समाजवादी पक्षात गतवर्षीच्या अखेरीस जो पेचप्रसंग उदभवला, तोच तीन वर्षापुर्वी भाजपामध्येही आलेला होता. दहा वर्षे राज्य केलेल्या युपीए व कॉग्रेसविषयी जनतेत असंतोष होता. त्याचा लाभ सर्वात प्रभावी राजकीय पक्षाला मिळणार हे स्वाभाविक होते. त्यामुळेच आपली पंतप्रधानपदी विराजमान होण्याची महत्वाकांक्षा अपुर्ण राहिलेले ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, तिसर्यांदा गुडघ्याला बाशिंग बांधून सज्ज होते. पण मधेच त्यांच्या पक्षातल्या तरूणांना नरेंद्र मोदी यांच्यातला महायोद्धा दिसू लागला आणि तोच भाजपाचे रुतून बसलेले गाडे चिखलातून बाहेर काढेल असे वाटू लागले. त्यामुळे गोव्यात झालेल्या पक्ष कार्यकारिणीच्या अधिवेशनात अडवाणी रुसले. कारण तिथेही त्यांच्या हजेरीत मोदी झिंदाबादच्या घोषणा सुरू झालेल्या होत्या. तितकेच नाही तर इतर राज्यात लोकप्रिय वक्ता म्हणून निवडणूक प्रचारासाठी मोदींना असलेली मागणी वाढू लागलेली होती. अधिक तिसर्यांदा गुजरात विधानसभेत मोठे यश मिळवून मोदींनी आपले प्रभूत्व सिद्धही केलेले होते. म्हणूनच गोव्यात मोदी यांना लोकसभा प्रचाराचे प्रमुख म्हणुन निवड होताच अडवाणी विचलीत झाले. तसेच उठून दिल्लीला तडकाफ़डकी निघून गेलेले होते. तिथून भाजपातील पेचप्रसंग सुरू झालेला होता. पण अडवाणींच्या रुसण्याची फ़ारशी दखल घेतली गेली नाही, तेव्हा त्यांनी पक्षातील सर्व पदांचे राजिनामे देऊन प्रतिष्ठा पणाला लावली. मात्र अखेरीस एकही शब्द त्यांच्या विरोधात न उच्चारता, मोदी पक्षात आपले नेतृत्व सिद्ध करण्यात यशस्वी झालेले होते. अडवाणींना माघार घ्यावी लागली होती आणि मुलायमना आज तशीच माघार घ्यावी लागली आहे. पण यात पुत्र अखिलेशचा विजय झाला, की आपलाच पराभव घडवून आणण्याचा विचित्र डाव पित्याने यशस्वी केला, याचीच शंका येते. कारण त्यातला विजय पराजय स्पष्ट दिसत नाही.
निवडणुका ऐन दार ठोठावत असताना अशाप्रकारे पक्षात दुफ़ळी माजणे व त्यात पुत्रालाच पक्षातून हाकलून लावण्याचे आततायी पाऊल पित्याचे उचलणे; चमत्कारीक वाटते. आपला पराभव पुत्राने घडवलेला जगाला दाखवण्याइतके मुलायम बावळट नक्कीच नाहीत. पण आपला पराभव होत असतानाच, आपला डाव सिद्ध करण्याइतके मुलायम नक्कीच बिलंदर आहेत. अयोद्ध्येतील कारसेवकांवर मुख्यमंत्री असताना गोळीबार करून, त्यांनी मुख्यमंत्रीपद गमावले होते. पण त्यातूनच मुस्लिम मतदाराचा विश्वास संपादन करत मुलायमनी मुस्लिमांचा देशातील एकमेव नेता असल्याची ख्याती निर्माण केलेली होती. त्यानंतर मुल्ला मुलायम अशी त्यांची हेटाळणी होत असताना, त्यांनी नव्या समाजवादी पक्षाची स्थापना केलेली होती. पाच वर्ष अज्ञातवासात जाताना त्यांनी आपला पक्का मतदारसंघ उत्तरप्रदेशात निर्माण केला. आज त्यावरच त्यांची नेता म्हणून प्रतिमा उभी राहू शकलेली आहे. यादव किंवा ओबोसींचा नेता असलेली प्रतिमा पुसताना, त्यांनी यादव मुस्लिमांचा अनभिषिक्त नेता, अशी प्रतिमा उभी करून घेतली होती. तो आपला वारसा त्यांनी साडेचार वर्षापुर्वी मुलाकडे सोपवला. त्याच्याशी अन्य सहकार्यांनी जुळवून घेतले नाही. त्या सवंगड्यांना हाकलून लावणे वा नमते घ्यायला लावणेही मुलायमना शक्य नव्हते. अधिक कुटुंबातील वाद होतेच. त्या सर्वांना सोबत ठेवून हा श्रीकृष्णाचा आधुनिक वारस नेमकी उलटी कृष्णनिती खेळलेला आहे. आपली सेना कौरवांना देऊन नि:शस्त्र असलेला कृष्ण पांडवांच्या सोबत राहिलेला होता. इथे नि:शस्त्र मुलायम जुन्या सहकार्यांच्या सोबत राहिला आणि त्याच सहकार्यांचा धुव्वा उडवू शकणारी आपली सेना त्याने पुत्राच्या हवाली केलेली होती. यात आपला पराभव झाल्याचे जगाला दाखवताना, त्याच मुलायमनी पक्षातील तमाम जुन्या सवंगड्यांना पुत्राच्या हातून शरणागत केले आहे.
किती भन्नाट महाभारत आहे ना? त्यात युद्ध टाळण्यासाठी भगवान श्रीकृष्ण शिष्टाई करायला गेला होता आणि इथे आझमखान शिष्टाई करायला पुढे आले. खरे तर आझमखान यांचे मुलायम गोटातील अमरसिंग यांच्याशी हाडवैर आहे आणि अखिलेशला अमरसिंग हाच खलनायक वाटतो. त्याला पाठीशी घालणारा चुलता शिवपाल शत्रू वाटतो आणि त्यांना अभय देणार्या मुलायमला पुत्राने आव्हान दिलेले होते. पण याच सर्व सवंगड्यांना व भावाला बाजूला सारून पुत्राला मुख्यमंत्रीपदी कोणी बसवले होते? मुलायमनीच ना? कारण तेव्हा मुलायमच्या नजरेसमोर पंतप्रधानपद होते. उत्तरप्रदेशात यश मिळवल्यानंतर दिल्लीत तिसर्या आघाडीचे सरकार आणि त्यात थेट पंतप्रधानकीवर दावा करण्यासाठीच मुलायमनी राज्याची सुत्रे मुलाकडे सोपवली होती. पण दिल्लीचे स्वप्न भंगले आणि राज्यातच पळता भूई थोडी झालेली होती. खरेतर तेव्हाच पुत्राला बाजूला करून सावरासावर करायला हवी होती. पण त्या दारूण पराभवानंतरही पिता ठामपणे अखिलेशच्या बाजूने उभा राहिला आणि त्याला समाजवादी पक्षात स्वतंत्रपणे आपले सामर्थ्य निर्माण करण्याची संधी देण्यात आली. तिथून शिवपाल विरुद्ध अखिलेश हा संघर्ष सुरू झालेला होता. शिवपालच्या मदतीला मग अमरसिंग, बेनिप्रसाद वर्मा असेही सवंगडी पुन्हा पक्षात आणले गेले आणि त्यांच्यावर मात करण्याची संधी अखिलेशला देण्यात आली. त्यातली कसोटी पक्षांतर्गत वादात या जुन्या सवंगड्यांना पुत्राने पराभूत करण्याची होती. त्याचा अखेरचा अध्याय वर्षअखेरीस सादर करण्यात आला. त्यात पित्यानेही पुत्राच्या विरोधात उभे रहायचे आणि पुत्राने पित्याला पराभूत करून दाखवायचे; हा पराकोटीचा प्रसंग साजरा व्हायचा होता. तो कमालीचा रंगला. ज्यात मोठमोठे राजकीय अभ्यासकही फ़सले आणि पितापुत्र मिलनाने सगळ्या नाट्यावर पडदा पडला.
बापसे बेटा सवाई होण्यातच पित्याचा आनंद असू शकतो. पण इथे पित्याने चतुराईने आपल्या पराभवाचा देखावा उभा करीत पुत्राला आपला वारसा सोपवला आहे. त्यात आपल्या बंधू व मित्रांना बळी दिलेले आहे. पुत्राकडून त्यांचे बळी पाडून घेतले आहेत. किंबहूना त्यांना आता निमूटपणे पुत्राच्या नेतृत्वाखालीच काम करायची पाळी खुद्द मुलायमनीच आणली आहे. मुलगा पक्ष हायजॅक करायला निघाला आहे आणि आपल्याला पक्ष वाचवायचा आहे; असे शुक्रवारी मुलायमच पत्रकारांच्या समोर म्हणाले होते. मग शनिवारी असे काय झाले, की त्यांनी त्याच हाकललेल्या पुत्राला पुन्हा पक्षात आणले? बहुतांश आमदार व खासदारांचा जमावडा मुलायमला झुगारून पुत्राच्या पाठीशी उभा राहिला, असे कोणी म्हणूही शकत नाही. कारण अखिलेशच्या समर्थनासाठी चाललेल्या झुंबडीमध्ये कोणीही मुलायमच्या विरोधात अवाक्षर बोलत नव्हता. तर शिवपाल, अमरसिंग आदींच्या विरोधात घोषणा गर्जना मुर्दाबाद चालू होता. या गदारोळात अवघा पक्ष व त्याचा तळागाळातील कार्यकर्ता ढवळून काढला गेला आणि निवडणूकीला आवश्यक असलेला आवेश त्या अनुयायांमध्ये निर्माण करण्यात आला. आता अखिलेशच्या नेतृत्वाखालीच पक्षाला पुन्हा सत्ता मिळवून देण्यासाठी अहोरात्र झटायची, एकप्रकारे ही कबुली जाहिरपणे वदवून घेण्यात आली. पुत्राच्या विरोधात बोलणार्यांनाही असे चुप करण्यात आले, तर तशी कृती वा खेळी करणार्यांना किती वचक बसला असेल? यापुढे समाजवादी पक्षात मुलायम नव्हेतर अखिलेशचा शब्द अंतिम, इतकाच या नाट्याचा बोध आहे. किंबहूना मुलायमचा शब्द म्हणजेच अखिलेशचा शब्द, असा बोध आहे. या नव्या उत्तरप्रदेशी महाभारतामध्ये कौरवही हरले आहेत तसेच पांडवही पराभूत झाले आहेत. जिंकले कोण तर यादव! आधुनिक महाभारतामध्ये जिंकतात, त्यांनाच पांडव म्हणायचा निकष असतो ना?
No comments:
Post a Comment