नुकत्याच संपलेल्या अमेरिकन निवडणूकीच्या प्रचारकाळात सर्व़च अमेरिकन माध्यमे आणि जाणते पत्रकार, हिलरी क्लिंटन सहज निवडून येतील; असे सांगुन डोनाल्ड ट्रंप यांच्या प्रत्येक भाषणाची व त्यातल्या विषयांची टवाळी करीत होते. पण प्रत्यक्षात मतदाराने त्या तमाम शहाण्यांना खोटे पाडत ट्रंप यांना विजयी केले. त्यानंतर आपले अंदाज कशामुळे चुकले, याची चाचपणी विविध माध्यमे करत असताना, एका चर्चेत ट्रंप समर्थक एका प्राध्यापकाने केलेला खुलासा अतिशय उदबोधक आहे. तो म्हणाला सामान्य माणूस ट्रंप यांच्या भाषणातला आशय समजून घेत होता आणि पत्रकार माध्यमे त्याच भाषणातले शब्द व अक्षरे पकडून लटकत होते. मग त्यांचा कपाळमोक्ष अपरिहार्य होता. त्याचा अर्थ असा, की स्वत:ला शहाणे समजणारे पत्रकार वा अभ्यासक शब्दात अडकून बसतात आणि समोर दिसणारे सत्य बघू शकत नाहीत. अमेरिकेतले पत्रकार व बुद्धीमंत आणि आपल्याकडले शहाणे; यात तसूभर फ़रक पडत नाही. तसे नसते तर नोटाबंदीच्या निर्णयानंतर विविध वाहिन्यांवर विचारले जाणारे बालीश वा पोरकट प्रश्न आपल्याला ऐकावे लागले नसते. प्रत्येक बॅन्केच्या दारात नोटा बदलून घ्यायला वा नव्या चलनाच्या स्वरूपात पैसे काढायला सामान्य लोकांची झुंबड उडाली. त्यात काळापैसावाले उद्योगपती वा व्यापारी श्रीमंत कुठे आहेत, असा प्रश्न विरोधक विचारत होते. त्याचाच पुनरुच्चार अनेक पत्रकारही करीत होते. काळापैसा ज्यांच्यापाशी आहे, ते तिथे आपले पाप सांगायला वा गुन्हा कबुल करायला कसे येऊन उभे रहातील? इतका साधा मुद्दा, अशा शहाण्यांचा सुचला नाही. गुन्हेगार येऊन पोलिस ठाण्यात आपल्याविषयी कुठली तक्रार आहे का, म्हणून चौकशी करीत नसतो. उलट अ़़सा गुन्हेगार आपल्या विरोधातले पुरावे व साक्षिदार नष्ट करण्याच्या कामाला लागलेला असतो. इथे काय वेगळे व्हायचे होते?
आता एक एक कहाण्या समोर येत आहेत. नोटाबंदीची घोषणा झाल्यापासून मेहनतीने कमावलेला पैसा वा बॅन्केत ठेवलेला पैसा, नव्या चलनाच्या स्वरूपात घ्यायला सामान्य लोकांनी रांग लावणे स्वाभाविक होते. त्यांना त्रास होतो वा रांगेत ताटकळत उभे रहावे लागते, म्हणून नोटाबंदी करायचीच नाही काय? तसेच आजवर होत आले. म्हणून काळापैसा बाळगणार्यांचे वा भ्रष्टाचार्यांचे फ़ावले आहे. जसे सामान्य अपहरण झालेल्यांच्या आडोशाला राहुन दहशतवादी घातपाती आपले प्राण वाचवू बघतात, त्यापेक्षा हा प्रकार वेगळा नसतो. लोकांना त्रास होईल म्हणून सरकार नोटा रद्द करणार नाही, अशी खात्री असल्यानेच काळापैसा नोटांच्या स्वरूपात लपवला जात असतो. असा नोटा लपवणारा बदलून घेण्याच्या रांगेत येऊन उभा राहू शकत नाही. कारण त्याच्यापाशी पोत्याने भरलेल्या नोटा असतात आणि इतक्या रुपयांच्या नोटा कुठून कशा आल्या, त्याचे उत्तर देण्याची त्याच्यात हिंमत नसते. मग तो कशाला रांगेत येऊन उभा राहिल? सहाजिकच असे प्रश्न विचारणारे एकतर बुद्दू असतात वा निव्वळ दिशाभूल करणारे लबाड असतात. पण मग असा प्रश्न येतो, की असे काळापैसा बाळगणारे रांगेत येऊन उभे रहात नाहीत, म्हणून कोणाहीपाशी काळापैसाच नसेल काय? काळापैसावाले कोणी नाहीतच आणि सरकार उगाच सामान्य माणसाला त्रास देत आहे, असा अर्थ घ्यायचा काय? तसेच असते तर देशाच्या कुठल्याही कानाकोपर्यातून रस्त्यावर, उकिरड्यात वा नदीनाल्यात फ़ेकून दिलेल्या कोट्यवधीच्या नोटा कशाला सापडल्या असत्या? आजवर असे कधी झाले आहे काय? भारताच्या कुठल्या शहरात, कचरापेटीत वा गटारात कोट्यवधी किंमतीच्या हजार पाचशेच्या नोटा अज्ञात व्यक्तीने फ़ेकून दिल्याचे आपण ऐकले आहे काय? आणि असे असताना त्या खिशात टाकण्याऐवजी लोक त्याची खबर पोलिसांना देताना आपण ऐकले आहे काय?
अशा नोटा शेकडो जागी फ़ेकून दिल्याचे आढळून येत आहे. कारण तोच काळापैसा आहे. त्यात खोट्या नोटांचा समावेश आहे. काळापैसाच नसता वा खोट्या नोटांची संख्या इतकी मोठी नसती, तर कोणी कशाला अशा रितीने इतक्या प्रचंड संख्येने नोटा कचर्यात फ़ेकून दिल्या असत्या? पंतप्रधानांनी नोटाबंदीचा निर्णय घेतल्यावर काही तासात अशा पोत्यानी भरलेल्या बेहिशोबी नोटा ज्यांच्यापाशी होत्या, त्यांच्यासाठी तो असह्य बोजा झाला. इतके दिवस जी त्यांची श्रीमंती व मस्तवालपणा होता, तो एका क्षणात गळ्याला लागलेला फ़ास झाला. तो फ़ास सोडवायला बॅन्केच्या दारात जाऊन उभे रहाणे कोणाला शक्य झाले असते? न्यायालयाच्या दारात जाऊन फ़ास गळ्याला लावून घेण्यासारखाच तो प्रकार नाही काय? काळापैसावाले कोणी रांगेत नाहीत हे जितके खरे आहे. तितकेच उकिरड्यात वा गटारात प्रचंड किमतीच्या नोटा फ़ेकल्या जात आहेत, ही बाबही खरी आहे. पण अशा नोटा कोण कशाला बदलून घेण्यासाठी पुढे येत नाही, असा सवाल कुणा पत्रकाराने विचारला आहे काय? त्या नोटा कोण फ़ेकतो आहे? त्याला त्याच हजार पाचशेच्या नोटांचा आजच इतका तिटकारा कशाला आला आहे? असा प्रश्न कुठल्या वाहिनीवरच्या पत्रकाराने अजून तरी रांगेतल्या व्यक्तीला वा स्टुडीओतल्या जाणकारांना विचारलेला मला ऐकू आलेला नाही. रांगेत काळापैसावाला दिसत नाही, असे विचारणार्यांना, तो काळापैसावाला कसा दिसतो, हे तरी ठाऊक आहे काय? त्याच्या हातात जिहादीसारखी बंदुक असते की अंगाला स्फ़ोटके गुंडाळलेली असतात काय? नसेल तर काळापैसावाला रांगेत उभा नाही, हा कशाच्या आधारावर काढलेला निष्कर्ष आहे? तर मित्रांनो, ही निव्वळ बदमाशी आहे. काळापैसावाला रांगेत नोटा बदलून घ्यायला येऊच शकत नाही, हेही अशा पत्रकारांना पक्के ठाऊक आहे. पण पेडगावला जाऊन वेड पांघरण्याचे नाटक चालू आहे.
रांगेत सामान्य माणूसच आपले कमाईचे रुपये व नोटा बदलू शकतो. काळापैसावाल्यांना तितकी हिंमत होणार नाही. याची खात्री आहे, म्हणूनच पंतप्रधानांनी नोटाबंदी केलेली आहे. नोटाबदलीचा मार्ग काळापैसावाल्यांना बंद करण्यासाठीच सामान्य प्रामाणिक नागरिकाला रांगेत उभे करणे हा मार्ग होता. तोच चोखाळल्यावर अप्रामाणिक खोटी कमाई केलेल्यांना, तिथे यायचे धाडस होऊ शकत नाही, हाच निकष त्यासाठी वापरला गेलेला आहे. पण नुसते काळापैसावालेच बदमाश नाहीत, माध्यमातले काही लोकही तितकेच बदमाश आहेत. म्हणून चुकीचे प्रश्न विचारून गोंधळ माजवत आहेत. रांगेत त्यांना काळापैसावाला उभा दिसत नाही. पण त्याचवेळी त्यांच्या कॅमेराला गटारात वा उकिरड्यात फ़ेकून दिलेल्या हजार पाचशेच्या नोटाही दिसत नाहीत काय? त्या कोणी कशाला फ़ेकून दिल्या, असला साधा बाळबोध सवालही अशा पत्रकार शहाण्यांना कशाला सुचत नाही? नोटा असोत की नवजात अर्भक, ते कोणी उकिरड्यात फ़ेकून दिले; तर मोठा गाजावाजा बातमी होते ना? कोणाचे मूल, कोणी आणुन टाकले, अशा प्रश्नांची सरबत्ती होते ना? पण गेल्या पंधरा दिवसात कुठल्याही वाहिनीवरच्या पत्रकाराने अशा फ़ेकून दिलेल्या ‘अनौरस संपत्ती’ विषयी बोलायचे कटाक्षाने टाळलेले दिसेल. म्हणून मग ट्रंपची आठवण येते. तो माणुस बोलतोय काय हे समजून घेण्यापेक्षा त्याची टवाळी जोरात चालू होती. म्हणूनच अमेरिकन जनतेने कुठल्या पत्रकाराची बडबड गंभिरपणे घेतली नाही. इथे बॅन्केच्या रांगेत कोणी काळापैसेवाला दिसतो काय, असल्या चर्चेला म्हणूनच सामान्य माणसाने गंभिरपणे घेतलेले नाही. कारण काळापैसा बॅन्केत जमा करायला कोणी येऊ धजणार नाही, तो कचरा झाला असल्याने असे काळापैसावाले तो उकिरड्यातच फ़ेकायला गेलेत, हे सामान्य जनतेला कळते. कारण कचरा कुठे फ़ेकायचा हे सामान्यज्ञान असते. पण शहाण्यांची बुद्धीच असामान्य असते ना? त्यांना सामान्यज्ञान कुठून असाय़चे?
छानच सुंदर भाऊ
ReplyDelete