Friday, November 4, 2016

नैतिक दहशतवाद



सध्या अमेरिकन अध्यक्षांची निवडणूक रंगात आलेली आहे आणि दोन्ही प्रमुख पक्ष एकमेकांवर चिखलफ़ेक करण्यात रमलेले आहेत. त्यानिमित्ताने माफ़ियाच्या संघटित गुन्हेगारीचा पाया घालणार्‍या चार्ली लकी लुच्यानोचे एक विधान आठवले. आपल्या आत्मचरित्रात चार्लीने त्याला तुरूंगात धाडणार्‍या थॉमस डेव्हीबद्दल कौतुक सांगितले आहे. थॉमस डेव्ही हा त्या काळात न्युयॉर्कचा सरकारी वकील होता आणि त्याच्याच कायदे कुशलतेने चार्लीला गजाआड जावे लागले होते. त्या कौशल्याबद्दल चार्ली म्हणतो. ‘तसा आम्हा दोघांमध्ये फ़ारसा काही फ़रक नाही. डेव्ही त्याचे गुन्हे कायद्याच्या चौकटीत बसवतो, तर मी कायद्याला जुमानत नाही. बाकी आम्ही सारखेच गुन्हेगार आहोत.’ चार्लीला तुरूंगात धाडणारा डेव्ही त्या पराक्रमामुळे पुढे न्युयॉर्कचा गव्हर्नर म्हणून निवडून आला. पण त्याच्याविषयी चार्लीने काढलेले उद्गार नेमके आहेत. समाजात नावारूपाला येणारी मंडळी कमीअधिक प्रमाणात अशीच असतात. त्यातली एक बाजू गुन्हेगार असल्याचे सांगून दुसरी बाजू आपली महानता सिद्ध करण्यात कायम गर्क असते. हिलरी क्लिंटन आज आपले विरोधक डोनाल्ड ट्रंप देशासाठी कसा धोका आहेत, त्याचे विवेचन करीत आहेत. आपल्याकडे कालपर्यंत सैनिकी वा पोलिसी कामावर शंका घेणारे आज सैनिकांच्या हौतात्म्याचा बडेजाव सांगत आहेत. पण त्यांनीच काही महिन्यांपुर्वी नेहरू विद्यापीठात सैनिक बलात्कार करतात असे आरोप करणार्‍या कन्हैयाकुमारला डोक्यावर घेतले होते. तसे करताना राहुल वा केजरीवाल यांनी सैनिकांचा कुठला सन्मान केला होता? तेव्हा सैनिकांना बलात्कारी संबोधणे योग्य होते आणि आज त्यापैकी एका माजी सैनिकाच्या आत्महत्येविषयी माजी सेनापती व्ही. के. सिंग यांनी शंका घेणेही अक्षम्य गुन्हा असतो. यातले योग्य काय आणि गैरलागू काय, हे ठरवणारा निकष कुठला असतो?

हे किंवा असे कुठलेही पक्के निकष नसतात. समाजातले काही नाकर्ते लोक ही बुवाबाजी निर्माण करत असतात. त्यांच्या सोयीनुसार असे निकष बदलत असतात आणि त्यांच्या सोयीनुसार बरेवाईट ठरवले जात असते. कृती महत्वाची नसते, तिला मिळणरे प्रमाणपत्र महत्वाचे असते. सहाजिकच प्रमाणपत्र देणारी सत्ता मोलाची असते. ती सत्ता कोणाची असते? ती सत्ता लढाई करून स्थापन झालेल्या साम्राज्याची नसते किंवा निवडून आलेल्या कुणा नेत्याची सत्ता नसते. ती सत्ता नैतिक असते आणि नितीमत्ता वेळोवेळी सोयीनुसार बदलत असते. भामट्यांची टोळी जशी काही लबाडीची कल्पना घेऊन समाजाला वा लोकांना गंडा घालत असतात, त्यापेक्षा हा नैतिक सत्तेचा प्रकार थोडाही भिन्न नसतो. उदाहरणार्थ सातारा येथे आदिवासी पिछड्यांसाठी संस्था चालवणार्‍या लक्ष्मण माने यांच्यावर त्या संस्थेतील काही महिलांनी लैंगिक शोषणाचा आरोप केला. तेव्हा तमाम असे नितीमान महापुरूष त्या आरोपाविषयी शंका घेऊ लागले होते. पण तसाच काहीसा आरोप किंवा संशय, नरेंद्र मोदी व अमित शहांशी संबंधित एका टेलिफ़ोन संभाषणात आल्यावर कोणाला भक्कम पुराव्याची गरज भासली नव्हती. स्नुपगेट म्हणुन त्याचा खुप गाजावाजा झाला होता आणि महिलांच्या विविध संस्थांनी तात्काळ महिला आयोगाकडे कारवाईची मागणी केलेली होती. माध्यमांनी तो विषय उचलून धरला होता आणि बहुतांश नितीमान विचारवंतांनी त्यावर ठाम मते व्यक्त केली होती. पण त्याच लोकांनी वा त्यांच्या पंथातल्या महाराष्ट्रातल्या कोणीही लक्ष्मण माने यांच्या विरोधातल्या तक्रारीनंतर किंवा घाबरून फ़रारी झालेल्या मानेंच्या विरोधात, अवाक्षर बोलायचे टाळलेले होते. ही आपली वा समाजाची आजची नैतिक दैवते किंवा मठाधीश आहेत. निकष वा नियम त्यांना लावायची वेळ आली, मग ते गैरलागू होतात. पण त्यांनी दुय्यम मानलेल्यांसाठी तेच नियम पवित्र असतात.

हा विचित्र संघर्ष समजून घेण्याची गरज आहे. एखाद्या गावात वस्तीत तिथला एक प्रतिष्ठीत वर्ग असतो. तसाच देशाच्या राजधानीत मान्यवरांचा गोतावळा असतो. त्याच्याकडे असे अधिकार असतात. म्हणजे ते अधिकार कुठल्या राज्यघटनेने कायद्याने त्यांना दिलेले नसतात, की समाजाने तशा अधिकारांना मान्यता दिलेली नसते. पण केवळ त्यांच्यापाशी उत्कृष्ठ संभाषण शैली असते वा त्यांचे व्यक्तीमत्व प्रभावित करणारे असते; एवढ्या बळावर असे लोक अवघ्या समाजाला ओलिस ठेवत असतात. त्याला आव्हान द्यायला गेल्यास तुम्हाला गुन्हेगार ठरवले जाते आणि तुमचा तिरस्कार सुरू होतो. खुप जुन्या काळात त्याला पुरोहितगिरी म्हणायचे. हल्ली त्याला समाजाचे नैतिक नेतृत्व म्हणून संबोधले जाते. सामान्य लोकांना लागणारे कायदे त्यांना लागू होत नाहीत आणि कुठलाही कायदा नियम धाब्यावर बसवण्याचा विशेषाधिकार त्यांनी स्वत:कडे घेतलेला असतो. अर्थात सामान्य माणसे मानतात वा दुर्लक्ष करतात, तोपर्यंतच असला नैतिक दहशतवाद चालू शकतो. कारण शब्दात बाजी मारणार्‍या अशा लोकांशी शब्दांनी युक्तीवादाने लढणे सामान्य माणसाला शक्य नसते. पण कधीतरी त्याचा अतिरेक होतो आणि त्य दांभिकपणाला कंटाळलेला सामान्य माणूस झुंडीने त्या अतिरेकाचा समाचार घेतो. अशा झुंडीसमोर नैतिक बुद्धीवादाचा टिकाव लागत नाही. त्यामुळे असा दांभिक दहशतवाद नेस्तनाबुत होतो. मात्र तो संपत नाही. नव्या स्थितीत व व्यवस्थेत नवा नैतिक दहशतवाद उदयाला येतच असतो. कम्युनिस्टांनी धार्मिक दहशतवाद संपवला, तरी त्यांच्याच साम्राज्यात नवा बौद्धीक दहशतवाद उदयास आलाच. जेव्हा त्याची मुंडी स्टालीनने पिरगाळली, तेव्हा सर्वात आधी त्याला शरण जाणारा तोच नैतिक नेतृत्वाचा गोतावळा होता. माणुस हाच ढोंगाचा पुजक असल्याने अशा दंभाचा कधी अंत होत नाही.

बुवाबाजी नको म्हणणारेच आपले प्रस्थ बुवाबाजीसारखे उभे करतात. त्यांचे देव्हारे माजवण्यास तेच चालना देतात. कारण एका बुवाबाजी वा संभ्रमातून बाहेर पडलेल्या सामान्य माणसाला, जगण्यासाठी तशाच दुसर्‍या भ्रामक विश्वाची गरज असते. आत्मविश्वास नसलेल्या बहुसंख्य लोकांना कुठला तरी भ्रम हवा असतो. मग तो धर्माचा असतो किंवा तथाकथित विज्ञान विचारांचा असतो. कशाची तरी मनोभावे भक्ती करून कोणाला तरी शरण जाणे; ही पराभूत मानसिकतेची गरज असते. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन करणारे आणि अंधश्रद्धेचे भाविक, सारख्याच मानसिकतेमध्ये जगत असतात. त्यांच्यात आत्मविश्वासाचा अभाव आसतो आणि तो भरून काढणारा कोणीतरी जादुगार त्यांना हवा असतो. त्यातूनच नैतिक नेतृत्वाचा उदय होत असतो. त्याच्यापाशी सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत, अशी समजूत लोकसमुहाला धीर देत असते. त्यातून झुंडी निर्माण होतात आणि त्या झुंडींच्या मनावर राज्य करायला नैतिक नेतृत्वाचे मक्तेदार उदयास येतात. सामान्य माणसाला त्यापैकी कुठल्याही पातळीवर जाणे शक्य नसल्याने, एकाला थोर म्हणून पुजणे व दुसर्‍याला चोर म्हणून निंदणे भाग असते. बाकी चार्ली लुच्यानो म्हणतो, तसे दोन्हीकडे सरावलेले भामटेच उभे असतात. सामान्य माणसाला त्यापैकी एका भामट्याची निवड करायची असते. आपल्याला कोण कमी लुबाडू शकतो, या निकषावर सामान्य लोक थोराला निवडतात आणि मग त्याच्या इच्छेनुसार दुसर्‍या भामट्याला चोर ठरवून कामाला लागतात. जगाची हीच रीत आहे. तेच अत्यंत पुढारलेल्या अमेरिकेत चालते आणि तेच भारतातही चालते. जोपर्यंत सामान्य माणसाला भ्रामकतेचे आकर्षण आहे, तोपर्यंत समाजाला त्यातून आपली सुटका करून घेता येणार नाही. बुवाबाजी संपणार नाही की अंधश्रद्धा संपू शकत नाही. एक हिंसेचा दहशतवाद असतो तर दुसरा नैतिक दहशतवाद असतो.

3 comments:

  1. मानवी प्रवृत्तींचे अत्यंत प्रभावी वर्णन करण्यात भाऊ तुमचा हात कोणी धरणार नाही.अत्यंत परखड विश्लेषण.आपल्या लिखाणाला यश मिळो आणि लोकांच्या डोक्यात प्रकाश पडो ही प्रार्थना.

    ReplyDelete
  2. संसारात उबला बायको मुलाला सोडून संन्यास घेतला , जंगलात जाउन पुन्हा शिष्याचा गोतावळा जमा केला. फरक काय पडला. दोन्ही ठिकाणी सारखच.
    जगातील ९० % लोक जर स्रधावान असतील तर ती मानवाची मुळ प्रेरणा मानुन तीला विधायक वळण लावावे .

    ReplyDelete