Sunday, January 22, 2017

असहिष्णूतेची पराकाष्टा

not my president के लिए चित्र परिणाम

बातम्या अनेक येत असतात. जगाच्या कानाकोपर्‍यात अनेक घटना घडत असतात. त्यांची माहिती आपल्याकडे तुटक स्वरूपात येत असते. त्याचे सगळेच संदर्भ उघड करून मांडले जातातच असे नाही. सहाजिकच त्या विविध घटनांचा परस्पर संबंध आपल्याला सहजासहजी उलगडत नाही. भारतात तामिळनाडू राज्यात जालीकटू नामे एका खेळावरून उठलेले रान आणि अमेरिकेतील नव्या अध्यक्षांच्या विरोधात होणारी निदर्शने; यांच्यात वरकरणी काहीही समानता आढळणार नाही. पण बारकाईने त्यातली साम्ये किंवा साधर्म्य शोधायचा प्रयत्न केल्यास, त्यामागची प्रेरणा किंवा चालना समान असल्याचे लक्षात येऊ शकते. दोन्हीकडला संघर्ष एकाच धारणेतून आला असल्याचे आपण सहज बघू शकतो. फ़ार कशाला महाराष्ट्रात निघालेले मराठा मूक मोर्चे, क्रांती मोर्चे; त्याच जागतिक धारणेतून आलेले असतात. ब्रिटनसारख्या देशाने युरोपियन महासंघातून बाहेर पडण्याचा घेतलेला निर्णय, किंवा एकूणच युरोपियन समाजात सुरू असलेली उलथापालथ, पश्चीम आशियातील घडामोडी; यांच्यातही अनेक साम्ये आढळून येऊ शकतील. अशा प्रत्येक घटनेतून प्रस्थापित कालबाह्य व्यवस्थेला धक्के देण्याची प्रक्रीया सुरू झालेली आहे. मानवी इतिहासात चारपाच दशके उलटून गेल्यावर प्रस्थापित व्यवस्था कालबाह्य होत असते आणि त्यामुळे तिथे ज्यांचे हितसंबंध निर्माण झालेले असतात, त्यांच्याकडून पिळले नाडले गेलेले बहुसंख्य लोक, प्रस्थापिताच्या विरोधात बंड पुकारत असतात. त्याचा चेहरा भुगोल वा संस्कारानुसार वेगवेगळा असू शकतो. पण त्यामागची प्रस्थापित नाकारण्याची धारणा समान असते. काल़चे नवे आज जुने होत असते आणि त्याच नव्याचे परवा जुने होऊन जात असते. अशा स्थितीत जुन्यानव्याचा संघर्ष अपरिहार्य असतो. त्याला भारत वा अमेरिका अपवाद असू शकत नाही. म्हणूनच त्या घटनांतील समानता समजून घेणे अगत्याचे असते.

अमेरिकेचे नवे अध्यक्ष निवडून येऊन आता दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. पण अजून तिथे ट्रंपविरोधी मानसिकतेला नवा अध्यक्ष स्विकारणे शक्य झालेले नाही. ट्रंप हा नवा अध्यक्ष काही गैरमार्गाने वा घटनात्मकता झुगारून विजयी झालेला नाही. दोनशे वर्षे जो प्रचलीत मार्ग आहे, त्याच मार्गाने ट्रंप अध्यक्षपदी निवडून आलेले आहेत. पुर्वीचे सर्व अध्यक्ष असेच निवडून आलेत आणि त्यांना प्रत्येकाने निमूटपण स्विकारलेले आहे. मग आता त्यावर शंका घेणारे वा तोच निवडणूक निकाल नाकारणारे असहिष्णू नाहीत काय? पण मजेची गोष्ट अशी, की आपल्या त्याच असहिष्णूतेला हे लोक सहिष्णूतेची चळवळ संबोधत विरोधाचे झेंडे फ़डकावत आहेत. ट्रंप कोणत्या कारणाने निवडून आले, त्याचा विचार वा आपल्या तथाकथित सहिष्णूतेला मतदानाने का झिडकारले, त्याचे आत्मपरिक्षण करण्याची कोणालाही गरज वाटलेली नाही. त्याचे कारण उघड आहे. ट्रंप विरोधात बंड पुकारणार्‍या कोणालाही लोकशाही मूल्ये वा सहिष्णूतेशी काडीचे कर्तव्य नाही. तर त्यांचे आजवर निर्माण झालेले व प्रस्थापित झालेले हितसंबंध धोक्यात आल्याने पुकारलेले हे बंड आहे. ट्रंपविरोध आणि भारतातला मोदीविरोध तुलनेने अगदी समसमान आहेत. दोन्ही नेतेही सारखेच आहेत. राजधानी वा सत्ताकेंद्राच्या अभिजनवर्ग वा जुन्या भाषेतील सरंजामशाहीतल्या सरदारवर्ग, यांची मान्यता नसलेले सत्ताधीश; ही ट्रंप व मोदी यांच्यातील एक समानता आहे. त्यांना सामान्य जनतेचा भावनात्मक पाठींबा, हे त्यातले दुसरे साम्य आहे. तथाकथित प्रस्थापित अभिजनवर्गाची हुकूमत झिडकारून लावणे, हे त्याच दोन्ही नेत्यातील तिसरे साम्य आहे. अखेरचे वा महत्वाचे निर्णायक साम्य म्हणजे, अशा ‘उपर्‍यांच्या’ हाती सत्ता जाण्याने सत्ताकेंद्री प्रस्थापित झालेल्यांचे सर्व हितसंबंध गोत्यात आलेले आहेत. त्यामुळेच आजवर त्यांनीच पूजलेला लोकशाही ढाचा, या अभिजनवर्गाला घातक वाटू लागला आहे.

भारतात असो किंवा अमेरिकेत असो, सत्तापक्ष अनेकदा बदलले आहेत आणि नवे भिन्न पक्षाचे नेतेही सत्ताधीश झालेले आहेत. पण असे पक्ष वा त्यांचा नेताही त्याच अभिजनवर्गाची मान्यता मिळवलेला वा सत्ताधारी परिघातलाच कोणीतरी असायचा. वाजपेयी, गुजराल वा विश्वनाथ प्रताप सिंग असे नेते ल्युटीयन दिल्लीच्या वंशावळीचे सदस्य होते. पण नरेंद्र मोदी वा त्याहीपुर्वी देवेगौडा त्या वंशातले नसल्याने, त्यांचा तिथे स्विकार होऊ शकला नाही. तेच काहीसे ट्रंप यांच्याविषयी मानता येईल. आजवर हा माणुस कधीही वॉशिंग्टन वा तिथल्या कॅपिटल हिल नामक अभिजन वर्तुळात गेलेला नव्हता. किंवा तिथल्या अभिजनवर्गाची मान्यता मिळवण्याचा प्रयासही ट्रंप यांनी केलेला नव्हता. उलट शक्य झाल्यास अशा अभिजनवर्गाची हेटाळणी वा त्यांच्या अधिकाराला झुगारण्याचीच हिंमत ट्रंप यांनी केलेली होती. सहाजिकच या अभिजनवर्गाने ज्यांना वाळीत टाकलेले असते, त्यापैकी ट्रंप वा मोदी असतात. मग त्यांना सत्ताकेंद्रातील कुणा पक्षाचा सदस्य म्हणून नेतृत्व मिळालेले असो, किंवा त्यांच्या निमीत्ताने सत्ताधारी पक्ष तिथलाच, परिघातला असो. त्यांच्या पक्षीय सत्तेला आव्हान दिले जात नसते. तर त्यांच्या व्यक्तीमत्वाला आक्षेप असतो. अभिजनांच्या हुकूमतीला आव्हान, ही समस्या असते. म्हणूनच मग अशी माणसे वा त्यांच्या हाती गेलेली सत्ता, हा एकूणच समाजाला वा देशाला असलेला धोका म्हणून काहुर माजवले जाते. त्यांच्या विरोधात कुठल्याही खर्‍याखोट्या आरोपावरून गदारोळ केला जातो. कंड्या-अफ़वा पिकवल्या जातात. कारण त्या व्यक्तीपेक्षाही त्याने मिळवलेल्या जनतेच्या पाठींब्याने धोका निर्माण केलेला असतो. अशा अभिजनवर्गाने जी नैतिक हुकूमत सत्तेवर प्रस्थापित केलेली असते, त्याच जोखडाखाली जगणारा समाज, या नेत्याच्या कृतीतून व वागण्यातून समाज मुक्त होण्याचे भय अभिजनवर्गाला सतावत असते.

नोटाबंदीपासून कुठल्याही विषयात काहूर माजवून जनतेने उठाव केला नाही. तिथे अमेरिकेत ट्रंप यांच्या जुन्या आक्षेपार्ह वाटणार्‍या गोष्टी उकरून काढून, त्यांना बदनाम करण्यातूनही त्यांचा विजय रोखता आला नाही. त्याची भिती आहे. नितीमत्तेचे निकष आम्ही निश्चीत करतो आणि त्यातून सवलतही आम्हीच देतो, अशी या अभिजन वर्गाची हुकूमत असते. म्हणून व्हाईट हाऊसमध्ये लैंगिक चाळे करूनही लपवाछपवी करणार्‍या बिल क्लिंटनना शुद्ध करून घेणारेच, डोनाल्ड ट्रंपविषयी काहुर माजवतात. दिर्घकाळ हेच होत राहिले. पण आता त्यालाच शह मिळाला आहे. कोण पापी व कोण पुण्यवंत, ते ठरवण्याचा अधिकार मतदानातून जनतेने आपल्या हाती घेतला असून अभिजनवर्गाला त्यापासून वंचित व्हावे लागते आहे. लोकशाहीने आपल्या हाती मिळालेला निर्णायक अधिकार जनता पुन्हा वापरू लागली आहे आणि मधल्यामधे तो अधिकार बळकावलेल्या अभिजनवर्गाला त्यापासून वंचित व्हावे लागते आहे. त्यात जनतेचा आवाज होऊन पुढे आलेले मोदी वा ट्रंप, हे त्या खर्‍या लोकशाही मूल्याचा चेहरा झालेले आहेत. त्यामुळेच त्याचे खच्चीकरण, हाच आता जगभरच्या अभिजनवर्गाचा एककलमी कार्यक्रम झाला आहे. शपथ घेतल्यानंतर ट्रंप यांनी केलेले भाषण काळजीपुर्वक ऐकले, तर त्याचाच उलगडा होतो. ‘मागल्या काही दशकात राजधानीत केंद्रीत झालेली सत्ता व अधिकार आपण या शहराकडून काढून घेऊन अमेरिकाभर पसरलेल्या जनतेच्या हाती सोपवत आहोत’, असे ट्रंप म्हणाले. त्यानंतर अमेरिकेच्या अनेक शहरात जाळपोळ झाली. ट्रंपविरोधी आंदोलन पुन्हा सुरू झाले. त्यामागची प्रेरणा वा बोलविता धनी हाच अभिजनवर्ग आहे. मात्र त्यांच्या नैतिक पाखंडी दबावाखाली येण्याइतके मोदी-ट्रंप दुबळे शेळपट नाहीत, हे त्यांच्या लौकर लक्षात येण्याची शक्यता नाही. म्हणूनच त्याकडे दुर्लक्ष करून लोकशाही या अभिजनवर्गाची गुलाम कशी झाली, ते समजून घेतले पाहिजे.

1 comment:

  1. While I agree with most of your views about the hypocrisy of these so called liberal people, I have to say that it wouldnt be entirely correct to compare Trump with Modi. While Modi has been in Politics over about two decades, its a new territory to Trump. Hence all the decisions, speeches and actions Modi has taken after coming to powers are wise, has good research background behind it and are all inclusive. Trump has no experience of politics or running even a state,he is known for his biased speeches, narrow mindset and eccentric nature. Trump has a long way to learn, american people have elected him, so its now fair that they give him chance to perform and prove himself, these protests are idiotic and stupid and only shows their intolerance (my way or high way)

    ReplyDelete