समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंग यादव यांनी उत्तराखंड राज्यातील आपल्या उमेदवारांची यादी जाहिर करून टाकली आहे. मात्र त्यांचा खरा बालेकिल्ला असलेल्या उत्तरप्रदेशची यादी अधांतरी लटकलेली आहे. कारण उमेदवारी कोणालाही दिली म्हणून उपयोग नसतो. निवडणूक आयोगाची मान्यता असलेला पदाधिकारीच त्या उमेदवाराला पक्षाचे चिन्ह बहाल करू शकत असतो. सहाजिकच ज्या पक्षाच्या पदाधिकार्यांनाच आयोगाने मान्यता दिलेली नाही, त्याच्या उमेदवारीचा उपयोग काय? मंगळवारपासून उत्तरप्रदेश विधानसभेच्या पहिल्या फ़ेरीत मतदानाला सामोरे जाणार्या उमेदवारांच्या अर्ज भरण्यास आरंभ होईल. मात्र त्यासाठी समाजवादी पक्षाचे उमेदवार कोण, त्याचा पत्ता रविवारीही उघड झालेला नव्हता. दरम्यान अखिलेश यादव यांनी मोटरसायकल चिन्ह घेण्याची तयारी केलेली असून, मुलायमनी पुर्वाश्रमी ज्या पक्षात होते, त्या लोकदलाच्या चिन्हावर आपले उमेदवार लढवण्याची तयारी चालविली आहे. समाजवादी पक्षाच्या या संघर्षामध्ये पुत्र मुख्यमंत्री अखिलेशने कितीही आवाज केला म्हणून, स्वबळावर सत्ता मिळवण्याचा आत्मविश्वास त्याच्यापाशी नाही. म्हणूनच त्याने पडद्यामागे कॉग्रेसला सोबत घेण्याची तयारी चालविली आहे. तर मुलायम चिन्हासाठी धडपडत आहेत. हा सगळा खेळ बघता दोघांनीही विधानसभा जिंकता येणार नाही, मनोमन स्विकारलेले सत्य असावे. मात्र त्यातून मायावती जिंकू नयेत, असे त्यांनाही वाटत असावे. किंबहूना भाजपा जिंकला तरी बेहत्तर! पण उत्तरप्रदेशात पुन्हा कॉग्रेसने डोके वर काढू नये आणि मायवतींना अधिकाधिक खच्ची कसे करता येईल, अशी रणनिती दिसते. भाजपा सोडला तर प्रत्येकाला मुस्लिम मतांचा गठ्ठा आपल्याला सोडून जाऊ नये, याचीच अधिक चिंता आहे. कॉग्रेस हा एकटाच पक्ष भाजपाला पराभूत करण्यासाठी उत्सुक आहे. पण त्याच्यापाशी तितके बळच नाही.
उत्तरप्रदेशात मुस्लिम मोठ्या संख्येने आहेत आणि शंभराहून अधिक जागी मुस्लिम मतांचा प्रभाव मतदानावर पडू शकतो. ३०-५० टक्के इतक्या मोठ्या संख्येने मुस्लिम मतदार असलेल्या अशा जागी, भाजपाला सहजगत्या जिंकता येत नाही. पण जर मुस्लिम मते विविध पक्षांकडे विभागली गेली, तर भाजपाला बाजी मारणे शक्य असते. मागल्या लोकसभेत भाजपा म्हणूनच मोठी बाजी मारू शकला आणि कुठल्याही पक्षातर्फ़े एकही मुस्लिम उमेदवार लोकसभेपर्यंत पोहोचू शकला नाही. तर पाच वर्षापुर्वी विधानसभेच्या मतदानात विविध पक्षांतर्फ़े ६८ मुस्लिम आमदार निवडून येऊ शकलेले होते. त्याचे कारण समजून घेतले पाहिजे. जिथे जो पक्ष वा त्याचा उमेदवार भाजपाला पराभूत करू शकतो, त्याला एकगठ्ठा मतदान करणे, ही मुस्लिमांची रणनिती राहिलेली आहे. त्यामुळे मायावती, मुलायम व कॉग्रेस हे पक्ष नेहमी मुस्लिमबहूल जागांवर मुस्लिम नेत्यालाच उमेदवारी देत असतात. पण त्यामुळेच अशा हक्काच्या मुस्लिम मतदारसंघात चारपाच मुस्लिम उमेदवार उभे रहातात आणि त्यांच्यातच मुस्लिम मतांची विभागणी झाली, तर अल्पसंख्य असूनही तिथे भाजपाला मिळणारी हिंदूंची एकगठ्ठा मते बाजी मारू शकतात. लोकसभेत तेच झाला आणि कुठल्याही पक्षाचा मुस्लिम मतदार मुस्लिमबहूल भागातूनही जिंकू शकला नाही. समाजवादी पक्षाच्या बाजूने बहुसंख्य मुस्लिम उभे रहातात, हा आजवरचा अनुभव आहे. त्यानंतर मायावती वा कॉग्रेस अशी विभागणी होते. पण यावेळी समाजवादी पक्षच दुभंगला आहे. त्यामुळे मुस्लिम मतदार गोंधळला आहे. मुलायमना पर्याय म्हणून मायावतीकडे बघता येऊ शकते. पण लोकसभेत त्यांच्या बहुजन समाज पक्षाने सपाटून मार खाल्ल्याने, मुस्लिम पर्याय म्हणून मायावतींकडे बघायला राजी नाहीत. राहिला कॉग्रेस पक्ष! तर त्याच्यापाशी लढण्याची कुवतच राहिलेली नाही.
अशा स्थितीत मुलायमना जिंकण्याची आशा उरलेली नाही आणि म्हणूनच मायावती मुस्लिमांना आपल्याकडे वळण्याचे आवाहन करीत आहेत. मुलायम वा समाजवादी पक्षाला मत म्हणजे भाजपाला मदत; असा मायावतींनी सूर लावला आहे. त्याचे कारण जितके मुस्लिम त्यांच्याकडे वळतील, तितकी त्यांच्या विजयाची शक्यता वाढते. ती त्यांना बहूमतापर्यंत घेऊन जाण्याची कुठलीही हमी नाही. पण सत्ता आज मायावतींसाठी महत्वाची नसून उत्तरप्रदेश या हक्काच्या राज्यात आपल्याला दुसरा क्रमांक मिळाला तरी मायावतींना आनंद असेल. कारण आज तरी तशी कुठलीही शक्यता समोर आलेली नाही. दहा वर्षापुर्वी स्वबळावर सत्ता मिळवताना मायावतींनी मुस्लिम दलित यांच्या जोडीला ब्राह्मणांना सोबत आणलेले होते. पण पाच वर्षापुर्वी ब्राह्मण त्यांना सोडून गेले आणि मुस्लिमही दुरावत मुलायमकडे गेल्याने, सत्तेचे पारडे फ़िरलेले होते. लोकसभेने त्यांना आणखी डबघाईला आणलेले आहे. त्यातून पक्ष सावरला आणि जी हक्काची दलित मते सोबत आहेत, त्याच्या जोडीला मोठ्या प्रमाणात मुस्लिम सोबत आला, तर शंभरी गाठूनही मायावती समाधानी असतील. कारण त्यांना विरोधी पक्ष म्हणून मान्यता मिळेल आणि दोन वर्षांनी येणार्या लोकसभेत मोठे यश मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देता येईल. मात्र याक्षणी मायावती सत्तेच्या स्पर्धेत नाहीत आणि त्याची प्रचिती त्यांच्या प्रचारातूनही येते आहे. किंबहूना मुलायम व मायावती या दोन्ही पक्षांनी सत्तेची अपेक्षा सोडलेली आहे. खरा स्पर्धक विद्यमान मुख्यमंत्री अखिलेश आहे. भाजपाशी टक्कर देण्याची जिद्द त्याच्यापाशी असून, त्यात भाजपाला रोखण्यासाठी कॉग्रेस मदत करू शकेल, अशी त्याची अपेक्षा आहे. कारण फ़ाटाफ़ुटीने घटणार्या मतांची त्रुटी कॉग्रेसने भरून काढली, तर भाजपाशी तुल्यबळ लढत देण्याची क्षमता निर्माण होते, असा त्याचा आडाखा आहे. तोही चुकीचा नाही.
कॉग्रेस उत्तरप्रदेशात आपला पाया गमावून बसलेली आहे. तामिळनाडूप्रमाणे एका द्रविडी पक्षाच्या सोबत कॉग्रेस गेल्यास, दुसर्या द्रविडी पक्षाचा पराभव होत असायचा. तेच अखिलेशचे गणित आहे. आज कॉग्रेस स्वबळावर २०-३० आमदार निवडून आणू शकत नाही. पण त्यांची मते मुलायम वा मायावतीच्या पक्षाच्या जोडीला गेली, तर ५०-७५ जागांवर मोठा फ़रक पडू शकतो. महागठबंधन म्हणून जो प्रयोग बिहारमध्ये झाला, तिथेही त्याचीच प्रचिती आली होती. दोनचार जागा जिंकू शकणार्या कॉग्रेसला सोबत घेऊन नितीश व लालूंनी ८० जागा प्रत्येकी जिंकल्या होत्या आणि बदल्यात कॉग्रेसलाही २४ आमदार तीन दशकानंतर निवडून आणणे शक्य झालेले आहे. त्याचीच पुनरावृत्ती उत्तरप्रदेशात अखिलेश करू बघतो आहे. आपल्या बळावर समाजवादी पक्षाची २० टक्के मते खेचण्याचा त्याला आत्मविश्वास आहे. त्यात कॉग्रेस पक्षाची परंपरागत १० टक्के मते मिळाली, तर ३०-३२ टक्के इतकी मजल मारता येते. तितकी मते आज भाजपाला मिळत असल्याचा प्रत्येक चाचणीतून समोर आलेला आकडा आहे. अखिलेश-राहुल एकत्र आल्यास मतदानात ३०-३२ टक्के मजल मरण्याचे समिकरण या तरूण नेत्याने मांडलेले आहे. त्यातून भाजपाशी तुल्यबळ लढत दिली, तर कदाचित सत्तेपर्यंत पोहोचण्याचीही अपेक्षा बाळगता येते. शिवाय अधिक जागा आपल्याकडे असल्याने त्या जागी कॉग्रेसच्या मतदारांना कायमस्वरूपी आपल्याच गोटात गुंतवता येते, असे हे समिकरण आहे. सहाजिकच सायकल चिन्ह मिळवण्यापेक्षा अखिलेश आज कॉग्रेसशी हातमिळवणी करण्याला प्राधान्य देतो आहे. पित्याच्या छायेतून बाहेर पडताना या मुलाने केलेली राजकीय मांडणी, उत्तरप्रदेशातील दिर्घकालीन राजकारणाची दिशाच बदलून टाकू शकते. त्यात मुलायम मागे पडतीलच. पण मायावती पुन्हा पराभूत झाल्यास अस्ताला लागतील आणि कॉग्रेस आधीच खंगलेली आहे. म्हणजे भविष्यात भाजपाला आव्हान फ़क्त अखिलेशचे असेल.
No comments:
Post a Comment