Thursday, March 16, 2017

राहुल गांधींचा ‘दिग्विजय’

Image result for rahul diggi

ठरल्याप्रमाणे मंगळवारी गोव्याच्या नव्या मंत्रीमंडळाचा शपथविधी पार पडला आणि गुरूवारी त्यावर विधानसभेत विश्वासही व्यक्त झाला. किंबहूना मतविभागणी बघितली तर कॉग्रेस सोडून अन्य सर्व पक्ष व अपक्ष आमदारांनी भाजपाचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर विश्वास असल्याचे दाखवून दिले. त्यात अखेरपर्यंत कॉग्रेससोबत असलेले राष्ट्रवादीचे आमदार चर्चिल अलेमाव यांचा समावेश होता, तसाच एका कॉग्रेसपुरस्कृत अपक्ष आमदाराचाही सहभाग होता. अशा लोकांनी अखेर आपल्याला सोडून भाजपा सरकारला कशाला पाठींबा दिला? त्याचा विचारही करण्याची कुणा कॉग्रेस नेत्याला गरज वाटलेली नाही. भाजपा दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष असून व त्यांचा मुख्यमंत्रीही निवडणूकीत पराभूत झाला असताना, भाजपाने सरकार बनवणे अनैतिक असल्याची पोपटपंची कॉग्रेसनेते करीत राहिलेले आहेत. मजेची गोष्ट म्हणजे गोव्याचे प्रभारी म्हणून तिथे ठाण मांडून बसलेले राहुलचे विश्वासू सहकारी दिग्विजयसिंग यांची अशाही स्थितीत केली जाणारी थिल्लर विधाने व वक्तव्ये,  कॉग्रेसचे भविष्य सांगणारी आहेत. कारण भाजपाने आमिषे दाखवली, पैसे मोजून आमदार विकत घेतले; असे आरोप दिविजय करीत होते. पण आपल्याच पक्षाचे सर्व आमदार सुरक्षित आपल्या बाजूला राखण्यात तेच लोक अपेशी ठरलेले होते. विधानसभेत जेव्हा बहूमत सिद्ध करण्याचा प्रसंग आला, तेव्हा कॉग्रेसला आपल्याच पक्षाची १७ मतेही धड दाखवता आलेली नाहीत. विश्वजीत राणे नावाचा तरूण आमदार ऐनवेळी उठून सभागृहाच्या बाहेर निघून गेला आणि तिथेच कॉग्रेस कुठल्या अवस्थेतून चालली आहे, त्याची साक्ष मिळाली. ज्यांना आपले घर धड राखता येत नाही, त्यांच्याकडे अन्य लहानसहान पक्षाचे नेते कार्यकर्ते कशाला येतील? ही गोव्यासारख्या इवल्या राज्यातली स्थिती असेल, तर एकूण देशातील कॉग्रेस कुठल्या अवस्थेत आहे, ते लक्षात येऊ शकते.

पाच वर्षापुर्वी उत्तरप्रदेशात मायावतींचे सरकार होते आणि तीन वर्षे आधी झालेल्या लोकसभा मतदानात कॉग्रेसला योगायोगाने २० जागा मिळालेल्या होत्या. तिथून मग राहुल गांधींच्या करिष्म्याच्या गुजगोष्टी सुरू झाल्या. वास्तवात लोकसभेत मतदान करताना कुठला बलवान पक्ष व त्याच्या कुठला खमक्या नेता सरकार चालवू शकतो, यावर लोक कौल देत असतात. तेव्हा भाजपाचे नेतृत्व अडवाणी करीत होते आणि त्यांच्यावर लोकांना विश्वास बसला नव्हता. म्हणूनच पा़च वर्षे निदान सरकार चालवुन दाखवलेले सोनिया मनमोहन यांना लोकांनी कौल दिला होता. त्याच्या परिणामी उत्तरप्रदेशात कॉग्रेसला वीस जागा मिळू शकल्या होत्या. त्याचा राहुलच्या करिष्म्याशी कसलाही संबंध नव्हता. तरी त्यावर राहुल नावाचे लेबल लावून अनेकांनी ‘राहुल लावो, देश बचावो’ असला नारा सुरू केला होता. त्या भाटगिरीमध्ये सर्वात आघाडीवर दिग्विजय सिंग होते. म्हणूनच मग त्यांच्यासह राहुलनी २०१२ च्या उत्तरप्रदेश मोहिमेला हात घातला. स्वबळावर उत्तरप्रदेश पादाक्रांत करण्याचा विडा उचलून हे दोन्ही वीर लखनौला पोहोचले होते आणि कित्येक महिने राहुल गल्लीबोळात व गावमोहल्ल्यात फ़िरत होते. गरीबाच्या झोपडीत वा दलिताच्या अंगणात मुक्काम ठोकून, त्यांनी मायावतींना आव्हान दिलेले होते. कधी दलिताच्या घरात जेवून वा मळकट मुलांना कडेवर घेऊन, त्याचे वाहिन्यांवर प्रदर्शनही मांडलेले होते. मात्र त्याचा उपयोग झाला नाही आणि २०१२ सालात समाजवादी पक्षाचा खेडोपाडी पोहोचलेला प्रचार बाजी मारून गेला. तेव्हा मतदान संपल्यावर दिग्विजय सिंग यांनी कॉग्रेसी निष्ठेचे नेमके प्रदर्शन केलेले होते. उत्तरप्रदेश जिंकला, तर श्रेय राहुल गांधींचे असेल आणि पराभव झाला तर ती कार्यकर्त्यांची नालायकी असेल. ही राहुलच्या नेतृत्वाची कसोटी आहे. दोष त्यांचा नसतो आणि ते फ़क्त श्रेयाचे धनी असतात.

भाटगिरी व कर्तॄत्वहीन लोकांचा भोवताली जमवलेला घोळका, इथून कॉग्रेसचा र्‍हास सुरू झालेला आहे. दिग्विजय सिंग यांच्यासारखे लोक बांडगुळे असतात. त्यांचे खरे कर्तृत्व कोणते? मध्यप्रदेशात दहा वर्षे मुख्यमंत्री राहिलेला हा माणूस पक्षाला पुन्हा निवडून आणू शकला नाही आणि पुढल्या चौदा वर्षात तिथे कॉग्रेसला आपली शक्ती सिद्ध करता आलेली नाही. राज्यातून लोकसभेत निवडून येण्याची शक्यता नसलेली माणसे, आज कॉग्रेसचे श्रेष्ठी आहेत. अंबिका सोनी, चिदंबरम, अहमद पटेल, गुलाम नबी आझाद, राजीव शुक्ला, विरप्पा मोईली; अशी मोठी लांबलचक यादीच सांगता येईल. आपण सतत विविध वाहिन्यांवर या लोकांचे चेहरे बघत असतो. पण त्यापैकी कोणालाही थेट जनतेतून निवडून येणे शक्य झालेले नाही. मात्र जे लोकांपर्यंत जातात, त्यांना कॉग्रेसमध्ये महत्वाचे स्थान शिल्लक उरलेले नाही. किंबहूना जनमानसात ज्याला स्थान नाही, त्याला आज राहुलच्या कॉग्रेसमध्ये मोक्याचे स्थान दिले जाते. आताही आझाद हे उत्तरप्रदेशचे प्रभारी होते. गोव्याची जबाबदारी दिग्विजयसिंग यांच्याकडे होती. उत्तराखंड अंबिका सोनी संभाळत होत्या. मागल्या कित्येक वर्षात यापैकी एकानेही कुठली थेट निवडणूक लढवलेली नाही, की मतदाराला जाऊन भिडणे त्यांना शक्य झालेले नाही. अशा लोकांना मतदाराच्या मनातले कसे कळणार आणि त्यांनी पक्षाला जनतेमध्ये कसे घेऊन जायचे? पण तेच आज पक्षाचे नेतृत्व करीत आहेत आणि राहुल त्यांच्यावर विसंबून पक्ष चालवित आहेत. गोव्यातून नुकतेच निवडून आलेले कॉग्रेस आमदार विश्वजीत राणे यांनी मतदानात भाग घेतला नाही व पक्षाचाच राजिनामा दिलेला आहे. त्यांनीही दिग्विजयसिंग यांच्याच नाकर्तेपणावर खापर फ़ोडलेले आहे. त्यातून राहुल गांधी कॉग्रेससाठी कोणता ‘दिग्विजय’ करायला निघाले आहेत, त्याचा अंदाज येऊ शकतो. पक्षाचे भवितव्यही कळू शकते.

आपला नाकर्तेपणा लपवण्यासाठी दिग्विजयसिंग यांनी मग भाजपाने आमदार विकत घेतले वा अन्य लहान पक्षांशी सौदेबाजी केल्यासा प्रच्छन्न आरोप केला आहे. त्याने त्यांचा नाकर्तेपणा लपलेला नाही. कोर्टानेही त्यासाठी कॉग्रेसची खरडपट्टी काढलेली होती. अशा चुका होतात, पण त्या स्विकारूनच त्यात सुधारणा होत असते. पण चुका कबुल केल्या नाहीत व त्यालाच योग्य पाऊल ठरवले, मग अपयशाखेरीज अन्य कसली हमी मिळू शकत नाही. आजची कॉग्रेस अशा गर्तेत फ़सलेली आहे. आपण चुकत नसल्याने त्यांना सुधारण्याची गरज वाटेनाशी झाली आहे आणि जनता त्यांना माफ़ करण्याच्या मनस्थितीत नाही. त्याची किंमत एकामागून एक निवडणूकीत मोजावी लागते आहे. आताही विधानसभेच्या पहिल्या दिवशी नवा आमदार पक्ष व पदाचा राजिनामा देतो, या़चे गांभिर्य दिग्विजयसिंग यांना उमजलेले नाही की राहुल गांधींना कळलेले नाही. त्यांच्याकडून पक्ष कसा सावरला जाऊ शकेल? हेच जयंती नटराजन, रिटा बहुगुणा वा अन्य अनेक नेत्यांनीस अतत सांगितले आहे. हेमंत बिस्वालसारखा नेता वैतागून भाजपात गेला आणि त्याने इशान्येच्या अनेक राज्यात भाजपाची सत्ता आणायला मोठा हातभार लावला आहे. पण त्याच्यासारख्या गुणी, धडपड्या नेत्याला राहुलच्या चौकडीत स्थान नाही. तिथे बेताल व बेछूट बडबड करून पक्षाची अधिकाधिक मते गमावणार्‍या दिग्विजयसिंग यांचे कौतुक आहे. मग पक्षातर्फ़े राहुल गांधी कुठला दिग्विजय साजरा करू शकतील? हातातला विजय पराभवात कसा परावर्तित करावा, याची दोन ताजी उदाहरणे राहुल व त्यांच्या निकटवर्ति सहकार्‍यांनी सादर केली आहेत. मग त्यांनी वा त्यांच्या पक्षाने २०१९ च्या लोकसभेत कसली अपेक्षा करावी? ४४ वरून १४ पर्यंत घसरण्याची की ४४ वरून १४४ पर्यंत मजल मारण्याची? लौकरच राज्यसभेतील संख्याबळ बदलणार आहे. मगच राहुलना कदाचित जाग येऊ शकेल. पण वेळ निघून गेलेली असेल.

3 comments:

  1. Bhau
    Jo ho raha hai acchha hai, chalne do.
    Rahul aise hi aage badho aur khatma karo sab kuch.

    ReplyDelete
  2. ND Modi led BJP no doubt is a deserving political party to lead this country but its is sad to see a non constructive and impotent opposition parties at the centres and states.

    Secondly also sad to see the decimation of party which sustained over the fundamentals of pre-independence visionaries like Gokhale, Tilak, Patel, MK Gandhi, Bose etc.

    From Nehru Era, Indira Era and Rajiv Era...... the Sonia era was significantly on a downward spiral.... But RaGa era is a worst embarrassment for the party.

    ReplyDelete