उभे रहायचे, ही मोदीशैली आहे. म्हणूनच नोटाबंदीला विरोध होताच मोदी डळमळून गेले नाहीत. अगदी देशभर बॅन्कांच्या दारात रांगा लागल्या आणि लोक हैराण झाले, तरी मोदी आपल्य निर्णयावर ठाम राहिले. त्यांनी आधी विरोधकांना एकजुटीने ओरडू दिले आणि मग त्यातून एकेकाला बाजूला काढण्याचा खेळ सुरू केला. मग विरोधकांचे आपसातच बेबनाव होतील याची प्रतिक्षा केली. विरोधकांच्या दुबळ्या बाजू आपल्या सरशीसाठी वापरण्यातही मोदी वाकबगार आहेत. तेच आताही घडले आहे. नितीश मनापासून आपले कौतुक करणार नाहीत, हे मोदींना कळते. पण नितीश-लालू वा नितीश-ममता यांच्यातले मतभेद यावेळी उपयोगी येऊ शकतात, हे मोदींनी आधीच ताडलेले होते. त्याचा परिणाम विखुरलेल्या विरोधकांच्या रुपाने समोर येतो आहे.

पहिल्या दिवशी एकसुरात नोटाबंदी विरुद्ध बोलणार्‍या विरोधकांचे आता बेसूर व भेसूर आपल्याला ऐकू येत आहेत. निवडणूक निकालापासून बोजवारा उडालेल्या भारतबंदच्या परिणामातून विरोधाचा विचका आपण बघितलेला आहे. दरम्यान आठ लाख कोटीहून अधिक जुन्या नोटा जमा झालेल्या असून, आणखी दोन लाख कोटी जमा होण्याची शक्यता आहे. उरलेल्या तीन लाख कोटी परत येणार नाहीत. तितका काळापैसा मातीमोल केल्याचा दावा मोदी करू शकतात. शिवाय ज्या नोटा जमा झाल्यात त्याची छाननी करून सरकारी तिजोरीत जमा होणार्‍या पैशातून मोठ्या जनहिताच्या योजना घेऊ शकतात. त्याचे श्रेय रांगेत उभ्या राहून त्रास काढणार्‍या जनतेला देऊन सहानुभूती मिळवू शकतात. दोन महिन्यांनी पुरेसे चलन बाजारात आल्यावर धावपळ कमी होईल. तेव्हा लोकांना या त्रासाचे स्मरण राहिलेले नसेल. पण त्यातून जमा झालेल्या कोट्य़वधी रुपयांच्या रकमेचे श्रेय जनतेला आपलीच पाठ थोपटून घेण्यात अभिमान वाटू शकतो. शिवाय जे काही किरकोळ लाभ मिळतील, तेच लक्षात रहातात. अशावेळी ज्यांनी नोटाबंदीला कडाडून वा अन्य मार्गाने विरोध केला, त्यांच्याविषयी जनमानसात संशय निर्माण होतो. तोच तर मोदींचा खरा हेतू आहे. ती राजकीय लबाडी आहे, यात शंका नाही. पण राजकारणात लोकमत आपल्या बाजूने फ़िरवण्यासाठी कुठलाही राजकारणी अशीच चतुराई करीत असतो. मोदींच्या या सापळ्यात विरोधकांनी स्वत:ला ढकलून दिले आहे आणि म्हणूनच त्यातून राजकारणात मोठी उलथापालथ होऊ लागलेली आहे. नितीश यांनी मोदीचे कौतुक केले वा लालूंना भूमिका बदलण्यास भाग पाडले, ही त्याची सुरूवात आहे. काही महिन्यांनी अर्थसंकल्प मांडला गेल्यावर अनेक अभ्यासक जाणकाराचे डोळे उघडतील. कारण मोदी हे वाजपेयी नाहीत, हे अनेकांच्या लक्षात येऊ लागलेले असेल.

2 comments: