कृष्णा हेगडे हे मुंबईतील कॉग्रेसचे माजी आमदार आहेत आणि त्यांनी वर्षा या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. अकस्मात त्यांनी असे का करावे, याचे उत्तर सोपे आहे. सत्ताधारी पक्षाकडे अन्य पक्षातले कार्यकर्ते नेते आपल्या राजकीय लाभासाठी जमा होत असतात. पण सद्यस्थिती बघता कृष्णा हेगडे यांच्यावर तसा आरोप करता येणार नाही. कारण त्यांनी आमदारकी भूषवलेली आहे आणि ते महापालिका निवडणूकीत नगरसेवक होण्याच्या अपेक्षाने पक्ष सोडण्याची शक्यता नाही. पण त्यांनी या पक्षांतरानंतर व्यक्त केलेले मत महत्वाचे ठरावे. आपण अनेक पिढ्यांपासून कॉग्रेसमध्ये आहोत आणि आज मुंबई विभागिय पक्षाचे अध्यक्ष संजय निरूपम कालपरवा पक्षात आलेले आहेत. त्यांनी कॉग्रेस बुडवण्याचे काम आरंभले असल्याने आता पक्षात थांबणे अशक्य झाले; असे हेगडे यांनी म्हटलेले आहे. त्यांच्या या भावना कॉग्रेस पक्षाच्या श्रेष्ठींकडे बोट दाखवणार्या आहेत. कारण अशी भूमिका घेणारे वा नाराजी व्यक्त करणारे हेगडे पहिलेच कॉग्रेसनेते नाहीत. त्यांच्याही आधी मुंबईतील अनेक कॉग्रेस नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकलेला आहे. त्या प्रत्येकाने विद्यमान पक्ष नेतृत्वावर दोषारोप केलेले आहेत. माजी विभागिय अध्यक्ष गुरूदास कामत, निरूपम यांच्याविरोधात असल्याची गोष्ट लपून राहिलेली नाही. त्यांनी तर निरूपम यांच्या वर्तनाला कंटाळून राजकारणातूनच संन्यास घेतलेला होता. पण कामत यांना दिल्लीला बोलावून राहुल व सोनियांनी समजून काढली, म्हणून ते पक्षात कायम राहिलेले आहेत. पण आता महापालिका निवडणूक ऐन भरात आली असताना कॉग्रेसमधील ह्या लाथाळ्या त्या पक्षाला पुरता रसातळाला घेऊन जाणार्या आहेत. कारण गेल्या लोकसभा विधानसभा निवडणूकीत कॉग्रेसला मुंबईत कुठेही आपली छाप दाखवता आलेली नाही. त्यातून पक्षाला सावरण्याची गरज आहे.
१९९८ सालात व नंतर अनेक वर्षे कामत यांनी कॉग्रेसचे मुंबईत नेतृत्व केले. मुरली देवरा यांच्याशी त्यांचेही पटलेले नव्हते. पण दोघांनी मिळून काम करताना पक्षाला आपल्या भांडणाचे चटके बसू नयेत, इतक्या मर्यादा संभाळल्या होत्या. मात्र तसे आजकाल होताना दिसत नाही. सोनिया गांधींनी पक्षाची सुत्रे हाती घेतल्यानंतर त्यांची मुंबईतली पहिलीच सभा जबरदस्त करण्याची कामगिरी कामत यांनी बजावली होती. त्यानंतरच्या लोकसभा निवडणूकीत २००४ सालात कॉग्रेसला मुंबईत मोठा विजय मिळाला होता. थोडक्यात शिवसेना-भाजपा युती असतानाही मुंबईत कॉग्रेसचे अस्तित्व टिकवण्याची व पक्षाचे जनमानसातील बळ वाढवण्याची महत्वपुर्ण कामगिरी कामत यांनी यशस्वी केलेली होती. त्या यशापेक्षाही, विपरीत स्थितीत पक्षाला सावरण्याचे कामत यांचे कौशल्य मोलाचे मानावे लागेल. जेव्हा युती जोरात होती, तेव्हाच नेतृत्वाची कसोटी लागलेली होती. त्यामुळेच आज लागोपाठचे पराभव कॉग्रेस अनुभवत असताना, पक्षाचे काम व संघटना कोणत्या प्रकारे चालली पाहिजे, याचा अनुभव गाठीशी असलेला एकमेव नेता म्हणून कॉग्रेसने कामत यांनाच जबाबदारी सोपवली पाहिजे. अशावेळी अन्य पक्षातून कॉग्रेसमध्ये आलेल्या निरूपम यांच्यासारख्याच्या हाती पक्षाची धुरा सोपवणे, म्हणजे पक्षाचा विध्वंस करायलाच आशीर्वाद देणे होय. तेच राहुल गांधी करत असतील, तर कामत काय करू शकतात? कामतच काही करू शकणार नसतील, तर कृष्णा हेगडे यांच्यासारख्या दुय्यम नेत्याला तरी काय शक्य आहे? हेगडे यांनी जे स्पष्ट बोलून दाखवले, ते कामत बोललेले नसतील. पण त्यांचा रोख वा नाराजी तिथेच आहे. ज्या पक्षाला उभारण्यात वाढवण्यात उमेद खर्ची घातली, तोच खच्ची होताना बघण्यापलिकडे हाती काही नसेल, तर कार्यकर्त्याला पक्षामध्ये कोण वाली असू शकतो? तो पक्षच पोरका होऊन जातो ना?
गतवर्षी मुंबई कॉग्रेसच्या मुखपत्रातच सोनिया व नेहरू खानदानाची घोर बदनामी करणारा मजकूर छापून आल्याने गदारोळ झालेला होता. तेव्हाच खरे तर निरूपम यांची गठडी वळायला हवी होती. पण तसे होऊ शकलेले नाही. कारण निरूपम उत्तर भारतीय नेता आहेत आणि त्यांच्याच नेतृत्वामुळे मुंबईतील उत्तर भारतीय मते कॉग्रेसच्या पारड्यात पडू शकतील, असा काहीसा समज राहुल वा पक्षश्रेष्ठींनी करून घेतलेला दिसतो. पण ते वास्तव नाही. निरूपमपेक्षाही संयमी व चतूर असा उत्तर भारतीय नेता म्हणून कॉग्रेसला कृपाशंकर सिंग यांनी नेतृत्व दिलेले आहे. फ़ार कशाला, २००९ च्या लोकसभा मतदानात सर्वच जागा कॉग्रेसने जिंकल्या, तेव्हा कृपाशंकर हेच नेतृत्व करीत होते. पण पुढे त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले आणि त्यांना बाजूला करावे लागले होते. तेही गैरलागू मानता येणार नाही. पण कॉग्रेसला सावरण्यात व मुंबईत नव्याने उभे करण्यात कामत व सिंग यांचा अनुभव श्रेष्ठींना दिसत कसा नाही? निरूपमच उत्तर भारतीय मते मिळवून देतील हाही भ्रम लौकरच निकालात निघू शकेल. कारण कृपाशंकर यांच्या तशा भूमिकेनेच कॉग्रेसला पाच वर्षापुर्वी मुंबईत फ़टका बसला होता. मराठी भागातही ह्टटाने उत्तर भारतीय उमेदवारांना उभे करून सिंग यांनी जो आगावूपणा केला; त्यातून बंडखोरी झाली होती आणि लोकसभा विधानसभेच्या यशानंतर दारूण पराभव सहन करावा लागला होता. मुंबईच्या पालिका निवडणूकीत प्रादेशिक भावनेला खतपाणी घालून मते मिळत नाहीत, तर संघटनात्मक बळावरच मते जिंकता येतात. हे वारंवार सिद्ध झालेले आहे, त्याकडे पाठ फ़िरवून निरूपम यांनाच मुंबईतले नेतृत्व देऊन, श्रेष्ठींनी मुंबईतला पक्षच उध्वस्त करण्याचे ठरवलेले असावे. महिन्याभरात त्याचे परिणाम दिसतील. कारण तोवर मतदान होऊन निकालही लागलेले असतील. पण त्यात कॉग्रेस पन्नाशीही गाठण्याची शक्यता उरलेली नाही.
संजय निरूपम हे शिवसेनेतून कॉग्रेसमध्ये आले आणि आपल्या उनाड वर्तनाने ते लोकांचे लक्ष वेधून घेण्याचा अखंड प्रयास करीत असतात. संघटना उभारणे व त्यातले खाचखळगे ओळखून लोकांना जोडणे; त्यांना कधीच जमलेले नाही. माध्यमांच्या आसर्याने पक्षात आपले स्थान निर्माण करणार्यांना संघटना उभी करता येत नाही. आज त्याच कारणाने देशभरातील कॉग्रेस डबघाईला गेलेली आहे. शिवाय उत्तर भारतात आपले उरलेसुरले अस्तित्व टिकवण्याची धडपड कॉग्रेसला करावी लागते आहे. अशावेळी सर्व शक्ती व वेळ तिकडे देण्याला पर्याय नाही. म्हणूनच सोनिया किंवा राहुलसहीत कोणीही मोठा दिल्लीकार नेता, मुंबईतल्या कॉग्रेसमधले वितंडवाद निकालात काढण्यासाठी मुंबईला धाव घेऊ शकत नाही. पण मुंबई ही देशाशी आर्थिक राजधानी आहे आणि तिथेच कॉग्रेस खचली, तर नव्याने पक्षाला आपल्याच पायावर उभेही रहाता येणार नाही. आज जसे बिहार उत्तरप्रदेशात अन्य पक्षांच्या मेहरबानीवर कॉग्रेसला मतदाराला सामोरे जावे लागत आहे, तितकी वाईट स्थिती येऊ शकते. एक शतायुषी पक्ष असा बारीकसारीक भांडणातून नामशेष होताना बघूनही अनेकांना खेद होत असेल. पण श्रेष्ठींनीच उनाड मुलाच्या हाती महागडे खेळणे सोपवावे, तसा पक्ष बहकू दिला असेल, तर दुसरे काय व्हायचे? समाजवादी व ओवैसी यांच्या संघर्षात मुस्लिम मते विभागली जाणार असताना, कॉग्रेसला फ़टका बसणार आहेच. पण सेना-भाजपा युती झाली नाही, तर उत्तर भारतीयांसह अमराठी मतांसाठी भाजपा हा उत्तम पर्याय होतो. त्याचा मोठा दणका कॉग्रेसलाच बसणार. पण हे निरूपम यांच्या लक्षात आलेले नाही, की दिल्लीतल्या श्रेष्ठींना महत्वाचे वाटलेले नाही. कृष्णा हेगडे यांचे पक्षांतर त्याचीच चाहूल आहे. तशीच वाटचाल होत राहिली, तर पुढल्या लोकसभा मतदानापर्यंत मुंबईत कॉग्रेस किती शिल्लक उरलेली असेल?
भाऊ, एक प्रश्न स्वयंघोषित जाणता राजा पेशव्यांकडून पुरस्कार स्वीकारणार का असहिष्णुवाद्यांप्रमाणे परत करणार
ReplyDeleteआता दोघे काहीही करतील
ReplyDelete