Tuesday, November 29, 2016

नितीश बदल रहा है?


Image result for nitish modi
आपल्या सरकारला दोन वर्षे पुर्ण झाल्याचा जो सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साजरा केला, त्यामध्ये एक जाहिरात होती. ‘देश बदल रहा है!’ त्यामध्ये केंद्र सरकारच्या अनेक योजनांचा प्रचार केला होता. असे प्रत्येक सरकार नेहमीच करत असते. कॉग्रेसनेही आपल्या विविध योजनांचा असाच डांगोरा पिटलेला होता. त्यामुळे मो्दींच्या अशा प्रचाराला दोष देता येणार नाही. मात्र प्रत्यक्षात देश किती बदलला आहे किंवा बदलतो आहे, तो वादाचा विषय होऊ शकतो. कारण बदल कशाला म्हणतात त्यासंबंधी प्रत्येकाची व्याख्या व व्याप्ती वेगवेगळी असू शकते. पण मोदी सरकारला दोन वर्षे पुर्ण झाल्यानंतर देशातील राजकारण व राजकीय समिकरणे मात्र वेगाने बदलताना दिसत आहेत. नवनवी समिकरणे पुढे येत आहेत आणि विविध प्रकारची गणितेही मांडली जात आहेत. अकस्मात बंगालची सुखवस्तु राजधानी सोडून ममता बानर्जी दिल्लीचे दार ठोठावू लागल्या आहेत. २००९ नंतर त्याच युपीएमध्ये रेल्वेमंत्री होत्या. देशभर पसरलेल्या रेल्वेचा कारभार त्या कोलकात्यात बसून चालवत होत्या. त्यासाठी दिल्लीच्या रेलभवनात येण्याची त्यांना फ़ारशी गरज वाटत नव्हती. अशा ममतांना आज दिल्लीत येण्याची संधी शोधताना देश बघतो आहे. कुठलेही निमीत्त शोधून त्या दिल्लीकडे धाव घेतात आणि रस्त्यावर किंवा मंडईतही जाऊन भाषणे देऊ लागतात. आपले हिंदी सुधारण्याचाही त्यांनी चंग बांधला आहे. बहुधा त्यांना आता आगामी लोकसभा निवडणूकीत पंतप्रधान होण्याचे वेध लागलेले असावेत. सहाजिकच देश बदलत नसेल, तरी ममता बदलताना दिसत आहेत. फ़क्त एकट्या ममताच अशा बदललेल्या नाहीत, मोदी विरोधातील अनेक राजकीय नेते व पक्षांमध्येही बदल होताना दिसतो आहे. त्यात बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यातला बदल लक्षणिय म्हणावा इतका ठळक आहे. म्हणूनच त्याकडे लक्ष ठेवायला हवे आहे.

साडेतीन वर्षापुर्वी येऊ घातलेल्या लोकसभा निवडणूकीचे वेध देशाला लागले होते आणि सगळीकडे नरेंद्र मोदी यांच्या नावाची चर्चा जोरात चालू झालेली होती. तेव्हा भाजपाचे सहकारी असलेले नितीशकुमार यांनी मोदी विरोधात बोलायला आरंभ केला होता. अतिशय आक्रमकपणे त्यांनी मोदींच्या उमेदवारीला विरोध करण्यासाठी कंबर कसलेली होती. अखेरीस भाजपाने मोदींनाच पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित केल्यावर नितीशनी भाजपाची साथ सोडलेली होती. त्यासाठी मग त्यांना वैचारिक कसरत करावी लागली होती आणि मुख्यमंत्रीपद जाण्याची वेळ आल्यावर लालूंची कुबडी घेऊन सत्ता वाचवावी लागली होती. पुढे तर सत्ता व मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी नितीशला थेट लालूंना शरणागत होण्याची पाळी आलेली होती. त्यात ते यशस्वी झाले आणि आजही आपल्या जागी सत्तेवर कायम आहेत. या साडेतीन वर्षात मोदी तर पंतप्रधान होऊन गेले आणि अगदी बिहारमध्येही आपल्या बालेकिल्ल्यात नितीश त्यांना रोखू शकलेले नव्हते. ता सर्व काळात मोदींवर उपरोधिक वा कडव्या शब्दात टिका करण्याची एकही संधी नितीशनी कधी सोडलेली नव्हती. कुठल्याही अन्य विरोधी पक्षापेक्षा व नेत्यापेक्षा नितीश अतिशय कडव्या भाषेत मोदींना विरोध करत राहिलेले आहेत. आज त्याच मोदींच्या विरोधात नोटाबंदीनंतर सर्व विरोधक एकजूट होत असताना मात्र, नितीश वेगळी भाषा बोलत आहेत. कदाचित प्रथमच नितीशनी आपल्या आयुष्यात मोदींच्या कौतुकाचे चार शब्द बोललेले आहेत. त्यांनी ठामपणे मोदींच्या नोटाबंदीचे स्वागत केले असून, त्याला मोदींचे मोठे धाडस संबोधले आहे. हा बदल नाही काय? इतकी सुंदर टिकेची संधी दवडून उलट मोदींचे कौतुक नितीश कशाला करत असावेत? देश बदलतो आहे म्हणून नितीश मोदींच्या समर्थनार्थ पुढे आलेत, की खुद्द नितीश बदलत चालले आहेत? असतील तर कशामुळे?

गेल्या वर्षी याच दरम्यान बिहार विधानसभेच्या निवडणूका झाल्या आणि त्यात तिसर्‍यांदा नितीश यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली. यापुर्वी दोनदा त्यांना भाजपाच्या पाठींब्याने त्या पदावर आरुढ होता आलेले होते. यावेळी त्यांना लालुंच्या मेहरबानीने सत्तेवर आरुढ होणे शक्य झाले आहे. पण भाजपा व लालूंचा पाठींबा यातला मोठाच फ़रक प्रत्यक्ष अनुभवाशिवाय येऊ शकत नव्हता. भाजपाचा पाठींबा नितीशच्या नेतृत्वगुणांसाठी होता आणि त्यात भाजपाने नितीशना कामाची मुक्त संधी दिलेली होती. लालुंचा पाठींबा नुसता आमदारांचा नाही किंवा नितीशच्या कर्तबगार नेतृत्वाला मिळालेला नाही. सत्तेतला हिस्सा व आपली मनमानी करण्याच्या बदल्यात, लालुंनी नितीशना पाठींबा दिलेला आहे. परिणाम जगासमोर आहेत. स्वच्छ कारभार व गुन्हेगारीला वेसण घालण्याची ख्याती नितीशना पुर्वी मिळालेली होती, त्याला गेल्या एका वर्षात काळिमा फ़ासला गेला आहे. खतरनाक गुन्हेगार शिरजोर होऊ लागले आहेत आणि कुणाला कायदा व्यवस्थेचा धाक उरलेला नाही. पुन्हा जंगलराज बिहारमध्ये आल्याची चर्चा नित्यनेमाने चालू झालेली आहे. थोडक्यात मोदींना तात्विक विरोध करण्याच्या अतिरेकापायी लालूंच्या कुबड्या घेऊन नितीशनी मिळवलेली प्रतिष्ठा धुळीत घातली आहे. त्याचाच पश्चात्ताप आता या माणसाला भेडसावतो आहे. असेच चालू राहिले तर मोदींना फ़रक पडणार नाही, पण भारतीय राजकारणातून आपले नाव कायमचे पुसले जाईल; अशा चिंतेने नितीशना ग्रासलेले आहे. त्यावरचा उपाय म्हणून जुन्या चुका सुधारण्याचा विचार त्यांच्या मनात सुरू झालेला असावा. लालूंचे जोखड गळ्यातून काढून टाकण्यासाठी त्यांना अन्य कुणा भक्कम मित्राची गरज असून, भाजपाचे विधानसभेतील संख्याबळ त्यासाठी पुरेसे आहे. नितीश-भाजपा एकत्र आले तर हा बदल शक्य आहे. तेच या बदलाचे कारण असू शकते काय?

बिहार विधानसभेतील भाजपाचे बळ नितीशच्या पाठीशी उभे राहिले, तर त्यांना लालूंच्या पायाशी बसण्याची गरज उरणार नाही. लालूपुत्रांचा प्रशासनातील गोंधळ संपवणे शक्य होईल आणि आजवर ज्या हिंमतीने गुन्हेगारी मोडीत काढलेली होती; तोच कारभार नव्याने सुरू करता येईल. पण साडेतीन वर्षातील अखंड शत्रूत्व चालविले आहे, तिथे सहजासहजी नव्याने दोस्ती होऊ शकत नाही. त्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणे अगत्याचे असते. आपण चांगल्याचे समर्थन करतो, असे भासवून भूमिका बदलता येत असतात. नितीशनी त्याच कारणास्तव नोटाबंदीचे विनाअट समर्थन करून, तसे सौहार्दाचे वातावरण निर्माण करण्यात पुढाकार घेतलेला दिसतो. आपल्याच पक्षातील सहकार्‍यांना नितीशनी दिलेला सल्ला नजरेत भरणारा आहे. कारण राज्यसभेतील त्यांचेच सहकारी मोदींवर तोफ़ा डागत आहेत. पण चांगला निर्णय घेण्याचे धाडस मोदींनी केले, तर त्यांच्या पाठीशी उभे रहायला हवे; असा पवित्रा नितीशनी घेतला आहे. त्याकडे त्यांच्या सहकार्‍यांनी बारकाईने लक्ष दिलेले नसले, तरी नितीशच्या या शब्दांनी त्यांचे ‘पाठीराखे; लालू कमालीचे विचलीत झालेले आहेत. त्यांनी तात्काळ सोनियांशी संपर्क साधला असून, ‘नितीश बदल रहा है’ असा संकेत कॉग्रेसला दिला आहे. कारण बिहारमध्ये लालु, नितीश व कॉग्रेस यांची आघाडी सत्तेवर आहे. ती कितीकाळ टिकणार, अशी चिंता लालूंना भेडसावू लागली आहे. दहा वर्षानंतर लालूंना सत्तेत सहभाग मिळाला आहे. तो हिस्सा गमावण्याची पाळी येण्य़ाची चिंता त्यांना सतावणे स्वाभाविक आहे. ही बाब इतकीच नाही. विरोधकांची मोदीविरोधी एकजुटही हाणून पाडण्याचे पाऊल नितीशनी त्याच दिशेने टाकलेले पहिले पाऊल असण्याची शक्यता नाकारता येत नाही. खरोखरच नितीश मोदी यांच्यात काही खिचडी पकते आहे काय? लौकरच याही प्रश्नाचे उत्तर आपल्यासमोर येईलच.

1 comment: