Thursday, January 26, 2017

प्रियंका गांधीचा करिष्मा

priyanka gandhi के लिए चित्र परिणाम

फ़िस्कटलेल्या समाजवादी पक्षाशी अखेरच्या क्षणी विस्कटलेल्या कॉग्रेसची युती झाल्याने, त्या शतायुषी पक्षाच्या अंगात दहा हत्तींचे बळ संचारले आहे. ज्या युतीविषयी समाजवादी पक्षाच्या कुठल्याही नेत्याने समोर येऊन कौतुक केलेले नाही, त्याविषयी कॉग्रेसला इतके अप्रुप वाटलेले असेल, तर आज तो पक्ष किती दिवाळखोरीत गेला आहे, त्याचा अंदाज येऊ शकतो. आठ महिन्यांपुर्वी कॉग्रेसने आधुनिक चाणक्य प्रशांत किशोर याला कोट्यवधी रुपयांचा मोबदला देऊन आपल्या गोटात आणलेले होते. मोदींना पंतप्रधान करणार्‍या रणनितीचा रचनाकार, अशी प्रशांतही ख्याती असल्याने त्याने कित्येक दिवस खपून उत्तरप्रदेशातील कॉग्रेसचा अभ्यास केला आणि एक रणनिती बनवली. त्यात राहुल किंवा प्रियंका यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून पेश करण्याचा प्रस्ताव दिलेला होता. पण गांधी खानदानात फ़क्त पंतप्रधानच जन्माला येत असल्याने, पक्षाने तो प्रस्ताव फ़ेटाळून लावला. मग बी प्लान म्हणून ब्राह्मण चेहरा पेश करण्याचा प्रस्ताव मान्य केला. त्यासाठी दिल्लीतील पराभूत मुख्यमंत्री शीला दिक्षीत यांना पुढे करण्यात आले. त्या रणनितीनुसार राहुल यांची किसानयात्रा सुरू होऊन तिचा पहिल्या दोन दिवसातच बोजवारा उडाला. अखेरीस कॉग्रेसला नव्याने या राज्यात संजीवनी देण्यासाठी प्रशांत किशोरने समाजवादी पक्षाशी युती करण्याचा प्रस्ताव आणला होता. तोही जाणत्या कॉग्रेस नेत्यांनी फ़ेटाळून लावला. थोडक्यात प्रशांत किशोर कॉग्रेसला यश मिळवून देण्यासाठी बुद्धी खर्ची घालत होता आणि बहुतांश कॉग्रेसजन प्रशांतची रणनिती फ़सण्यासाठी पराकाष्टा करीत होते. झालेही तसेच आणि सगळीकडून बट्ट्याबोळ झाल्यावर, आता प्रशांतच्या लक्तरे झालेल्या रणनितीची वस्त्रे परिधान करून कॉग्रेस समारंभाला मिरवायला हजर झालेली आहे. त्याला प्रियंकाचा करिष्मा असे नाव दिले जात आहे.

प्रियंका प्रचारातही नको असा एकूण सूर काही महिन्यांपुर्वी होता. कारण कॉग्रेसला उत्तरप्रदेश जिंकणे वा संसदेत प्रभाव पाडण्यापेक्षा, राहुल गांधींना यशस्वी करायचे आहे. पण तीच समस्या असल्याने त्यांची सगळी खेळी प्रत्येकवेळी फ़सते आहे. आताही आधी समाजवादी पक्षाशी परस्पर बोलणी केल्याने प्रशांत किशोरला नावे ठेवण्यात आली आणि आता तेच घडवून आणल्याबद्दल प्रियंकाची पाठ थोपटली जात आहे. हीच खेळी प्रशांत म्हणाला तेव्हाच खेळली गेली असती, तर रुसवेफ़ुगवे झालेच नसते, की अखेरच्या क्षणाची धावपळ करावी लागली नसती. याहीपुर्वी प्रचाराचा धुमधडाका सुरू झाला असता आणि एकूणच जो विचका राहुल गांधी करू शकले, तसेही काही घडू शकले नसते. पण आताही निवडणूकीतील यश वा प्रियंकाचे कौतुक करताना, तिला पुर्ण श्रेय देताना कॉग्रेसनेत्यांची जीभ अडखळते आहे. राहुलनी आदेश दिल्यावर प्रियंकाने अखिलेशशी संपर्क साधला आणि युती होऊन गेली. म्हणजे प्रियंकाने महत्वपुर्ण भूमिका निभावली, हेही धड मान्य करता येत नाही. प्रियंकाने युती घडवून आणली, पण त्याचे श्रेय तिला नव्हेतर राहुलनाच देण्याचा अट्टाहास आहे. वास्तविक ही युती करण्याचे ठरले होते आणि त्यानुसार राहुल-अखिलेश एकत्रित पत्रकार परिषदेत त्याची घोषणा करणार होते. पण राहुल तिकडे फ़िरकले नाहीत. कारण आपण राष्ट्रीय़ नेता असल्याने अखिलेश या प्रादेशिक नेत्याच्या बाजूला बसण्याचा त्यांना कमीपणा वाटलेला होता. सहाजिकच अखिलेशने त्याची कुवत दाखवण्यासाठी थेट आपले उमेदवार जाहिर केले आणि त्यात अमेठी व रायबरेलीतील उमेदवार बघून कॉग्रेसजनांचे धाबे दणाणले. तेव्हा प्रियंकाला मध्यस्थी करण्याची गळ घातली गेली. त्यानंतरही कॉग्रेस प्रदेशाध्यक्षाच्या सोबत पत्रकारांना भेटायला कोणी मोठा समाजवादी नेता फ़िरकला नाही. किंबहूना अखिलेशने जागा दिल्या, पण कॉग्रेसला महत्व दिलेले नाही.

आता राहिला मुद्दा प्रियंकाच्या प्रभावाचा! प्रियंका प्रचारात उतरली आणि उत्तरप्रदेशात सर्वत्र फ़िरली; तर मतदानाचे पारडे फ़िरणार असल्याचा गवगवा माध्यमातून सुरू झाला आहे. त्यातही काही नवे नाही. यापैकी एकाला तरी प्रियंकाचा प्रभाव किंवा करिष्मा म्हणजे काय, तेही ठाऊक नसल्याने अशी बाष्कळ बडबड वाहिन्यांवरून झाली तर नवल नाही. जणू काही प्रियंका प्रथमच प्रचारात उतरते आहे आणि तिच्या नुसत्या दर्शनाने व भेटीने उत्तरप्रदेशी जनता कॉग्रेसला अफ़ाट यश मिळवून देणार आहे; असाच माध्यमांचा सूर आहे. पण तशी वस्तुस्थिती नाही. कारण २००४ पासून प्रियंका सातत्याने उत्तरप्रदेशभर नाही, तरी अमेठी व रायबरेलीत प्रचाराची धुरा संभाळते आहे. त्याचे निकाल काय सांगतात, ते तपासून बघितले तरी प्रियंकाचा करिष्मा किती त्याचा अंदाज येऊ शकतो. २००४ व २००९ या दोन्ही लोकसभा मतदानात तिथे सोनिया व राहुल अफ़ाट मतांनी जिंकले, हे कोणी नाकारू शकत नाही. पण जेव्हा गांधी खानदानाचा उमेदवार नसतो, तेव्हा प्रियंका तिथे प्रचाराला जाऊन काय प्रभाव पाडू शकलेली होती? गेल्या विधानसभा मतदानातही प्रियंकाने त्याच भागात मुक्काम ठोकलेला होता. भाऊ व आईच्या दोन लोकसभा मतदारसंघात विधानसभेचे दहा मतदारसंघ येतात. तिथे प्रियंका प्रचार करत असूनही २०१२ साली दहापैकी फ़क्त तीन जागी कॉग्रेस उमेदवार जिंकू शकलेले होते. उर्वरीत सात जागी अन्य पक्षांचे आमदार निवडून आलेले होते. म्हणजेच गांधी खानदानाचे बालेकिल्ले मानल्या जाणार्‍या अमेठी रायबरेली भागातही, प्रियंकाने प्रचार केलेले निम्मेही कॉग्रेस उमेदवार यशस्वी होऊ शकलेले नव्हते. जिंकलेल्या तीनपैकी एक आमदार तर अमेठीची संस्थानिक राणी होती. म्हणजेच प्रियंकाचा करिष्मा आपल्या बालेकिल्ल्यातही किती आहे,  त्याचे समिकरण मांडता येते. मग जिथे बालेकिल्ला नाही, तिथे काय घडू शकेल?

तीन वर्षापुर्वी लोकसभेच्या निवडणूका झाल्या, तेव्हाही प्रियंकाने त्याच दोन लोकसभा मतदारसंघात ठाण मांडले होते. बाकीचा उत्तरप्रदेश सोडून द्या. अमेठीत भाजपाने स्मृती इराणी नामक नवख्या उमेदवाराला मैदानात धाडले होते. तोही उमेदवार भाजपाने आधीपासून टाकलेला नव्हता, महिनाभरही स्मृती इराणी त्या भागात नव्हत्या. पण त्यांनी प्रचाराची अशी धमाल उडवून दिली, की अखेरच्या दोन दिवसात तिथे राहुल सोनियांनाही धाव घ्यावी लागलेली होती. स्मृतीची उमेदवारी जाहिर झाल्यावर एका पत्रकाराने प्रियंकाची प्रतिक्रीया विचारली होती. त्यावर या राहुल भगिनीने उत्तर दिले होते, ‘कोण स्मृती?’ पुढल्या तीन आठवड्यात स्मृतीने प्रियंकाला कायमच्या स्मृती निर्माण करून दिल्या. कारण अर्ज भरून बेपत्ता झाल्यावरही राहुल जिथे तीनचार लाखाच्या फ़रकाने जिंकू शकत होते, तिथे जागा टिकवण्यासाठी त्या राजपुत्राला घाम आला होता. ४०-५० हजाराच्या फ़रकाने जिंकतानाही एकदोन फ़ेर्‍यात राहुल मागे पडलेले होते. दोन महिने प्रियंकाने अमेठीत मुक्काम ठोकल्यानंतर तिथे मतांवर पडलेला हा प्रभाव होता. ज्या प्रियंकाला बालेकिल्ल्यात आपल्या भावाची मते टिकवता आली नाहीत आणि विधानसभेत दहापैकी निम्मेही कॉग्रेस उमेदवारांना विजयी करून दाखवता आले नाही, तिच्या करिष्म्याच्या गोष्टी रंगवून सांगणार्‍या वाहिन्या व माध्यमे निकालानंतर तोंडघशी कशाला पडतात, त्याचा वेगळा खुलासा करण्याची गरज नाही. पण समाजवादी पक्षाशी युती करून व प्रियंका मैदानात आल्याने निदान आधीच्या २८ जागा तरी टिकवू; अशी आशा कॉग्रेसजनांना वाटू लागलेली असेल, तर त्यांचा कोणी मुखभंग करण्याचे कारण नाही. सगळीकडून अपेशी व पराभूत झालेल्यांना चमत्कारावरच विसंबून रहाणे भाग असते. मात्र आता विधानसभेतही प्रियंकाचा काही प्रभाव दिसला नाही, तर २०१९ च्या लोकसभा निवडणूकीसाठी झाकलेली मूठही उघडी पडणार आहे.

1 comment:

 1. Bhau anakhi ek sunder lekh..
  Priyanka hi Priyadarshani aahe he Media prachar karel..
  Modi sarkar satte var yevun suddha Media ani Congress mhanje Soniya Gandhi yanchi link aajun gupta her गुप्त हेर द्वारा छडा लाउन पर्दाफार्श करु शकले नाहीत.
  Media aajun Priyanka Gandhi ch dakhavto aahe ti aata Robert Wadra pan aahe election commission la Wadra Gandhi mhanun dakhawayla social gang bhag padu shakat nahi.. hi pan ek univ उणीव think tank pravktya kadun rahun rahun geli aahe..
  Priyanka is Indira he Media parat parat dalkawnar ani bhavanik aavahan UP sarkhya magaslelya rajya til ashikshit matadarala सपा congress chya bajune zhukawanar aani 2-3 % cha pharak pan aanek seats BJp la gamavanyas bhag padu shakto..
  Modi sarkar ni aajun hi CBI che hatyar vapar le Mulayam ani Mayavati virodhat vapar shakala nahi yachi don karane asu shaktak ek evadhe varsh congress che gulam CBI officer Modi Sarakarla kitpat support karat aastil he te doghe jari janat aasale tari.. swatahachya pot bharanyachya chintetil janata evhada vichar karu shakat nahi ..
  Ani CBI che hatyar vapar le tar hach Media BJP NDA la target karel..
  Tya mule Rajya Sabhe sathi UP election phar mahatwachi aahet he parat parat UP janatechya dokyat bharvayache Indra dhanushya Modi ani team kashi pelate hyavar UP che ani देशाचे पुढील दशकाचे राजकीय भवितव्यय आवलंबुन आहे..
  याची तयारी मोदी सारखा मुर्रब्बी नेता करु शकला नाही तर ....
  या सारखे.देशाचे दुर्दव्य नाही..
  जसे गुजरात election chya veli ek jari seat modi na kami milali tari Modi kendrat 2014 la hartil इथ पर्यंत media chi majal geli hoti ti Modi chya karishmya ne palatavali hoti ...
  Yachi punaravrati पुनर्रराव्र् ती modi karu shakatat ka he pahave lagel..

  ReplyDelete