Saturday, November 12, 2016

फ़्रेंच राज्यक्रांतीची गोष्ट

french revolution के लिए चित्र परिणाम

जगाच्या इतिहासात कुठेही व कुठल्याही युगात आहेरे आणि नाहीरे वर्गातच संघर्षाची ठिणगी पडत असते. समता किंवा समानता हा एक भ्रम असतो. बहुसंख्य लोक अशा भ्रमाला बळी पडत नाहीत आणि आपल्या वाट्याला येईल, त्यातच समाधान मानत असतात. पण समतेचा उदघोष चालू असतानाच विषमतेचा अतिरेक होऊ लागला; मग सामान्य लोकही रस्त्यात येतात. त्यांच्या सहनशीलतेचा अंत बघितला जातो, तेव्हा समतेच्या व न्यायाच्या नावाने चाललेली भोंदूगिरी उध्वस्त करायला सामान्य जनता रस्त्यावर उतरते. कुठल्याही पुरोगामी, प्रागतिक वा उदारमतवादी गोतावळ्यात तुम्ही वावरत असाल, तर तुम्हाला फ़्रेंच राज्यक्रांतीचा एक किस्सा प्रथम सांगितला जातो. तिथे राज्य व अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असते आणि दोन वेळची भुक भागवण्याइतकेही साधन सामान्य लोकांच्या हाती उरलेले नसते. मात्र तेव्हाच राजवाड्यात सरदार, सरंजामदार, अमिर-उमराव यांच्या मेजवान्या झडत असतात आणि मौजमजा चालू असते. अशी चैन भुकेल्या गांजलेल्या लक्षावधी लोकांना बोचत टोचत असते. ते असह्य होऊन लक्षावधी प्रक्षुब्ध लोकांचा जमाव राजवाड्यावर चाल करून जातो. वाड्याबाहेर कसली गडबड चालू आहे म्हणून आतून विचारणा होते. तर वाड्याच्या सौदावरून राणी वा कोणी राजा लोकांना विचारतो, कशाला गोंगाट चालला आहे? तर जमाव ओरडून सांगतो, आम्हाला खायला पावही मिळेनासा झाला आहे, तुमची मात्र मौज चालू आहे. तर हा सत्तेची मस्ती चढलेला राजा वा राजकन्या उत्तर देतात, ‘पाव मिळत नसेल तर केक खायचा’. यातल्या दोन्ही बाजू तितक्याच प्रामाणिक असतात. पण दोघांचे जगच वेगळे असते. सत्ता वर्तुळातल्या खुशहाल व्यक्तीला गरिबी वा उपासमार म्हणजे काय तेच ठाऊक नसते आणि दुसर्‍या बाजूला भुकेने व्याकुळ केलेले असते. हा जो फ़रक आहे, तोच बदलाची ठिणगी पाडत असतो.

कुठल्याही प्रगतीशील विचार वा पुरोगामी विचारांच्या गोतावळ्यात तुम्ही गेलात, तर फ़्रेंच राज्यक्रांतीची बाराखडी लिहून तुमचे वैचारिक शिक्षण सुरू होत असते. त्यापैकी बहुतेकांना गरीबी वा गांजलेपण म्हणजे काहीही ठाऊक नसते. पण समता वा तत्सम काही भ्रामक गोष्टींसाठी अशी सुखवस्तु वैचारिक माणसे त्यात ओढली जातात. मग त्यांना आपली गरीबीविषयीची आस्था वा आपुलकी यांचे प्रदर्शन मांडण्यासाठी, खर्‍याखुर्‍या तळगाळातल्या कुणा अनुभवी व्यक्तीचे सहकार्य घ्यावे लागते. त्यासाठी मग अशा अनुभवातून आलेल्या व बुद्धी असलेल्या उत्साही लोकांना हाताशी धरावे लागते. गरीबी व विपरीत स्थितीतुन झगडून पुढे येणार्‍या धडपड्याला अशा लोकांच्या उच्चभ्रूपण व सुखवस्तुपणाचे आकर्षण असते. त्यामुळेच अशा गोतावळ्याने जवळ केल्यावर तळागाळातून आलेला सामान्य तरूण वा व्यक्ती, त्या गोतावळ्याच्या कथन विचारांनी भारावुन जाते. नाहीतरी हा गोतावळा समतेच्या गोष्टीच बोलत असतो. पण त्यांचा हा विचारविनिमय अतिशय सुखवस्तु तारांकित स्थळी होत असतो. तिथली व्यवस्था व श्रीमंती, अधिक अगत्य बघून तो नवखा गोंधळून जातो. ते एकप्रकारचे आमिष असते. आपल्याला पुन्हा तिथे आमंत्रण मिळावे आणि त्या गोतावळ्यात स्थान मिळावे, म्हणून मग हा नवखा चेहरा त्यात गुरफ़टत जातो. आपला अनुभव विसरून हा खरा गरीब तथाकथित पुरोगामी पोपटपंची करू लागतो. पण प्रत्यक्षात तो प्रस्थापित सुखवस्तु शोषक वर्गाच्या आहारी जात असतो. त्यांच्या हातातले बाहुले होत असतो. ज्यांच्या विरोधात बंड पुकारायचे आणि जी व्यवस्था उधळून टाकावी अशी चर्चा तिथे चालू असते; तिच्याच आहारी जाऊन तिची गुलामी पत्करत असतो. आज भारतात वा जगात कुठेही गेलात, तर पुरोगामी म्हणून मिरवणारा बोलघेवडा वर्ग, अशाच सुखचैनीत लोळताना दिसून येईल. जो केक खाण्याचा सल्ला देणार्‍या फ़्रेंच राजकन्येचे प्रतिक झाला आहे.

यात फ़सणारा तो तळागाळातला नवखा कोणी सोडला, तर बाकीचा गरीब समाज त्याच गरीबीत घुसमटलेला असतो आणि काहीकाळ त्यालाही आपल्यापैकी असलेल्या त्या हुशार बुद्धीमान गरीब शहाण्याची भाषा आवडत असते. त्याच्या भ्रामक समतेमध्ये किंवा तत्सम स्वप्नांमध्ये आपल्या खर्‍या दु:खाचा गरीबांना विसर पडतो. विचारांची ही नशा त्यांनाही बधीर करून टाकते आणि प्रस्थापितांचा हस्तक म्हणून आलेल्या त्या नव्या तरूण नेत्यांच्या मागून तळागाळातला समाज सुखवस्तु वर्गाला आपले नेतृत्व देऊन टाकतो. आपला प्रवक्ता मानु लागतो. अशा रितीने आज गजभर पुरोगामी म्हटल्या जाणार्‍या गोतावळ्याने गरीबी हा कच्चामाल बनवला आहे. त्यावरच त्यांचा प्रगतीशील विचार बाजारात खपवला जात असतो आणि त्याच गरीबाच्या नावाने त्यांना नफ़ाही कमावता येत असतो. नर्मदा अंदोलनापासून तीस्ता सेटलवाडने गुजरात दंगलपिडीतांना कसे आपल्या व्यापारात सहज वापरून घेतले; ते बारकाईने बघितले तर लक्षात येऊ शकेल. अशा स्थितीत आल्यानंतर त्या दु:खाला वाचा फ़ोडण्यासाठी माध्यमे सज्ज असतात, ज्याची सुत्रे त्याच शोषक वर्गाकडे असतात. कला, साहित्य वा संस्कृती इत्यादी क्षेत्रही अशीच पादाक्रांत करून शोषक वर्गाच्या दावणीला बांधली जात असतात. थोडक्यात बंड करणार्‍यांनाच प्रस्थापित व्यवस्थेने आज आपल्या दावणीला बांधलेले आहे. पण ही बंडखोर व क्रांतीकारक मंडळी म्हणजे पुरोगामी गोतावळा, वास्तविक जीवनात व व्यवहारात गरीब पिडीत गांजलेले यांच्यापासून मैलोगणती दुरावलेले आहेत. त्यांना सामान्य समाजात घडणार्‍या घडामोडी व दु:खदैन्य, समस्या प्रश्न, यांचा किंचीतही गंध उरलेला नाही. आपल्या काल्पनिक विश्वातील भ्रामक गरीबी व समस्यांवर सेमिनार परिसंवाद भरवले जातात आणि त्यावरच चर्चा व उत्तरे शोधली जातात.

ट्रंप यांच्याविषयी जितकी विपरीत प्रतिमा माध्यमातून रंगवली जात होती, तितका हा माणूस खरेच विकृत व अपायकारक असता; तर त्याला इतकी मते मिळू शकली नसती. किंबहूना हिलरी क्लिंटन खरेच इतकी महान महिला असती, तर तिला अशा फ़डतूस माणसाकडून पराभव पत्करावा लागला नसता. पण वास्तव भलतेच आणि समोर आणले गेलेले चित्र उलटेच, अशी स्थिती होती. हिलरी व तिच्या पतीसह पक्षाची पापे झाकली जात होती आणि नसलेलीही ट्रंपची पापे रंगवून सांगितली जात होती. पण वास्तवात अमेरिकनांना या उद्योगपतीचा जो अनुभव होता. त्याच्या बोलण्यातले सत्य व गांभिर्य ओळखण्याची सामान्य बुद्धी लोकांपाशी शिल्लक होती, त्यांनी माध्यमातील खोट्यानाट्या प्रचाराला दाद दिली नाही. कारण हिलरी कधीच गरीबांची प्रतिनिधी नव्हती. उलट हिलरी त्याच फ़्रेंच राजकन्येचे प्रतिनिधीत्व करीत होती. म्हणून मतदानातून सामान्य मतदाराने आपला ठोसा हाणला आणि खोट्याचा बळी घेतला. राजरोसपणे जो भोंदूपणा माथी मारला जात होता, तो फ़ेटाळून लावला. ही फ़्रेंच राज्यक्रांतीचीच पुनरावृत्ती आहे. कारण आजचे पुरोगामी लोक जगायला पाव मिळत नसलेल्याना, अविष्कार स्वातंत्र्याचा सहिष्णूतेचा केक खायला सांगत आहेत. असे असंबद्ध बोलले गेल्यावरच फ़्रान्सच्या राजवाड्यावर चाल करून आलेल्या त्या जमावाने तिथे घुसून संपुर्ण राजघराण्याची कत्तल केली होती. अमिर उमराव यांचे शिरकाण केले होते. ट्रंप वा मोदी जिंकल्यावर जो तमाशा चालू आहे, तो केक खाऊन जगा, सांगितल्यासारखा असंबद्ध प्रतिसाद आहे. ट्रंप विजयानंतर अमेरिकेत सुरू असलेला हिंसाचार तसाच चालू राहिला; तर तिथे खर्‍या अर्थाने सोशिक सामान्य जनताही रस्त्यावर उतरून यादवी होऊ शकेल. भारतातही त्याचीच पुनरावृत्ती होईल. तो पुरोगामी विचाराचा पराभव नसेल, तर पुरोगामी भोंदूगिरीचा नायनाट असेल.

3 comments:

  1. भाऊ म्हणजे यादवी होणार का ??

    ReplyDelete
  2. Bhau,Bharatat samanya janta ekdam ragavat nahi.Americamadhye matra shakya ahe.

    ReplyDelete