यादवकुलीन नाट्य संपता संपत नाही, असे एकूण चित्र आहे. शुक्रवारी एका मोठ्या नाट्यपुर्ण पत्रकार परिषदेत समाजवादी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांनी आपल्या मुख्यमंत्री पुत्र अखिलेश यादव याची पक्षातून हाकालपट्टी केली होती. कारण त्याने पक्षाच्या हिताविरुद्ध काम केले, असा त्यांचा दावा होता. शिवाय त्याच्याच सोबत मुलायमबंधू रामगोपाल यादव यांचीही हाकालपट्टी करण्यात आली होती. याच रामगोपाल यांनी नववर्षाच्या प्रथमदिनी लखनौ येथे पक्षाच्या कार्यकर्ते व सदस्यांची तातडीची बैठक बोलावली होती. अध्यक्षाच्या संमतीशिवाय अशी बैठक बोलावणे नियमबाह्य असल्याने, रामगोपालचीच पक्षातून हाकालपट्टी करीत असल्याची घोषणा मुलायमनी केली होती. मग एकच रान उठले आणि दोन गटात दावे प्रतिदावे सुरू झाले होते. पण शनिवारी त्यात अखिलेशच्या वतीने आझमखाननी शिष्टाई करून समझोता घडवून आणला होता. तेव्हा मुलायमच्या वतीने प्रदेश समाजवादी पक्षाचे अध्यक्ष शिवपाल यादव, यांनी चुलत्या पुतण्य़ाचे निलंबन रद्द करीत त्यांना पक्षात परत घेतले होते. त्यामुळे समाजवादी पक्षातले वादळ आटोपले असेच मानले गेले. पण रविवारी ते वादळ अजून घोंगावत असल्याची साक्ष मिळाली. ठरले होते त्याप्रमाणे अखिलेशच्या गटाने पक्षाचे अधिवेशन भरवले आणि त्यात नव्या अध्यक्षांची निवड केली आहे. अखिलेश यांची पक्षाध्यक्ष म्हणून उपस्थितांनी निवड केली आणि मुलायम यांना मार्गदर्शक म्हणून सन्मान दिला आहे. थोडक्यात आता आगामी निवडणूकीचे उमेदवार ठरवण्याचा अधिकार मुलायमना उरलेला नसून, अखिलेशकडे तो अधिकार आला आहे. अर्थात तसा नवा अध्यक्ष केल्याचा अधिवेशनातील प्रस्ताव निवडणुक आयोगाने मान्य करण्यावर सर्वकाही अवलंबून आहे. आपल्याच पक्षामध्ये मुलायमना अधिकारापासून वंचित करण्यात आले आहे. ते कितपत रास्त ठरू शकेल?
समाजवादी पक्षातल्या ह्या उचापती समजून घेण्य़ासाठी कायदेशीर बाबी समजून घ्याव्या लागतील. पहिली गोष्ट म्हणजे जसे शरद पवार किंवा मायावती आपापल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, तसे मुलायम समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नाहीत. ते पक्षाचे अध्यक्ष असले तरी ते प्रादेशिक पक्षाचे म्हणजेच उत्तरप्रदेशच्या एका पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या जागी शिवपाल यादव प्रदेशाध्यक्ष असण्याला काहीही अर्थ नाही. समाजवादी पक्षाची निवडणूक आयोगातील गणना एक प्रादेशिक पक्ष अशीच आहे. त्यामुळेच उत्तरप्रदेशातील या मान्यताप्राप्त प्रादेशिक पक्षाच्या त्या राज्यातील आमदार, लोकप्रतिनिधी व कार्यकारिणीचे सदस्य, ज्याची पक्षाध्यक्ष म्हणून निवड करतील, तोच त्या संघटनेचा अधिकृत अध्यक्ष असू शकतो. पक्षाचे व्यवहार त्याच्याच सहीशिक्क्यानिशी होऊ शकतात. त्याच अधिकारात मुलायमनी शुक्रवारी अखिलेश व रामगोपाल यांची पक्षातून हाकालपट्टी केलेली होती. पण शनिवारी त्यांनी आमदारांसह अन्य पदाधिकार्यांना जमवू,न आपली शक्ती माध्यमांसमोर साफ़ केली होती. मग पत राखण्यासाठी मुलायम वा शिवपाल यांनी माघार घेऊन, त्या दोघांना पक्षात परत घेतले होते. पण तीच शिवपाल यांची चुक होती. अगोदर दोघा बंडखोरांनी वेगळे अधिवेशन रद्द करावे, अशीही अट त्यांना घातलेली नव्हती. त्यामुळेच रविवारी त्याच दोघांनी बोलावलेले अधिवेशन कायदेशीर ठरलेले आहे. आता त्याच अधिवेशनात बहुतांश उत्तरप्रदेशी पदाधिकारी व आमदारांच्या हजेरीत, मुलायम यांची अध्यक्ष पदावरून उचलबांगडी करण्यात आली. तर नवे अध्यक्ष म्हणून तिथे अखिलेश यांची निवड करण्यात आली आहे. बहुतांश पदाधिकार्यांच्या सह्या असलेला हा प्रस्ताव आयोगाकडे गेल्यावर, तो मान्य झाल्यास पक्षसंघटनेसह निवडणूकचिन्ह अखिलेशच्या गटाला मिळू शकेल. तसे झाले नाही, तर निवडणूक चिन्ह वादग्रस्त म्हणून गोठवले जाईल.
थोडक्यात या अधिवेशनातील प्रस्तावामुळे पक्षाचा ताबा भले अखिलेशला मिळाला नाही, तरी मुलायमकडे उरणार नाही. म्हणजेच मुलायमच्या सहीने कुणाला समाजवादी पक्षाची उमेदवारी मिळू शकत नाही आणि प्रस्ताव मान्य झाला, तर तशी उमेदवारी फ़क्त अखिलेशच्याच सहीने मिळू शकते. कारण हा प्रादेशिक पक्ष असून, त्यामध्ये उत्तरप्रदेशचे पदाधिकारी अंतिम अधिकारी आहेत. एका बाजूला ही बातमी आहे आणि दुसरीकडे त्याला पुरक म्हणावी अशी प्रियंका गांधी व अखिलेश यांच्यात संपर्क झाल्याचीही बातमी आहे. म्हणजेच अखिलेशने पित्यासह शिवपाल यांना शह देतानाच, आधीपासून कॉग्रेसच्या सोबत जागावाटपाचा बेत शिजवलेला होता. कारण आज पुन्हा पाच वर्षापुर्वी इतकी मते आपण मिळवू शकत नाही, याची या तरूण मुख्यमंत्र्याला खात्री आहे. बदल्यात होणारी घट व पक्षातीत फ़ुट यांची त्रुटी भरून काढण्यासाठी त्याने दुबळ्या कॉग्रेसला सोबत घेण्याची योजना आखलेली आहे. गेल्या विधानसभेत समाजवादी पक्षाने मिळवलेली मते लोकसभेत टिकलेली नव्हती आणि आता फ़ुट पडल्याने आणखी मते घटणार आहेत. लोकसभेत कॉग्रेसला विनाकाष्ट साडेसात टक्के मते मिळालेली होती. त्यापैकी पाच टक्के मते जरी समाजवादी पारड्यात पडली, तरी बेरीज २७-२८ टक्के होऊ शकेल. त्यामुळे बहुमताचा पल्ला गाठला नाही तरी मोठी टक्कर देता येईल, असा अखिलेशचा हिशोब असू शकतो. त्यात दोन डाव साधले जाऊ शकतात. कॉग्रेसला स्वबळावर लढण्यापासून रोखले जाते आणि आपल्याच पक्षातील जुन्या लोकांना संपवता येते. मायावती व भाजपाशी तुल्यबळ टक्करही दिली जाऊ शकते. यात सत्ता मिळाण्याची अपेक्षा अखिलेशने बाळगलेली नाही, तर आधी पक्षावर ताबा मिळवणे, इतकाच प्रमुख हेतू आहे. आझमखान यांना तडजोडीसाठी पुढे करून अखिलेशने चुलता शिवपाल याला हातोहात उल्लू बनवले, असा याचा अर्थ होतो.
यात मुलायमनी उघड्या डोळ्यांनी आपला पराभव करून घेतला, असे आपण म्हणू शकत नाही. हे असे होणार याचा अंदाज मुलायमसारख्या बिलंदर राजकारण्याला नव्हताच, असा दावा कोणी करू शकत नाही. पण त्यांनी मुद्दाम तिकडे दुर्लक्ष केलेले असू शकते. बाकी मुलावर कारवाई किंवा मुलाचे निलंबन वगैरे निव्वळ नाटके असण्याची शक्यता अधिक आहे. काही वर्षापुर्वी कर्नाटकात मुलायमच्याच वयातले व संगतीतले जनता दलीय माजी पंतप्रधान देवेगौडा यांनीही असेच नाटक रंगवलेले विसरण्याचे कारण नाही. कॉग्रेसशी असलेली युती मोडून गौडापुत्र कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्री होण्यासाठी भाजपाशी युती केली होती. तेव्हा सेक्युलर जनता दलाचे जवळपास सर्व आमदार त्याच्या सोबत गेले आणि पिता देवेगौडा डोळे पुसण्याचे नाटक करीत बसलेले होते. मग कुमारस्वामी यांनी राजिनामा देऊन भाजपला मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मोकळी करून देण्याची पाळी आली; तेव्हा तेच देवेगौडा अडवाणी व अन्य भाजपा नेत्यांच्या पायर्या झिजवत होते ना? तेही शक्य झाले नाही तेव्हा शपथ घेण्यापुरता शब्द पाळून, त्यांच्या पक्षाने भाजपाच्या येदीयुरप्पा यांच्याशी दगाफ़टका केलेला होता. मुख्यमंत्रीपदासाठी पितापुत्राने कर-नाटकात रंगवलेले ते नाटक, इतक्यात आपण विसरून गेलो आहोत काय? थोड्याफ़ार प्रमाणात त्याच संहितेत बदल करून, जुनेच नाटक नव्या संचामध्ये उत्तरप्रदेशात सादर केले जात आहे. पक्षाचे नाव वेगळे आणि पात्रांची नावे बदलली आहेत. नेपथ्य थोडेफ़ार नवे आहे. पण बाकीचा तमाशा जसाच्या तसाच आहे ना? ते नाटक भाजपाला उल्लू बनवण्यासाठी होते आणि आता उत्तरप्रदेशात रंगलेले नाटक कॉग्रेसला उल्लू बनवण्यासाठी खेळले जात आहे. भाजपाला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी झपाटलेल्या कॉग्रेसचा उरलासुरला मतदार, यात समाजवादी पक्षाकडे येणार आणि समाजवादी पक्षात मुलायमचा खरा वारस पक्षात सर्वोच्चपदी विराजमान होणार आहे.
ReplyDeleteभाऊराव,
ही असली रडगाणी बापानं गायची रीत बरीच जुनी आहे.
शहाजीमहाराजांना आदिलशहाने फसवून कैद केलं. यावर एकीकडे शिवाजीने मोगलांशी संधान बांधून प्रत्युत्तर दिलं. तर दुसरीकडे त्यांच्या थोरल्या मुलाने म्हणजे संभाजीने फर्रादखानाचा पराभव केला. या घटनांचा परिणाम म्हणून आदिलशहास शहाजीमहाराजांना सन्मानपूर्वक मोकळं करावं लागलं. ठीके. यानंतर आदिलशहाने शहाजीमहाराजांना विनंती करून शिवाजीस आवरण्याची सूचना केली. तर महाराज म्हणतात की माझा मुलगा माझं ऐकंत नाही!
महाभारतकाळी धृतराष्ट्रही हेच रडगाणं गायचा. म्हणे, दुर्योधन माझं ऐकंत नाही!
आपला नम्र,
-गामा पैलवान